14 August 2020

News Flash

कै सी तेरी खुदगर्जी?

योगायोग किती विलक्षण आहे पाहा.. जागतिक पर्यावरण दिनाच्या पूर्वसंध्येस निसर्ग या चक्रीवादळावर, त्याने दिलेल्या इशाऱ्यावर, वातावरणबदलावर आणि तापमानवाढीवर चर्चा सुरू आहे.

आगीचा शोध आणि चाकाचा शोध लावणाऱ्या या माणसाने नंतर मागे वळूनच पाहिले नाही गेली हजारो वर्षे.

विनायक परब – @vinayakparab / vinayak.parab@expressindia.com

योगायोग किती विलक्षण आहे पाहा.. जागतिक पर्यावरण दिनाच्या पूर्वसंध्येस निसर्ग या चक्रीवादळावर, त्याने दिलेल्या इशाऱ्यावर, वातावरणबदलावर आणि तापमानवाढीवर चर्चा सुरू आहे. कदाचित यापेक्षा अधिक विचार करायला लावणारे दुसरे निमित्तच असू शकत नाही!

कधी नव्हे ते करोनाकाळात संपूर्ण जगाचे सारे व्यवहार ठप्प झाले. जगात हा असा सारे काही ठप्प करायला लावणारा क्षण येईल, अशी कल्पनाही प्रगतीच्या वारूवर आरूढ झालेल्या माणसाने कधी केली नव्हती. आगीचा शोध आणि चाकाचा शोध लावणाऱ्या या माणसाने नंतर मागे वळूनच पाहिले नाही गेली हजारो वर्षे. अश्मयुग मागे टाकून नवाश्मयुग, ताम्रयुग आणि लोहयुग अशी एक एक करत त्याने प्रगतीची दारे स्वकर्तृत्वावर खुली केली.. त्याचे बळ वाढत गेले. ज्या निसर्गाला त्यातील घटनाघटितांना घाबरून त्याने बहुधा देव-दैत्य निर्माण केले तोच माणूस स्वत:च देव असल्यासारखा वागू लागला..

बन लिया अपना पैगंबर

तर लिया तू सात समंदर..

या प्रगतीच्या वाटेवर गेल्या दोनशे वर्षांत तर त्याने आधुनिकतेची परिमाणे बदलली. औद्योगिक युग निर्माण केले तेही स्वबळावर. त्यानंतर संगणक युग. आता तो तिसऱ्या क्रांतीच्या उंबरठय़ावर उभा आहे. असे समांतर इंटरनेटचे जग निर्माण केले की, याच्या दोऱ्या कुणा एकाच्या हाती नाहीत आणि आता या प्रगतीच्या वारूला रोखणाराही कुणी नाही.. खरे तर माणसाची सावली त्याला कधीच सोडून जात नाही, असे म्हणतात; पण त्याने कृत्रिम बुद्धिमत्तेच्या बळावर आता तर देवालाही शक्य नाही असेही वरदान मिळवले. पूर्वी कथा- दंतकथांमध्येच शक्य असलेल्या गोष्टी प्रत्यक्षात आणल्या. िलबोणीच्या झाडामागे लपलेल्या चंद्रावर त्याने प्रत्यक्ष पाऊलही ठेवले. मंगळही पारखा नाही राहिला अशा अवस्थेप्रत प्रवास झाला.. माणूस मोठा होत गेला.

मस्त मौला, मस्त कलंदर

तू हवाका एक भवंडर

..निसर्गच आपल्या कह्य़ात आल्यासारखा.

या संपूर्ण प्रवासात त्याने विकास-प्रगतीचे मानक मानलेल्या गोष्टींकडेच लक्ष दिले, त्याला निसर्गाचे असलेले भान सुटले.. माणूस वगळता सारे काही किडेकीटक असेच त्याला वाटू लागले.. पण त्या कीटकांनाही निसर्गात महत्त्व असतं खूप. त्यांचं एक चक्र असतं. त्याला धक्का बसला की, मग शेतीचं उत्पादनही घटतं, शेतकरी आत्महत्या वाढतात.. टोळधाडीही येतात! हे सारं काही तो आता अनुभवतो आहे. आता गेल्या काही वर्षांत तापमानवाढीबद्दल चर्चा सुरू आहे. प्रगतिपथावर असताना वाढलेल्या कर्ब उत्सर्जनाचाच हा परिणाम. दुसरीकडे शहरीकरणासाठी झाडे- जंगलेही सपाट केली. कर्बवायूचे ऑक्सिजनमध्ये रूपांतर करणारी नैसर्गिक यंत्रणाच आपण कापून काढली आणि प्रदूषणामुळे फुप्फुसविकार वाढले. गेल्या काही वर्षांत सार्स, स्वाइन फ्लू आणि आता करोना या श्वसनविकारांचा हल्ला त्याच फुप्फुसांवर होतो आहे. करोनाकाळाने दोन गोष्टी केल्या. एक ‘त्याला’ जालंदरच्या छतावरून पूर्वीसारखा हिमालय दाखवला आणि तात्पुरत्या स्वच्छ झाल्याने अनेक नद्यांचा तळही दाखवला. यंदाच्या पर्यावरण दिनाचे घोषवाक्य आहे ‘निसर्गासाठी वेळ’.. करोनाकाळात त्याने हा किमान विचार केला असावा.

फुलपाखरांच्या पंखांना दोरा बांधणाऱ्या त्याच्या वृत्तीने गर्भार हत्तिणीलाही सोडले नाही. अननसामध्ये फटाके भरून तोच भुकेल्या हत्तिणीला खायला देत त्याने मजा करून पाहिली. दुर्दैव असे की, भारताच्या पर्यावरण चळवळीचा श्रीगणेशा करणाऱ्या सायलेंट व्हॅलीमध्येच ही घटना घडली! होरपळलेल्या तिने मानवी वस्तीतून जाताना ना माणसांना त्रास दिला, ना त्यांच्या वस्त्या उद्ध्वस्त केल्या. जातककथेतील करुणामयी बोधिसत्त्वासारखी तिने जलसमाधी पत्करली..

हे कबिरा अब तो मान जा..

कैसी तेरी खुदगर्जी!

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 5, 2020 1:32 am

Web Title: world environment day nisarga cyclone mathitartha dd70
Next Stories
1 सावधपण सर्वविषयी!
2 येरे माझ्या मागल्या!
3 चीन चीन चुन…
Just Now!
X