डॉ. सूर्यनारायण रणसुभे

ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित ज्येष्ठ हिंदूी लेखिका कृष्णा सोबती यांचे नुकतेच निधन झाले. त्यांच्याविषयी..

ज्ञात अशा संपूर्ण भारतीय भाषांच्या स्त्री-पुरुष साहित्यिकांत कदाचित कृष्णा सोबती या एकमेव अशा लेखिका असाव्यात ज्यांना ९४ वर्षांचे दीर्घायुष्य लाभले. वयाच्या ९३ वर्षांपर्यंत त्या दिल्लीतील साहित्यिक वर्तुळात सक्रिय होत्या. त्यांच्या सर्जनात्मक ऊर्जेवर आणि लेखकीय बांधिलकीवर त्यांच्या वयाचा कधीच व कसलाच परिणाम दिसून येत नव्हता. वयाच्या ९३ वर्षांपर्यंत त्या रोज तीन-चार वृत्तपत्रे वाचत होत्या. लेखक व बुद्धिवाद्यांच्या सत्ताविरोधी संमेलनात हजेरी लावत होत्या आणि रोजच भेटायला आलेल्यांचे आतिथ्यसुद्धा करीत होत्या. आयुष्याच्या कुठल्याही वळणावर त्यांनी सत्तेशी कधीच व कसलीच तडजोड केलेली नाही. पद, प्रतिष्ठा आणि सन्मानापासून त्या सतत अंतर राखून होत्या. तरीदेखील सन्मान त्यांचा शोध घेत त्यांच्यापर्यंत येतच होते. साहित्य अकादमी (१९८०), कथा चुडामणि पुरस्कार (१९९९), साहित्य अकादमी फेलोशिप (१९९६), व्यास सम्मान (२००८) आणि शेवटी ज्ञानपीठ (२०१७) असे पुरस्कार व सन्मान त्यांना मिळत गेले. सत्तेपासून त्या कायम दूर राहिल्या. यूपीए सरकारने त्यांना पद्मभूषण द्यायचे ठरवले होते, पण त्यांनी ते नाकारले. अलीकडे समाजात वाढत असलेली असहिष्णुता आणि त्याला सत्तेचे वरदान पाहून त्यांनी साहित्य अकादमीची फेलोशिप परत केली होती.

पत्रकार-लेखक आशुतोष भारद्वाज यांनी त्यांची एक मुलाखत २०१६ मध्ये ‘आलोचना’ या हिंदी त्रमासिकासाठी घेतली होती. त्यात त्यांनी कृष्णाजींना प्रश्न विचारला की, ‘एक लेखक म्हणून तुमचे स्वत:चे राजकारण काय आहे? २०१४ नंतरच्या या देशातील सांस्कृतिक परिदृश्याबद्दल तुमचे काय मत आहे?’ उत्तरादाखल त्या म्हणाल्या की, ‘आजचे सांस्कृतिक वातावरण हे संवेदनशील मनास अस्वस्थ करणारे, भयभीत करणारे आहे. सर्जनस्वातंत्र्यावर अलीकडे ज्या पद्धतीची आक्रमणे होत आहेत आणि ज्या प्रकारे आज लेखकांचा अपमान केला जात आहे, याच्यापूर्वी असे कधीच झाले नव्हते.’

या मुलाखतीत पुढे त्या म्हणतात : ‘या अशा अवस्थेसाठी स्वत: लेखक मंडळीही तेवढीच जबाबदार आहेत. अलीकडे लेखक मंडळी सत्ता-प्रतिष्ठानात घुसण्याचा प्रयत्न करत आहेत. स्वातंत्र्यानंतरच्या सुरुवातीच्या काळात नागरिक आणि सत्ता हे दोघेही आपल्या अधिकार आणि कर्तव्याबद्दल खूप सावध होती. एकमेकांबद्दल सन्मान बाळगणाऱ्यांची ती संस्कृती होती. पण असे सन्मानाचे नाते नंतरच्या काळात संपुष्टात आले. लेखकासाठी हे खूप महत्त्वाचे असते, की त्याने आपले स्वातंत्र्य अबाधित ठेवावे. पण हे नवे सरकार या देशास पुन्हा एका फाळणीकडे घेऊन जात आहे. फाळणीच्या ज्या जखमा भरून गेलेल्या होत्या वा मंदगतीने भरल्या जात होत्या, त्या जखमांना या राजकीय मंडळींनी पुन्हा ताज्या केल्या. यांना हेच कळेना, की हे राष्ट्र एका महाकाव्याप्रमाणे आहे. यात अनेकानेक अर्थ भरलेले आहेत. पुन: पुन्हा वेगवेगळ्या रूपांत या महाकाव्याच्या व्याख्या होऊ शकतात, होतातही. या देशाच्या स्मृतीचे वय हजारो वर्षांचे आहे. पण हे सरकार या महाकाव्यावर एकच वृत्तांत, एकच अर्थ थोपवू इच्छिते. आपण मंडळी यांच्यासोबत या देशाच्या संस्कृतीवर चर्चाच करू शकत नाही. कारण यांना या देशाची संस्कृतीच समजलेली नाही आणि त्यामुळेच आम्हा सर्व लेखकांचे हे नैतिक कर्तव्य ठरते, की आमच्या इतिहासावर ही मंडळी जो दावा करीत आहेत, त्याचा विरोध करायला हवा. हे खरे आहे, की संग्रहालयात एक इतिहास असतो. पण त्याच्याहीपेक्षा एक मोठा इतिहास राष्ट्राच्या आत्म्यात धडकत असतो. या इतिहासाला, या विशाल अशा महाकाव्यात्मक वृत्तांताला वाचवण्याची आज गरज आहे.’

आयुष्याच्या अखेरच्या श्वासापर्यंत आपली मते निर्भीडपणे मांडणाऱ्या या लेखिकेचा जन्म १८ फेब्रुवारी १९२५ रोजी पाकिस्तानातील गुजरात या गावी झाला. त्यांच्यावर तीन वेगवेगळ्या भाषांचे संस्कार झाले. जन्म अखंड अशा पंजाबात, त्यामुळे पंजाबी भाषेचे संस्कार; सुरुवातीचे शिक्षण लाहोर येथे, त्यामुळे उर्दू भाषेचे संस्कार; नंतरचे शिक्षण व निवास शिमला आणि दिल्ली येथे, त्यामुळे हिंदीचे संस्कार! केवळ भाषिक संस्कारच नाही तर जगण्याचे, खाण्या-पिण्याचे, जीवनशैलीचे संस्कारदेखील तीन ठिकाणांचे! त्यामुळे त्यांच्या अभिव्यक्तीवर या तिन्ही भाषांचा व संस्कृतींचा प्रभाव दिसून येतो. त्यामुळेच ज्ञानपीठ पुरस्काराच्या समितीने हे नमूद केले आहे- ‘कृष्णा सोबती ज्या भाषेचा वापर आपल्या अभिव्यक्तीसाठी करतात, त्या भाषेत हिंदी, उर्दू व पंजाबी भाषेचा आणि या तीन प्रदेशांतील संस्कृतींचा अप्रतिम समन्वय झालेला आहे. त्यांच्या कथा-कादंबऱ्यांतील स्त्री-पुरुष निर्भीड आहेत. व्यवस्थेने व समाजाने दिलेल्या आव्हानांना सहजपणे भिडण्याची ताकद त्यांच्यात आहे आणि हेच त्यांचे भारतीय साहित्याला दिलेले योगदान आहे.’

जी भाषा कृष्णाजी आपल्या अभिव्यक्तीसाठी वापरतात, ती त्या-त्या पात्रांच्या जगण्याची भाषा असते. त्यामुळे त्यांच्या या भाषेशी, शब्दांशी जर कोणी संपादक वा प्रकाशक छेडछाड करीत असेल, तर ते त्या अजिबात खपवून घेत नसत. त्यांनी आपली पहिली कादंबरी १९५२ मध्ये ‘चन्ना’ या नावाने लिहिली आणि प्रकाशनासाठी त्या काळचे प्रसिद्ध मुद्रक व प्रकाशक ‘लीडर प्रेस, अलाहाबाद’ला पाठवून दिली. त्यांनी ही कादंबरी प्रकाशित करण्याचा निर्णय घेतला. सात-आठ महिन्यांनंतर त्या कादंबरीची मुद्रित प्रत मुद्रित-शोधनासाठी प्रकाशकाने त्यांच्याकडे पाठवून दिली. ही प्रत तपासताना त्यांच्या लक्षात आले, की त्यातल्या बऱ्याचशा उर्दू व पंजाबी शब्दांना काढून त्या ठिकाणी त्याच अर्थाचे संस्कृत शब्द ठेवण्यात आले आहेत. हे पाहून कृष्णाजी संतापल्या आणि त्यांनी प्रकाशकाला कळवून टाकले की, ‘मला ही कादंबरी प्रकाशित करायची नाही. तुम्ही माझ्या शब्दांशी जो खेळ केलेला आहे, त्यामुळे मी हा निर्णय घेतलेला आहे.’ पण प्रकाशकाने यावर फार मोठा खर्च केलेला होता. मुखपृष्ठही तयार होते. कृष्णाजींची ही पहिलीच कादंबरी असली, तरी त्या बधल्या नाहीत. तो संपूर्ण खर्च त्यांनी पाठवून दिला. ‘ही कादंबरी वाचकांच्या हाती पडण्याआधीच मी तिचे दफन केले आहे’ असे त्या म्हणाल्या!

हीच कादंबरी १९७९ मध्ये ‘राजकमल प्रकाशन, दिल्ली’तर्फे ‘जिन्दगीनामा’ या मथळ्याने प्रकाशित झाली व १९८० चा साहित्य अकादमी पुरस्कार या कादंबरीला मिळाला!

आपल्या भाषेबद्दल इतकी संवेदनशीलता बाळगणारी, शब्दांच्या वापराबद्दल इतका आत्मविश्वास असलेली ही लेखिका त्यामुळेच इतर लेखकांच्या तुलनेत वेगळी जाणवते.

कृष्णाजींच्या लेखनाची सुरुवात लघुकथेने झाली. ‘लामा’ ही त्यांची पहिली लघुकथा. त्यांची सर्वात चर्चित आणि हिंदी लघुकथेच्या इतिहासात मैलाचा दगड समजली जाणारी ‘सिक्का बदल गया’ ही कथा कवी अज्ञेय यांच्या संपादकत्वाखाली निघणाऱ्या ‘प्रतीक’ या नियतकालिकात प्रसिद्ध झाली. त्यावेळी त्यात एकाही शब्दाचा बदल करण्याची हिंमत अज्ञेय यांची झाली नाही. फाळणीवर लिहिलेली ही कथा मानवी स्वभावाचे तरल दर्शन घडवते.

ज्या लघुकादंबरीमुळे हिंदीत त्या खूप चर्चिल्या गेल्या, वादग्रस्त ठरल्या ती कादंबरी ‘मित्रो मरजानी’ १९६७ मध्ये प्रकाशित झाली. एका विवाहित तरुणीच्या अतृप्त कामवासनेची घुसमट त्यात व्यक्त झालेली आहे. अशा लाखो अतृप्त स्त्रिया मन मारून, अनेक कुंठा घेऊन भारतात जगत असतात. पण कादंबरीतील मित्रो अशा प्रकारची नाही. ती उच्छृंखलदेखील नाही. तर ती आपल्या सासूकडे आपले हे गाऱ्हाणे मांडत असते. अगदी उघड-उघड अशा शब्दांत. हे वास्तव जरी असले तरी एवढय़ा बोल्ड भाषेत लिहायचे नसते, असा सूर त्या काळी काही समीक्षकांनी लावला होता.

‘बादलों के घेरे’ (१९८०) हा कथासंग्रह, ‘डार से बिछुडी’ (१९५८), ‘यारों के यार’ (१९६८) या लघुकादंबऱ्या आणि ‘सुरजमुखी अंधेरे के’ (१९७२), ‘दिलोदानिश’ (१९९३), ‘समय सरगम’ (२०००) या त्यांच्या इतर कादंबऱ्या. या सर्व कादंबऱ्या स्त्री-प्रधान आहेत. प्रेम, संभोग आणि मृत्यू या जीवनाच्या मूलभूत सत्यावर त्या आधारलेल्या आहेत. हे तीनही घटक वर्ग, जात, धर्म, लिंग व राष्ट्र यांच्या पल्याडच्या केवळ मानवी जीवनाच्या अस्तित्वाशी संबंधित आहेत. कृष्णाजींच्या लघुकथेतून सर्व थरांतील स्त्री-पुरुषांचे दर्शन घडते.

कृष्णाजींची शेवटची विशालकाय कादंबरी ‘गुजरात पाकिस्तान से गुजरात हिंदुस्तान’ ही २०१७ साली प्रसिद्ध झाली. त्यांच्याच शब्दांत सांगायचे, तर ही कादंबरी त्यांची पहिली कादंबरी असावयास हवी होती. पण ती लिहिली गेली जीवनाच्या शेवटच्या वळणावर आल्यानंतर. ही कादंबरी त्यांची आत्मकथाच आहे असे काही टीकाकारांचे म्हणणे. यावर कृष्णाजींची प्रतिक्रिया अशी : ‘असे म्हणणे फारसे योग्य ठरणार नाही. कारण सर्जनात्मक लेखनाची प्रक्रिया खूपच गुंतागुंतीची असते. यात लेखकाच्या आतले आणि बाहेरचे दोन्हीही असतात. मूळ लेखनात (टेक्स्ट) असंख्य ताण-तणाव असतात. या अशा कथात्मक लेखनात लेखक स्वत: कोठे, केव्हा व कोणत्या वळणावर कसा सामील होतो, हे त्यालादेखील सांगता येत नसते. त्याचे स्वत:चे वास्तव व पात्रांचे वास्तव यांत सीमारेषा ओढणे शक्य नसते. अर्थात माझा स्वत:चा असा प्रयत्न राहिलाय, की त्यात मी कोठेतरी असावे.’

लेखनप्रक्रियेसंबंधी त्या म्हणतात : ‘लेखन हा स्वत:शी केलेला संवाद असतो. जो भाषेमुळे संपन्न होतो. एका पातळीवर लेखक ‘स्व’च्या आवाजाला शब्द देण्याचा प्रयत्न करत असतो आणि त्याच वेळी आपल्या परिसरातील गोंधळालाही पकडण्याचा प्रयत्न तो करत असतो. पहिले वाक्य लिहिल्यानंतर लेखक आपले अर्धे हक्क वाचकांकडे सोपवत असतो. लेखकाच्या मनात काही दृश्यं, काही विचार, काही घटना, काही स्त्री-पुरुष वावरत असतात आणि या सर्वास कागदावर उतरवण्यास तो उत्सुक असतो. सर्जनात्मक लेखन हे लेखकास विनम्र करत असते आणि त्याच वेळी त्याला त्याच्या मर्यादांचीही जाणीव करून देत असते. लेखन ही एक बौद्धिक प्रक्रिया आहे. पण त्याच वेळी ते सर्जनात्मक परिश्रमही आहे आणि त्यासोबत एक सामाजिक – राजकीय वक्तव्यदेखील. सर्जनात्मक लेखनात लेखकाची जीवनविषयक भूमिका, त्याची अंतर्दृष्टी येण्याची गरज असते.’

कृष्णाजींच्या कथात्मक लेखनात जरी स्त्री केंद्रस्थानी असली, स्त्रियांचे गोपनीय असे प्रश्न त्यांनी धाडसाने मांडलेले असले, तरी त्या स्वत:ला स्त्रीवादी लेखिका म्हणवून घेण्यास तयार नव्हत्या. उलट, त्यांनी अशा कप्प्यांचा विरोधच केलेला आहे. यासंबंधी त्या म्हणतात : ‘भारतीय तत्त्वज्ञानात अर्धनारीश्वराची विलक्षण अशी संकल्पना आहे. यात एकाच शरीरात स्त्री आणि पुरुष दोघेही आहेत. माझ्या कथा-कादंबऱ्यांतून याच संकल्पनेची अभिव्यक्ती झालेली आहे.’ याच संकल्पनेचा वापर करून त्यांनी ‘हशमत’ हे नाव धारण करून लेखन केलेले आहे. त्यांचे ‘हम हशमत’ हे संस्मरणात्मक पुस्तक खूपच गाजले. यात भीष्म साहनी, निर्मल वर्मा, नामवरसिंह या आणि इतर हिंदीतील पुरुष लेखकांसंबंधीच्या आठवणी आहेत. या लेखनात त्या या लेखकांसोबत पुरुष म्हणूनच वावरतात. या पुस्तकाच्या वाचनातून कृष्णा सोबती या लेखिकेचे जे चित्र उभे राहते, ते स्त्री कृष्णा सोबतीशी जुळत नाही. याचाच अर्थ असा की, प्रत्येक स्त्रीत एक पुरुष असतो व प्रत्येक पुरुषात एक स्त्री. त्यांच्या मतानुसार, महान साहित्यिकात स्त्री आणि पुरुष ही दोन्ही तत्त्वं असतात. कृष्णाजींना एकदा एकाने प्रश्न विचारला, की स्त्री असणे म्हणजे काय? त्यांचे उत्तर होते- ‘भारतीय संविधानात आम्हा स्त्रियांना तेवढेच अधिकार आहेत, जेवढे पुरुषांना. त्यामुळे स्त्रियांचे वेगळेपण ते काय असू शकते?’

लौकिक अर्थाने त्यांचे जीवन हे आर्थिक संपन्नतेचे व सुसंस्कृतपणाचे होते. वयाच्या ७० व्या वर्षांपर्यंत त्या एकटय़ाच होत्या. पण वयाच्या ७० व्या वर्षी त्यांनी डोगरी भाषेतील लेखक शिवनाथ यांच्याशी लग्न केले. आश्चर्य आणि विलक्षण अशी गोष्ट म्हणजे या शिवनाथ यांचा जन्म त्याच तारखेस, त्याच वर्षी व त्याच वेळी झालेला होता; ज्या तारखेस व वेळेस कृष्णाजींचा जन्म झालेला होता. दोघांचे वय ७०! लग्नाच्या काही वर्षांनंतर शिवनाथ वारले. कृष्णाजी पुन्हा एकाकी झाल्या. पण त्यांना एकटेपण असे कधीच जाणवले नाही. त्यांच्या साहित्यातून एकटेपण, वैफल्य, नैराश्य वगैरे कोठेच आढळून येत नाही. शेवटपर्यंत त्या दिल्लीच्या साहित्यिक वर्तुळात सक्रिय होत्या. त्यांनी म्हटलेदेखील आहे की, ‘माझ्या खूप खूप ओळखी आहेत, पण मला फारसे मित्र नाहीत.’

साहित्य, लेखन आणि लेखक याविषयीची त्यांची बांधिलकी निर्विवाद होती. आपली एक कोटी रुपयांची संपत्ती, पुरस्काराच्या सर्व रकमा आणि त्या ज्या प्रशस्त फ्लॅटमध्ये राहत होत्या, तो फ्लॅट त्यांनी एका ट्रस्टला सोपवलेला आहे. या फ्लॅटमध्ये सतत साहित्यिक मैफिली घडाव्यात, या रकमेच्या व्याजावर साहित्यिक कार्यक्रम व्हावेत, ही त्यांची शेवटची इच्छा आहे. त्यांच्या लेखनास व त्यांच्या बांधिलकीस कोणत्याच वादात बंदिस्त करता येत नाही. धर्म, जात, वेश, लिंग, भाषा, प्रांत यांच्यापलीकडे जाऊन आपण केवळ भारतीय व फक्त भारतीय आणि विवेकसंपन्न माणूस म्हणून जगावे, एवढीच त्यांची तळमळ होती. वर्तमान भारतीय राजकारण येथील सामाजिक व वैविध्यपूर्ण संस्कृतीस नष्ट करावयास निघाले आहे याचे शल्य घेऊनच त्या गेल्या. आपल्या दैनंदिन जीवनात आपण भारतीय व माणूस म्हणून जगण्याचा, वागण्याचा प्रयत्न करणे, हीच त्यांना खरी श्रद्धांजली ठरेल!