भविष्य २०१८

निसर्गाचे आणि या पृथ्वीवर वावरणाऱ्या सजीव प्राण्यांचे एक वैश्विक नाते असते.

निसर्गाचे आणि या पृथ्वीवर वावरणाऱ्या सजीव प्राण्यांचे एक वैश्विक नाते असते. त्यातूनच निर्माण होणाऱ्या स्पंदनांतून एक अनोखा संवाद साधला जातो. फलज्योतिषशाास्त्र आणि संख्याशास्त्र ही यातील माध्यमे आहेत. गेल्या चार हजार वर्षांपासून या शास्त्राचा आधार घेऊन जगणारी असंख्य माणसे आपल्या जीवनातील सुख-दु:खाचा शोध या शास्त्राधारे घेत असतात.

फलज्योतिषशास्त्र नि संख्याशास्त्र यांचा मेळ घालून जर फलादेशाचा विचार केला तर खूपशा प्रमाणात येणारे निष्कर्ष खूपच सत्यतेच्या जवळपास आढळतात. जगण्यात सुसूत्रता आणण्यासाठी फलज्योतिषशास्त्र नि संख्याशास्त्राचा उपयोग चांगल्या प्रकारे होऊ शकतो. फलज्योतिषशास्त्रात ग्रहांची तर संख्याशास्त्रात प्रत्येक महिन्यातील सूर्यप्रवासाची मदत घेतली जाते. या दोन्ही शास्त्रांच्या समन्वयातून निर्माण होणारे २०१८ चे भविष्यनिदान विस्तृतपणे पाहू या.

या वर्षी २०१८ सालची पूर्ण बेरीज २ + ० + १ + ८ = ११ = २ येते. या २ अंकावर चंद्रगहाचा अंमल असतो. या वर्षी पूर्ण जगावर २ म्हणजे चंद्र ग्रहाचा प्रभाव असणार आहे. गेल्या वर्षी २ + ० + १ + ७ = १० यामध्ये १ आणि शून्य आहे. एक या अंकातील स्पष्टता सत्यता नि शून्यातील प्रगल्भ विचार या दोहोतून काही कठोर निर्णय घ्यावे लागतील आणि ते खूप फायद्याचे ठरतील. मात्र यांत सामान्य माणसाच्या त्यागाचीही नोंद होईल आणि भावी पिढय़ांना सुखाचे दिवस लाभतील नि जगण्याची सूत्रे बदलतील असा स्पष्ट उल्लेख गेल्या वर्षी केला होता.

या वर्षी २०१८ साली चंद्राच्या अमलाखाली येणारे हे वर्ष खूपच भावनाप्रधान असणार आहे. अश्रू नि निखळ घामाची ओळख नव्या पिढीला नव्याने होईल. त्यातून त्यांना सजगता प्राप्त होईल. कठोर श्रम, कायदा यातून नव्या भारताचे भविष्य अधिक उजळ होईल. भारताची एक कर्तृत्ववान देश म्हणून एक नवीन ओळख पूर्ण जगाला होईल. मात्र भावनिकतेचा, श्रद्धाळूपणाचा अतिरेक टाळावा.

सूर्याचा एका राशीतून दुसऱ्या राशीत जाण्याचा काळ साधारणपणे एक महिना असतो. अशा बारा राशीतून बारा महिने त्याचा प्रवास सुरू असतो. प्रत्येक राशीत असणारे त्याचे अस्तित्व नि इतर ग्रहांचे एकमेकांशी होणारे योग लक्षात घेऊन मानवी मनावर, जीवनावर होणारे परिणाम कसे असू शकतील, याचा संपूर्ण बोध या दोन शास्त्रांच्या समन्वयातून अधिक खोलवर होऊ शकतो.

आता पाहू २०१८ सालचे संख्याशास्त्र + कुंडलीशास्त्राधारे संपूर्ण वर्षांचे राशिभविष्य.

मेष (२१ मार्च ते १९ एप्रिल)

आपला जन्म २१ मार्च ते १९ एप्रिलदरम्यान झाला असेल तर या कालावर ९ अंकाचा प्रभाव असतो. २०१८ या वर्षांचा एकांक २ आहे. एकूण पाहता ९ अंकाचे २ शी फारसे जमत नाही, पण या वर्षी या दोन अंकाच्या माध्यमातून मेष राशीला आवश्यक असणारी सहनशीलता, शांतता सहज प्राप्त होईल. चिडखोर, रागीट, तापट अशा अनेक विशेषणांनी मेष राशीकडे पाहणाऱ्यांना या समंजसपणाचे खूप कौतुक वाटेल. एकूण या चंद्र-मंगळ मैत्रीच्या शुभ प्रवासात साहस, पराक्रमाबरोबर शांत संयमाची उत्तम साथ या राशीला खूपच फायदेशीर ठरणार आहे.

जानेवारी २०१८ :- नोकरी-उद्योगधंद्यात आर्थिक स्थिती चांगली राहील. नवीन परिचय, नवीन ओळख यात फारसे हळवे राहू नका. खूप संयमाने वागा. मात्र नवीन योजना, नवीन कामासाठी होणाऱ्या गाठीभेटी यशस्वी होतील. आरोग्याची काळजी घ्यावी.

फेब्रुवारी २०१८ :-  काही वैचित्र्यपूर्ण अनुभव येतील. येणाऱ्या प्रत्येक प्रसंगाला शांतपणे सामोरे जा. अतिउत्साह, आततायीपणा टाळा. अतिगोंधळ, बेपर्वाई टाळा. निर्णय शांतपणे घ्या. शांतपणे घेतलेले निर्णय सफलता देतील. खूपशा ठरवलेल्या गोष्टींना मूर्त स्वरूप प्राप्त होईल. निर्थक गोष्टींची चिंता करू नका.

मार्च २०१८ :- आत्मविश्वास वाढवा म्हणजे आपल्या कार्याला गती प्राप्त होईल. गुप्त शत्रूंचा त्रास वाढेल, तेव्हा उद्योग-धंद्यात खूप काळजीपूर्वक लक्ष द्या. संयमाने बोला. त्यातून आपली प्रतिष्ठा वाढेल. प्रतिष्ठित लोकांचा सहवास लाभेल. त्यातून समाधान लाभेल.

एप्रिल २०१८ :- रवी-शुक्राच्या सहकार्यातून आपण आखलेल्या योजनांची पूर्तता होईल. गुरूच्या उत्तम दृष्टीतून बुद्धिमता नि आत्मविश्वासातून खूपशी बोलणी यशस्वी होतील. आर्थिक बाजू चांगली राहील. मात्र पैसा जपून वापरावा.

मे २०१८ :- बुध-शुक्राचे उत्तम सहकार्य लाभेल. अनपेक्षित संधीतून मोठी सफलता मिळणे शक्य. त्यात मनाला सावरण्याचे बळ मिळेल. बुद्धी, मन यांतील गोंधळ दूर होईल. अतिभावनिक होणे टाळा. बुद्धीतून संयम, शांतता लाभेल. नको त्या गोष्टींना फारसे महत्त्व देऊ नका. वादविवाद टाळा.

जून २०१८ :- पराक्रमात येणारा रवी खूप महत्त्वाचा ठरेल. गुरूमुळे उद्योग-नोकरीतील अडचणींवर मात करू शकाल. मनाची ताकद उत्तम साथ देईल. मात्र परिस्थितीचे योग्य भान ठेवून निर्णय घ्यावे लागतील. घाईगर्दी, धावपळ टाळणे हिताचे ठरेल. समस्या दूर होतील. मात्र प्रलोभने टाळा. अतिविश्वास ठेवणे चुकीचे ठरेल.

जुलै २०१८ :- कुटुंबात गैरसमज, वादविवाद टाळा, संयम आणि शांततेने प्रश्न सुटतील. उद्योगधंदा, नोकरीत वरिष्ठांशी मतभेद टाळा. समजुतीने, शांतपणे घेतलेले निर्णय यश देतील. पैसा जपून वापरा. महिनाअखेरीस गैरसमज दूर होतील.

ऑगस्ट २०१८ :- स्वराशीतील रवीचे आगमन खूपशा गोष्टींना फलदायक ठरेल. एकूण घरातील वातावरण आनंदी राहील. लहानमोठे वाद, गैरसमज दूर होतील. संयम, शांततेतून खूपसे समाधान लाभेल. नवीन योजनांसाठी वेळ द्यावा लागेल.

सप्टेंबर २०१८ :- बुध-शुक्राच्या उत्तम योगातून खूपशा दिलासा देणाऱ्या घटना घडतील. नवीन जागा घेताना कागदपत्रे आणि कायद्याची चौकट सांभाळा. लहानशा फायद्यासाठी मोठे नुकसान नको हा विचार कायम मनात असू द्या.

ऑक्टोबर २०१८ :- काहीसा त्रासाचा, मनस्तापाचा काळ. महत्त्वाचे निर्णय त्वरित घेऊ नका. धंद्यात नफ्यातोटय़ाची बाजू समजून घेऊन पुढचे व्यवहार करा. घरातील नातेसंबंध जपा. खाण्याचा अतिरेक टाळा. आरोग्य जपा. शक्यतो रात्रीचा प्रवास टाळा.

नोव्हेंबर २०१८ :- लाभात येणारा रवी नवीन विचार, नवीन कल्पना, आनंदी जगण्यासाठी खूपच मदत करील. नेहमीचा गोंधळ, चिडखोरपणा कमी होईल. दुसऱ्याच्या व्यथा, दु:खे समजून घ्या. प्रवासातील ओळखी, प्रेमप्रकरण यांत फारसे गुंतू नका. वचने, शब्द देऊन स्वत:ची कोंडी करू नका. स्थिरता बाळगा.

डिसेंबर २०१८ :- स्वराशीत शुक्र, प्रवासाचे योग येतील. उत्साह वाढेल. नवीन योजना आखाल. संयमाने वागा, अतिरेक टाळा. नम्रतेने वागा. त्यातून महत्त्वाची कामे मार्गी लागतील. उद्योगधंद्याच्या प्रगतीसाठी उत्तम काळ. समाजकार्यात, राजकारणात सावधतेने वागा. फार स्पष्ट बोलू नका.

वृषभ (२० एप्रिल ते २० मे)

२०१८ साल २ + ० + १ + ८ = ११ = १ + १ = २ या अंकावर चंद्र ग्रहाचा प्रभाव अखंड वर्षभर असणार आहे. २० एप्रिल ते २० मे या काळात ज्यांचे जन्म झालेत त्यांच्यावर शुक्र ग्रहाचे म्हणजे ६ अंकाचे वर्चस्व असणार आहे. एकूण २ आणि ६ हे एकमेकांचे उत्तम मित्र आहेत. त्यामुळे दोघांच्या गुणातून निर्माण होणारी अतिसोशिकता, शांत स्वभाव खूपसा त्रासदायक ठरू शकतो. कारण अतिसोशिक वा शांत माणसे जगात बावळट ठरतात. तेव्हा या सद्गुणाचा वापर करताना खूप खुबीने जगता आले पाहिजे. विशेषत: आर्थिक व्यवहार मानसिक गुंतवणूक करताना खूपच काळजीने वागावे.

जानेवारी २०१८ :-  शुक्राचे शुभसंकेत पाठीशी आहेत त्यामुळे उद्योगधंद्यात-नोकरीत खूप उत्साही-आनंदी वातावरण  राहील. आपण केलेल्या मेहनतीचे चीज होईल. खूपशा अडचणींना पर्याय सापडतील. पैशाची आवक वाढेल नि खर्चाचे प्रमाण वाढेल.

फेब्रुवारी २०१८ :- बुध-शुक्राची उत्तम साथ उद्योगधंद्यातील नोकरीत नवीन योजना उत्तम रीतीने पार पडतील. आपल्या कार्यक्षेत्रात आपल्या शब्दाला किंमत येईल मात्र शब्द जपून वापरा. वागण्यातील संयम खूप मोलाचा ठरेल.

मार्च २०१८ :- बुध – शुक्राचा उत्तम प्रभाव जुने गैरसमज दूर होतील. नवी नाती नवीन परिचयातून आनंद लाभेल. जुन्या मित्रमंडळींच्या भेटीगाठीतून जुन्या आठवणींना उजाळा मिळेल. व्यसने जागरणे कटाक्षाने टाळा. आरोग्याची काळजी घ्या.

एप्रिल २०१८ :- स्वराशीतील शुक्रामुळे उत्साह वाढेल. काहीशा मागे राहिलेल्या कामांना गती प्राप्त होईल. उद्योगधंद्यासाठी उत्तम काळ. सामाजिक कार्यात राजकारणात उत्तम संधी प्राप्त होईल. स्वत:चे वेगळेपण जरूर जपा. पण स्वत:ला अगदीच वेगळे समजू नका.

मे २०१८ :- उत्तम प्रसन्नतेचा काळ. लहान लहान घटनांतून आनंद मिळेल. नोकरीत उत्तम संधी, प्रमोशन, मनासारखे काम मिळेल. नव्या ओळखी नवीन परिचयातून कामे सुरळीत पार पडतील. जागरणे, वेळी-अवेळी जेवणे टाळा, विशेषत: पोटाची काळजी घ्या.

जून २०१८ :- रवी-शनीच्या प्रतियोगातून खूपशा कामांत नाराजीचा सूर, अडथळे विलंब येईल. पण पुढील १५ दिवसांत हे चित्र बदलेल नि कामाला गती प्राप्त होईल. मात्र खूपशाबाबतीत ठाम निर्णय घेणे जरुरीचे ठरेल.

जुलै २०१८ :- केलेल्या मेहनतीचे चीज होईल. नवीन कामे, नवीन योजना यातील सकारात्मक बदल खूपच फायद्याचे ठरतील. मात्र अतिभावनावश होणे, भावुक होणे टाळा. गंभीर विचार करून कुटुंबातील निर्णय सोपे करू शकाल. कौटुंबिक आनंदातला सहभाग सुखदायक ठरेल.

ऑगस्ट २०१८ :- काहीसे संभ्रम निर्माण होणारे विचार मनात येतील. कामाचा व्याप वाढेल. अचानक आलेल्या समस्यांना सामोरे जाणे जरुरीचे ठरेल, पण त्यातून पैशाची हानी होणार नाही; मात्र कुठेही वादग्रस्त भूमिका घेऊ नका.

सप्टेंबर २०१८ :- उद्योगधंद्यात, नोकरीत कामाचा ताण वाढेल, मात्र या महिन्यात स्वत:ला सावरण्याचे बळ लाभेल. विशेषत: जगण्याचा दृष्टिकोन बदलेल. वेळ आणि काम यांचा उत्तम समन्वय साधण्याचे कसब हळूहळू जमू लागेल नि पुढील कामाचे स्वरूप अधिक सोपे होईल.

ऑक्टोबर २०१८ :- षष्ठातील रवीमुळे खूपशा समस्यांचे स्वरूप अधिक सोपे होईल. ओळखी परिचयातून महत्त्वाची कामे मार्गी लागतील. आर्थिक लाभातून येणारे पैसे हाती येतील. आत्मविश्वास वाढेल. आरोग्य चांगले राहील.

नोव्हेंबर २०१८ :-  खरं तर गरज असेल तिथेच संघर्ष करा. कारण संघर्षांतून मिळणारे यश मनाला समाधान देणारे असावे. ओढूनताणून केलेली कामे मनाला तापदायक ठरतात. तसेच मोठय़ा अपेक्षा जरूर ठेवाव्यात पण तितकाच संयम, नम्रता असावी.

डिसेंबर २०१८ :- हा काळ काहीसा परीक्षेचा जाणवेल. आपल्या जवळच्या लोकांकडून केलेल्या अपेक्षा पूर्ण होणार नाहीत. त्यांच्यावर सोपवलेल्या जबाबदाऱ्या ते आपल्याला साभार परत करतील. तेव्हा तुम्ही कुठेही वादग्रस्त भूमिका न घेता सामोपचाराने वागण्यात  फायदा आहे. पुढे सरकणारा रवी निश्चित उत्साह, यश देईल.

मिथुन (२१ मे ते २० जून)

२०१८ साल २ + ० + १ + ८ = ११ = १ + १ = २ या अंकावर वर्षभर चंद्र ग्रहाचा प्रभाव असणार आहे. २१ मे ते २० जूनदरम्यान ज्यांचे जन्म झालेत अशा लोकांवर बुध ग्रहाचा म्हणजे ५ अंकाचा अंमल असणार आहे. २ आणि ५ अंकांच्या प्रभावाखाली मिथुन राशीचा वर्षभराचा प्रवास सुरू होईल. बुद्धी आणि मन यांचा उत्तम समन्वय साधून ही रास पुढे सरकेल. एकूण मनातील सुप्त विचारांकडे बुद्धीच्या नजरेतून पाहिले की परिणामांची जाणीव अधिक सूक्ष्म होते. सुख-दु:खाच्या रेषांना कुठेही स्पर्श न करता मानसिकता स्थिर ठेवण्यात ही माणसे यशस्वी ठरतात.

जानेवारी २०१८ :- गुरूचे उत्तम सहकार्य. शनीच्या विद्रोही वागण्याला खूपच वचक राहील. अडचणीचे रूपांतर अनुभवात होऊन खूपशा कामात सहजता प्राप्त होईल. आपण आखत असलेल्या कामात गती प्राप्त होईल. मित्रमंडळीत, सामाजिक कार्यात आपल्या विचारांचे स्वागत होईल.

फेब्रुवारी २०१८ :- अचानक सुरू झालेला विरोध हळूहळू मावळेल. आपल्याविरोधात उभे राहिलेल्यांचे डावपेच त्यांच्याच अंगाशी येतील. मात्र गाफील राहणे, स्वस्थ बसणे यापासून दूर राहा. कामाचे वेळापत्रक ठरवा. अतिविश्वास, अतिअवलंबून राहणे कटाक्षाने टाळा.

मार्च २०१८ :- या महिन्यातील रवीचा उत्तम प्रवास आपल्या आनंदात नक्कीच भर घालील. आर्थिक आवक वाढेल. तितकेच खर्चाचे प्रमाणही वाढेल. काही महत्त्वाच्या घटना खूप आनंद देतील. आपण केलेल्या कामाचे भरभरून कौतुक होईल. अतिश्रम, दगदग टाळा.

एप्रिल २०१८ :- उत्तम प्रसन्नतेचा काळ. नोकरी- उद्योगधंद्यात नवीन संधी प्राप्त होतील. त्यातून आपल्या नवीन कल्पना, नवीन सूचनांचे स्वागत होईल. कामाचे स्वरूप व्यापक होईल. धावपळ वाढेल. पण उत्साह राहील.

मे २०१८ :- समजुतीने वागण्यातून खूपशा गोष्टींना सहजता प्राप्त होते, याचा प्रत्यय या महिन्यात येईल. सामाजिक कार्यात, राजकारणात आपण आखलेल्या योजना उत्तम पार पडतील. प्रेम प्रकरणात मनस्ताप, हुरहुर होईल. अशा गोष्टींपासून दूर राहावे. निराशा टाळा.

जून २०१८ :- हा महिना तसा त्रासाचा वाटला तरी आर्थिक बाजू उत्तम राहील. प्रत्येक बाबतीत अतिचिकित्सकपणा दाखवू नका. तसेच प्रथमदर्शनी आपले मत तात्काळ मांडू नका. उद्योगधंद्यातले डावपेच ओळखून सावधतेने निर्णय घ्या. वादविवाद टाळा.

जुलै २०१८ :- बोलण्यात कुठेही तोल ढळू देऊ नका. जुनी येणी वसूल होतील. खूपशा गोष्टींचे संदर्भ कळल्याशिवाय मते मांडू नका. वास्तव जाणून घेणे हिताचे ठरेल. कुठल्याही बाबतीत स्पर्धा करू नका. विशेष म्हणजे मानसिक संतुलन जपून कामे करा. म्हणजे कामातील आनंद खऱ्या अर्थाने मिळेल.

ऑगस्ट २०१८ :- गुरू-शुक्र आपसांतील मतभेद विसरून आपल्या मदतीला आले आहेत. सामाजिक, राजकीय क्षेत्रात आपला ठसा उमटेल. महत्त्वाची कामे मार्गी लागतील. आपल्यापाशी असलेल्या दूरदृष्टीचा खऱ्या अर्थाने उपयोग होईल. मात्र फार स्पष्ट बोलणे टाळा.

सप्टेंबर २०१८ :- आपल्यासाठी हा महिना संमिश्र स्वरूपाचा आहे. उद्योगधंद्यात, नोकरीत आपली सतर्कता अतिमहत्त्वाची ठरेल. प्रवासाचे योग येतील, धावपळ वाढेल. मात्र फायद्याचे अंदाज खरे ठरतील नि त्यातून पैशाची आवक वाढेल.

ऑक्टोबर २०१८ :- नवीन कल्पना, नवीन योजना यांमधून उद्योगधंद्यात प्रगती होईल. घरातील वातावरण आनंदी राहील. बौद्धिक आणि राजकीय क्षेत्रातील व्यक्तीशी नव्याने परिचय होतील. आपल्या नवीन कल्पनांचे स्वागत होईल.

नोव्हेंबर २०१८ :- विरोधाचे प्रमाण कमी होईल. खूपशा बाबतीत अनुकूलता प्राप्त होईल. कौटुंबिक समस्या दूर होतील. नवीन कामातून आर्थिक लाभ, धार्मिक कार्यात विशेष सहभाग, जागेत, जमिनी खरेदीत पैसे गुंतवणे फायद्याचे ठरेल.

डिसेंबर २०१८ :- आपल्या ठोस निर्णयातून आपले वेगळेपण सिद्ध कराल. मात्र हळवेपणा, दबाव यातून कोणतेही निर्णय घेऊ नका. मात्र त्यामागील सत्यता अवश्य तपासा. आर्थिक गुंतवणूक करताना वरिष्ठाशी सल्लामसलत करणे गरजेचे ठरेल. कामाच्या व्यापकतेतून दगदग वाढेल.

कर्क (२१ जून ते २० जुलै)

२०१८ साल २ + ० + १ + ८ = ११ = १ + १ = २ या अंकावर चंद्र ग्रहाचा प्रभाव असतो. २१ जून ते २० जुलैदरम्यान ज्यांचे जन्म झालेत त्या लोकांवर चंद्राचा प्रभाव असणार आहे. एकूणच या वर्षी कर्क राशीवर चंद्राची जास्तच मेहेरनजर असणार आहे. वर्ष दिवसाच्या हिशेबाने जगण्यापेक्षा मनाने जगणे खूप महत्त्वाचे असते. अंतर्मनाच्या सामर्थ्यांत खूप मोठी ताकद असते. चांगले विचार, सकारात्मक मन नेहमीच यशाच्या वाटेवर उभे असते. असा अनुभव या वर्षी कर्क राशीला येईल.

जानेवारी २०१८ :- आपल्या राशीला येणारा सहावा शनी खूप मोलाची कामगिरी करील. नव्या योजना, नव्या कल्पना यशस्वी ठरतील. प्रवासाचे योग येतील. विनय, नम्रतेतून यश अधिक व्यापक होईल. उद्योगधंद्यात, नोकरीत कामाची व्यापकता वाढत राहील.

फेब्रुवारी २०१८ :- या महिन्यातील शुक्र सहवास खूप शुभदायक ठरेल. प्रेम प्रकरणातून विवाह जमतील. उद्योगधंद्यात, नोकरीत खूपच सतर्क राहा. नातेवाईक, मित्रमंडळींच्या भेटीतून एक अनोखा आनंद प्राप्त होईल. प्रवासाचे योग जुळून येतील. एकूण हा महिना मानसिकदृष्टय़ा खूप चांगला जाईल.

मार्च २०१८ :- उद्योगधंद्यात, नोकरीत उत्तम आवक राहील. घरातील वातावरण आनंदी राहील. नवीन योजनांचे प्रारंभ मनाला आनंद, समाधान देतील. कर्तृत्वाला चांगला वाव मिळेल. नवीन परिचयातून उद्योगधंद्यात मदतीचा उत्तम हात लाभेल.

एप्रिल २०१८ :- आपण स्थिरपणे राहून घेतलेले निर्णय आपल्या फायद्याचे ठरतील. गैरसमजुतीतून निर्माण झालेले वाद सामोपचाराने मिटतील. कुटुंबात आनंद निर्माण होईल. आरोग्य उत्तम राहील. एकूण हा महिना जरी खूप धावपळीचा गेला तरी त्यातून मिळालेले समाधान खूप मोलाचे ठरेल.

मे २०१८ :- बुध-शुक्राच्या सहकार्यातून उद्योगधंद्यात, नोकरीत येणाऱ्या अडचणी फार काळ टिकणार नाहीत. अचानक खर्चाचे प्रमाण वाढले तरी जुन्या येण्यातून पैशाचे गणित सोपे होईल. थोडय़ाशा घरगुती समस्या वाढतील, पण रवीच्या उत्तम सहवासातून त्या सहज दूर होतील.

जून २०१८ :- आत्मविश्वास वाढेल. पण गैरसमजुतीतून निर्माण झालेले वाद आणखी वाढवू नका. त्यात दोन पावले मागे येणे शहाणपणाचे ठरेल. कामातील महत्त्वाच्या योजना मार्गी लागतील. त्यातून प्रगतीची दारे उघडतील आणि मेहनतीचे चीज होईल.

जुलै २०१८ :- राजकीय, सामाजिक कार्यात आपला सहभाग महत्त्वाचा ठरेल. जवळच्या मित्रमंडळीकडून मिळणारा पाठिंबा उत्साह देईल. शब्द जपून वापरा. संयम, समंजसपणा खूप कामाचा ठरेल.

ऑगस्ट २०१८ :- आपल्या चतुरस्रपणाचे कौतुक होईल. कला, विज्ञान नि शिक्षण क्षेत्रात नवीन संधी प्राप्त होतील. नवीन जबाबदाऱ्या वाढतील. अचूक वेळ, अचूक कामे यांचा उत्तम समन्वय साधू शकाल.

सप्टेंबर २०१८ :- रवी, शनीचे उत्तम सहकार्य या महिन्यात लाभेल, मात्र उद्योगधंद्यात, नोकरीत सध्या बदल करू नका. नवीन कामे जरूर स्वीकारा. ती यशस्वी ठरतील. पाहुण्यांची ये-जा वाढेल. हळवेपणातून नकारात्मक विचारांचे काहूर मनात येईल. शक्यतो या मानसिकतेपासून दूर राहा.

ऑक्टोबर २०१८ :- मानसिक स्थितीत खूपसा बदल होईल. शांत वातावरण, प्रार्थना यातून आत्मविश्वास वाढेल. त्यातून महत्त्वाची कामे पार पाडाल. थोरामोठय़ांच्या गाठीभेटीतून नवीन विचार प्रेरणादायक ठरतील. आर्थिक बाजू स्थिर राहील. भावनांवर नियंत्रण असू द्या. त्यातूनच उत्साह वाढेल.

नोव्हेंबर २०१८ :- गुरू, शुक्र, शनी या त्रयीचा उत्तम आशीर्वाद या महिन्यात आपल्याला लाभत आहे. घरातील वातावरण आनंदी राहील. सरकारदरबारी कामात यश लाभेल. नवीन उद्योगधंद्यांच्या सुरुवातीसाठी उत्तम काळ. आर्थिक स्थिती चांगली राहील.

डिसेंबर २०१८ :- रवीचे उत्तम बळ आपल्या पाठीशी ठामपणे उभे आहे. तेव्हा महत्त्वाची कामे उरकून घ्या. लक्षात असू द्या, आजचे कठोर निर्णय तुमचा उद्याच्या जगण्याचा मार्ग सोपा करतील. उद्योगधंद्यात, नोकरीत श्रम आणि योग्य ठिकाणी बुद्धीचा वापर निश्चित यश देईल.

सिंह (२१ जुलै ते २० ऑगस्ट)

२०१८ साल २ + ० + १ + ८ = ११ = १ + १= २  या अंकावर संपूर्ण वर्षभर चंद्र ग्रहाचा अंमल असणार आहे, तर २१ जुलै ते २० ऑगस्टदरम्यान ज्यांचे जन्म झालेत त्या लोकांवर रवीचा प्रभाव असणार आहे. रवीचा अंक १. एकूण सिंह राशीवर वर्षभर २ आणि १ या अंकांचा प्रभाव राहणार आहे. साहस नि उत्तम बुद्धिमत्ता यांचा विशेष प्रभाव सिंह राशीवर प्रामुख्याने दिसून येतो. कष्टातून, पराक्रमातून ही पुढे येणारी रास यंदा २ या अंकाचा समजूतदारपणा, समंजसपणा या गुणांनी अधिक विनयशील होईल.

जानेवारी २०१८ :- रवीच्या उत्तम सहकार्यातून खूपशा कामांना गती प्राप्त होईल. उत्साह वाढेल. मनासारखी कामे होतील. महत्त्वाचे निर्णय घेण्यासाठी वेळ घालवू नका. जमीन- घराची खरेदी-विक्री करताना वा पैशाचे मोठे व्यवहार करताना खूप काळजी घ्या. कौटुंबिक प्रश्नात जातीने लक्ष घालून अडचणी दूर करा.

फेब्रुवारी २०१८ :- गेल्या महिन्यांत घेतलेले निर्णय योग्य ठरतील. आपल्या निर्णयक्षमतेतून आपली एक चांगली प्रतिमा तयार होईल. आपल्या कुशल कामपद्धतीची प्रशंसा होईल. सामाजिक-धार्मिक कार्यात आपला महत्त्वाचा सहभाग राहील. त्यातून नवीन परिचय होतील.

मार्च २०१८ :- बऱ्याच नवीन जबाबदाऱ्या वाढतील. अचानक जुनी येणी वसूल होतील. उद्योगधंद्यातील गैरसमज दूर होतील. आलेले पेचप्रसंग उत्तम तऱ्हेने हाताळू शकाल. शक्यतो नात्यात मानापमानाचे प्रसंग, वादविवाद टाळा. नवीन संधी, नवीन योजना यांत आपले असणे महत्त्वाचे ठरेल.

एप्रिल २०१८ :- काही वैचित्र्यपूर्ण अनुभव येतील. येणाऱ्या प्रत्येक प्रसंगाला शांतपणे सामोरे जा. अतिउत्साह आणि आततायीपणा, गोंधळ, बेपर्वाई नि विशेष म्हणजे आळशीपणा टाळा. नेटाने आणि शांतपणे घेतलेले निर्णय फायद्याचे ठरतील. निर्थक गोष्टी मनात ठेवू नका.

मे २०१८ :- रवी-शुक्राची उत्तम मदत, त्यामुळे महत्त्वाची कामे पार पडतील. आपली सात्विकता खूपशा कामात महत्त्वाची ठरेल. परिश्रम आणि बुद्धीच्या समन्वयातून नवीन कामांना गती लाभेल. त्यात आपल्या परिश्रमाचे कौतुक होईल.

जून २०१८ :- या महिन्यात थोडीफार धावपळ वाढेल. त्यातून येणाऱ्या समस्यांशी सामना करावा लागेल. पण त्यात संयम, शांतता ढळू देऊ नका. उद्योग, नोकरीच्या क्षेत्रात आपला वेगळा ठसा उमटेल. आपण मनात उभारलेली स्वप्ने पुरी होतील.

जुलै २०१८ :- हा काळ काहीसा परीक्षेचा ठरेल. हाती घेतलेल्या कामात दिरंगाई करू नका. खूप काळजीने कामे करा. आर्थिक देण्या-घेण्याच्या व्यवहारात वावरताना खूप सावधानता बाळगा. घाईगर्दीत कुठल्या कामांना प्राधान्य द्यायचे ते शांतपणे ठरवा.

ऑगस्ट २०१८ :- उत्तम, प्रसन्नतेचा काळ. खूपशा घटना आनंद देतील. नोकरीत उत्तम संधी, प्रमोशन, मनासारखी बदली अशा सुखद बातम्या कानावर येतील. नवीन ओळखी, परिचय लाभदायक ठरतील. जागरणे, वेळी-अवेळी जेवणे टाळा.

सप्टेंबर २०१८ :- गुरू-शनीच्या त्रिएकादश योगातून खूपशा गोष्टी मार्गी लागतील. एकूण सुख म्हणजे उत्तम मन:स्थिती असा अनुभव या महिन्यात येईल. कोर्ट-कचेरीची कामे मार्गी लागतील. खूपशा समस्या परस्परांच्या समजुतीने दूर होतील. पैशाची आवक वाढेल. पुरेशी विश्रांती लाभेल.

ऑक्टोबर २०१८ :- रवी, शुक्र, बुधाची उत्तम साथ. उद्योगधंदा- नोकरीत यश. मात्र साहसी, धाडसी निर्णय तूर्त घेऊ नका. नोकरी बदलणे, धंदा बदलणे या गोष्टी करण्यास हा काळ योग्य नाही. कौटुंबिक प्रश्न समजुतीने सोडवा.

नोव्हेंबर २०१८ :- शनी-शुक्र उत्तम योग. त्यामुळे उद्योगधंद्यात- नोकरीत लाभदायक घटना घडतील. आपसांतील आणि मैत्रीतील मतभेद दूर होतील. नव्या योजनांची सुरुवात होईल. त्यातील अडथळे सहज पार करू शकाल. पैशाचे व्यवहार जपून करावेत.

डिसेंबर २०१८ :- मेहनत केली की फळ जरूर मिळतेच असा अनुभव आपल्याला येईल. रखडलेल्या कामांना गती मिळेल. जुनी येणी वसूल होतील. पैशाची आवक वाढेल. घरातील वातावरण आनंदी राहील. मित्रमंडळींच्या भेटीतून आनंद मिळेल. प्रवासाचे योग जुळून येतील.

कन्या (२१ ऑगस्ट ते २० सप्टेंबर)

मिथुन आणि कन्या या दोन्ही राशी बुधाच्या प्रभावाखाली येतात. मिथुन ही वायू तत्त्वाची तर कन्या ही पृथ्वी तत्त्वाची रास. २०१८ सालचा एकांक २ येतो. तर २१ ऑगस्ट ते २० सप्टेंबर या दरम्यान ज्यांचे जन्म झालेत त्या लोकांवर कन्या राशीचा म्हणजे बुधाचा अंमल असतो. बुधाचा अंक ५. या वर्षी मिथुन राशीवर २ आणि ५ या अंकाचा प्रभाव असणार आहे. विद्वत्ता आणि मन यांचा सुरेख संगम या राशीच्या वर्षभराच्या प्रवासात दिसून येईल.

जानेवारी २०१८ :- आत्मविश्वास वाढेल. महत्त्वाची कामे मार्गी लागतील. उद्योगधंद्यात, नोकरीत उत्तम संवाद साधला जाईल. त्यातून नवीन योजना, नवीन कामे पुढे येतील. थोडय़ाशा घरगुती समस्या वाढतील. घरातील ज्येष्ठ मंडळींच्या आरोग्याची काळजी घ्यावी लागेल. नवीन ओळखी, परिचयातून नवे मित्र मिळतील.

फेब्रुवारी २०१८ :- कौटुंबिक मतभेद मिटतील. आर्थिक प्रगती होईल. तितकेच खर्चाचे प्रमाण वाढेल. उद्योग-धंद्यात, नोकरीत आपल्या यशस्वी कामाचे कौतुक होईल. विज्ञान आणि बुद्धीच्या साहय्याने प्रगतीची दारे जवळ येतील.

मार्च २०१८ :- कर्तृत्वाला चांगला वाव मिळेल. आपल्या कार्यक्षेत्रात आपला प्रभाव वाढेल. सामाजिक कार्यात आपल्या कामाचे कौतुक होईल. एकूण हा महिना मानसिक दृष्टीने खूप चांगला जाईल. आरोग्याची काळजी घ्यावी. जेवणाचे वेळापत्रक सांभाळणे गरजेचे आहे.

एप्रिल २०१८ :- आपल्या शिस्त व संयमशील वगाण्यातून आपल्या कार्यक्षेत्रात अडवणुकीचे धोरण ठेवणारे, फसवणूक करणारे यांना चांगलाच चाप बसेल. नाटय़-सिनेकलावंतांना उत्तम संधी प्राप्त होतील. आपल्या समंजस वागण्यातून खूपसे गैसमज दूर होतील.

मे २०१८ :- शनी-मंगळचे उपद्व्याप चालू राहतील, ते तसेच चालू राहू द्यात. येणाऱ्या समस्या फारशा उपद्रव देणार नाहीत. नोकरी उद्योगधंद्यात सावधतेने वागा कुठलेही निर्णय तडकाफडकी घेऊ नका. गुरू-राहूच्या उत्तम सहकार्यातून आपण आखलेल्या योजना सहज पार पडतील. आरोग्याची काळजी घ्या.

जून २०१८ :- सत्य, विश्वास, प्रामाणिकता यातून मनाची निकोपता जपली जाते. त्यामुळे ही मूल्ये अवश्य जपा. कुटुंबात आजूबाजूला होणारे गैरसमज, वादविवाद यात संयमाने वागा. महिनाअखेरीस हे वादळ पूर्णपणे शांत होईल. लहान प्रवासाचे योग येतील. महत्त्वाच्या कामांना गती प्राप्त होईल.

जुलै २०१८ :- रवी, राहू, बुध, गुरू यांची प्रसन्नता आपल्याला कायम लाभेल. त्यामुळे नवीन कामे, नवीन योजना आपोआप पुढे येतील. मात्र आपल्या मेहनतीची साथ खूप गरजेची आहे. अशक्य गोष्टींपासून दूर राहा. त्यात वेळ नि पैसा घालवू नका. नात्यात किंवा प्रेमात बेताने राहा. अतिभावुकता टाळा.

ऑगस्ट २०१८ :- १७ सप्टेंबरनंतर रवी स्वराशीत येईल. त्यामुळे खूपशा कामांना गती प्राप्त होईल. गुरू-शुक्राची उत्तम साथ. आर्थिक गुंतवणूक करा, मात्र शेअरधंद्यात सावधतेने वागा. नोकरी-धंद्यात उत्तम प्रगतीचा काळ. घाईगर्दी टाळा. शांततेने जगण्यातला आनंद शोधा.

सप्टेंबर २०१८ :- राहू-गुरूचे पाठबळ खूप मोलाचे ठरेल. कोणतीही अनामिक भीती मनात शिरली की मन त्या भीतीचे शिकार बनते आणि त्यातून नैराश्य, वैफल्य सुरू होते. यासाठी सकारात्मक विचार, ध्यान, चिंतन या गोष्टीचा सातत्याने उपयोग करा. खूपसा मनाला आधार वाटेल.

ऑक्टोबर २०१८ :- रेंगाळलेल्या कामांना गती प्राप्त होईल. तर बुधाच्या उत्तम युक्तिवादातून सोपे मार्ग निघतील नि खूपशा कामातील अडचणी दूर होतील. आनंदाबरोबर खर्चाचे प्रामण वाढेल. सखोल विचार, उत्तम बुद्धिमत्ता यातून नवीन कामाची सुरुवात होईल.

नोव्हेंबर २०१८ :- धनस्थानातील शुक्राचे आगमन आपले भाग्य उजळण्याचे संकेत देईल. खूपशा कामांत आपण दाखवलेला संयम आपल्या पुढील उद्योगधंद्याला नोकरीत खूप मदतीचा ठरेल. नवीन योजना, नवीन कामे येतील. त्यासाठी रोजचे वेळापत्रक तयार ठेवा नि त्यातील महत्त्वाची कामे निवडा.

डिसेंबर २०१८ :- शुक्राची उत्तम साथ. शिक्षण, राजकारण, कला, बौद्धिक क्षेत्र यात आपला सहभाग यशस्वी ठरेल. आपल्या कामातील तडफदारपणाचे कौतुक होईल. व्यवहाराचे गणित सोपे होईल. समस्यांतून नवीन वाटा निघतील. एकंदरीत कामाच्या व्यापातूनही मनाला प्रसन्नता लाभेल.

तूळ (२१ सप्टेंबर ते २० ऑक्टोबर)

या वर्षी २०१८ सालावर चंद्र ग्रहाचे वर्चस्व आहे. २१ सप्टेंबर ते २० ऑक्टोबर या दरम्यान ज्यांचा जन्म झाला आहे, अशा लोकांवर शुक्र ग्रहाचा प्रभाव असतो. शुक्राच्या दोन राशी आहेत. वृषभ आणि तूळ. वृषभ राशीत कला सौंदर्याचा अविष्कार असतो, तर तूळ राशीत मानसिक संतुलन, स्नेह आणि न्याय जपला जातो. मनाचा हळवेपणा जपत मायेने फुंकर मारणारी आणि अंतरंगात न्यायाची पवित्रता जपणारी ही तूळ रास तिचा ६ अंक तर २०१७ सालचा एकांक २ या वर्षी यांचा उत्तम स्नेहसंवाद जमेल.

जानेवारी २०१८ :- पराक्रमातील रवी-शनीचे वास्तव्य खूप मदतीचे ठरेल. नवीन योजना, नवीन कल्पना प्रत्यक्ष कृतीत उतरतील. आर्थिकआवक वाढेल. जमीन खरेदीसाठी उत्तम काळ. आपण घेतलेले निर्णय पुढील काळासाठी खूपच फायद्याचे ठरतील.

फेब्रुवारी २०१८ :- खोलवर विचार करून निर्णय घ्या. खूपशा बाबतीत मनाचा गोंधळ वाढेल तो थांबवा. आपल्या अंतर्मनात प्रचंड ताकद असते. केवळ नकारात्मक विचारातून आपण ती वाया घालवतो तेव्हा अंतर्मनात सकारात्मकता ऊर्जा येऊ द्या, म्हणजे आत्मविश्वास वाढेल.

मार्च २०१८ :- मंगळ, शनी, रवीचे उत्तम सहकार्य. आपल्या निर्भय वागण्यातून यशाकडे वळाल, मात्र फाजील साहस अतिरेक टाळा. नवीन आव्हाने, नवीन कामे यशस्वी करू शकाल. नोकरीत आपल्या कर्तृत्वशैलीचे कौतुक होईल. मात्र घाईगर्दीने निर्णय घेणे टाळा.

एप्रिल २०१८ :- अचानक खर्चाचे प्रमाण वाढेल. नोकरीधंद्यात नवीन समस्या उभ्या राहतील, पण त्या फार काळ टिकणार नाहीत. शक्यतो पैसे उसने घेणे टाळा. मानसिक स्थिती चांगली ठेवा. हळूहळू कार्यात खूपशा गोष्टींना गती प्राप्त होईल. जुन्या व्यवहारातले पैसे परत मिळतील.

मे २०१८ :- मतभेद, गैरसमज दूर होतील. खर्चाचे प्रमाण वाढेल. प्रिय व्यक्तीच्या भेटी. मात्र भावनावश होऊन कोणतेही निर्णय घेऊ नका. सत्य, विश्वास, प्रामाणिकता यातून मनाची निकोपता साधू शकाल. त्यामुळे ही मूल्ये अवश्य जपा. त्यातूनच पुढे येणाऱ्या कामाचे मार्ग सोपे होतील.

जून २०१८ :- अतिशय उत्तम काळ. जीवनप्रवासात अडचणीच्या जागा लख्ख होतील आणि एक आनंदमय निरागस जगण्याचा सूर लाभेल. सामाजिक-राजकीय कामातील सहभाग आनंद देईल. आर्थिक बाबतीत समाधान लाभेल. नवीन कामे, नवीन योजना मार्गी लागतील.

जुलै २०१८ :- रवी-बुध-शुक्र-शनी ग्रहांची उत्तम साथ. अडकून पडलेली बरीचशी कामे मार्गी लागतील. नवीन संपर्क, सामाजिक बैठकीतील चर्चा, व्यापारी देवघेव, जागेचा शोध, कला प्रांतातील करार या सर्व गोष्टींसाठी हा महिना शुभदायक ठरेल. मात्र आनंदात मिठाचा खडा टाकण्याची संधी कुणाला देऊ नका.

ऑगस्ट २०१८ :- अति स्पष्ट बोलण्याने माणसे दुखावतील. अति हट्टीपणा टाळा, मात्र अनपेक्षित संधीतून मोठी सफलता मिळेल. व्यापार, राजकारण, कला प्रांत, विज्ञान क्षेत्रातील लोकांना त्यांच्या कामात यश लाभेल. मात्र बोलण्यात संयम ठेवा आणि कृतीत तत्परता असू द्यावी.

सप्टेंबर २०१८ :- स्वराशीत शुक्राचे आगमन. एकूण ग्रहाचे उत्तम पाठबळ पाठीशी आहे. आपल्या कार्यक्षेत्रात अधिक भव्यता निर्माण होईल आणि त्यात उत्तम यश प्राप्त कराल. या वर्षांतील चंद्राचे वर्चस्व तुमचे मन अधिकाधिक सामथ्र्यवान करील. आरोग्य उत्तम राहील.

ऑक्टोबर २०१८ :- भेटी-संपर्क-चर्चा यामध्ये गुप्तता ठेवा. शासकीय कामातील नियम सांभाळा. सामाजिक राजकीय क्षेत्रात वादविवाद टाळा म्हणजे कार्यमार्ग निदरेष होईल नि कामांना गती येईल. सामाजिक कार्यात मानसन्मान मिळेल. कलाक्षेत्रात यश लाभेल.

नोव्हेंबर २०१८ :- गुरूचे उत्तम सहकार्य सुरू होईल. त्यामुळे खूपशा गोष्टींना अनुकूलता प्राप्त होईल. नोकरी- उद्योगधंद्यात प्रगतीचा काळ. घरातील कौटुंबिक मतभेद मिटतील. महिना अखेरीस अनपेक्षित शुभ घटना आनंद देतील. मित्र-नातेवाईक मंडळींच्या भेटीतून समाधान लाभेल.

डिसेंबर २०१८ :- नवे विचार, नव्या योजना यशदायक ठरतील. कर्तव्य आणि भावना यांच्या समन्वयातून तुमच्या कामाचे वेगळेपण दिसून येईल. रवी-गुरूच्या उत्तम साहाय्यातून तुमचा आत्मविश्वास अधिक वाढेल. त्यातून कामाचे स्वरूप अधिक व्यापक होईल.

वृश्चिक (२१ ऑक्टोबर ते २० नोव्हेंबर)

या वर्षी २०१८ साली संख्याशास्त्राप्रमाणे २०१८ = २+०+१+८= ११= १+१= २ या संवेदनशील अंकाचा प्रभाव वृश्चिक राशीवर राहणार आहे. तर २१ ऑक्टोबर ते २० नोव्हेंबर दरम्यान ज्यांचे जन्म झालेत त्या लोकांवर मंगळ ग्रहाचा म्हणजे ९ अंकाचा प्रभाव असतो. २०१८  सालच्या वर्षप्रवासात चंद्र मंगळाचे वर्चस्व  खूपच लाभदायक ठरेल. मंगळाच्या साहसतेला चंद्राच्या शांत स्वभावाची जोड लाभेल. त्यातून येणारा संयम वृश्चिक राशीला खूप मोलाची मदत करील.

जानेवारी २०१८ : साडेसातीचे शेवटचे पर्व सुरू आहे. त्यात गुरूचे असहकार्य, तरीही शुक्राचा उत्तम प्रभाव खूपसा मदतीचा ठरेल. प्रत्येक कामात सावधानता बाळगा. कुठेही संघर्षांची ठिणगी पडू देऊ नका. उद्योगधंद्यात, नोकरीत उत्कर्षांची दारे उघडी राहतील. नवीन योजना नवीन कामे हाती येतील. आर्थिक सुबत्ता लाभेल.

फेब्रुवारी २०१८ :- बुध-शुक्राचा उत्तम सहयोग हा काळ काहीसा संमिश्र स्वरूपाचा असेल. त्याही स्थितीत आपण आखलेल्या गोष्टी पुऱ्या होतील. आपल्या शब्दाला किंमत येईल, मात्र नको त्या ठिकाणी समेट घडवून आणणे, मध्यस्थी करणे अशा गोष्टी जरूर टाळा.

मार्च २०१८ :- बुध-शुक्राची उत्तम साथ, त्यातून नवीन संधी प्राप्त होतील. उद्योगधंद्यात आर्थिक लाभ घडून येतील. मात्र फारसे विसंबून राहणे, विश्वास ठेवणे या गोष्टी टाळा. जागेसंबंधित व्यवहारात फारसे ताणून धरू नका. आपण केलेली निदाने खरी ठरतील.

एप्रिल २०१८ :- संकटातून संधी येते असं म्हणतात. तसा अनुभव या महिन्यात येईल. गैरसमजुतीतून झालेले वाद मिटतील नि मित्रमंडळीतील सलोखा कायम राहील. जुनी येणी वसूल होतील. जागेसंबंधीचे वाद मिटतील. कामातील अडचणीचे स्वरूप बदलेल.

मे २०१८ :- जगण्यात हट्टीपणा आला की त्या मागोमाग संघर्ष धावत येतो नि कुठलाही संघर्ष मानसिक दु:खाला आमंत्रण देतो. तेव्हा हट्टीपणा, आपले तेच खरे या गोष्टी टाळा. संयम-शांततेने खूपशा गोष्टी जवळ येतील. त्यातून मनाला खरा आनंद मिळेल.

जून २०१८ :- हा महिना काहीसा संमिश्र स्वरूपाचा. व्यापार-उद्योगधंद्यात काहीसा चढउतार होईल. देण्या-घेण्यावरून वादविवाद टाळा. जुने पैसे वसूल होतील. कौटुंबिक वातावरण चांगले राहील. समजुतीचे धोरण खूपशा समस्या दूर करील.

जुलै २०१८ :- पराक्रमातील मंगळाचा मोठा आधार खूपशा गोष्टींना सकारात्मकता प्राप्त करून देईल. उद्योगधंद्यात, नोकरीत झालेले वादळ शमेल. मात्र त्यातून काही खऱ्या गोष्टी पुढे येतील नि आपली होणारी अडचण दूर होईल. साहस, जिद्द यांचा वापर बौद्धिकतेतून होऊ द्या.

ऑगस्ट २०१८ :- ग्रहांचे उत्तम सहकार्य लाभेल. शनी-गुरू कामात अडचणी आणण्याचा प्रयत्न करतील, पण तो फार यशस्वी होणार नाही. दशमातील रवीच्या आधाराने खूपशी कामे मार्गी लागतील. नोकरी, धंद्यात परस्परांबद्दल आदर बाळगणे जरुरीचे आहे. त्यात तुम्ही कमी पडू नका.

सप्टेंबर २०१८ :- सारेच ग्रह तुमच्या मदतीला धावून आले आहेत. नवीन योजना, नवीन कामे यात यश लाभेल. आर्थिक बळ वाढेल. पण खर्चाचे प्रमाण वाढू देऊ नका. जुनी माणसे, नातेवाईक यांची घरी वर्दळ वाढेल. घरात मंगलकार्याच्या गोष्टी चालू होतील.

ऑक्टोबर २०१८ :- यशाकडे वाटचाल सुरू राहील. मात्र हे मिळवलेले यश कसे टिकवायचे याकडे लक्ष असू द्या. आनंद लाभेल. कला व शिक्षण क्षेत्रात नावलौकिक वाढेल. शिक्षण पद्धतीतल्या आपल्या नव्या विचारांचे स्वागत होईल.

नोव्हेंबर २०१८ :- शुक्राचा एकमेव आधार. बाकी सर्व ग्रहांनी पाठ फिरवली आहे. या महिन्यातही थोडीफार धावपळ वाढेल. त्यातून येणाऱ्या संकटाशी निकराने दोन हात करा, पण संयम नि शांततेने. लवकरच पुढील काळात आपण उभारलेली स्वप्ने पुरी होतील. चिकाटी ठेवा.

डिसेंबर २०१८ :- खूपशा समस्यांना मार्ग सापडतील. शुक्राचे शुभसंकेत आपल्या पाठीशी आहेत. नोकरी, उद्योगधंद्यात खूपशा अडचणी दूर होण्याच्या मार्गावर राहतील. आपण आखलेल्या योजना, त्यासाठी घेतलेल्या श्रमाचे कौतुक होईल. पैशाची उत्तम आवक राहील. खर्चाचे प्रमाण वाढेल.

धनू (२१ नोव्हेंबर ते २० डिसेंबर)

आपला जन्म २१ नोव्हेंबर ते २० डिसेंबर या दरम्यान झाला असेल तर आपल्यावर ३ अंकाचा प्रभाव राहील. म्हणजेच गुरू ग्रहाचा २०१८ = २+०+१+८= ११= १+१= २ या अंकावर चंद्र ग्रहाचा अंमल असतो. एकूण या धनू राशीवर २ आणि ३ या अंकाचा उत्तम प्रभाव वर्षभर राहील. गुरू ग्रहाची ज्ञानशीलता, प्रामाणिकपणा, सत्यवादी नि मधुर भाषा तर चंद्राची शीतलता, सहृदयता, भूतदया या सद्गुणांचा सहवास या वर्षी धनू राशीला लाभणार आहे. त्यामुळे जरी शनीची साडेसाती असली तरी या सद्गुणांच्या सहवासात ती फारशी तापदायक ठरणार नाही. त्यामुळे साडेसातीचे भय मनातून काढून टाकावे.

जानेवारी २०१८ :- समजुतीने वागण्याचा खूप फायदा होतो. याचा उत्तम अनुभव या महिन्यात येईल. खूपशा गोष्टी सबुरीने घेणे खूप महत्त्वाचे ठरेल. नोकरी-उद्योगधंद्यात काहीसा मनस्ताप घडेल. प्रेमप्रकरण, जामीन देणे यात वादविवाद घडतील. आश्वासने, वचने देऊ नका नि मागू नका.

फेब्रुवारी २०१८ :- रवी-शुक्राचे उत्तम सहकार्य. कर्तृत्वाला चांगला वाव मिळेल. नवीन परिचय, नवीन ओळखी यातून कार्याची व्याप्ती मोठी होईल. आर्थिकबाबतीत खर्चाचे प्रमाण वाढेल. पण त्याचबरोबर जुनी येणी येतील. महत्त्वाचे निर्णय तातडीने घेऊ नका.

मार्च २०१८ :- खूप आशावादी राहा, पण स्वस्थ बसून नव्हे. आपल्या मनातील उत्तम विचार कृतीत उतरण्यासाठी आशावादी असणे खूपच महत्त्वाचे ठरेल. लहानसहान समस्यांना मनात स्थान देऊ नका. प्रेमात, मैत्रीत काही कारण नसताना अविश्वासाचे वारे वाहू लागतील. खूपशा गोष्टींत स्थितप्रज्ञता हा उत्तम उपाय ठरतो.

एप्रिल २०१८ :- शनीसोबत मंगळाचे अस्तित्व अधिक प्रखरता निर्माण करील. पण गुरूच्या साहाय्याने खूपसे मार्ग मोकळे होतील. मात्र कुठलाही महत्त्वाचा निर्णय, व्यवहार खूप शांतपणे विचारपूर्वक करावा. खर्चाचे प्रमाण वाढेल. आरोग्य सांभाळा.

मे २०१८ :- रवी-बुध-गुरूच्या साहाय्याने कामातील खूपशा अडचणी दूर होतील. स्थावर इस्टेटीच्या वादात थोडीशी माघार घेणे शहाणपणाचे ठरेल. कोर्टकचेरी नको. चर्चेतून प्रश्न सोपे होतील. संयम नि प्रसन्नता हे यशाचे मूळ सूत्र आहे.

जून २०१८ :- नोकरी-उद्योगधंद्यात नवीन संधी प्राप्त होतील. गोंधळ अस्थिरता टाळा, मानसिक संतुलन सांभाळा. राग, चिडणे, दूरगामी विचारांपासून दूर राहा. कोर्टकचेरीची कामे वाढतील. त्यात मध्य साधून तंटे मिटवा. नवीन घेतलेले निर्णय फायदेशीर ठरतील.

जुलै २०१८ :- शुक्र-गुरूचा उत्तम आशीर्वाद. लाभदायक घटना घडतील, पण घरात अचानक खर्चाचे प्राण वाढेल. उद्योगधंद्यात नव्याने स्पर्धा सुरू होईल. त्यात अतिसाहसीपणा टाळा. वेळेला महत्त्व द्या. त्यातून कामाचे वेळापत्रक ठरवा.

ऑगस्ट २०१८ :- अतिभावनिक राहू नका. घरात गैरसमज नि त्यातून होणारे वादविवाद टाळा. पण हे सारे हास्यास्पद ठरेल. कोणाला किती किंमत द्यावी हे फार उशिरा कळेल. त्याआधी बुद्धी आणि मन यांच्या साहाय्याने मानसिक गुंता दूर करा.

सप्टेंबर २०१८ :- उद्योगधंद्यात, नोकरीत अचानक जबाबदाऱ्या वाढतील. काही महत्त्वाचे निर्णय घ्यावे लागतील. मनावरील दडपण वाढेल. कामात नको ते राजकारण आडवे येईल. त्याला ठामपणे सामोरे जा. आपण एक पाऊल पुढे उचलल्याशिवाय समोरचा दोन पावले मागे जाणार नाही, याची खात्री असू द्या.

ऑक्टोबर २०१८ :- गुरूची वर्षभराची साथ संपली तरी रवी-बुध-शुक्राचा पाठिंबा आपल्या पाठीशी कायम उभा आहे. नोकरी-उद्योगधंद्यातील वादळ संपुष्टात येईल. आपण घेतलेला पवित्रा यशस्वी ठरेल. मात्र पुढील प्रवास सावधतेने करा. आपल्या निर्णयाचे स्वागत होईल.

नोव्हेंबर २०१८ :- कामाची व्याप्ती वाढेल. घरातील मुलांना नोकरी-उद्योगधंद्यानिमित्त नवीन संधी प्राप्त होतील. कोर्टकचेरीची कामे मार्गी लागतील. नवीन जागेचे प्रस्ताव येतील. जागा बदलण्याचे योग.

डिसेंबर २०१८ :- कामात बढती मिळेल. मध्यस्थीने घरातील प्रश्न सुटतील. व्यवसायातील चढउताराचा अनुभव येईल. त्यातून खूपसे शिकता येईल. नोकरीधंद्यात शब्दाला पैशापेक्षाही किंमत आहे, ही जाणीव लवकर होईल.

मकर

(२१ डिसेंबर ते २० जानेवारी)

आपला जन्म २१ डिसेंबर ते २० जानेवारीदरम्यान झाला असले तर आपल्यावर कायमस्वरूपी ८ अंकाचा म्हणजे शनी ग्रहाचा प्रभाव असतो. २०१८ साल २+०+१+८= ११ = १+१ = २ हा अंक चंद्रचा.

एकूण मकर राशीच्या वर्ष-प्रवासात शनी-चंद्राच्या जोडीचे वर्षभर प्रभुत्व असणार आहे. चंद्र आणि शनी म्हणजे द्विधा मन:स्थितीचे प्रतिक आहे अािण त्यात साडेसातीचा त्रास, पण रवी-शुक्राच्या राश्यांतर प्रवासाने हे चित्र पूर्णपणे बदलून जाईल. खूपशा गोष्टीत स्थिरता प्राप्त होईल नि त्यातून हा वर्षप्रवास खूप संमिश्र स्वरूपाचा होईल.

जानेवारी २०१८ :- नुकतीच साडेसातीची सुरुवात नि त्यात गुरूची असाह्य़ता, पण मंगळाच्या तडफदार वागण्यातून कामे होतील. संयम नि सहनशीलता असणं जास्त जरुरीचे ठरेल. तसेच या काळात नोकरी, उद्योगधंद्यात गैरसमज, वादविवाद टाळावेत. समस्या कायमस्वरूपी नसतात. त्यातून मार्ग निघतो.

फेब्रुवारी २०१८ :- उद्योगधंद्यात, नोकरीत आखलेल्या योजना पुऱ्या होतील. कर्तृत्वाला चांगला वाव मिळेल. सामाजिक, राजकीय क्षेत्रात वावरताना बोलताना शब्द जपून वापरावेत. नवीन ओळखी, परिचयातून कामाची व्याप्ती वाढेल. तूर्त जागेसंबंधीचे व्यवहार पुढे ढकला.

मार्च २०१८ :- रवी-बुध शुक्राचे उत्तम साह्य़. आपण ठरवलेल्या गोष्टीत यश लाभेल. वरिष्ठांशी सुसंवाद साधाल. उद्योगधंद्यात कामाचे स्वरूप बदलेल. अडचणी दूर होतील. आर्थिक जुनी येणी वसूल होतील. पैशाची आवक वाढेल. घरातील वातावरण आनंदी राहील.

एप्रिल २०१८ :- १५ दिवसांच्या आत महत्त्वाची कामं उरकून घ्यावीत. पैशाची योग्य ठिकाणी गुंतवणूक करावी. शेअर धंद्यात सावधपणे वागा. सामाजिक कामात नको ते वादविवाद टाळा. तसंच दोन पावलं मागे येणं शहाणपणाचं ठरेल. आरोग्याची काळजी घ्या.

मे २०१८ :- साहित्य-कलाक्षेत्रात, राजकारणात मानसन्मानाचे योग येतील. बुद्धीच्या माध्यमातून पैसे जरूर कमवा, पण त्यासाठी योग्य कामाची निवड करा. धार्मिक कार्यात सहभाग, नवीन परिचयाचं रूपांतर मैत्रीत होईल. पण त्यात वेळेचा अपव्यय आणि मानसिक त्रास होणार नाही याची काळजी घ्या.

जून २०१८ :- उत्तम काळ. प्रयत्नास उत्तम साथ लाभेल. नवीन योजना प्रत्यक्षात आकार घेतील. बोलण्या-वागण्यातील नम्रता आपल्या कामात नकळत मदत करील. शक्यतो राजकारणापासून दूर राहणे योग्य ठरेल. संयम आणि शांतपणे निर्णय घ्या.

जुलै २०१८ :- रवी-शुक्राचे उत्तम सहकार्य; कामात घाईगर्दी टाळा अतिउत्साह आणि साहस टाळा. नोकरी, उद्योगधंद्यात पुढे-मागे होणाऱ्या गोष्टींमुळे निराश होऊ नका. नवीन जागा, स्थावर खरेदी-विक्रीसाठी उत्तम काळ. त्यातून पैशाची आवक वाढेल.

ऑगस्ट २०१८ :- आपल्याशी असलेल्या दूरदृष्टीचा उपयोग करा. अतिभावनिक राहू नका. कौटुंबिक मतभेद फार काळ टिकणार नाहीत. तरुण मंडळींना नोकरीत, उद्योगधंद्यात उत्तम संधी प्राप्त होतील. पाय, गुडघेदुखीचा त्रास सुरू होईल.

सप्टेंबर २०१८ :- आर्थिक गणितं फार खुबीने सांभाळा. फार उतावळेपणा, नाहक खर्च, चुकीच्या जबाबदाऱ्या यांपासून दूर राहा. हट्टीपणे आततायीपणे निर्णय घेऊ नका. शांतपणे गंभीरपणे निर्णय घ्यावेत. त्यात न्यायाची बूज राखा.

ऑक्टोबर २०१८ :- लाभदायक घटना घडतील. गरजूंना मदत कराल. आपले मार्गदर्शन मोलाचे ठरेल. घरगुती जमिनीचे वादग्रस्त प्रश्न निकालात निघतील. प्रिय व्यक्तीच्या भेटीत आनंद मिळेल. आपल्या बोलण्यातील आत्मविश्वास कामात खूप मदतीचा ठरेल.

नोव्हेंबर २०१८ :- हा महिना संमिश्र स्वरूपाचा आहे. व्यापार-उद्योगात काहीसा चढउतार होईल. देण्या-घेण्यावरून गैरसमज टाळा. कामाचा उत्साह जरूर असू द्या, पण त्याचा अतिरेक होऊ देऊ नका. कौटुंबिक वातावरण आनंदी राहील.

डिसेंबर २०१८ :- शुक्र-बुधाची उत्तम साथ. राजकारण, समाजकार्यात, उद्योगधंद्यात फारसे हळवे, भावनाशील राहणे खूप चुकीचे ठरेल. चुकीची माणसे येऊन फसवून जातील ही काळजी घेणे जरुरीचे आहे. तेव्हा माणूस पारखून त्याच्याशी संवाद साधा.

कुंभ (२१ जानेवारी ते १९ फेब्रुवारी)

ज्यांचा जन्म २१ जानेवारी ते १९ फेब्रुवारीदरम्यान झाला आहे. अशा लोकांवर शनी ग्रहाचा अंमल असतो. या वर्षी २०१८ साली २+०+१+८= ११= १+१= २  अंकाचा म्हणजे चंद्राचा प्रभाव असणार आहे. कुंभ ही बौद्धिकरास शनी ग्रहाच्या प्रभावाखाली येते, तर चंद्र हा मनाचा कारक ग्रह आहे. एकूण मन आणि बुद्धीच्या समन्वयापासून उत्तम संवाद साधला जाईल. या सुखद संवादात समस्यांना सोपे मार्ग मिळतील आणि त्यातून आर्थिक, मानसिक उन्नतीत उत्तम भर पडू शकेल.

जानेवारी २०१८ :- राहू-गुरू-शनी यांचा दीर्घकाळ सहवास आपल्याला लाभदायक ठरणार आहे. आपल्याला मिळणारे हे यश विनयाने स्वीकारा. उद्योगधंद्यात, नोकरीत आपल्या दूरदृष्टीचा खूप फायदा होईल. अकारण गरजा वाढवू नका. पैसा, मानसन्मान यात फार काळ स्वत:ला गुंतवून ठेवू नका.

फेब्रुवारी २०१८ :- रवी-गुरूच्या सान्निध्यात मनाची ताकद उत्तम साथ देईल. फक्त त्या ताकदीचा उपयोग मर्यादित स्वरूपात कधी आणि कसा करायचा हे तंत्र सांभाळून वागलात तर वातावरणात खूप चांगला फरक पडेल. बुद्धीच्या कुशल वापरातून समस्या दूर होतील.

मार्च २०१८ :- रवी-गुरूमुळे रोजच्या जीवनातल्या समस्या दूर होऊ लागतील. नवे विचार, नव्या योजना यशदायक ठरतील. कर्तव्य आणि भावना यांच्या समन्वयातून कामाचे वेगळेपण दिसून येईल. आसपासच्या लोकांना आपले अस्तित्व खूप आधाराचे वाटेल.

एप्रिल २०१८ :- हा महिना तसा फारसा त्रासदायक जाणार नाही, पण आपल्यापाशी असलेला सुज्ञपणा खूप कामाचा ठरेल. आपल्या साध्या सरळ स्वभावाचा फायदा घेण्याचा प्रयत्न होईल. तेव्हा आर्थिक मानसिक गुंतवणूक टाळा. शब्द देणे, वचन देणे, अशा भावनिक पेचात अडकू नका.

मे २०१८ :- घरात कौटुंबिक वादविवाद, गैरसमज आदी घटना घडतील. मात्र भावनेच्या भारात टोकाचे निर्णय घेऊ नयेत. नोकरी-उद्योगधंद्यात नवीन जबाबदाऱ्या येतील. मनाचे स्वास्थ त्यामुळे वरखाली होईल, पण त्यावर मात करा. संघर्ष वाढू देऊ नका. महत्त्वाची गोष्ट म्हणजे आर्थिक प्रश्न सहज सुटतील.

जून २०१८ :- कौटुंबिक वातावरणात खूप चांगला बदल दिसून येईल. झालेल्या चुकांचा पश्चात्ताप करत बसू नका. त्या चुका पुन्हा होणार नाहीत याची काळजी घ्या. भावनेपेक्षा कर्तव्यावर जास्त भर असू द्या. स्वत:च्या विचारावर, वागण्यावर आपला अंकुश असू द्यावा.

जुलै २०१८ :- पंधरा दिवसांनी रवीचा षष्ठातला प्रवेश खूपसा मदतीचा ठरेल. उद्योगधंद्यात, नोकरीत कामांना खूपसे चांगले स्वरूप प्राप्त होईल. अडचणी संपतील. राजकारणात, सामाजिक जगतात आपले वर्चस्व राहील. कामानिमित्त प्रवासाचे योग.

ऑगस्ट २०१८ :- खूपशा घटना दिलासा देणाऱ्या घडतील. उद्योगधंद्यात, नोकरीत कामाची व्यापकता वाढेल. त्यातून आर्थिक स्थिरता लाभेल. जुनी येणी वसूल झाल्यामुळे आर्थिक बळ वाढेल. मानसिक समाधान लाभेल.

सप्टेंबर २०१८ :- ग्रहांची उत्तम साथ लाभेल. उद्योगधंद्यात, नोकरी-व्यवसायात आपले स्थान अधिक बळकट होईल. मात्र आळस आणि वेळेचे तारतम्य बाळगून नको तिथे वेळ वाया जाणार नाही. यांची काळजी घ्या. भावनात्मक गुंतवणूक टाळा. त्यातून मनस्ताप निर्माण होईल.

ऑक्टोबर २०१८ :- ११ ऑक्टोबरला वृश्चिकेत जाणारा गुरू उद्योगधंद्यात, नोकरीत फारसा उत्कर्ष साधू शकणार नाही. पण राहू-शनीचा आधार खूपशा कामात मदतीचा ठरेल. अर्थप्राप्ती चांगली राहील. तितकेच खर्चाचे प्रमाण वाढेल. निर्णय आणि कृतीशीलता यात मागेपुढे करू नका.

नोव्हेंबर २०१८ :- राहू-शुक्र-शनी यांच्या पाठबळातून उत्तम संधी प्राप्त होतील. आपल्या स्नेहशील सरळ वागण्याने उद्योगधंद्यात, नोकरीत वातावरण खूप चांगले राहील. शब्द जपून वापरा. घाईगर्दीपासून दूर राहा.

डिसेंबर २०१८ :- लाभातला रवी खूपसा मदतीचा ठरेल. १६ डिसेंबपर्यंत महत्त्वाची कामे आटपून घ्यावीत. योग्य निर्णय घेणं, कागदपत्रांवर सह्या करणे यांत कुठेही घाईगर्दी करू नये. कोणतेही गैरसमज, दूराग्रह टाळणे. सकारात्मक गोष्टीतून खूपशी सूत्रं आपल्याला फायदेशीर ठरतील.

मीन (२० फेब्रुवारी ते २० मार्च)

ज्यांचा जन्म २० फेब्रुवारी ते २० मार्च दरम्यान झाला आहे अशा लोकांवर गुरू ग्रहाचा अंमल असतो. या वर्षी २०१८ साली २+०+१+८= ११= १+१= २  अंकाचा म्हणजे चंद्र ग्रहाचा प्रभाव असणार आहे. एकूण चंद्र आणि गुरू म्हणजे २ आणि ३ अंकाचे प्रभुत्व मीन राशीवर असणार आहे. मीन ही जलतत्त्वाची रास आहे. तसेच अध्यात्माची रास आहे. जलतत्त्वाचा गुरू अहंकार द्वेष विसर्जित करण्याचा संदेश देतो. एकूण चंद्र आणि गुरूच्या संयोगातून आपला जीवनप्रवास या नव्या अध्यात्माच्या मार्गावर सहज पोचेल.

जानेवारी २०१८ :- रवी-शुक्राचे उत्तम सहकार्य उद्योगधंद्यात कामाची व्यापकता वाढवेल. नवीन संधी प्राप्त होतील. सामाजिक कार्यात आनंद मिळेल. थोरामोठय़ांच्या गाठीभेटीतून साामजिक कामाला गती प्राप्त होईल. त्या कामातील आपला सहभाग महत्त्वाचा ठरेल.

फेब्रुवारी २०१८ :- या महिन्यात सर्वच ग्रहांनी पाठ फिरवली आहे. त्यामुळे शांतपणे समोरच्याला समजून घेण्याने बरेचसे कटू प्रसंग टाळू शकाल. गैरसमज, वादविवाद यातून खूपशा कटकटी वाढू शकतील. त्यापेक्षा परिस्थितीशी जुळवून घेणे शहाणपणाचे ठरेल.

मार्च २०१८ :- आपण आखलेल्या योजना प्रत्यक्षात येण्यासाठी हा काळ खूप योग्य ठरेल. जरी आर्थिक अडचणीचा काळ असला तरी जुन्या व्यवहारातून पैसे येतील. उद्योगधंद्यात-नोकरीत आपल्या दूरदृष्टीचा चांगला उपयोग होईल. आणि अशा कटू वेळी  शांत, उत्साही  जगण्यातच खरे अध्यात्म लपलेले असते हा प्रत्यय या महिन्यात येईल.

एप्रिल २०१८ :- बुध-शुक्राच्या स्नेहातून परिस्थिती बदलेल नि आश्चर्याच्या झोक्यावर बसल्यासारखे क्षणभर वाटेल. संकटातून संधी प्राप्त होते असा वेगळा अनुभव येईल नि आपल्या विरोधातला सूर पूर्णपणे मावळेल. रखडलेल्या कामांना गती प्राप्त होईल. नवीन परिचय आनंद देतील.

मे २०१८ :- एकूण खूपसे ग्रह आपल्या मदतीसाठी उभे आहेत. शिक्षण, नोकरी, उद्योगधंद्यात नवीन संधी प्राप्त होतील. पण लोकप्रियता प्रसिद्धी यामध्ये फारसे फसू नका. यात खऱ्या कामाचा विसर पडेल. रोजच्या जीवनातले साधे नियम पाळून पुढे सरका.

जून २०१८ :- व्यवसायात नोकरीत उत्तम संधी प्राप्त होतील. मात्र आळशीपणा वेळेचा अपव्यय टाळा. स्वत:चे  महत्त्व सांभाळून वेळेचे गणित साधा म्हणजे नको तिथे वेळ वाया जाणार नाही. भावनात्मक गुंतवणूक टाळा म्हणजे मनस्तापाचे कारण संपेल.

जुलै २०१८ :- मंगळ-बुध-शुक्राचे उत्तम साह्य़, पण फार भावनावश होणे, हळवेपणा यापासून दूर राहा. शांत-संयमाने वागा. घरातील लोकांशी संवाद साधा. महत्त्वाचे निर्णय घेण्यासाठी उत्तम काळ. जागेसंदर्भातील वादविवाद सामोपचाराने मिटतील. आपल्या बोलण्यात आत्मविश्वास खूप चांगले काम करील.

ऑगस्ट २०१८ :- रवी-मंगळाची उत्तम साथ. आत्मविश्वास आणि प्रेरणा या शब्दाचा खरा अनुभव देतील. चांगले विचार चांगल्या अपेक्षा ठेवल्या की यश अधिक जवळ येते, असा छानसा अनुभव येईल. १७ ऑगस्टला षष्टस्थानात प्रवेश करणारा रवी खूपसा मदतीचा ठरेल. त्यामुळे पुढचा काळ खूपसा अनुकूल होईल.

सप्टेंबर २०१८ :- रवी-बुधाचे मोलाचे सहकार्य. खूपशी कामे पुढे सरकतील. नवीन कल्पना, नव्या योजना प्रत्यक्षात उतरतील. आर्थिक आवक वाढेल. काही नवीन उद्योग सुचतील तर जमीन इस्टेटच्या व्यवहारात फायदा होईल.

ऑक्टोबर २०१८ :- आर्थिक आवक नि खर्चाचे प्रमाण यांचे गणित आखून उद्योगधंद्यातील पुढील रूपरेषा कायम करा. घरात किरकोळ समस्या वाढतील, पण त्या फार काळ त्रास देणार नाहीत तेव्हा त्यावरील निर्णय शांतपणे घ्यावेत.

नोव्हेंबर २०१८ :- ११ ऑक्टोबरला गुरूचा भाग्यस्थानातील प्रवेश खूपच लाभदायक ठरेल. उद्योगधंद्यात नोकरीत उत्साहाचे वातावरण निर्माण होईल. आर्थिक येणी वसूल होतील. नवीन वास्तू व्यवहारांत यश, मन:स्वास्थ्य चांगले राहील.

डिसेंबर २०१८ :- मंगळ-बुध-गुरूचे उत्तम पाठबळ सर्व दृष्टीने फायद्याचे ठरेल. आपल्या कार्यक्षेत्रात अधिक भव्यता निर्माण होईल. आपण आखलेल्या नवीन योजना, कल्पना पुढे सरकतील. पैशाचे व्यवहार काळजीपूर्वक करावेत.
उल्हास गुप्ते – response.lokprabha@expressindia.com

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व विशेष लोकप्रभा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Astro

ताज्या बातम्या