दि. ३ जुलैच्या ‘लोकप्रभा’तील दिनेश गुणे यांचा ‘असला भ्रष्ट तरी जय महाराष्ट्र’ हा सद्य:स्थितीकडे कटू वास्तव दाखवणारा, धाडसी व बोलका लेख आहे. रयतेचे हित जपणारे लोकनायक आता इतिहासजमा झाले आहेत.
गाव, जिल्हा व राज्य पातळीवरील राजकारणात उतरलेले, प्रथम बेताची परिस्थिती असणारे अनेकजण पुढे भरपूर माया जमवताना दिसतात. सर्वसाधारण मनुष्य रोजच्या धावपळीत, पोटापाण्याच्या स्पर्धेत धावत राहिल्याने सर्व समजत असल्याने, दुर्लक्ष करणेच पसंत करतो. अन्यथा सत्ताधीशांना विरोध करणे, हे परवडण्यासारखे नसते! या पाश्र्वभूमीवर म्हणूनच सदर लेख धाडसी असे म्हणावेसे वाटते.
लहानमोठे घोटाळे तर असंख्य घडत असतात. त्यापैकी फारच थोडे पुढे उघडकीस येतात. सत्ता संपत्तीच्या मोहापायी इतकी आंधळी होते की, त्यातून अनेक कटकारस्थाने होत राहातात. पक्षबदल होण्यासाठी व करण्यासाठी लालूच हे आता उघड गुपित आहे. अनेक स्टिंग ऑपरेशन्स होतात. त्यातील काही जनतेसमोर उघडही झालेली आहेत. राजकीय क्षेत्राचा वरदहस्त असणारे ठेकेदार, माफिया यांच्या कारवायाही अशाच क्रूर प्रकारच्या असतात व त्यापायी काही पत्रकार व अधिकाऱ्यांना जीवही गमवावे लागले आहेत.
सर्वच राजकीय नेत्यांची मुजोरी, दादागिरी, दहशत सामान्य माणसाला खाली मान घालून जगत राहण्यास भाग पाडत आहे. म्हणूनच फ्रेंच राज्यक्रांतीसारखी एखादी क्रांती या देशातही घडावी, असे भाबडय़ा lp10आशावादातून म्हणावेसे वाटते.
श्यामसुंदर गंधे, पुणे.

सगळेच तसेच!
‘लोकप्रभा’ (३ जुलै) च्या अंकातील ‘असला भ्रष्ट, तरी जय महाराष्ट्र’ हा लेख वाचला. महाराष्ट्र सदन आणि अन्य प्रकरणात उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने महाराष्ट्र सदन प्रकरणात घोटाळा झाल्याचं नमूद करून राज्याचे तत्कालीन सार्वजनिक बांधकाम मंत्री छगन भुजबळांसह त्यांच्या पुत्र व पुतण्यावर गुन्हा दाखल केला. एकेकाळी ‘शिवसेना’चा ढाण्या वाघ असलेले छगन भुजबळ १९९१ मध्ये काँग्रेसमध्ये गेल्यापासून नेहमीच वादग्रस्त राहिले आहे. १९९९ च्या आघाडी सरकारमध्ये पहिल्यांदा उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री असलेल्या छगन भुजबळ यांची कारकीर्द वादग्रस्त ठरली. तेलगी स्टँप घोटाळा प्रकरणात नाव आले. परंतु तेलगी प्रकरणातून त्यांना सहीसलामत बाहेर काढले गेले. छगन भुजबळ यांच्यासाठी राजकीय पुनर्जन्म होता. परंतु त्यापासून छगन भुजबळ योग्य धडा घेतील ते भुजबळ कसले? २००४ साली पुन्हा सत्तेत आल्यानंतर त्यांनी मागील पानावरून पुढे सुरू केले. सार्वजनिक बांधकामसारखे मलईदार खाते मिळाले. भुजबळांची आता जी बाहेर आलेली सर्व प्रकरणे या खात्याची आहेत. प्रसारमाध्यमांमध्ये आमच्या कुटुंबाच्या मालमत्तेबाबत चर्चा सुरू आहे. ती निर्थक आहे, असे भुजबळ म्हणतात. परंतु एखाद्याकडे एवढी संपत्ती असू शकते? काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसच्या राजवटीत अनेक मंत्र्यांनी भरपूर भ्रष्टाचार केला आहे असे म्हटले जाते. त्या सर्वाचे धंदे एकेक करून जनतेसमोर येतील.
सुनील महादेव कुवरे, शिवडी, मुंबई.

lp11व्यसनाधीनतेला ताणतणावच कारणीभूत
‘मनोमनी’ या सदरातील डॉ. जान्हवी केदारे यांचा विथड्रॉवल सिम्प्टम्सवरचा लेख वाचला. मी हॉस्पिटलमध्ये वेगवेगळे पेशंट बघितले. त्यात विथड्रॉव्हल सिम्प्टममध्ये असणारे जास्त असतात. त्यामागचे आवश्यक ते कारण शोधायला हवे. ते कारण मला सापडले. व्यसनाधीनता वाढायला ताणतणाव हा घटक सगळ्यात जास्त कारणीभूत आहे. आजची तरुणाई व्यसनांकडे वेगाने खेचली जाते. परीक्षा, निकाल करियर, पैसा हे या गोष्टींमध्ये जर अपयश मिळाले त्यातून येणाऱ्या ताणातून बाहेर पडण्यासाठी आजचे तरुण व्यसनांचा रस्ता पकडतात. त्यासाठी त्यांना त्याच परिस्थितीत असणाऱ्या मित्रांची साथ मिळते. या मुलांचा असा समज असतो की आपले आईवडील आपल्याला समजून घेऊ शकत नाहीत. काही अंशी तो बरोबरही आहे. कारण पालक खरंच आपल्या मुलांना समजून घेतात का हा प्रश्न उभा राहतो. त्यासाठी आजच्या धकाधकीच्या जीवनात आपल्या पाल्याला त्याच्या चांगल्या वाईट काळात त्याच्याशी बोलणे करून मित्रासारखी वागणूक देऊन सर्व गोष्टी समजून घेतल्या पाहिजेत. त्यामुळे त्यांना इतर मित्रांपेक्षा घरचे आपले वाटतील. आणि तो व्यसनाकडे वळणार नाही.
त्याच बरोबर ऑनलाइन गेम खेळून सुस्तावर चालले आहेत तरुण. मैदानी खेळ खेळण्यात नि हार पचवण्यात मागे पडत आहेत. उद्विग्न होऊन सगळे प्रश्न सुटत नाहीत यासाठी मुलांचे समुपदेशन घरी व्हायला पाहिजे.
आणखी एक कारण म्हणजे लाइफ स्टाइल. आज अगदी खेडय़ातही बॉलिवूड संस्कृती चांगलीच फोफावत आहे. त्यामुळे जेव्हा मुले पार्टी करतात तेव्हा त्यात दारू असतेच. जोडीला सिगारेटही हवीच. स्पेशल पार्टीला तर ड्रग पुरवले जातात. होस्टेलमध्ये तर जवळचे पैसे संपले की मुले बीडी, तंबाखू, देशी दारू असे स्वस्त पर्याय निवडून आपली नशा भागवतात.
अलीकडे मुलीही व्यसनांच्या बाबतीत हम किसीसे कम नही या पद्धतीने वागताना दिसतात. मुलीने एखाद्या मुलाला तू ड्रिंक्स घेतोस का विचारले तर तो छे छे म्हणाला तर मुलीच्या मते तो फारच मागास ठरतो.
काही महिन्यांपूर्वी चंद्रपूर जिल्ह्य़ात दारूबंदी लागू करण्यात आली. परिणामी जिल्ह्य़ाच्या बॉर्डरवरची दारू विक्री वाढली. सरकार फक्त कायदे, जाहिराती करते, पण दारू सरसकट बंद करत नाही. डॉ. अभय बंग यांचे कुटुंब त्यासाठी काम करते, पण त्यांची दखल घेतली जात नाही यापेक्षा मोठी शोकांतिका कोणती?
डॉ. सुनील राजपूत

lp12स्वेच्छामरण असाध्य आजारपणापुरतेच!
‘लोकप्रभा’ साप्ताहिकात (१६ जून) शशिकांत काळे यांचा ‘स्वेच्छामरण’ हा लेख वाचला. ‘स्वेच्छामरण’ हे विधेयक आणले तर त्याचा गैरफायदा सधन, काही मध्यमवर्गीय व निर्धन या वर्गातील लोक घेऊ शकतात. मी बँकेत अधिकारी होते. त्यामुळे सर्व थरातील लोकांचा संपर्क यायचा. काही ठेवीदार तर बँकेत येऊन आमच्यासमोर मन मोकळे करायचे तेव्हा असे लक्षात आले की, जी वृद्ध व्यक्ती आपली आयुष्याची संपत्ती राखून असते तिच्यावर त्यांच्या मुला-मुलींचा डोळा असतो. शिवाय पैसा असल्याने वृद्धांच्या औषधपाण्यावर एक पैदेखील खर्च करीत नाहीत. अशा व्यक्ती आजारी पडल्यावर दुखणं बळावले व वेदना सुरू झाल्या तर डॉक्टरांना त्यांना मरण द्या हे सांगायला मागेपुढे पाहणार नाहीत. अतिशय सधन व्यक्ती असेल तर नातेवाईक वृद्धावर दबाव आणून साक्षीदार, डॉक्टर व इतर सर्वाना पैसे देऊन मॅनेज करू शकतात व वृद्धाला (किंवा दुसऱ्या कुणाही श्रीमंत व्यक्ती) मनाविरुद्ध स्वेच्छामरणाच्या फॉर्मवर सही करायला लावू शकतात.
निर्धन (गरीब) व्यक्तींची व्यथा तर निराळीच. घरात कमी जागा किंवा जागा नाही. पैसा काही नाही. निव्वळ मुलांवर अवलंबून. मुलांची मिळकत फार नाही. अशा परिस्थितीत सध्या तर काही जण वृद्धांना देवळासमोर आणून टाकतात किंवा तीर्थक्षेत्रात नेऊन सोडतात.
वरील दोन्ही परिस्थिती भयावह आहेत. जर हे विधेयक आणले तर वृद्ध व्यक्तींनी (विशेषत: अशिक्षित निर्धन, अंध, डोळ्यात फूल पडलेली, अपंग इ.) काय करायचे? स्वत:चा जीव कसा वाचवायचा? कारण मुलं त्यांची ब्याद नको म्हणून काही खोटंनाटं सांगून फॉर्मवर सही/अंगठा घेतील.
एकंदरीत जनसंपर्कातून आलेल्या अनुभवातून मी सांगू शकते की, जर स्वेच्छामरण हवे असेल तर ते फक्त असाध्य, वेदनादायी आजारात; ज्या वेदना पुढे कधीही कुठल्याही औषधोपचाराने थांबणार किंवा कमी होणार नाहीत, असे डॉक्टरनी लिखित स्वरूपात दिले व स्वत: रुग्णाने वेदना सहन करता येत नाहीत म्हणून डॉक्टरांकडे स्वेच्छामरणाची इच्छा व्यक्त केली व ती लिखित स्वरूपात डॉक्टर, पोलीस, निवृत्त न्यायाधीश यांच्यासमोर स्वाक्षरी करून दिली तरच त्याचा विचार व्हावा.
रोहिणी ताम्हणकर, पुणे.

lp13व्यंगचित्रांना मानाचे स्थान हवे!
कित्येक लेख लिहूनसुद्धा जो विचार मांडता येणार नाही तो बऱ्याच वेळा केवळ एका व्यंगचित्राद्वारे प्रभावीपणे व्यक्त होतो असे म्हटल्यास अतिशयोक्ती ठरू नये (व्यंगचित्रकारांचा डिक्टेटर!, प्रभाकर वाईरकर, १० जुलै). काही वर्षांपूर्वीपर्यंत राजकीय व्यंगचित्रे प्रथम पानांवर छापली जात, परंतु चालू वर्तमानात त्यांना आतील पानांच्या कोपऱ्यात अडगळीचे स्थान दिले गेल्याचे दिसते. राजकारण्यांच्या दबावामुळेच असा बदल करण्यात आला आहे असे वाटते. अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा पुरस्कार करणाऱ्या वृत्तपत्रांनी व्यंगचित्रांना पुन्हा एकदा प्रथम पानांवर मानाचे स्थान द्यावे. स्वत:ला लोकनेते म्हणवणाऱ्या पुढाऱ्यांनी या माध्यमातून करण्यात येणारी टीका स्वीकारण्याचा मोठेपणा दाखवायला हवा, परंतु वास्तवात असे घडताना दिसेल याची खात्री वाटत नाही. बर्फाच्या गोळ्यावर फक्त सरबत टाकल्यास तो चार आण्याला मिळत असे. परंतु सरबत आणि मध टाकल्यास त्याची किंमत आठ आणे असे (बर्फाचा गोळा – एक आठवण, ब्लॉगर्स कट्टा – सुरेश पटवर्धन, १० जुलै) वास्तविक गोळेवाला सरबतावर मधाऐवजी साखरेचा पाक टाकून मुलांची फसवणूक करीत असे! अमेरिकेत मिळणाऱ्या आईस कॅन्डीला (ice candy) पॉपसिकल (popsicle) म्हणतात. आपल्या येथे पॉपसिकल या शब्दाचा अपभ्रंश होऊन त्याला पेप्सी कोला असे नाव पडले. लहानपणीच्या आठवणी जागृत करणारा लेख लिहिल्याबद्दल धन्यवाद.
– केतन र. मेहेर, विरार (पूर्व).