वेगळ्या वाटेवरचा महाराष्ट्र
पर्यटन म्हणजे काही केवळ काश्मीर किंवा केरळला जाणे नव्हे. अतिशय चांगली समृद्ध परंपरा तर आपल्या महाराष्ट्रालाही लाभली आहे. तो केव्हा पाहणार. महाराष्ट्र म्हणजेही काही केवळ अजिंठा- वेरुळ नव्हे. तर बरेच काही आहे, पण त्यासाठी आपल्याला वेगळ्या वाटेने जावे लागते. या वेगळ्या वाटा कोणत्या आणि वीकेंडच्या दोन दिवसांमध्ये त्याचे प्लानिंग कसे करायचे त्याचे मार्गदर्शन करणारा हा खास विभाग..
भारताची आíथक राजधानी असलेली मुंबई, कधीही न झोपणारी मुंबई, आणि माणसांचे लोंढेच्या लोंढे असणारी मुंबई. अशा मुंबईत भटकंतीसाठी ठिकाणे असतील तरी का, असा प्रश्न कदाचित सर्वसामान्यांना पडेलसुद्धा. परंतु मुंबईचा अगदी शहरी भाग जरी सोडला तरीसुद्धा मुंबई परिसर रमणीय आहे. फिरायला उत्तम आहे. इथेसुद्धा लेणी आहेत, मंदिरे आहेत, उद्याने आहेत, निसर्गरम्य परिसर आहे. आवश्यकता आहे ती फक्त याची माहिती करून घेण्याची. ब्रिटिश काळापासूनचा जरी मुंबईला वारसा लाभलेला असला तरी त्याच्याही किती तरी पूर्वीच्या गोष्टी इथे आहेत. प्राचीन कान्हेरी लेणी, अंबरनाथचे ८०० वर्षांपूर्वीचे शिवमंदिर या आणि अशा अनेक गोष्टी या परिसरामध्ये आढळतात.
अंबरनाथ
पुणे-मुंबई रेल्वेमार्गावरील एक स्टेशन एवढीच आपल्याला याची माहिती असते. पण याच अंबरनाथमध्ये एक अद्वितीय कलाकृती आपली वाट पाहत आहे. कल्याणपासून १२ कि.मी.वर आणि अंबरनाथ रेल्वे स्थानकापासून अवघ्या १ कि.मी.वर असणारे अंबरनाथचे शिल्पसमृद्ध शिवमंदिर. या अमरनाथमुळेच गावाचं नाव अंबरनाथ झालं असावं. वालधुनी किंवा वढवाण नदीच्या जवळ एका ओढय़ाच्या काठाशी हे मंदिर आहे. हे मंदिर म्हणजे ठाणे जिल्ह्यचे भूषणच म्हणावे लागेल. शिलाहार राजा छित्तराज याने मंदिर बांधणीला प्रारंभ केला आणि त्याचा धाकटा भाऊ मुम्मुणीराज याने हे मंदिर बांधकाम इ.स. १०६० साली पूर्णत्वाला नेले, असा उल्लेख या मंदिरावरील शिलालेखावर सापडतो. मंदिर स्थापत्यानुसार महत्त्वाचे असलेले असे महाराष्ट्रातील पहिले भूमीज मंदिर असा मान अर्थातच या मंदिराकडे जातो. या वास्तूवर कल्याणी चालुक्याचा आणि गुजरातच्या सोलंकी स्थापत्याचा प्रभाव पडलेला आहे. या मंदिरावर अंतर्बा मूर्तिकलेला बहर आलेला दिसतो. अंतराळ, सभामंडप, आणि मंदिराची सर्व अंगोपांगे यावर विविध देवदेवतांचे अस्तित्व मूर्तीरूपात आहे. शरीरसौष्ठव आणि भावपरिपूर्णता या संबंधांत तर काही शिल्पे अजोड आहेत. हे शिवमंदिर असल्यामुळे शिवाच्या विविध मूर्तीची रेलचेल या मंदिरावर पाहायला मिळते. त्यातही मरकडेयानुग्रह, उमामहेश्वर आिलगन मूर्ती, अंधकासुरवधमूर्ती, त्रिपुरांतक शिव, शिव-पार्वतीच्या विवाहाची कल्याणसुंदर मूर्ती, आणि शिव-ब्रह्मा-विष्णू आणि सूर्य यांची संयुक्त, दुर्मीळ अशी ब्रrोशानजनार्दनार्कची प्रतिमा, आणि विविध सुरसुंदरी (अप्सरा), या अगदी आवर्जून पाहाव्यात अशा मूर्ती आहेत. इतके शिल्पजडित मंदिर अगदी मुंबईच्या जवळ आहे ते मुद्दाम डोळसपणे पाहिले जावे. मुद्दाम वेळ काढून हे मंदिर पाहायला यावे. माहीतगार सोबत असेल तर उत्तमच अन्यथा सावकाशपणे एक एक मूर्ती पाहत पाहत संपूर्ण मंदिर पाहायला २ तास तरी द्यावे लागतात.
वसई किल्ला
४ मे १७३९ या दिवशी दोनशे वर्षे पाय घट्ट रोवून बसलेल्या पोर्तुगीजांचे मराठी सन्याकडून संपूर्ण उच्चाटन वसई येथे झाले. साता समुद्रापलीकडून आलेल्या उन्मत्त, धर्माधांना मराठी सन्याने संपूर्ण नेस्तनाबूत केले. उत्तरेचं फिरांगण समूळ नष्ट झालं. चिमाजी अप्पांच्या मराठी सेनेला इथे प्रचंड विजय मिळाला. ‘‘यामागे युद्धे बहुत प्राप्त झाली, परंतु मराठी फौजेस यासारखे युद्ध पडले नाही. सीमासीमाच झाली. त्याचा विस्तार लिहिता विस्तार आहे. या जागा फत्ते होणे देवाची दया आहे.’’ असे उद्गार खुद्द चिमाजी अप्पांनी काढल्याची नोंद आहे. मुंबईपासून ६५ कि.मी अंतरावर असलेल्या वसई किल्ल्यात आपण खुश्कीच्या दरवाजातून नव्याने बांधलेल्या रस्त्याने जलदरवाजाकडे जातो. वाटेतच मारुतीरायाचे मंदिर आहे. सारे कोळी बांधव त्यासमोर नारळ फोडून मगच वार्षकि मासेमारीला सुरुवात करतात. किल्ल्यामध्ये सेंट जोसेफचे मुख्य चर्च, बालेकिल्ला, बाजाराचे मदान, नोसा सिनोरा दा विदा चर्च, यशवंत बुरुज अशा वास्तू आहेत.
अर्नाळा किल्ला
विरारपासून १२ कि.मी.वर वैतरणा नदीच्या मुखाशी एका छोटय़ाशा बेटावर हा किल्ला बांधलेला आहे. याचे बुरुज वाटोळे आहेत. तटबंदी दहा मीटर उंच आणि एकसलग आहे. मूळचा किल्ला गुजरातचा सुलतान महमूद बेगडा याने १५१६ साली बांधला. वसई तालुक्यातील आगाशी गावचे पांडुरंगशास्त्री जोशी यांनी थोरल्या बाजीरावाला अर्नाळा किल्ल्याची पुन्हा उभारणी करण्यासाठी मुहूर्त काढून दिला होता. किल्ल्यामधील अष्टकोनी पाण्याचा तलाव विशेष पाहण्याजोगा आहे. शिवमंदिर, भवानी मंदिर आणि अम्बकेश्वर मंदिर अशी देवळे किल्ल्यात आहेत.
तुंगारेश्वर
वसई परिसरातील अजून एक सुंदर ठिकाण म्हणजे तुंगारेश्वर. निसर्गरम्य परिसर, आणि टेकडीवर असलेले तुंगारेश्वर मंदिर, तिथे येणारा भन्नाट वारा आपला सगळा शीण घालवून टाकतो. वसई रोड रेल्वे स्थानकापासून जेमतेम १० कि.मी. अंतरावर असलेले हे तुंगारेश्वर मंदिर आणि त्याचा परिसर मुद्दाम जाऊन पाहण्याजोगा आहे. जीर्णोद्धार केलेले शिवमंदिर इथे आहे. इथेच असलेल्या सदानंद बाबा मंदिराच्या आसपास मोरांचे दर्शनदेखील होते. घनदाट अरण्यामध्ये अजून एक ठिकाण आहे आणि ते म्हणजे तुंगारेश्वर धबधबा. वर्षां ऋतूमध्ये तर या ठिकाणी पर्यटकांची खूप मोठय़ा प्रमाणावर गर्दी असते. अनेक लोक पायथ्यापासून इथपर्यंत चालतसुद्धा येतात. अंदाजे १ तासाचे हे चालण्याचे अंतर आहे. वाटेत अनेक वृक्षांच्या कमानी, ओढे, निर्झर यांच्या सान्निध्यात चालताना थकवा जाणवत नाही. मंदिर परिसरात छोटी उपाहारगृहे असल्यामुळे चहा-नाश्त्याची सोय इथे होऊ शकते.
* मुंबई-वसई-अर्नाळा-तुंगारेश्वर-मुंबई अशी एक दिवसाची भटकंती करता येईल. आपले वाहन असले तर उत्तमच अन्यथा वसई रोडपर्यंत रेल्वे आणि पुढे रिक्षा असा प्रवास करता येईल.
* मुंबई-अलिबाग बोटीने आणि मग अलिबाग-किहीम-सासवने-कनकेश्वर-कुलाबा किल्ला-अलिबाग-मुंबई हा सागरी सफर असलेला २-३ दिवसांचा प्रवासमार्ग अगदी वेगळा होईल. मुक्कामाला अलिबाग हे ठिकाण सोयीचे आहे. जेवणाची आणि राहण्याची उत्तम आणि मुबलक सोय इथे होऊ शकते.
कान्हेरीची लेणी
भारतातील लेणी समूहातील सर्वात जास्त संख्या असणारी लेणी म्हणजे कान्हेरीची लेणी होत. जवळजवळ ११० पेक्षा जास्त अशा बौद्ध लेण्यांचा हा समूह आहे. बोरिवली स्थानकाच्या पूर्वेला १० कि.मी. अंतरावर ही लेणी आहेत. इ.स.चे पहिले शतक हा या लेण्यांचा काळ सांगितला जातो. नालासोपारा आणि कल्याण ह्या प्राचीन व्यापारी केंद्रांच्या मध्यवर्ती ठिकाणी या लेण्यांची निर्मिती झाली. लेण्यांमध्ये असलेल्या विविध शिलालेखांवरून समाजातील निरनिराळी व्यावसायिक पाश्र्वभूमी असलेल्या लोकांनी बौद्ध भिक्षूंना या लेण्यांसाठी देणग्या दिल्याची नोंद आढळते. या लेण्या पाहण्यासाठी कमीत कमी एक संपूर्ण दिवस मोकळा ठेवायला हवा. बौद्ध धर्मातील त्राता देव असलेल्या अवलोकितेश्वराची ११ डोकी असलेली मूर्ती, तसेच बोधिसत्वाच्या विविध प्रतिमा कान्हेरीला पाहता येतात. संशोधकांना भुरळ पाडणारी ही लेणी सर्वसामान्य पर्यटकांनीसुद्धा आवर्जून पाहिली पाहिजेत. कै.डॉ. शोभना गोखले यांनी या लेण्यांमधील शिलालेखांवर केलेला अभ्यास खरोखर स्फूर्तिदायक आहे. या सगळ्या परिसरात रात्रंदिवस गोखलेबाई एकटय़ा राहायच्या. त्यांनी केलेला शिलालेखांचा अभ्यास आज संशोधकांसमोर दीपस्तंभासारखा उभा आहे. हा भाग आता संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या अंतर्गत येत असल्यामुळे इथे राहण्याची परवानगी नाही.
कोंडाणा लेणी
मुंबईहून कर्जतला आता उपनगरी रेल्वेने येता येते. कर्जतपासून अंदाजे १२ कि.मी.वर आहेत कोंडाणा लेणी. अत्यंत सुंदर ठिकाण, राजमाची किल्ल्याच्या पोटात ही लेणी आहेत. काही अंतर जंगलातून चालत जावे लागते. लेण्यांपाशी पावसाळ्यात मोठा धबधबा असतो. इथल्या चत्यगृहाची कमान भक्कम आणि अत्यंत देखणी आहे. बौद्ध भिक्षूंना वर्षां ऋतूमध्ये निवास करण्याच्या हेतूने या लयनस्थापत्याची निर्मिती झाली. बारीक कलाकुसरयुक्त असे दगडातले कोरीव काम इथे केले गेले. कर्जतपासून इथे येण्यासाठी ६ आसनी रिक्षा मिळू शकतात. स्वत:चे वाहन असेल तर इथे येणे फारच सोयीचे आहे. कोंडाणे गावापाशी गाडीरस्ता संपतो आणि पुढे अंदाजे अध्र्या-पाऊण तासाची डोंगरातून रमणीय भटकंती आहे. ऐन पावसाळ्यामध्ये इथे खूपच पाऊस पडतो. परंतु सरत्या पावसाळ्यात इथे यावे. निसर्गसौंदर्य आणि त्याचबरोबर खोदीव कोंडाणा लेणी यांचा मनमुराद आस्वाद घेता येतो. कोंडाणा गावात जाताना पूर्वसूचना दिली तर जेवणाची सोय केली जाते. तसे फलक संबंधित घरांबाहेर लावलेले दिसतात.
घारापुरी
मुंबई गेटवे ऑफ इंडियापासून १ तासाच्या बोटीच्या सफारीने आपण घारापुरी किंवा एलिफंटा या शैव लेण्यापाशी पोहोचतो. घारापुरीच्या डोंगरात कोरलेले हे शैव लेणे आणि त्याच्या मध्ये असलेले सदाशिवाचे शिल्प (जे कायम त्रिमूर्ती असे चुकीचे सांगितले जाते), तसेच त्या लेण्यांमध्ये असलेली इतर शिल्पे केवळ अप्रतिम आहेत. गंगावतरण, कल्याणसुंदर, अंधकासुरवधाची मूर्ती आणि अर्धनारीश्वराची अत्यंत देखणी मूर्ती आपल्याला खिळवून ठेवतात. मुंबईच्या इतक्या जवळ असलेले हे ठिकाण मुद्दाम पहिले गेले पाहिजे. इथे मुक्कामाची परवानगी नाही, मात्र हॉटेल्स असल्यामुळे खाण्याची उत्तम सोय होते. घारापुरी बेटावर उतरल्यावर लेण्यांपर्यंतच्या रस्त्यावर दोन्ही बाजूंनी विविध वस्तूंची दुकाने थाटलेली आहेत.
तसेच सप्टेंबर ते मे या कालावधीमध्ये मुंबईहून अलिबाग आता बोटीने जेमतेम १ तासाच्या अंतरावर आले असल्यामुळे अलिबागजवळची कनकेश्वर, सासवने, कुलाबा किल्ला हीसुद्धा एका दिवसात पाहून घेता येतात. रस्त्यावरून रहदारी आणि गर्दी यापेक्षा हा जवळचा मार्ग तर आहेच, परंतु समुद्रसफरीचा आनंदसुद्धा या मार्गाने घेता येतो. मान्सून काळात मात्र ही बोटसेवा बंद असते.
वेगळ्या वाटेवरचा महाराष्ट्र
ल्ल मुंबई-अंबरनाथ-कर्जत-लोणावळा-मुंबई हा प्रवासमार्ग दोन दिवसांचा केल्यास उत्तम. सर्व प्रवास रेल्वेने करता येईल आणि अंबरनाथ मंदिर, कोंडाणा लेणी पाहता येतील. कर्जत किंवा लोणावळा इथे राहण्याच्या उत्तम सोयी आहेत.