अंजली चिपलकट्टी – anjalichip@gmail.com

अंजली चिपलकट्टी.. विज्ञान अभ्यासक आणि अभियांत्रिकी क्षेत्रातील संशोधक. विज्ञानाशी घट्टपणे जोडलेल्या समाजशास्त्र, इतिहास, मानसशास्त्र, शिक्षण अशा आंतर—विद्याशाखीय संगतींच्या अभ्यासात त्यांना विशेष रस आहे. र्रूील्ल३्रऋ्रू कल्ल०४्र१८ हा विषय त्या शिकवतात. मानसशास्त्र, समाजशास्त्र, न्यूरॉलॉजी, जनुकशास्त्र, उत्क्रांती, अंत:स्रावशास्त्र या ज्ञानशाखांच्या एकात्मिक अभ्यास मांडणीतून मानवी वर्तणुकीचे अनेक पदर उलगडतात.  त्याबद्दल जाणून घेणारं आणि अथांग मानवी व्यवहारांचा थांग लावू पाहणारं पाक्षिक सदर..

Sadguru, Sadguru news, Sadguru latest news,
‘सद्गुरुंकडे’ यापेक्षाही वेगळ्या दृष्टिकोनातून पाहता येऊ शकते; ते असे…
Womens health It is need to understand mentality of pregnant women
स्त्री आरोग्य : काय असतं गर्भवतीच्या मनात?
kanyadan, valid marriage,
वैध लग्नाकरता कन्यादान नाही, तर सप्तपदी महत्त्वाची !
wife
पत्नीने तक्रार दाखल करणे क्रुरता नाही…

मानवी वर्तनाच्या विविध पैलूंपैकी या लेखात चर्चा करू या ‘आक्रमकता व हिंसकपणा’ या वृत्तीचा. मानवी इतिहासात अंदाजे सत्तर हजार वर्षांपूर्वी आदिमानवातून मानव घडत गेला.. ज्याला ‘बोधात्मक क्रांती’ असं म्हणतात. त्याआधी झालेली जीवशास्त्रीय उत्क्रांती आणि त्यानंतर वेगाने होत असलेली सांस्कृतिक उत्क्रांती या दोन्हींत आक्रमकतेची बीजे आहेत.

‘आक्रमकता आणि हिंसा योग्य की अयोग्य?’ याचं उत्तर बहुतांश लोक ‘अयोग्य’ असंच देतील; पण आपले वैयक्तिक-सामाजिक व्यवहार मात्र याची ग्वाही देत नाहीत. बॉक्सिंगसारखे खेळ आपण पैसे देऊन पाहतो. हॉकीमध्ये एखाद्या टीमने केलेली आक्रमक चढाई आपल्याला आवडते. एखाद्या सिनेमात हिरो सूडासाठी आक्रमक बनून कायदा हातात घेतो तेव्हा आपल्या नकळत आपण त्याच्या बाजूने असतो. अलीकडे कोणत्या वेबसीरिज किंवा सिनेमे जास्तीत जास्त बघितले जातात याची यादी पहिली तर ‘आक्रमकता व हिंसा आवडे सर्वाना’ असंच म्हणावं लागेल. युद्धभूमीवरच्या हिंसेला आपण उदात्त समजतो. पण नक्षलवादी किंवा दहशतवादी यांची मात्र आपण बाजू घेत नाही.

याचा अर्थ संदर्भानुसार आक्रमक व हिंसक असण्याला आपण मंजुरी देतो किंवा विरोध करतो. हे संदर्भ वैध की अवैध- हे कसं ठरतं?  माणसाचं हे आक्रमक, हिंसक वर्तन नैसर्गिक आहे की संस्कारित, त्यामागची कारणं काय नि धारणा काय, हे जरा खोलात जाऊन, जीवशास्त्रीय, पर्यावरणीय आणि समाजशास्त्रीय अशा सर्व विज्ञानवाटांनी समजावून घेऊ.

अनेक प्रयोगांमधून असं लक्षात येतं की आक्रमकतेचं एक प्रमुख कारण म्हणजे धोक्यांचं वाटणारं भय हे आहे. धोक्याच्या जाणिवेनं किंवा असुरक्षित वाटल्यानं जे भय उत्पन्न होतं त्याची निर्मिती मेंदूच्या ‘अमिग्डाला’ या पिटुकल्या भागात होते. इतर प्राणिजगतात बऱ्याच अंशी हे धोके शारीरिक असतात. अशा धोक्यांपासून वाचण्यासाठी क्षणार्धात प्रतिहल्ला किंवा पळ काढणे (fight or flight) हाच उपाय असतो. समजा, जंगलात फिरताना तुम्हाला साप दिसला, तर भीती वाटून लांब पळण्याचा किंवा सापाला लांब फेकण्याचा निर्णय मेंदूला खूप झटपट घ्यावा लागतो. यासाठी आपल्या ज्ञानेंद्रियांपासून एक शॉर्टकट अमिग्डालापर्यंत आलेला असतो.  म्हणूनच साप दिसला याची ‘जाणीव’ व्हायच्या आतच आपली कृती झालेली असते आणि आपला जीव वाचतो. मुद्दा हा की, धोक्यामुळे वाटणारी भीती हाताळण्याचं काम अमिग्डाला करतं आणि त्याचाच एक परिणाम असा की, अमिग्डाला हे भीतीतून येणाऱ्या आक्रमकतेचंही केंद्र आहे. यासाठी अनेक पुरावे सापडतात.

मादी प्राणी आपल्या पिल्लांना काही धोका वाटला तर आक्रमक होऊन जिवाची पर्वा न करता हल्ला करतात. उंदरांवर केलेल्या प्रयोगांतून दिसून आलं की अमिग्डाला काढून टाकला तर त्यांना नैसर्गिकपणे ज्याचे भय वाटते ते वाटेनासे होते. ते मांजरांनाही घाबरेनासे होतात! त्यामुळे आक्रमकपणेही वागत नाहीत. अपघाताने अमिग्डाला निष्क्रिय झालेल्या माणसातही असंच दिसून आलंय. याउलट, अमिग्डाला अति-उत्तेजित झाल्याने अत्यंत आक्रमक आणि हिंसक बनलेल्या गुन्हेगारांची बरीच उदाहरणे आहेत. चार्ल्स व्हिटमन हे त्यापैकी एक. या टेक्सासमधल्या माणसाने टेक्सास टॉवरवरून केलेल्या बेछूट गोळीबारात १६ माणसं ठार झाली होती. त्यानं आपली पत्नी आणि आईचीही हत्या केली होती. त्याला फाशी दिल्यावर त्याच्या मेंदूच्या ऑटोप्सीत असं दिसलं की त्याला अमिग्डालाजवळ झालेल्या टय़ुमरमुळे तो भाग दाबला जात होता आणि त्यातून उत्तेजित होत असावा.

भीती वाटणं हे फक्त नैसर्गिक शत्रूंमुळे घडतं असं नाही, तर प्राणी काही प्रमाणात भय ‘शिकू’ शकतात. काही उंदरांना एका विशिष्ट वस्तूला स्पर्श केल्यावर शॉक दिला; त्याची त्यांना भीती वाटू लागल्यानंतर आधी फ्लॅश टाकून मग शॉक अशी रचना केली. मग नुसता फ्लॅश बघताक्षणीच त्यांच्या अमिग्डालामध्ये भीतीची जाणीव झाली. याचा अर्थ कशाचं भय वाटलं पाहिजे, हे भोवतालच्या परिस्थितीनुसार उंदरासारखे प्राणीही शिकू शकतात. माणसात एकंदरच स्मरणात ठेवण्याची आणि शिकण्याची क्षमता एवढी जास्त असते की खूप जुने- अगदी लहानपणीचे धोक्याचे संकेत जाणवले किंवा त्यांचा भास झाला तरी भय उत्पन्न होते. आणि ही धोक्याची घंटा वाजवण्याचं काम अमिग्डाला करतं.

अमिग्डालाची उत्तेजित अवस्था कमी करण्याचं काम ‘फ्रंटल कॉर्टेक्स’ (फ्रंकॉ) हा मेंदूचा भाग करतो. हा म्हणजे आपल्या थेट कपाळामागचा मेंदूचा भाग. माणसाच्या उत्क्रांतीत सर्वात शेवटी तयार झालेला मेंदूचा तरुण भाग. फ्रंकॉचं मुख्य काम काय? तर माहितीचं सावकाश, पण योग्य उपयोजन करणं. भोवतालातून नवीन शिकत राहणं, पॅटर्न शोधून त्याचे नियम बनवणं. सायकल चालवायला शिकताना आपल्याला खूप लक्ष द्यावं लागतं, पण एकदा ती शिकली की ते काम ‘आपोआप’ होत राहतं. तर गोष्टी शिकून त्या ‘ऑटोमॅटिक’ सवयीच्या बनवणं आणि साठवून ठेवणं हे फ्रंकॉचं काम.

उत्तेजित अवस्थेत झटपट निर्णय घेणं ही अमिग्डालाची खासियत. पण म्हणूनच त्या निर्णयात त्रुटी असण्याची शक्यता जास्त. त्यामुळे फ्रंकॉ सतत अमिग्डालाची उत्तेजित अवस्था कमी करत त्याला बजावत राहतो, ‘थांब, हा निर्णय तुला नंतर महागात पडेल.’  निर्णय होण्याची जी प्रक्रिया चालते त्यात दोघांचाही सहभाग असतो. पण काही वेळा उत्तेजित अवस्था एवढी जास्त असते की अमिग्डाला फ्रंकॉकडे दुर्लक्ष करतो आणि निर्णय घेऊन मोकळा होतो.

हे विस्तारानं सांगायचं कारण असं की, आपलं वर्तन संतुलित ठेवण्यामध्ये फ्रंकॉची भूमिका खूप महत्त्वाची असते.. विशेषत: भय आणि आक्रमकता यासंदर्भात. फिनिअस गेज या रेल्वेत फोरमन म्हणून काम करणाऱ्या माणसाचं उदाहरण हा यासंदर्भात भरभक्कम पुरावा मानला जातो. काम करताना एकदा प्रचंड स्फोट होऊन आठ किलोचा एक लोखंडी बार त्याच्या मेंदूतून आरपार गेला आणि तरीही तो जिवंत राहिला. पण त्याच्या वागण्यात जमीन-अस्मानाचा फरक पडला. तो अत्यंत लहरी, अस्थिर, आक्रमक, बलात्कार करणारा हिंसक माणूस बनला. त्या अपघातात त्याच्या मेंदूतला फ्रंकॉचा बहुतांश भाग नष्ट झाला. ही घटना १८४८ मधली. तेव्हाच्या डॉक्टरनं फिनिअसचं बरीच र्वष निरीक्षण केल्यावर नोंदवलं की, मेंदूचा जो भाग आपल्याला भावनिक स्थिरता देतो, तोच हा भाग असावा. यावरून असं लक्षात येतं की, ‘असंतुलित- भय- आक्रमकता- हिंसा’ अशी ही एक साखळी आहे.

मगाशी आपण भय ‘शिकण्या’विषयी जे बोललो, ते शिकण्याचं काम अमिग्डाला फ्रंकॉच्या मदतीनं करतो. पण नंतर ‘आता धोका टळलाय, तर भय कमी होऊ दे’ असं शिकण्यामागे फ्रंकॉ प्रमुख भूमिका बजावतो. ज्यांचा फ्रंकॉ शारीरिक किंवा मानसिक आघाताने दुबळा असतो त्यांच्यात भीतीचे कारण नाहीसे झाले तरी मेंदू भीतच राहतो!  हे महत्त्वाचं अशासाठी की, भय आणि आक्रमकता कमी होण्यासाठी फ्रंकॉचा विकास जोमदार होणं अत्यावश्यक असतं.

फ्रंकॉ हा सर्वात हळू विकसित होत जाणारा मेंदूचा भाग.. जन्मापासून ते २५ वर्षांपर्यंत. याचाच अर्थ असा की, त्यातला बराचसा भाग हा जन्मजात नसून, आपले अनुभव आणि भवतालातील देवाणघेवाणीतून घडतो. केवळ आपल्या निसर्गदत्त जनुकांवर नाही!

याचा अर्थ अमिग्डाला हे फक्त भावनेचं आणि फ्रंकॉ हे विचारांचं/ विवेकाचं केंद्र आहे असं अजिबातच नाही. उलट, त्यांच्या मज्जापेशी एकमेकांत इतक्या गुंफलेल्या असतात की कोणी एक स्वतंत्रपणे काम करूच शकत नाहीत. देकार्ते या तत्त्वज्ञाने शरीर- मन- भावना- विवेक या प्रत्येकाचे अस्तित्व स्वतंत्र असते अशी मांडणी केली होती. ती कशी चुकीची आहे याबद्दलचे संशोधन अँटोनियो दमासीओ या वैज्ञानिकानं ‘देकार्तेज् एरर’ नावाच्या पुस्तकात मांडले आहे. आक्रमक/ हिंसक वृत्तीची आणखीन कारणे काय? भय ‘शिकू’ शकण्याचे परिणाम काय? बेरोजगारी, गरिबीमुळे लोक आक्रमक, हिंसक होतात का? ज्यांच्याकडे ‘सर्व आहे’ ते लोक कमी आक्रमक असतात का? या प्रश्नांची सखोल चर्चा आपण पुढील लेखात करू.