lp08टाचणी टोचून फुगा फोडण्याची वाट का पहायची?

९ जानेवारी २०१५ या अंकामधील टाचणी आणि टोचणी या सदराखाली असणारा ‘जुने ते सोने’ हा रवि आमले यांचा लेख वाचला. अंकातील बरीचशी मते ग्रा आणि पटणारी असली तरी नवीन वर्षांत जुन्या लोकांवर एवढे ते का नाराज झाले कळत नाही. जुने-जाणते लोक आपल्या आपल्या अनुभवांच्या शिदोरीवर काही मते बनवीत असतात. सध्याचा २१व्या शतकाचा काळ हा वेगवान घडामोडींवर आधारलेला आहे. तंत्रज्ञान युगात अनेक बऱ्या-बाईट गोष्टींचा मारा आपल्यावर होत आहे. त्यामानाने पूर्वीचे आयुष्य स्थिर, शांत होते. अनेक स्तरावर चालणाऱ्या वेगवान घडामोडींमुळे तरुण वर्ग भांबावलेला तर वृद्धवर्ग हताश झालेला दिसतो. प्रत्येक गोष्टीचे वाढते बाजारीकरण, नावीन्याच्या नावाखाली चालणारी सुखलोलुपता, ऐषोआराम या गोष्टीकडे कानाडोळा करता येत नाही. प्रत्येक काळाचे जगण्याचे नैतिकतेचे निकष वेगवेगळे असतात हे जरी मान्य केले तरी पाळणाघर, वृद्धाश्रमाची वाढती संख्या, विभक्त कुटुंबपद्धती, व्यसनाधीनता, नोकरीची शाश्वती नाही, जीवनाच्या या रॅट रेसमध्ये कोठेतरी तरुणाईची दमछाक आणि वृद्धांची हताश मानसिकता याकडे दुर्लक्ष करता येत नाही. प्रत्येक काळात काळानुरूप गोष्टी घडतच असतात. त्याचा ओघ आपल्याला थोपविता येत नाही. त्यातून तुलनात्मकरीत्या विचार केला तर पूर्वीचे आयुष्य स्थिर आणि शांत वाटायला लागते. ते तसे खूपसे नसले तरी आणि मग यातूनच ‘जुने ते सोने’ हा विचार निर्माण होतो. ‘जुने ते सोने आणि नवे ते हवे’ या दोन्ही विचारांचा समन्वय हवा असे मला वाटते. आता राहता राहिला गाण्यांचा प्रश्न. सगळेच जुने ते वाईट किंवा नवीनमध्ये काही अर्थ नाही असे निकष लावू शकत नाही. इनामिनाडिका आणि चिनचिनचू या गाण्यात सांगीतिक थंडावा नसला तरी अर्थहीन शब्दांमध्ये पण गाण्याची म्हणून एक मेलडी असते ती होती. आताच्या बऱ्याचशा गाण्यांमध्ये ती असते का? दुसरे असे की, सुरेश भटांची गझल ‘मलमली तारुण्य माझे’ आणि ‘चांदणे शिंपीत जाशी’ यावर कोणी डी.जे. किंवा स्टेज शोमध्ये नाचत नाही. मग लहान लहान मुले ‘मुन्नी बदनाम हुई’, ‘शीला की जवानी’ यावर नाचतात तेव्हा ते स्तुत्य असते का? कमी कपडय़ात, कानठाळय़ा बसणाऱ्या आवाज आणि कर्कश संगीतावर नाचणारी बेफाम युवा पिढी बघून मगच उद्गार येतात ‘बाबा रे आमच्या काळी असे काही नव्हते’. याचा अर्थ उसासे सोडणं असला तरी एक प्रकारची सामाजिक मनाची काळजी असते.
‘जुने ते सोने’ असे म्हणण्यात कदाचित अशी काही कारणं असू शकतील. आजच्या काळात वेगाने घडणाऱ्या बलात्काराच्या घटना, सिनेमाचा, इंटरनेटचा वाढता प्रभाव, कमी कपडय़ात असणाऱ्या मुली, लहान मुलांचे वर्तन, त्यांची आक्रमकता सगळेच चिंतनीय आहे. त्यामुळे ‘जुने ते सोने आणि नवे ते हवे’ असे दोन मतप्रवाह न करता त्याचा सुवर्णमध्ये गाठला पाहिजे. टोचणी असली तरी टाचणी टोचून फुगा फुटण्याची वाट का पाहायची?
मीनल श्रीखंडे, पुणे.

lp09कव्हर स्टोरी उत्तम
महेंद्रसिंग धोनीची निवृत्ती जाहीर झाली आणि क्रिकेटप्रेमींमध्ये एकच चर्चा सुरू झाली. ही चर्चा सुरू असतानाच ‘लोकप्रभा’ने १६ जानेवारीच्या अंकातली ‘कॅप्टन कूल ते कॅप्टन हॉट’ ही कव्हर स्टोरी वाचनात आली. धोनीचं उत्तम नेतृत्व आता आक्रमक विराट कोहलीकडे जाण्याच्या चर्चेला उधाण आलं. या कव्हर स्टोरीत नेमकं तेच दिलंय. कॅप्टन धोनीच्या कारकीर्दीचा आढावा यामध्ये वेगळ्या स्वरूपात वाचायला मिळाला. अचानकपणे जाहीर केलेली धोनीची निवृत्ती खळबळजनक ठरली. पण, यशस्वी कॅप्टन म्हणून ओळख असलेल्या धोनीची कारकीर्द या अंकात वाचायला मिळाली. तसंच विराट कोहलीसारखा भडक डोक्याचा, सातत्याने गॉसिप्समध्ये असणारा, वेगवेगळ्या कारणांसाठी चर्चेत राहिलेला खेळाडू कॅप्टन पदाच्या खुर्चीत बसल्यावर त्या पदाच्या जबाबदाऱ्या पेलू शकेल का, कशा प्रकारे तो जबाबदाऱ्या पूर्ण करेल याविषयीचं विश्लेषण कव्हर स्टोरीत वाचता आलं.
जयेश दीक्षित, नागपूर</strong>

lp10नवं स्वरूप आवडलं
वैविध्य आणण्यासाठी ‘लोकप्रभा’ने नेहमीच वेगवेगळे प्रयोग केले आहेत. तसेच प्रयोग नवीन वर्षांतही केल्याचं जाणवलं. २०१५ च्या पहिल्याच अंकात नवी सदरं, नवे लेखक, नवे विषय हाताळलेले दिसले. तरुणांचे विषय, तंत्रज्ञान, फॅशन, वैद्यकीय सल्ला, रेसिपीज अशा वेगवेगळ्या विषयांची सदरं आवडली. नाटक, टीव्ही, सिनेमा अशा मनोरंजन क्षेत्राची सैर करणारे लेखही उत्तम. तिन्ही क्षेत्रांतल्या घडामोडी, नव्या गोष्टी, येणारे सिनेमे, मालिकांमधला ट्रेंड, नवी नाटकं असे लेख वाचण्यास आवडतात. नृत्य या विषयालाही अनेक पैलू असू शकतात, हे नृत्यविषयक सदरातल्या लेखांमुळे उमगले. सुबोध भावे यांचा ‘भावे प्रयोग’ हे सदरही वाचनीय आहे. ‘बिहाइंड थर्टी सेकंद्स’ या सदरामुळे जाहिरात क्षेत्रातही डोकावता आलं. जुन्या जाहिरातींच्या आठवणी जागवणारा ‘तीस सेकंदांच्या मागे डोकावताना’ हा लेख आवडला. फ्लॅशबॅकमध्ये गेलो. ‘कलाजाणीव’अंतर्गत येणारे फोटो आणि चित्रंही चांगले असतात. सर्वसमावेशक असं ‘लोकप्रभा’च्या नव्या स्वरूपाचं वर्णन करता येईल.
सागर शिंदे, मुंबई.

lp11वाचकांची कलाजाणीव…
‘त्या’ चित्राने अंतर्मुख केले
‘लोकप्रभा’चा प्रत्येक अंकच तसा विशेष असतो. या वेळच्या ९ जानेवारीच्या ‘कलाजाणीव’मध्ये ‘मनोज साकळे’ या चित्रकाराचे चित्र पाहिले आणि मन चाळीस-पंचेचाळीस वर्षांपूर्वीच्या काळात झर्रकन जाऊन पोहोचले. ‘आईचे पत्र हरवले.. ते मला सापडले’ या चित्रातल्या खेळात आम्ही मैत्रिणी अशाच रमून जायचो. चित्र इतके बोलके आहे की, त्यातील प्रत्येकाच्या हालचाली आणि चेहऱ्यावरचे भाव, त्यांची देहबोली अगदी अचूक टिपली आहे. ज्या भिडूवर राज्य आलं आहे, ती आपल्यापासून लांब गेल्याने निर्धास्त असलेली काही मुलं पाठमोरी आहेत आणि ज्यांच्या पाठीमागे खेळणारी मुलगी आली आहे, त्यातल्या प्रत्येकाला आपल्यामागे तर पत्र नाही ना याचा धास्ती आहे. या खेळाची इतकी सुंदर चित्ररूपी आठवण करून दिल्याबद्दल चित्रकाराचे अभिनंदन! या चित्राकडे पाहून मात्र वाटतं, हल्लीची मुलं हा खेळ खेळतच नाहीत. काचा-कवडय़ा, गजगे, टिकरी, आंधळी कोशिंबीर, कानगोष्टी असे अनेक बैठे खेळ मुले विसरलीच आहेत. मोबाइल, लॅपटॉप, टी.व्ही. यांवरचे गेम असल्याने मुलांच्या विश्वात आणि इलेक्ट्रॉनिक्स माध्यमांच्या दुनियेत अशा खेळांना आता जागाच उरली नाही! आणि आजच्या या जमान्यात, या खेळाप्रमाणे आईचं पत्र येणंही संपलंच आहे की! या खेळाच्या सुंदर आठवणी आणि चित्र पाहिल्यानंतरची खंत अशा संमिश्र भावना या चित्राने निर्माण केल्या. काळ मोठा जादूगार आहे हेच खरं!
विद्या पाटील, सोलापूर.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

‘कन्यादाना’ला द्या तिलांजली
लग्नसराई सुरू झाली की वर-वधू परीक्षा, पसंती, साखरपुडा, कार्यालय बुक करणे, याद्या बनविणे, लग्नपत्रिका वेळेवर छापवणे- पाठवणे, मग सुरू होते लगीनघाई, मेहंदी, हळद, गायन, नाच, भव्य सोहळा, मुलीची पाठवणी, त्यापूर्वी कन्यादान, वरदक्षिणा आदी आदी. जेव्हापासून ‘हम आपके है कौन’ चित्रपट प्रदर्शित झाला तेव्हापासून तर लग्ने महागडी होत चालली आहेत. नेते-अभिनेते त्यांच्या किंवा मुलांच्या लग्नात अमाप खर्च करतात. घराच्या अंगणात किंवा मंदिरात कमी खर्चात होणारी लग्ने तर बहुतेक विसरायलाच झाली आहेत.
भाजपचे एक नेते तसंच माजी राष्ट्रीय अध्यक्ष यांनी एक कोटीची कार्डे वाटून आणि २० कोटी रुपये खर्च करून आपल्या मुलाचे केले, तेव्हा तर तोंडात बोटेच घालायची वेळ आली होती. आता तर भाजप शासन असो किंवा कोणत्याही पक्षाचे, ‘कन्यादान योजना’ राबविली जाते आहे. मध्य प्रदेशात कन्यादान योजनेद्वारे मुलीला गॅस शेगडी, सिलेंडर, संसाराची भांडी तर दिलीच जातात, पण आता तर घर व शौचालयदेखील देण्याचा शासनाचा उपक्रम आहे.
प्रश्न हा उद्भवतो की, कन्येचं ‘दान’ का? व कशासाठी? पूर्वापार चालत आलेल्या परंपरेनुसार एक तर ‘कन्येचं दान’ वर वरदक्षिणा! ती पण हजारो किंवा लक्ष रुपयांची! असो.
पूर्वी मुली शिक्षित नव्हत्या, बालविवाह होत असत. त्या वेळेस एकदा ‘कन्यादान’ केले की आई-वडील आपली कर्तव्यपूर्तता करून मोकळे व्हायचे. पण जसजशी सामाजिक जागरूकता होऊ लागली, स्त्री-शिक्षणाचा प्रकाश पसरू लागला, स्त्री आर्थिक दृष्टीने स्वावलंबी झाली, हुंडा घेणे व देणे न्यायाविरुद्ध ठरू लागले. हुंडा-हत्या होऊ लागल्या. युवक-युवती हुंडा घेण्याच्या व न देण्याच्या आणाभाका घेऊ लागले, तेव्हा कन्येचं ‘दान’ का, हा प्रश्नही भेडसावू लागला आहे.
एकविसाव्या शतकात स्त्री-पुरुष समानतेचा भाव स्त्रीला विविध समान अधिकार मुलगा-मुलगी एकसमानची भावना जागृत झाली व ज्यांना एकच किंवा दोन-तीन मुलीच आहेत असे आई-वडील वृद्धावस्थेत मुलीच्या घरी राहू लागले आहेत. त्यांच्या मृत्यूनंतर मुलगीच त्यांना मुखाग्नीही देऊ लागली आहे. अशा वेळेस लग्नसोहळय़ात कन्येचं ‘दान’ का? ती काय जिन्नस आहे, तिचे ‘दान’ करायला? असाही अनुभव आहे की, दानाच्या गाईचे दात मोजत नसतात किंवा दानाची वस्तू भंडारगृहात किंवा उकिरडय़ावर फेकून दिली जाते. म्हणूनच समाजाला मला असे सांगावेसे वाटते की, पुराणपंथी कन्या‘दान’ या सोहळय़ाला आता तिलांजली द्यावी. कारण कन्या ही जीतीजागती, हाडामांसाची व्यक्ती आहे. ईश्वरनिर्मित प्रकृतीची कृती आहे. एखादा जिन्नस नव्हे. असेही म्हटले जाते की, ‘बेटी है तो कल है।’ मग समाजातल्या जागृत, शिक्षित जनतेने कन्या‘दान’ न करता मुलीला ‘वैवाहिक जीवनाचा सुखद प्रवास’ हे उद्बोधन द्यावे व सतत तिच्या पाठीशी ठामपणे उभे राहावे.
२०१५ चा सूर्योदय झालेलाच आहे, तर या सूर्योदयाच्या नवकिरणांसोबत हा नवा विचार अमलात आणावा असे मला वाटते.
म्हणूनच माझे सर्वाना सांगणे आहे की, कन्येचं ‘दान’ का? कशासाठी? मग? व्हायचं आहे नं! जागं!
– संध्या रामकृष्ण बायवार,
बानापुरा, मध्य प्रदेश.