scorecardresearch

दूसरी बाजू : दारू, आपली आणि त्यांची

मद्य अथवा दारू या शब्दांशी सुसंस्कृत मराठी माणसाचा संबंध हा परंपरेनंच मानभावीपणाचा. पण युरोपातील देशातला मद्याप्रतिचा दृष्टिकोन यामध्ये कमालीची तफावत आहे.

दूसरी बाजू : दारू, आपली आणि त्यांची

मद्य अथवा दारू या शब्दांशी सुसंस्कृत मराठी माणसाचा संबंध हा परंपरेनंच मानभावीपणाचा. पण युरोपातील देशातला मद्याप्रतिचा दृष्टिकोन यामध्ये कमालीची तफावत आहे. आपल्याकडे पिण्यापेक्षा हँगओव्हरचंच विश्व मोठं.

मागच्या पंधरवडय़ात मी आणि कवी वैभव जोशी सादर करीत असलेल्या, ‘काहीच्या काही’ या आमच्या नव्या कार्यक्रमाची सुरुवात आम्ही, स्कॉटलंडच्या मराठी मंडळांसाठी अॅबर्डीन आणि ग्लास्गो येथे केली. कार्यक्रमानिमित्त बाहेर गेल्यानंतर मी अतिरिक्त भटकायची संधी जरासुद्धा सोडत नाही. मागच्या दोन्ही युरोपच्या ट्रिप्समध्ये काही मित्रांनी ‘स्कॉटलंडला चाललाच आहेस तर प्रेक्षणीय स्थळांमध्ये जगप्रसिद्ध स्कॉच या दारूच्या डिस्टिलरीला भेट’ देण्यासाठी आवर्जून सुचवलं होतं. मद्य या विषयातली मला फारशी गती आणि आवड नसल्याने मी आवर्जून वगरे काही जाण्याच्या फंदात पडलो नाही. पण या वेळी माझ्याबरोबरच्या मित्रांमुळे माझं जाणं झालंच. जवळची म्हणून ग्लास्गोच्या ‘ग्लेनगॉयन’ या डिस्टिलरीत आम्ही गेलो. म्हटलं बघू तरी प्रेक्षणीय स्थळांचा दर्जा देण्यासारखं काय आहे एवढं त्यात! लोक नक्की बघतात तरी काय यात?
या डिस्टिलरीच्या प्रांगणात पाय ठेवला आणि एखादा विद्यार्थी मोठय़ा शिक्षण संस्थेत प्रवेश घेतो तसा काहीसा फील यायला लागला. आमच्यासारखेच अनेक पर्यटक आले होते. दारू नक्की कशी बनते हे जाणून घेण्यासाठी इतक्या उत्कंठेने लोक आलेत याचं तर आश्चर्य वाटत होतंच; पण त्याच बरोबरीने आम्ही ती कशी बनवतो आणि ती का सर्वोत्तम आहे, हे एखाद्या विद्यापीठाच्या अभ्यासक्रमापेक्षाही तळमळीने समजून सांगणारे शिक्षक दिसले, याचं मला जाम नवल वाटत राहिलं.
स्कॉटलंडमधल्या पाण्यापासून बनवल्या जाणाऱ्या व्हिस्कीला ‘स्कॉच’ म्हणतात.. पासून माझं प्राथमिक शिक्षण सुरू झालं. ती स्कॉच तशी बनण्यासाठी तिथल्या पाण्यातले घटक महत्त्वाचे आहेत; म्हणून स्कॉचसाठी संपूर्ण स्कॉटलंडचं पाणी स्पेशल आहे. प्रत्येक प्रादेशिक पाण्याला का महत्त्व असतं याचा मला खरा उलगडा होऊ लागला आणि एखादा माणूस बारा गावचं पाणी प्यायलेला असणं म्हणजे अनुभवसंपन्न का असतो हेही पर्यायाने उमगू लागलं. एक देखणी स्कॉटिश शिक्षिका आमचा अभ्यासक्रम पूर्ण करून घेत होती, त्यामुळे कुणाचंही ध्यान विचलित होण्याचा प्रश्नच नव्हता. एक लिटर स्कॉचच्या बाटलीसाठी दीडशे लिटर पाणी खर्च होतं.. या पहिल्या वर्गाच्या धडय़ानंच माझ्या घशाला कोरड पडली. माझ्याबरोबरीच्या मित्रांना वाटलं, ती नवीन प्येयाच्या ध्यासानं पडलीय की काय वगरे! तर एका बाटलीमागे दीडशे लिटर पाण्याचं बलिदान असतं; नाहीतर त्या स्कॉचला कशाला महत्त्व आलं असतं? या माहितीतच मी मनानं खूप वेळ रेंगाळल्याने, आपल्या देशातल्या वाइनरीज, त्यासाठीचं पाणी, त्या पाण्यासाठीचं राजकारण, एकूणच महाराष्ट्रातले आणि पर्यायाने भारतातल्या पाणी प्रश्नाचे असंख्य कंगोरे माझ्या डोक्यात थमान घालू लागल्याने; पुढचा काही वेळचा अभ्यासक्रम ढोणीच्या हेलिकॉप्टर शॉटसारखा माझ्या डोक्यावरून गेलेला होता. सिंगल माल्ट म्हणजे एकहाती सत्ता जिंकलेल्या सरकारसारखी ‘रेअर’ आणि ‘ब्लेंडड’ म्हणजे आघाडी सरकारसारखी ‘थोडी कमी महत्त्वाची, पण गरज भागवणारी’ वगरे सवयीच्या परिभाषेने, नवीन शब्द आणि त्यांच्या व्याख्या माझ्या माझ्यासाठीच पक्क्या करून घेऊन ज्ञानात नव्याने भर करून घेत होतो. मग पुढचे वर्ग पार करत ती संपूर्ण डिस्टिलरी, त्यातली तांत्रिकता, वापरली जाणारी रसायनं, पदार्थ, प्रमाणं, अल्कोहोलचं महत्त्व, गणित, शास्त्र, अवाढव्य अशा कॅटॅगरीत मोडणारी दारू बनवली जाणारी, साठवली जाणारी दुमजली लाकडी बॅरल्स, प्रयोगशाळा वगरे असं काही तासांचं मनोभावे शिक्षण घेतल्यानंतर सर्व विद्यार्थ्यांना शेवटी शिक्षणाची अनुभूती म्हणून उच्चतम स्कॉचचे मोफत दोन दोन घुटके; आणि ते घेतानाही ते कसे घ्यायचे? घेण्यापूर्वी त्याचा गंध आधी गात्रात कसा भिनवायचा, मग पहिला छोटासा घुटका घेऊन पूर्ण तोंडभर घोळवून फील घेऊन मग दुसरा मोठा घुटका कसा आणि कधी घ्यायचा वगरे स्पेशलायझनचे धडे देऊन विद्यार्थ्यांला मद्य पिण्यात निष्णात करून टाकणारं विद्यापीठंच ते. इतर कोणत्याही विद्यापीठातून बाहेर पडताना असा पारंगत वगरे होण्याचा आत्मविश्वास दिला जात नसेल.
मी या अभ्यासक्रमाकडे किती मध्यमवर्गीय विचारसरणीतून पाहतोय असं नक्कीच एखाद्या जाणकाराला वाटलं असणार. कारण माझ्या डोक्यातले हे विचार खरंच टिपिकल मराठी मध्यमवर्गीय माणसाचे आहेत हे माझं मलाच नंतर जाणवत राहिलं.
मद्य अथवा दारू या शब्दांशी सुसंस्कृत मराठी माणसाचा संबंध हा परंपरेनंच मानभावीपणाचा. हे शब्द आणि प्रत्यक्ष पिणे या कृतीचा आपल्याकडे थेट चारित्र्याशीच संबंध येत असल्याने आपल्या दैनंदिन जीवनात उघडपणे या पेयाला आजही अजिबात स्थान नाही. पण म्हणून पिणाऱ्यांची संख्या खूप कमी आहे का? तर अजिबात नाही. सर्व जगात, सर्व समाजांमध्ये जेवढं पिणाऱ्यांचं प्रमाण आहे तितकंच आपल्या समाजातही ते तेवढंच आहे. मग हा खजील करणारा दृष्टिकोन का, हा प्रश्न मला खूपच मनोरंजक वाटू लागला.
खरंतर आपल्या सर्व पुराणकथांमधे सुर-असुर, राक्षस वगरे सोडाच, प्रत्येक देवागणिक वेगवेगळ्या मद्य-मदिरांचा उल्लेख आहे. नाहीतर शंकराच्या नावाने सोमरस आजही कशाला फेमस असता? कोणतेही सण, समारंभ निरनिराळ्या प्रकारच्या मद्यांशिवाय होत नसावेत असं गोष्टी वाचून लक्षात येतं. म्हणजे या विषयाचीही आपली प्रचंड मोठी परंपरा असणार त्या काळी. नाहीतर मदिराक्षी वगरे कुठून आल्या असतील? खरंतर मदिराक्षी हे त्या काळचं एक प्रकारे जॉब प्रोफाइलच नाही का? बरं. देव मद्य प्यायचे म्हणून त्यांच्या देवपणाला बाधा आल्याची काही गोष्ट वाचनात नाही. म्हणजे दारू हा तेव्हा आजच्या इतका अडचणीचा विषय नसावा. मग हा विषय आपल्याकडेच अडचणीचा कसा आणि केव्हापासून झाला असेल? अगदी कालिदास, शूद्रक वगरे नाटककारांच्या नाटकांतही मद्य, मदिरेचे सीन्स दिसतात. चाणक्याच्या कालखंडातही मदिरेचा उल्लेख आहे. चाणक्याने मदिरेच्या दुष्परिणामाबद्दलही लिहिलेलं आहे. म्हणजे ती होतीच.
आज मदिरा, मदिराक्षी आहेत; पण आजचं चित्र तेव्हासारखं नाही. आणि आमच्या कलाक्षेत्रासाठी दारू हा विषय तर काही विचारूच नका. साधारणत: कलाक्षेत्रात काम करणारा प्रत्येकजण पीत असला पाहिजे हा एक अत्यंत सामान्य समज रूढ आहे. किंवा दारू पीत नसाल तर या क्षेत्रात घेतच नाहीत की काय, इतपत सामान्य लोकांना शंका असते. दारू पिणाऱ्या कलावंतांची संख्या प्रचंड आहे यात वादच नाही; पण ही संख्या सर्वच क्षेत्रांत तितकीच आहे. असं कोणतं क्षेत्र नाही जिथे मद्य पिणारे लोक नाहीत? पण आमच्या क्षेत्रासाठी हा विषय सामान्यांसाठी कमालीचा उत्कंठावर्धक. ‘अमक्या अमक्या नटाला त्या दिवशी प्यायलेला पाहिला मी’ हे सांगण्यात काय खुमखुमी असते लोकांना. हे अचंब्याचं प्रमाण महाराष्ट्रात जरा जास्तच आहे. बाहेरच्या प्रदेशात याचं इतकं स्तोम मला फारसं दिसत नाही. पंजाबी लग्न वगरे तर दारूशिवाय होऊच शकत नाही. डायरेक्ट ऐपतीपर्यंत विषय जातो हा.
पण मला मागच्या काही युरोपच्या दौऱ्यांमध्ये याविषयी जाणवलेली प्रकर्षांची बाब म्हणजे, मद्य याविषयी आपल्या देशातल्या लोकांचा अॅप्रोच आणि बाहेरच्या देशातला अॅप्रोच यामधली कमालीची तफावत. आपल्याकडे पिण्यामध्ये अजूनही अपराधी भावना फार आहे. सांगूनसवरून उघडउघड पिणाऱ्यांची संख्या जेमतेम एकदोन टक्के. बाकी चोरून पिणारे. कुणालाच न कळता, जणू पीतच नाही अशी प्रतिमा राखून गुप्तपणे पिणाऱ्यांची संख्या अमाप. घरातली मुलं वडिलांबरोबर निवांत पीत बसली आहेत असं दृश्य आजकाल काही घरात दिसतं. पण हे प्रमाण अत्यल्प या सदरातच मोडणारं.
आपल्या नाटक-सिनेमांमध्ये मद्य हा विषय तर सरसकट एकांगीच. अजूनही. आजही. दारू पिणारी पात्रं ही व्हिलन असतात. गुंड, मवाली, बदमाश, भुरटे, चोर, स्मगलर्स दाखवायचे असतील तर ते दारू पिणारे दाखवले की त्यांची नीतिमत्ता अत्यंत सोपी अधोरेखित करता येते. हिरोचं डोकं फिरलं आहे, तो विमनस्क आहे, त्याचं मानसिक संतुलन बिघडलं आहे, फ्रस्ट्रेट झालाय, किंवा तो वाया जाण्याच्या मार्गावर आहे असं काही दाखवायचं असलं की फक्त एक दारूचा ग्लास त्याच्या हातात दिला की काम झालं. एवढं सोपं आहे ते. पण प्रत्यक्षात संयमानं दारू पिणाऱ्या यशस्वी लोकांची संख्या काही कमी नाही ना समाजात? एखादा चांगला हिरो, समंजस, कोणतंही दु:ख नाही, आनंदात आहे आणि तो ‘प्रमाणात’ प्यायलाय आणि तरीही त्यानं काहीही राडे घातलेले नाहीत, असं दृश्य आजपर्यंत कोणत्याही गोष्टीत पाहायला मिळालेलं नाही. जे वास्तवात एरव्हीच असतं, पण कलेच्या प्रांगणात हा विषय तसा कधीच येत नाही. त्याचं कारण खरा प्रॉब्लेम हा की, नीतिमत्ता, वाईटपणा, मूल्यं, अपयश वगरे सगळे विषय मद्याच्या ‘प्रमाणावर’ अवलंबून आहेत हे आपल्याला कधीच शिकवलं गेलेलं नाही. एका मर्यादेपलीकडे, अतिरिक्त सेवन वाईटच; पण प्रमाणात, झेपेल तेवढी. एखादा पेग यानं काही नीतिमत्ता पणाला नाही लागत. फक्त ‘प्यायलं की वाईट’ या समजातूनच वर्षांनुवर्षांचा अपराधीपणा साचत आलेला आहे. पण म्हणून पिणाऱ्यांची संख्या काही कमी झालेली आहे असं अजिबात नाही.
कोल्हापूरला माझ्या घराशेजारी गिरणी होती. पाटील नावाचा माणूस तिचा मालक होता. सकाळी उठल्यावर चहा प्यायलेला पाटील पाहणं म्हणजे, एखाद्याने उपवासाला चिकनचा बेत ठेवण्यासारखं धक्कादायक. हा पाटील सकाळी सातला एक क्वार्टर रम प्यायचा आणि गिरणी सुरू करायचा. पाटील प्यायला असेल तर संतही या पाटलासमोर लाजेल एवढा हा माणूस सज्जन. पाटील प्यायलेला असेल तर स्त्रिया अधिकच खात्रीनं गिरणीत जाऊन बसायच्या. शुद्धीत असेल तरच हा पाटील कर्दनकाळ वाटे. पण प्यायल्यावर शांत, सरळ आणि लॉजिकल वागे.
मी कित्येक नामवंत चित्रकार, गायक, नट पाहिलेत; जे नेमानं रोज प्यायचे, पितात; पण त्यांचं पिणं त्यांच्या कलेपेक्षा कधीच मोठं झालं नाही.
इथे मला पिण्याचं समर्थन करायचं नसून त्याबद्दलचा एकांगी दृष्टिकोन तिरस्करणीय वाटतो. पिणारा माणूस म्हणजे सरसकट वाईट, व्यसनी, अनतिक ही समजूत फार दांभिक आहे. कित्येक निव्र्यसनी वाईट वागणारी माणसं नाहीयेत का या जगात? व्यसन न करताही अन्याय्य वागणारी.
तेच जरा बाहेरच्या संस्कृतीत पाहा.. कबीरसारखा संत असू देत, नाहीतर मीर, गालिबपासून सोमेगोमे शायर असू देत; मद्य, मदिरा या विषयांकडे एका आध्यात्मिक दृष्टीनं त्यांनी पाहिल्याचं दिसतं. हरिवंशराय बच्चन यांचा ‘मधुशाला’ काव्यसंग्रह श्रेष्ठ काव्यसंग्रह ठरतो. मद्य, मदिरा आणि मदिरालय याकडे इतक्या परमाíथक पातळीवर ते लोक पाहतात. तशी दृष्टी आपल्याकडे विकसितच झाली नाही.
मी आताच्या भारत-इंग्लंड क्रिकेट मॅचसाठी लीड्सला गेलो होतो. क्रिकेट मॅचव्यतिरिक्त प्रत्यक्षात चहूबाजूने दारू, बीयरचे पाट वाहताना मी पाहिले. लोकांना दारू प्यायला मिळावी म्हणून या मॅचेसचं आयोजन करतात की काय, अशी शंका यावी. यामध्ये स्त्रियांचं प्रमाणही तितकंच. तिथल्या संस्कृतीचा अविभाज्य घटक आहे मद्य. दिवस-रात्र, स्त्री-पुरुष असा काही भेद तिथे मानला जात नाही. तिथलं हवामान हा महत्त्वाचा भाग आहेच; पण जेवताना, नंतर, आधी मद्य हे असतंच. प्रवासात, विमानात, पर्यटन स्थळांवर, मॉल्समध्ये कुठेही तुम्हाला वाट्टेल तेवढं मद्य उपलब्ध असतं. पाणीच कमी पितात ते लोक. मी परवा नवीन शब्दप्रयोगच ऐकला तिकडे ‘बीएरएज’ म्हणून. म्हणजे तासाला किती बीयर प्यायल्या जातात यावरून त्या माणसाचं ‘अॅव्हरेज’ तसं ‘बीएरएज’ मोजतात. वीकेंड्सना तर विचारायचीच सोय नाही. तरुण, तरुणी आबालवृद्ध फक्त पिण्यासाठीच वीकेंड साजरा करतात.
पण दुसऱ्या दिवशी मी हेही पाहिलंय की, हे पिणारे कित्येक किलोमीटर्स पळतात, खूप चालतात किंवा सायकिलग करतात, प्रचंड अंगमेहनत करतात. तशी ती तिथे करावीच लागते, पण आपल्याकडे? पिण्यापेक्षा हँगओव्हरचंच विश्व मोठं.
मी मघाशी म्हटलं की अॅप्रोचचा प्रश्न आहे, त्याचं अत्यंत बोलकं आणि छोटंसंच उदाहरण म्हणजे, मी ज्या मॅचला गेलो होतो त्या मदानावर जवळपास प्रत्येकच गोरा पीत होता. पण मॅचनंतर ते लोक निमूटपणानं आपापल्या वाटेनं निघून गेले. मात्र मदानावर जे प्रचंड प्यायलेले भारतीय होते त्यांनी िधगाणा घातला. यॉर्कशायरच्या एका मोठय़ा गुजराती चमूने तर लाज आणली होती. मॅचनंतर हर्षां भोगले, सुनील गावसकर, रवी शास्त्री, संजय मांजरेकर, वासिम अक्रम यांच्याबरोबर जे विश्लेषण करताना आपण पाहतो; ते विश्लेषण मी प्रत्यक्ष पाहत होतो. तेव्हा या प्यायलेल्या भारतीय गुजराती चमूने सुनील गावसकरना, ते लाइव्ह बोलत असतानाही समोरून हाका मारून मारून हैराण करून सोडलं होतं. ते त्यांचं काम करतायेत, चॅनेलवर लाइव्ह बोलतायेत याचं त्यांना काहीही सोयरसुतक नव्हतं. वासिम अक्रमला तर अत्यंत अपमानास्पद एकेरी हाक मारून सळो की पळो करून सोडलं होतं. पिणारे सगळेच होते, पण असं वागणारे फक्त भारतीय होते. प्यायल्यानंतरची लायकी सिद्ध होते, ती अशी.
मला एन.एस.डी.मध्ये अभिनय शिकवायला शेवटच्या वर्षी नसीरुद्दीन शहाही होते. क्लासेस झाल्यावर हॉस्टेलवरच रात्री कसलीशी पार्टी होती. पार्टीत यशपाल शर्मा नावाचा आजचा प्रथितयश नट खूप प्यायलेल्या अवस्थेत आला. नसीर सरांचा नुकताच कुठला तरी सिनेमा रीलीज झाला होता. त्या सिनेमातलं काम यशपाल शर्माला अजिबात आवडलं नव्हतं, ते त्यानं दारूच्या नशेत नसीर सरांना उघड उघड सांगितलं. हा प्यायलेला आहे म्हणून नसीर सरांनी लक्ष नाही दिलं कदाचित. मला खूपच आश्चर्य वाटलं. पण मला त्याहून धक्का नंतर बसला, जेव्हा नसीर सरांचं काम वाईट होतं हे सांगून यशपाल पार्टीतून बाहेर पडला आणि बाहेर मी त्याला पाहिलं तर तो चक्क शुद्धीत होता. त्यानं प्यायल्याची अॅक्टिंग केली होती. त्याला त्याचं खरं मत मांडायचंच होतं; पण ते त्यानं दारूच्या नशेच्या आड सांगणं पसंत केलं. नशेत सांगितलं असतं तर काय झालं असतं याचा विचार मला करता आला नाही. अशा कित्येक पाटर्य़ाना दारूच्या खोटय़ा नशेच्या आड जुनी भांडणं काढताना आणि मारामारी करताना मी अनेकांना पाहिलेलं आहे. म्हणजे नशेच्या प्रभावात किंवा आडून खरं वागणं, हे प्रत्यक्ष खरं वागण्यापेक्षा सोपं वाटतं. म्हणजे जे काही झालं ते दारूवर ढकलणं सोपं जातं. आपण कसेही वागलो तरी दोष दारूवर ढकलता येतो. अॅप्रोचचा फरक आहे तो इथेच. आज पुरुषांबरोबर पिणाऱ्या स्त्रियांची संख्या वाढतेय. या वाक्यामध्येच प्रतिगामीपणाचा फील आहे. पण ही वस्तुस्थिती आहे.
बाहेरच्या देशात लोक कोणत्याही थराला जाऊन पितात. तिकडे सगळं आदर्श वातावरण आहे असं तर मुळीच नाही. पण त्यासंबंधीची त्यांची व्यवस्थाही तशीच कडक आहे. कायदे प्रचंड कडक आहेत. दारू प्यायल्यानंतर गाडी चालवली तर लायसेन्स जप्त होतेच, आणि फक्त आणि फक्त तुरुंगवास भोगावा लागतो. मग यात कुणालाही दयामाया नाही.
पण या बाबतीत आपल्याकडे काय चित्र आहे याबद्दल लिहायची काहीच आवश्यकता नाही. एका बाटलीमागे दीडशे लिटर पाणी वापरून आपण दारू बनवणार, नंतरही एका पेगसाठी परत वरून पाणी घालून आपण ती पिणार; त्यासाठी नसíगक पाण्याचं नियोजन न करता गरिबांच्या तहानेचं राजकारण करणार; दारूबंदीच्या जाहिराती करणार, पण कारखानेही काढणार, वर अवाढव्य कर लादून अर्थकारणातला सगळ्यात जास्त महसूलही मिळवणार; लोकांना प्यायला सहज उपलब्ध करून देणार, पण नतिकतेचा बाऊपण करणार; पिण्याच्या प्रमाणाचे संस्कार तर नाहीच करणार आणि नंतरच्या परिणामांबाबत कायद्याची अंमलबजावणी चुलीत घालणार; या आणि अशा सगळ्याच पातळीवर आपल्याकडे मद्याबाबतीत अत्यंत नेभळट, बेगडी आणि दांभिक धोरण राबवलं जातं. दारू या विषयातला आपला सगळाच व्यवहार हा अत्यंत खोटेपणाचा आणि स्वत:ची समजूत घालण्याचा आहे.

मराठीतील सर्व लोकप्रभा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 19-09-2014 at 01:19 IST

संबंधित बातम्या