28 February 2021

News Flash

मोकळे आकाश.. : पोचपावती

आमच्या वर्गातल्या मुलामुलींचा एक व्हॉट्स अ‍ॅप ग्रुप आहे. सगळ्यांचा असतो तसाच. त्यावर नातवंडांच्या बारशापासून त्यांच्या शाळांच्या अ‍ॅडमिशनपर्यंत चर्चा झडतात.

मराठी ही इतकी समृद्ध भाषा आहे की अनेकदा एकाच अर्थाचे दोन शब्द इंजिन आणि कोळशाच्या डब्यासारखे जोडून येतात आणि आपल्याला अभिप्रेत अर्थ पूर्णपणे पोचविते होतात.

डॉ. संजय ओक – sanjayoak1959@gmail.com

आमच्या वर्गातल्या मुलामुलींचा एक व्हॉट्स अ‍ॅप ग्रुप आहे. सगळ्यांचा असतो तसाच. त्यावर नातवंडांच्या बारशापासून त्यांच्या शाळांच्या अ‍ॅडमिशनपर्यंत चर्चा झडतात. जुन्या स्मृतींना उजाळाही असतोच. गेल्या वर्षी करोनाचे नानाविध उपाय होते. आणि कधी कधी एखादा प्रसन्न, आयुष्य जगण्याची उमेद वाढविणारा विचार, चारोळी किंवा परिच्छेद. हे विचार माझ्या मनात रुंजी घालत राहतात. त्यातून नवे काहीतरी सुचते, लिहिले जाते. श्रेय द्यावे तर मूळ लेखकाचे नाव दर वेळेला मिळतेच असे नाही. कारण एखाद्या धबधब्याने कडय़ाकपाऱ्यांमधून उडय़ा मारत पुढे जावे तसा तो विचार ‘फॉरवर्ड’ होत आलेला असतो. परवा वाचनात आलेला ‘पोचपावती’ हा असाच एक विचार. अनामिक लेखकाने केलेल्या विचारांपेक्षा मला ही ‘पोचपावती’ खूप वेगळी भावली, आणि त्याचेच शब्दांकन मी येथे करतो आहे.

मराठी ही इतकी समृद्ध भाषा आहे की अनेकदा एकाच अर्थाचे दोन शब्द इंजिन आणि कोळशाच्या डब्यासारखे जोडून येतात आणि आपल्याला अभिप्रेत अर्थ पूर्णपणे पोचविते होतात. एखादी गोष्ट मिळाली आणि ‘घेता’ देत्याकडून स्वीकार घेऊन संमती देता झाला की पोच पूर्ण होते आणि त्याची दप्तरदरबारी नोंद घेतली गेली की ‘पावती’ फाडली जाते.  ‘पोचपावती’ ही अशी उदयाला येते. वास्तविक पाहता कोणीतरी काहीतरी विशेष किंवा वेगळे केलेले असते, त्याची दखल म्हणजे ही पोचपावती होय. आमच्या लहानपणी पोस्ट खात्यात ‘रजिस्टर्ड विथ अ‍ॅकनॉलेजमेंट’ ही एक संज्ञा आणि टपाल प्रकार अस्तित्वात होता.  हिरवट निळ्या रंगाचे एक चतकोर चिठोरे मूळ पत्राला चक्क शिवले जात असे. पुढे स्टेपलरचा जमाना आला. पाठविणाऱ्याचा पत्ता भरलेला असे. त्यावर सही करून साभार परत पाठविण्याचे उत्तरदायित्व वाचणाऱ्याकडे असे.  ‘अ‍ॅकनॉलेजमेंट’ या शब्दाच्या इंग्लिश स्पेलिंगने आमचे बालपण यथेच्छ करपले. यात w, d ही मंडळी सायलेंटच राहणार होती, तर घुसलीच कशाला? हा विचारही अनेकदा माझ्या मनाला स्पर्श करून गेला.

‘पोचपावती’ ही दरवेळी उलट टपाली पाठवायची सरकारी सोय न राहता परस्पर शिष्टाचाराचे अंग बनून राहिली. कोणाच्या घरी जेवायला बोलावल्यावर ताकाचा शेवटचा भुरका मारल्यावर येणारा ढेकर हीसुद्धा यजमानाला दिलेली पोचपावती बनला. ‘थॅंक्स फॉर अ लव्हली डिनर..’ हे आंग्लाळलेले आभार आमच्या एका ‘ओ..ब्या’ या ढेकराने पोच देऊन पूर्ण केले. आईच्या हातची पालकाची ताकातली शेंगदाणे घालून केलेली आमटी पिताना आम्ही मारलेला भुरका हे बॅड टेबल मॅनर्स असतीलही कदाचित; पण आमच्या लेखी ती आईच्या हस्तकौशल्याला दिलेली पोचपावती होती.

छोटय़ा छोटय़ा पोचपावत्या मोठमोठी कामे करवून घेण्यात खारीचा वाटा उचलू लागल्या.  आजही उत्तम टाके घालणाऱ्या माझ्या पदव्युत्तर विद्यार्थ्यांला ‘‘Well done, these are not sutures, this is your signature!’’असे म्हणून त्याच्या पाठीवर कौतुकाची थाप मारताना मी त्याला उत्तम कामाची पोचपावतीच देत असतो. माणूस खरं तर स्तुतीचा, प्रशंसेचा किंवा अगदी मुळापासून बोलायचं तर कौतुकाच्या चार शब्दांचा भुकेला असतो. Acknowledgement reflects appreciation.. एखाद्या उत्तम कामाचे खरे पारिश्रमिक म्हणजे बक्षीस कोणते? पसे, पुढचे पद, प्रतिष्ठा? नाही! तर ‘‘बढिया किया, आगे बढो..’’ म्हणणे आणि ते काम पुढे चालू ठेवण्यासाठी अधिक संधी देणे, ही खरी पोचपावती!

ती कधी लेखी शेऱ्यातून मुद्रित होते, क्वचित सरकारी फायलीतून डोकावते, कधी नजरेतून चमकते, तर कधी नि:शब्द बोलून जाते. पोच पुष्कळशी अनौपचारिक, तर पावती पूर्णपणे औपचारिक आणि अधिकृत. पोच म्हणजे स्वीकार आणि पावती म्हणजे देकार. पोच खिडकीतून डोकावते, तर पावती दरवाजा ठोठावून आत येते. पण दोघी एकत्र येऊन भेटतात तेव्हा केलेल्या कामाचे सार्थक होते. नव्या प्रयत्नांना हुरूप येतो आणि अजून करण्यासारखे बरेच काही आहे याचा विश्वास बळावतो.

करोनाच्या गेल्या दहाएक महिन्यांत काय कमावले आणि काय गमावले याची गोळाबेरीज केली तर उणे बाजूच विशेषत्वाने समोर येते.  म्हणून सुज्ञ वाचकांना एवढीच नम्र विनंती की, आम्ही डॉक्टरांनी केलेल्या कष्टांना पोचपावती द्यायची असेल तर एवढेच करा.. चेहऱ्यावर मास्क लावा. एकही शब्द न उच्चारता तुम्ही ‘Thank you’ म्हटल्याचा भास होईल!

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 7, 2021 1:10 am

Web Title: acknowledgement mokle akas dd70
Next Stories
1 थांग वर्तनाचा! : आक्रमकता आणि वर्तनीय सूज
2 लालित्यपूर्ण कादंबरी
3 ऐतिहासिक वाङ्मयाचा चिकित्सक वेध
Just Now!
X