आडवाटेवरील मंदिरे, गडकोट, नदीतीर, समाधीस्थाने, जंगल परिसर, अभयारण्ये, इतिहासातील कर्तबगार व्यक्तिमत्त्वांची मूळ गावे.. एकंदरीतच भटकंतीच्या आडवाटेवरच्या अनेक ठिकाणांची तेथील ऐतिहासिक संदर्भासह माहिती ‘आडवाटेवरचा इतिहास’ या छोटेखानी पुस्तकातून मिळते. विशेषत: महाराष्ट्रातील स्थळांच्या माहितीवर भर देण्यात आला असला तरी गोवा, केरळ, कर्नाटक राज्यातील काही वेगळ्या ठिकाणांची ओळख लेखक प्रल्हाद कुलकर्णी यातून करून देतात. छोटय़ा छोटय़ा प्रकरणांतून एकूण ४५ स्थळांची माहिती ते या पुस्तकातून देतात. भौगोलिकदृष्टय़ा त्या त्या स्थळांचे महत्त्व, तेथील निसर्गसंपदा, इतिहास, लोकसमजुती, त्या स्थळाबाबतच्या दंतकथा, वास्तूंची बांधकाम वैशिष्टय़े, ऐतिहासिक वास्तूंची आजची स्थिती इ. बाबत ते अगदी थोडक्यात माहिती देतात. भटकंती, इतिहास, वास्तुकला याची आवड असणाऱ्यांसाठी हे पुस्तक उपयुक्त ठरते. थोर समाजसुधारक गोपाळ गणेश आगरकर यांच्या साताऱ्यातील टेंभू गावाची माहिती, आद्य पत्रकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या सिंधुदुर्ग जिल्ह्य़ातील पोंभुर्णे या जन्मगावाची तसेच जांभेकर यांच्या येथील घराची ओळख करून देणारे प्रकरण निश्चितच दुर्लक्षित बाबींची महत्त्वपूर्ण माहिती देतात. मात्र या पुस्तकाच्या काही मर्यादाही आहेत. ‘आडवाटेवरचा इतिहास’ हे पुस्तकाचे शीर्षक काहीसा अपेक्षाभंग करते. कारण संबंधित ऐतिहासिक स्थळांची माहिती देताना, ऐतिहासिक संदर्भापेक्षा लोककथा, दंतकथा इ. ची माहिती जास्त प्रमाणात दिलेली आहे. ती तशी देण्याचीही अडचण नाही. मात्र या पुस्तकाचा मुख्य उद्देश आडवाटेवरच्या ऐतिहासिक स्थळांच्या भटकंतीसाठी लोकांना उद्युक्त करणे असा दिसतो. तसेच ऐतिहासिक संदर्भाच्या सूचीचा अभाव असल्यानेही ‘आडवाटेवरचा इतिहास’ हे शीर्षक सयुक्तिक वाटत नाही.

‘आडवाटेवरचा इतिहास’

– डॉ. प्रल्हाद कुलकर्णी

स्वयम प्रकाशन,पृष्ठे – १७६, मूल्य – २६४ रुपये