सगळ्यांची जेवणं आटोपल्यावर  अचानक आलेले पाहुणे. अशा वेळी त्या घरातली गृहिणी पटकन म्हणते, थांबा, पट्कन पिठलं-भात टाकते. चार घास खाऊन घ्या.

कधी एखाद्याला घरी यायचा प्रेमाचा आग्रह करताना हमखास येणारे शब्द असतात, ‘या गरिबाघरची झुणकाभाकरी खायला.’

आसपासच्या घरात मृत्यू होतो, अंत्यसंस्कार आटोपून मंडळी आली, शेजारपाजारच्या घरांमधून जेवण येतं. इतर काहीही शक्य असूनही तिथे हजेरी असते ती पिठलं-भाताचीच.

तर असं हे पिठलं. मराठी जेवणातला सर्वमान्य पदार्थ. घरात कुणासाठी तरी पिठलं टाकलं जाणार आहे हे ऐकल्यावर भरपेट जेवलेल्यावरही पिठल्यावरच्या प्रेमापोटी पुन्हा दोन घास खायला तयार असणारी मंडळी कमी नाहीत. किंवा पिठल्याची कढई चाटूनपुसून खाण्यासाठी सगळ्यांचं जेवण पूर्ण होण्याची वाट बघत बसणारेही घरोघरी सापडतील. आणि पिठल्यात असं काय आहे हे विचारणाऱ्या माणसाला खवय्यांच्या रसिकतेच्या व्याख्येतून कायमचा बाद करून टाकतील. आणि वर ‘पिठल्यात काय नाही असं विचारा.’ असंही म्हणतील.

खरंच आहे ते. पिठल्यात काय नाही? वेगवेगळ्या पद्धतीने शिजवलेलं डाळीचं पीठ म्हणजे पिठलं नव्हे. भुकेलेल्याला कमी श्रमात, कमी वेळेत क्षुधाशांतीबरोबरच पोट भरल्याचं अपार समाधान देणारा पदार्थ म्हणजे पिठलं. ते करण्याच्या पद्धती मात्र वेगवेगळ्या. कुणी फोडणीमध्ये हिरवी मिरची, लसूण, कांदा कोथिंबीर परतून घालतं, त्यात भरपूर पाणी घालून ते उकळलं की त्यात डाळीच्या पिठाची पेस्ट घातली जाते. आणि मग ते सगळं कढईमध्ये रटरट शिजवलं जातं. या पद्धतीची गंमत म्हणजे अगदी थोडय़ा पिठात बक्कळ पिठलं होऊ शकतं. जितकं पाणी वाढवाल तितकं पिठलं जास्त. तिखटमिठाचं प्रमाणही त्यानुसार वाढवत जायचं. खूप लोक जेवायला असतील तेव्हा हमखास पुरवठय़ाला येणारं. त्यामुळे झुणका-भाकरी विकणाऱ्या हॉटेलवाल्यांचीही ही आवडती पद्धत.

पिठल्याच्या दुसऱ्या प्रकारात फोडणी देऊन, त्यात पाणी घालून झालं की ते पाणी उकळायला लागल्यावर त्यात वरून पीठ पेरलं जातं. हे पीठ पेरून केलेलं किंवा गुठळ्यांचं पिठलं. उकळत्या पाण्यात पीठ फिरवल्यामुळे त्यात गुठळ्याही होतात. जसजसं उकळत जाल तशा या गुठळ्या शिजतात आणि एकजीव होतात किंवा वरून गार पाण्याचा हबका मारून त्या फोडल्या जातात. हे पिठलं हिरवी मिरची, लसूण घालून नाही तर लाल तिखट घालून खमंग केलं जातं. ते ढवळत राहायचं. ते भरपूर शिजलं की कढईला खाली चिकटायला लागलं ते झालं असं समजून आणखी पाच मिनिटं मंदाग्नीवर ठेवायचं. वरून हिरवीगार कोथिंबीर पसरायची आणि भात किंवा भाकरीबरोबर गरमगरम खायचं. गरम गरम पिठल्यावर तुपाची धार सोडली तर जिव्हादेवी आणखी तृप्त होणार. असं गरमगरम पिठलं शिळ्या भाकरीबरोबर तर आणखी झक्कास लागतं. वर ते लोखंडाच्या कढईत केलेलं असेल तर क्या बात है..

हे पिठलं करायचे सर्वमान्य प्रकार. पण याशिवाय पिठलं करायचे आणखीही दोन-तीन प्रकार आहेत. एखाद्या माणसापुरतं पिठलं करायचं असेल तर भाकरी केलेल्या तव्यातच फोडणी द्यायची. त्या फोडणीतच डाळीचं पीठ घालायचं ते चांगलं परतून घ्यायचं आणि त्यात वरून पाणी घालून शिजवायचं.

काही समाजांमध्ये डाळीच्या पिठाचा उंडा करून तो चक्क उकडला जातो. मग तो उकडलेला उंडा गार झाला की फोडून मोकळा करून फोडणीत परतला जातो. प्रवासात टिकणारा हा पिठल्याचा प्रकार आहे. त्याशिवाय प्रवासासाठी आणि एरवीही खायला पिठल्याच्या वडय़ा म्हणजेच पाटवडय़ाही अनेकांच्या आवडीच्या असतात. त्या टिकणाऱ्या असल्यामुळे प्रवासात द्यायची पद्धत आहे. त्या करायला एकदम सोप्या. डाळीच्या पिठाची भज्यांसाठी करतात तशी पेस्ट करायची. त्या पेस्टमध्येच लाल तिखट, मीठ कोथिंबीर घालायची. फोडणी तयार करून त्या फोडणीमध्ये आधीच्या पिठल्यांच्या प्रकारात घालतात तसं पाणी अजिबातच घालायचं नाही. त्याऐवजी डाळीच्या पिठाची तयार केलेली पेस्ट घालायची. फोडणीत तेल मात्र जरा सढळ हातानेच घालायचं आणि ती पेस्ट घातल्यावर ते भराभरा हलवायचं. पाण्याचं प्रमाण कमी असल्यामुळे हे पिठलं पट्कन शिजतं. कढईतच त्याचा गोळा तयार व्हायला लागतो. तो गोळा परतत, सारखा करत राहायचा. पाचेक मिनिटात खाली उतरवायचा. ताटाला तूप लावून त्यात तो पसरायचा. वर कोथिंबीर पेरायची. आणि उलथनं किंवा सुरी घेऊन वडय़ा पाडायला घ्यायच्या. या वडय़ा प्रवासात तोंडीलावणं म्हणून उपयोगी पडतातच, शिवाय फार जड जेवायचं नसतं अशा वेळी दहीभाताबरोबर एकदमच तोंडाला चव आणतात.

एखाद्या हौशी घरात हरभऱ्याची डाळ भिजत घालून, ती अगदी पेस्टसारखी वाटून ओल्या डाळीचं पिठलंही केलं जातं. या पिठल्याला मात्र खमंगपणासाठी हिरवी मिरची आणि लसूण पाहिजेच.

पिठल्याचाच रावण पिठलं असाही एक प्रकार आहे. तो आहेच इतका राक्षसी की रावणाला का बदनाम करता असं एखाद्याला वाटेल. इतका राक्षसी प्रकार कोण करत असेल आणि कोण खात असेल काय माहीत, पण त्याचं वर्णन उपलब्ध आहे याचा अर्थ कुणीतरी कधीतरी नक्कीच करून बघितला असणार. रावण पिठलं करताना सगळे घटक सारख्या प्रमाणात घ्यायचे असतात म्हणे. म्हणजे वाटीभर डाळीचं पीठ घेतलं तर तेवढंच तेल, तेवढंच लाल तिखट आणि तेवढंच पाणी घेतलं जातं. नशीब मीठ मात्र चवीपुरतं घ्यायचं असतं.

हरभऱ्याची डाळ चालत नाही, पथ्यं आहे, पचत नाही अशांसाठी हरभऱ्याच्या डाळीची जागा मुगाची डाळ घेते. मुगाची डाळ दळून तिच्या पिठाचं पिठलंही तेवढंच चविष्ट लागतं.

कोकणात हरभऱ्याच्या-मुगाच्या डाळीच्या पिठाचं पिठल्यापेक्षा भरपूर लसूण आणि मिरची घालून केलेलं कुळथाच्या पिठाचं अतिशय चविष्ट पिठलं केलं जातं.

जुनी माणसं सांगतात, आमच्या लहानपणी ज्वारीच्या पिठाच्या भाकरी आणि त्याच पिठाचं पिठलं खायचो आम्ही! म्हणजे हरभऱ्याच्या, मुगाच्या डाळीचं, कुळथाचं असं वेगवेगळ्या प्रकारचं पिठलं खाऊन कंटाळा येत नाहीच, पण तरीही आलाच कधी तर चवबदल म्हणून पिठल्याचा हा पर्यायही आहेच.
वैशाली चिटणीस – response.lokprabha@expressindia.com