विजया जांगळे – response.lokprabha@expressindia.com
परिसंस्थेचं पुनरुज्जीवन म्हणजे काय? जे आपण निर्माणच केलं नाही ते पुनरुज्जीवित कसं करणार? परिसंस्था हे खरंतर आपल्या आवाक्याच्या खूपच बाहेरचं जंजाळ! आपण नव्हतो तेव्हाही ते होतं, उत्तम स्थितीत होतं. व्यत्यय आपण आणला. जी गोष्ट आपण निर्माणच केली नव्हती, तिच्यात वाट्टेल तसे बदल केले. समृद्धीच्या अल्पजीवी संकल्पना साकार करण्याच्या नादात आयता लाभलेला शाश्वत, समृद्ध वारसा गमावून बसलो. परिसंस्थेच्या त्या अगम्य जंजाळातले अनेक दुवे तोडत गेलो. आता केवळ त्यातले काही अवशेष शिल्लक आहेत. मानव कितीही बुद्धिमान असला, तरी हे तोडलेले दुवे पुन्हा सांधण्याची क्षमता त्याच्यात नाही. आपण आता एकच गोष्ट करू शकतो. आपली ढवळाढवळ, आपला हस्तक्षेप कमी करणं. आपण तेवढंच करणं अपेक्षित आहे. परिसंस्था स्वतच स्वत:ला दुरुस्त करू शकते. तिचे तुटलेले दुवे सांधण्यासाठी ती स्वत: सक्षम आहे. टाळेबंदीच्या काळाने तिच्या या क्षमतेची झलक ठिकठिकाणी दाखवून दिली. ठाणे खाडी हे त्यापैकीच एक ठिकाण. या खाडीत आणि लगतच्या नद्यांमध्ये मासेमारी करणाऱ्यांनी, खाडी स्वच्छ राहावी म्हणून काम करणाऱ्यांनी आणि तिथल्या जैवविविधतेचा अभ्यास करणाऱ्यांनी त्याचा अनुभव घेतला.

योगेश पगडे.. कासडी नदी परिसरातले मूळ निवासी. त्यांच्या आजवरच्या सर्व पिढय़ांनी कासडी नदी आणि खाडी परिसरात मासेमारी करून उदरनिर्वाह चालवला. पण गेल्या २० वर्षांपासून तळोजा औद्योगिक वसाहतीतल्या सांडपाण्यामुळे, खाडीकिनारी टाकण्यात येत असलेल्या कचऱ्यामुळे आणि परिसरात ठिकठिकाणी झालेल्या भरावांमुळे जलप्रदूषण प्रचंड वाढलं. पगडे सांगतात, ‘काही वर्षांपूर्वीपर्यंत आमच्या नदीत आणि खाडीत जवळपास ४० प्रकारचे मासे मुबलक प्रमाणात आढळत. आम्ही लहान असतानाच वडिलांबरोबर मासेमारी करू लागलो. पण गेल्या २० वर्षांपासून नदी आणि खाडीत मासे मिळेनासेच झाले आहेत. पावसाळ्यात काही प्रमाणात जिताडे आणि चिवणी मासे मिळतात, बाकी सगळा दुष्काळच! पण मागचं र्वष एरवीपेक्षा वेगळं होतं. मार्च २०२० पासून एमआयडीसी बंद होती. त्यामुळे रसायनमिश्रित सांडपाणी नदी-खाडीत सोडणं बंद झालं होतं. पाण्याचा दर्जा सुधारला होता. टाळेबंदीमुळे सर्वजण घरी होते, पण खाडीत मासेमारीवर बंदी नव्हती. त्यामुळे कोळीवाडय़ातले सगळेच नदीत मासेमारीसाठी जाऊ लागले होते. आश्चर्य म्हणजे आमच्या भागात पूर्वी विपुल प्रमाणात आढळणारी पण अलीकडच्या काळात शोधूनही न सापडणारी कोळंबी मागच्या वर्षी जाळ्यात येत होती. ज्या करंजा नदीत कोणत्याही प्रजातीचे मासे आढळणं बंद झालं होतं, तिथे साधारण मेपासून सप्टेंबपर्यंत कोळंबी, टायगर प्रॉन्झ, वरा, चिवणा, जिताडा, ढोमा, वरस हे मासे मिळू लागले. माझ्या जाळ्यात दिवसाला १०-१२ किलो मासळी येत होती. ज्यांचे नदीकाठी तलाव आहेत, त्यांना सुमारे ५० किलोपर्यंत मासे मिळत. किलिस नावाचा एक सापासारखा जलचर या पूर्वी भागात आढळत असे. तो खाल्ला जातो. साधारण १०-१२ फुटांचा किलिस टाळेबंदीच्या काळात मिळाला होता.’ मानवी हस्तक्षेप केवळ काही महिने बंद राहिला, तर निसर्ग स्वतला कसा पुनरुज्जीवित करू शकतो, याचा मासेमारांना आलेला हा अनुभव!

Lok Sabha Election, Lok Sabha Election 2024,
डोके ठिकाणावर ठेवून मतदान कराल ना?
mumbai, KEM Hospital, Artificial Insemination Center, Project Stalled, Election Code of Conduct, child, Infertility, husband wife, couple for Artificial Insemination, mumbai KEM Hospital,
मुंबई : ‘केईएम’च्या कृत्रिम गर्भधारणा केंद्राला आचारसंहितेचा फटका
kanyadan, valid marriage,
वैध लग्नाकरता कन्यादान नाही, तर सप्तपदी महत्त्वाची !
Vanchit Bahujan Aghadi Changes Lok Sabha Candidates in maharashtra ahead of lok sabha 2024 Election
‘वंचित’ चा फेरबदल कोणाच्या फायद्याचा? कोणाच्या सांगण्यावरून?

पूर्वी रोडपाली कोळीवाडय़ातल्या ८० कुटुंबांचा उदरनिर्वाह पूर्णपणे मासेमारीवरच अवलंबून होता. पण आता परिस्थिती बदलली आहे. मासे मिळत नसल्यामुळे अनेकांनी उदरनिर्वाहासाठी मिळेल ते काम करायला सुरुवात केली आहे. आता जेमतेम १० कुटुंबच मासेमारी करतात. तळोजा औद्योगिक वसाहतीत रासायनिक उत्पादनं, औषधनिर्मिती, मत्स्य प्रक्रिया, शीतगृहं असे अनेक कारखाने आणि उद्योग आहेत. त्यांचं सगळं सांडपाणी नदीत सोडलं जातं. शिवाय सिडको वसाहतींच्या घरगुती सांडपाण्याचीही त्यात भर पडते. घनकचरा, राडारोडाही टाकला जातो. याविषयी पगडे सांगतात, ‘केवळ आमच्या परिसरातलंच नाही, तर अन्य ठिकाणी तयार झालेलं सांडपाणीही इथे सोडलं जातं. रोज रसायनांचे टँकर भरून आणले जातात आणि आमच्या नदी, खाडीत रिते केले जातात. काही वेळा पाण्याचा रंग बदलतो, काही वेळा दरुगधी पसरते. रेती माफिया मोठय़ा प्रमाणात तस्करी करतात. सांडपाणी प्रक्रियेचे सर्व नियम पाळले गेले आणि खाडीकाठी राडारोडा, कचरा टाकणं बंद केलं तर इथलं पर्यावरण बरंच सुधारेल. पण तसं होत नाही. काही कंपन्या योग्य ती प्रक्रिया न करताच सांडपाणी सोडून देतात. गेल्या वर्षी टाळेबंदीच्या काळात या सगळ्यावर बरंच नियंत्रण होतं आणि त्यामुळे जो फरक पडला तो आम्ही स्वत अनुभवला.’

ठाणे-बेलापूर औद्योगिक पट्टा सुरू होण्यापूर्वी ठाणे खाडी परिसरात अनेक प्रकारचे मासे आढळत होते. १९७० नंतर या भागात कारखाने उभे राहू लागले. यापैकी बहुतेक कारखाने हे रासायनिक उत्पादनांचे होते आणि त्यातलं सांडपाणी खाडीत सोडलं जात होतं. असं असूनही १९८० पर्यंत या भागात सुमारे ३० ते ३५ प्रकारचे मासे आढळत होते. पण त्यापुढच्या १० वर्षांत खाडीची परिसंस्था वेगाने बिघडत गेली आणि त्यातल्या अनेक प्रजाती नष्ट होऊ लागल्या. ऱ्हासाचा हा वेग एवढा प्रचंड होता की, अवघ्या १० वर्षांत माशांच्या प्रकारांचं प्रमाण ३०-३५ वरून दोन-तीनवर आलं.

याविषयी खाडीचे अभ्यासक प्रसाद कर्णिक सांगतात, ‘आमच्या लहानपणी ठाणे खाडीतले मासे कोळणी विकायला घेऊन येत. तेव्हा खाडीत बोयरी, निवटे, खरबी, चिमणे हे मासे मुबलक प्रमाणात मिळत. पण १९९० नंतर बोयरीला तेलाचा वास येऊ लागला. हा पहिला दृश्य बदल होता. २०००च्या सुमारास कारखाने बंद होऊ लागले. त्यानंतर रिलायन्सने या पट्टय़ातली जागा खरेदी केली आणि तिथे माहिती-तंत्रज्ञान आणि लाइफ सायन्सेसशी संबंधित कंपन्या सुरू झाल्या. त्यानंतर तेलाचा वास येणारी मासळी सापडणं बंद झालं; कारण खाडीत मासळीच उरली नाही. फक्त काही प्रमाणात निवटी आणि एक दोन प्रकारचे खेकडे उरले. ठाणे खाडीची कोळंबी म्हणून ओळखली जाणारी कोळंबी नावापुरतीही उरली नाही. गेल्या ३० वर्षांत खाडीतल्या पाण्यात एवढय़ा प्रचंड प्रमाणात प्रदूषकं मिसळली गेली आहेत की त्याची क्षारता आता प्रमाणाबाहेर वाढली आहे. पाण्यात जीवसृष्टी टिकून राहण्यासाठी त्यातल्या प्राणवायूचं प्रमाण किमान चार मिलीग्रॅम प्रति लिटर असायला हवं. ते ठाणे खाडीत जवळपास शून्यावर आलं आहे. खाडी स्वच्छ करणं आता शक्य नाही, पण ती स्वच्छ ठेवता येऊ शकते. त्यासाठी सातत्यपूर्ण प्रयत्न करण्याची गरज आहे. खाडीत गेल्या तीन-चार वर्षांत पुन्हा अगदी थोडय़ा प्रमाणात का असेना मासे मिळू लागले आहेत. १९९०च्या सुमारास खाडीत आढळणाऱ्या माशांच्या प्रजातींचं प्रमाण दोन-तीनवर आलं होतं, ते वाढून आज चार-पाचपर्यंत पोहोचलं आहे. आता निवटी आढळू लागली आहे, कोळंबी, खेकडे मिळत आहेत, पण चिंबोरी म्हणजे काळ्या पाठीचा खेकडा मात्र अद्याप दिसलेला नाही.’

कारखान्यांचं रसायनमिश्रित सांडपाणी हे एक आव्हान होतंच, पण त्याव्यतिरिक्तही काही समस्या होत्या आणि आजही आहेत. खाडीकिनाऱ्यांना कचराभूमीचं रूप आलं होतं. पालिकांनी स्वतच कचराभूमीसाठी खाडी किनारच्या जागा निवडल्या. अनधिकृतरीत्या कचरा, राडारोडा टाकणं सुरू झालं. याविषयी कर्णिक सांगतात, ‘शहरांमध्ये निर्माण होणारा राडारोडा, कचरा सारं काही या किनाऱ्यांवर टाकण्यात येत होतं. दरम्यानच्या काळात ठाण्याची लोकसंख्या वेगाने वाढत गेली. वाढत्या लोकसंख्येबरोबर कचरा, सांडपाणी सगळंच वाढलं आणि साहजिकच खाडीप्रदूषणात प्रचंड भर पडली. खाडीपट्टय़ातल्या निमखाऱ्या पाण्यात जलचरांचं खाद्य मुबलक प्रमाणात उपलब्ध असतं. पण प्रदूषणामुळे या खाद्याचं प्रमाण रोडावलं. याव्यतिरिक्त मोठी समस्या म्हणजे भराव! वाढत्या लोकसंख्येला सामावून घेण्यासाठी कोणतीही योजना हाती नसल्यामुळे खारफुटीची ठिकठिकाणी मोठय़ा प्रमाणात कत्तल करण्यात आली. मुंब्रा- दिवा- विटावा पट्टय़ातली खारफुटी तोडून टाकली गेली. २६ जुलैला निर्माण झालेली पूरसदृश स्थिती हा या खारफुटींच्या अपरिमित कत्तलीचा परिणाम म्हणता येईल.’

ठाणे-बेलापूर खाडीलगत रासायनिक सांडपाण्यामुळे होणाऱ्या प्रदूषणाची समस्या कारखानेच बंद झाल्यामुळे कमी झाली. पण या खाडीला येऊन मिळणाऱ्या नद्यांच्या काठांवर वसलेल्या कारखान्यांतून सोडण्यात येणाऱ्या सांडपाण्याचा प्रश्न आजही गंभीर आहे. यातील सर्वात महत्त्वाची म्हणजे उल्हास नदी. लोणावळा परिसरात उगम पावणारी ही नदी बदलापूर, अंबरनाथ, आंबिवली, उल्हासनगर, कल्याण, डोंबिवलीतून प्रवास करत ठाणे खाडीला येऊन मिळते. या सर्व शहरांत कमी-अधिक प्रमाणात औद्योगिक क्षेत्रं आहेत. पण या सर्व औद्योगिक क्षेत्रांत एक घटक समान आहे, तो म्हणजे सगळीकडचे कारखाने लहान किंवा मध्यम स्वरूपाचे आहेत. सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प राबवणं या सर्व कारखान्यांना बंधकारक आहे, पण आर्थिक स्थिती यथातथाच असणाऱ्या या कंपन्या नियमांची अंमलबजावणी केवळ नावापुरतीच करतात. काही ठिकाणी सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प बांधलेला असतो, पण तो बिघाड किंवा अन्य कारणांमुळे बंद असतो. त्यामुळे मोठय़ा प्रमाणावर सांडपाणी हे प्रक्रिया न करताच खाडीत सोडून दिलं जातं. प्रकल्पातून प्रक्रिया पूर्ण होऊन पाणी खाडीत सोडलं गेलं, तर प्रदूषणाचं प्रमाण कमी होऊ शकतं. टाळेबंदीच्या काळात रसायनमिश्रित सांडपाणी सोडणं बंद झाल्याचा सकारात्मक परिणाम उल्हास नदीच्या पात्रातही दिसून आला. तिथल्या मासेमारांना काही वर्षांपासून ज्या भागात मासे अजिबातच मिळत नव्हते, तिथेही ते आढळू लागले. जिथे कमी प्रमाणात मिळत होते, तिथलं प्रमाण वाढलं.

कारखान्यांतील सांडपाण्यांबाबत जे तेच घरगुती किंवा औष्णिक विद्युत प्रकल्पांतील सांडपाण्याबाबतही लागू होतं. तिथलंही सांडपाणी योग्य प्रक्रिया करून खाडी किंवा समुद्रात सोडलं गेलं तर प्रदूषण नियंत्रित राहू शकतं. याविषयी सेंट्रल मरिन फिशरीज रिसर्च इन्स्टिटय़ुटचे (सीएमएफआरआय) संशोधक अजय नाखवा सांगतात, ‘जलप्रदूषण म्हटलं की आपण फक्त कारखान्यांतून सोडण्यात येणाऱ्या सांडपाण्याचाच विचार करतो, पण प्रत्यक्षात घरगुती सांडपाण्यामुळे होणाऱ्या प्रदूषणाचं प्रमाणही मोठं आहे. टाळेबंदीच्या काळात कारखाने बंद झाल्यामुळे नदी खाडय़ांत रसायनमिश्रित सांडपाणी सोडलं जाण्याचं प्रमाण कमी झालं होतं. पण त्या काळातही घरगुती सांडपाणी खाडय़ांमध्ये आणि समुद्रात जात होतंच. ईटीपी प्लान्ट अनेक ठिकाणी असतात, पण त्यातले किती सुरू असतात, हे पाहणं महत्त्वाचं ठरतं. राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळ त्यावर लक्ष ठेवतं, पण अनेकदा शुद्धीकरण प्रकल्प बंद असतात. प्रक्रिया केलेलं पाणी खाडीत सोडलं गेल्यास प्रदूषण बऱ्याच प्रमाणात नियंत्रणात येतं. घरगुती सांडपाणीही प्रक्रिया करून समुद्रात किनाऱ्यापासून दूर नेऊन सोडलं जातं. औष्णिक विद्युत प्रकल्पातल्या सांडपाण्याचं तापमान अधिक असतं. त्यामुळे ते थेट समुद्रात सोडलं जात नाही. काही ठिकाणी ते कूलिंग टँकमध्ये साठवलं जातं आणि थंड झालं की समुद्रात सोडलं जातं. काही ठिकाणी त्याचं तापमान कमी करण्यासाठी विविध वाहिन्यांतून ते वाहून नेलं जातं आणि वेगवेगळ्या ठिकाणी सोडलं जातं.’

परिसंस्थेच्या पुनरुज्जीवनाविषयी अजय सांगतात, ‘एखाद्या भागातल्या जलचरांची संख्या रोडावण्याचं किंवा ते नाहीसे होण्याचं महत्त्वाचं कारण म्हणजे तिथल्या पाण्यातलं प्राणवायूचं प्रमाण घटणं. प्राणवायू कमी झाला की जलचरांसाठी ती जागा अनुकूल राहत नाही, पण प्रदूषणाची पातळी सातत्याने आणि दीर्घकाळ कमी राखण्यात आपण यशस्वी झालो, तर पाण्यातल्या प्राणवायूचं प्रमाण वाढून कालांतराने त्या भागात पुन्हा जलचर आढळू शकतात. खाडीतल्या जलचरांचा विचार करता काही प्रजाती केवळ हजारात १५ ते ३५ (पीपीटी) एवढीच क्षारता सहन करू शकतात, अशा प्रजाती शक्यतो नदीच्या मुखाशी किंवा किनाऱ्याजवळच आढळतात. त्यांना स्थानिक प्रजाती किंवा रेसिडेन्ट स्पिशीज म्हणून ओळखलं जातं. काही प्रजाती अशा आहेत ज्या भरती- ओहोटीबरोबर समुद्रातून खाडीत जात येत राहतात. काही प्रजाती या प्रजननासाठी येतात, काही खाद्याच्या शोधात येतात आणि निघून जातात. पण स्थानिक प्रजाती या बाराही महिने किंवा साधारण १० महिने तरी त्या भागात आढळतात. बोईस, जिताडा, निवटे, खेकडे, वाम या ठाणे खाडी परिसरातल्या स्थानिक प्रजाती आहेत. काही मासे पूर किंवा भरतीच्या पाण्याबरोबर किनाऱ्यालगतच्या भातशेतीतही येतात. खाडीत प्रदूषणामुळे मासे कमी झाले आहेतच, मात्र समुद्रातही माशांचं प्रमाण कमी झालं आहे. मासेमारीच्या चुकीच्या पद्धती हे त्यामागचं महत्त्वाचं कारण आहे. आणि मासेमारी योग्य काळात, योग्य पद्धतीने केली गेली, तर त्याचा काय फायदा होऊ शकतो, हे गतवर्षी दिसून आलं. पापलेटचं उदाहरण घेऊया. हा आपल्याकडचा अतिशय लोकप्रिय मासा असल्यामुळे त्याची वारेमाप मासेमारी केली जाते. एप्रिल-मेमध्ये त्यांची पिल्लं साधारण दोन-तीन महिन्यांची असतात, त्यामुळे आकाराने अतिशय लहान असतात. मासेमारीदरम्यान ती जाळ्यात अडकतात आणि लहान मासे विनाकारण मोठय़ा प्रमाणात मारले जातात. परिणामी जुलैनंतर पापलेट मिळण्याचं प्रमाण कमी होतं. खरंतर १६० सेंटीमीटरपेक्षा कमी आकाराचे पापलेट पकडणं योग्य नाही. मागच्या वर्षी एप्रिल-मेमध्ये मासेमारी फारशी झाली नाही. जून-जुलै आणि जवळपास अर्धा ऑगस्ट हा मासेमारीबंदीचा काळ! त्यामुळे या पापलेटच्या पिल्लांना मोठं होण्यासाठी अवधी मिळाला. त्याचा परिणाम ऑगस्टनंतर दिसू लागला. एरवीपेक्षा अधिक प्रमाणात आणि मोठय़ा आकाराचे मासे जाळ्यात आले. त्यामुळे मच्छीमारांना फायदा झाला आणि खवय्यांनाही चांगल्या दर्जाचा मासा मिळाला, टाळेबंदीचा असा सकारात्मक परिणाम दिसला. वनस्पतींच्या बाबतीत सांगायचं तर खारफुटी म्हटलं तरी त्यात अनेक प्रकारची झाडं आणि वेलींचा समावेश असतो. शिवाय समुद्राच्या पोटात वाढणाऱ्या वनस्पतीही असतात, मात्र मासे आणि अन्य जलचरांच्या तुलनेत प्रदूषणाचा वनस्पतींवर होणारा परिणाम सौम्य आहे. खारफुटींची थेट कत्तलच होते, तेव्हाच तिला धक्का पोहोचतो, पण प्रदूषणामुळे त्यांच्यावर गंभीर परिणाम झाल्याचं दिसत नाही.’

मच्छीमारांना संघटित करण्यासाठी आणि त्यांना योग्य मोबदला मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील असलेले गणेश नाखवा सांगतात, ‘मार्च २०२०च्या टाळेबंदीच्या काळात नद्या आणि खाडय़ांमध्ये मासेमारी करणाऱ्या आमच्या मच्छीमार बांधवांना सकारात्मक अनुभव आले. मार्चपासून मेपर्यंत एमआयडीसीतले कारखाने बंद होते. त्यानंतर र्निबध काहीसे शिथिल करण्यात आले, तरी ऑगस्टपर्यंत फारसे कारखाने सुरू झाले नव्हते. त्यामुळे पाण्याचा दर्जा सुधारल्याचं आणि नेहमीपेक्षा अधिक प्रमाणात मासे आढळल्याचं करंजा, रोडपाली, कल्याण-डोंबिवली भागातल्या काही मच्छीमार बांधवांनी सांगितलं. रोडपाली भागातली स्थिती अशी आहे की मासे आढळणं तर दूरच पण मासेमारी करण्यासारखी जागाही शिल्लक नाही. परंतु चार-पाच महिने एमआयडीसीतून सांडपाणी सोडलं गेलं नाही. पाऊसही पडला. खाडीकिनारे नेहमीपेक्षा थोडे स्वच्छ दिसू लागले. त्यामुळे परिसरातल्या मासेमारांनी खाडीत जाळी टाकायला सुरुवात केली आणि त्यांच्या जाळ्यात मासे येऊ लागले. पण नोव्हेंबरच्या सुमारास कारखाने पुन्हा सुरू झाले आणि खाडी पुन्हा आधीसारखीच प्रदूषित आणि अस्वच्छ झाली. खाडीपेक्षा जास्त फरक समुद्रात दिसला. समुद्रात वाहून जाणाऱ्या प्लास्टिकचं प्रमाण कमी झालं, त्यामुळे पाणी स्वच्छ दिसू लागलं. माशांचा आकार आणि प्रमाण वाढलं. त्यामुळे नद्या-खाडय़ांमध्ये सोडल्या जाणाऱ्या सांडपाण्याचं प्रमाण कमी झालं, त्यावर योग्य प्रक्रिया केली गेली, खाडीकिनारी कचरा टाकणं बंद झालं, तर स्थिती सुधारू शकते. खाडय़ा सोडून दूर गेलेले मासे परतू शकतात.’

टाळेबंदी काळातला खाडय़ा आणि नद्यांच्या परिसरात आलेला हा अनुभव केवळ प्रातिनिधिक! मुंबई आणि परिसरात अन्यही ठिकाणी नदी, खाडी आणि समुद्रात मासेमारी करणाऱ्यांना असे अनुभव आले. त्यांची निरीक्षणं पाहता, आपल्याला फक्त एकच काम करायचं आहे की काहीही करायचं नाही! आपली ढवळाढवळ थांबवायची! आधीच आपण पुरेसा हस्तक्षेप केला आहे. निसर्गाला आपल्या मार्गाने जाऊ देणं, त्याच्या वाटेत न येणं एवढीच आपली जबाबदारी आहे. परिसंस्थेचं पुनरुज्जीवन करण्याची जबाबदारी आपल्या खांद्यांवर नाही. त्यासाठी परिसंस्था स्वतच सक्षम आहे.