25 February 2020

News Flash

आयुष्याच्या सरतेशेवटी..

आयुष्याच्या अखेरच्या टप्प्यावर जेव्हा एखादी व्यक्ती पोहोचते तेव्हा ती कुठल्या मन:स्थितीतून जात असावी, हा प्रश्न मला नेहमीच अस्वस्थ करतो.

| April 26, 2015 12:14 pm

आयुष्याच्या अखेरच्या टप्प्यावर जेव्हा एखादी व्यक्ती पोहोचते तेव्हा ती कुठल्या मन:स्थितीतून जात असावी, हा प्रश्न मला नेहमीच अस्वस्थ करतो. वृद्धाश्रम हा शब्द कानावर आला की एक प्रकारचं उदास वातावरण असलेले, मुलांपासून त्रास सहन करावे लागणारे वृद्ध अशी काहीशी प्रतिमा आपल्या डोळ्यासमोर उभी राहते. पाश्चात्त्य देशात मात्र वृद्धाश्रमाची व्याख्या थोडी वेगळी असते, मी इथे मुख्यत: ऑस्ट्रेलियामधील रिटायरमेंट होमबद्दल सांगेन, याचे कारण त्याचा जवळून अनुभव घेतला आहे.
गोल्ड कोस्टमधल्या एका रिटायरमेंट व्हिलेजमध्ये मी जवळपास चार र्वष काम केलं, तेव्हा अनेक चांगले-वाईट अनुभव आले. एकूणच कुठल्याही भारतीय व्यक्तीला या संकल्पनांबद्दल जसं कुतूहल, संकोच असावा तसाच तो माझ्याही मनात होता. आपलं मन तर उबणार नाही ना या व्यवसायावरून, अशी धास्ती लागून राहिला होती. पण या उलटच सगळं घडत गेलं. एक तर रिटायरमेंट व्हिलेजेस बरेचदा एखाद्या फाइव्ह स्टार हॉटेलइतकी पॉश असतात. तिथे राहायला येणाऱ्या लोकांचे आजार, प्रकृती, आवड, इच्छा या सगळ्या गोष्टी लक्षात ठेवून उरलेलं आयुष्य त्यांना शांतपणे व्यतीत करता यावं याकरता अतिशय संपन्न असे बांधलेलं ठिकाण म्हणजेच ऑस्ट्रेलियन वृद्धाश्रम. सकाळपासून रात्रीपर्यंतचा दिवस तिथे नियमित आखलेला असतो, तोसुद्धा रेसिडेंट्सच्या इच्छेनुसार. सकाळी आंघोळ-ब्रेकफास्ट उरकल्यावर फिजियोथेरपी किंवा इतर अ‍ॅक्टिव्हिटी झाल्यानंतर दुपारच्या जेवणापर्यंत जे शारीरिक व मानसिकदृष्टीने सबल असतात ते आजी-आजोबा रिटायरमेंट व्हिलेजच्या बसमधून बाहेर जातात. मग कुणी शॉपिंग करतं, तर कुणी lok02कॉफी-केकचा आस्वाद लुटतात, तर काही जणी हेअर सलोनमध्ये जाऊन हेअर सेट करतात. काही जण पोकीज् खेळतात आणि मग परत त्याच बसमधून परत येतात. देवळात जाणारे आजी-आजोबा, नातवंडांना शाळेत ने-आण करणारे व संध्याकाळी नातवंडांकडून पाढे किंवा शुभंकरोती म्हणवून घेणारे आपले वयोवृद्ध व आपलं आयुष्य केवळ आपल्या पद्धतीने घालवणारे ऑस्ट्रेलियन वयोवृद्ध यांच्यात बराच फरक जाणवला. अर्थात हे चुकीचं आहे असं मी अजिबात म्हणणार नाही. मुळात एकत्र कुटुंबपद्धती हे समीकरण त्यांना कधी जमलंच नाही, काही अपवाद वगळता. अनेकांशी बोलताना आढळलं की, त्यांना मुलाबाळांसोबत राहायचं नव्हतं. त्याविषयी अनेकांच्या म्हणण्यात आलं, ‘इट इझ अनफेयर ऑन अवर चिल्ड्रन अँड अवरसेल्फ टू!’ त्यांच्या या विचारांना सरकार व समाजाचा भक्कम पाठिंबा आहे. आíथक परिस्थितीनुसार ठिकाण निवडायचं व बाकी खर्च सरकार पेन्शन देऊन भागवते. सगळीच प्रक्रिया काही सोपी असते असं नाही. अनेक वेळा मुलं/मुली असं साजेसं ठिकाण शोधायला मदत करतात. त्याकरता पॉवर ऑफ अ‍ॅटर्नी मुलांकडे असते , जेणे करून काही वेळा निर्णयक्षमता गमावून बसलेल्यांच्या केसमध्ये त्यांची मुलं संबंधित निर्णय घेऊ शकतात. पण ज्यांना अपत्य नाही व इतर कुणी नातलग नाही अशा वृद्धांसाठीदेखील ट्रस्ट असतात. सोशल वर्कर या सगळ्या प्रक्रियेची काळजी घेतात व त्यांच्या आíथक, शारीरिक, मानसिक गरजा पुरवल्या जातील अशा ठिकाणी त्यांची सोय करतात. मी आतापर्यंत एकही ऑस्ट्रेलियन वृद्ध घरदार, कुटुंबं, नोकरी, पसा नाही, म्हणून रस्त्यावर आलेला पाहिला नाही.
देश समृद्ध असल्याने आणि लोकसंख्या कमी असल्यामुळे या सर्व सुविधा उपलब्ध होतात, असं जरी असलं तरीही मिळालेल्या सुखसोयींचं सार्थक मानावं, की त्यात मोडता पाय घालून उदासीन आयुष्य जगावं हे प्रत्येक व्यक्तीवर अवलंबून असतं. हा फरक माला एडना (९३) व मेरी (८६) या दोन ऑस्ट्रेलियन आजींमध्ये पाहून आला. एडना म्हणजे प्रसन्न, सकारात्मक, आनंदी व्यक्तिमत्त्व. कुणाच्यात वाईट दिसायचंच नाही तिला. आणि दिसलंच तरी  ती प्रेमळपणे त्याची कानउघडणी करत असे. मेरीला मात्र अख्खं जग तिच्या विरोधात आहे असं वाटे. संपर्कात येणारी सर्व माणसं तिचं आयुष्य संपवण्याच्या ध्यासाने आली आहेत असा तिचा गरसमज होता. तिची रोज नित्यनवीन तक्रार असायची. ‘आज मला आंघोळच नीट घातली नाही, असं जेवण तर मी माझ्या कुत्र्यालासुद्धा वाढणार नाही, मला आता औषधं नको, परत ये,’ असा तिचा रोज काही ना काही त्रागा असायचा. बरं वैद्यकीय दृष्टीनेही डिप्रेशन वगरे आजार तिला नव्हता. मेरीचा मुलगा आणि मुलगी तिच्या या त्राग्याला कंटाळले होते. ते तिला भेटायला आले की तिची एकच भुणभुण असायची की, मला इथून दुसरीकडे हलवा. तुम्हाला माझी काळजीच नाही. एक दिवस मेरीचा मुलगा डोळ्यात पाणी आणून म्हणाला, ‘मोनिका, वी वेअर नेव्हर गुड  इनफ देन, अँड वी आर नॉट गुड इनफ टुडे.’  त्याला दिलासा देत म्हटलं, ‘तू काळजी करू नको, इथे आम्ही तिची व्यवस्थित काळजी घेत आहोत, इट इज अवर जॉब.’ त्याला ते कितपत पटलं, माहीत नाही. पण मेरीची मला जरा गंमतच वाटायची. समृद्ध जीवन, प्रेमळ नवरा, काळजी घेणारी मुलं व रक्तदाब सोडल्यास कोणताही आजार नसलेली मेरी आयुष्याच्या या वळणावर कशाशी झगडत होती?
एडनाची मुलगी- जावई, दोन मुलगे-सुना, जावई, नातवंडं, पतवंडं, मित्र परिवार नेहमी तिला भेटायला येत असत. आले की आम्हा स्टाफकरता केक, चॉकलेट्स वगरे न चुकता आणत. किती प्रेमानं जोडली होती एडनानं ही माणसं. हे एक ऑस्ट्रेलियन कुटुंब आहे याचा मला विसरच पडे. भाषा वेगळी होती आमची. ही कौटुंबिकता आपली भारतीयांसारखी भासे. काळाच्या प्रवाहाबरोबर जुळवून घेणारी, नवीन पिढीला समजून घेणारी एक ‘कुल ग्रॅनी’ होती एडना. म्हणूनच कदाचित, माझ्या मुलाच्या वयाएवढा तिचा पणतू कायम तिला भेटायला येत असे. ते दोघे भरपूर गप्पा मारत. एडनाला पाहून नेहमी मला माझ्या आजीची आठवण येत असे. नऊवारी साडी नेसणारी माझी आजी व पँट-शर्ट घालणारी एडना यांच्यात किती साम्य होतं. तोच आपुलकीचा स्पर्श, तसंच प्रेमानं समजावणं, वेळोवेळी केलेल्या कामाचं कौतुक करणं व सतत सगळ्यांच्या उपयोगी येणं, असे अनेक समान गुण होते दोघींचे. एक दिवस एडनानं मला विनंतीच्या स्वरात विचारलं, ‘‘बेडशीट घालायला मदत करशील का? आधी एक हार्ट अटॅक व एकदा बायपास होऊनही सगळं काही स्वत: करण्याकडे तिचा कल असायचा. वास्तविक ती भरत असलेल्या पशात या सर्व सेवा ती घेऊ शकत होती. पण घ्यायची नाही. त्या दिवशी मी तिच्या रूममध्ये गेले, तसं म्हणाली, ‘सॉरी टू बॉदर यू, बट माय बॉडी डझंट कोऑपरेट नाऊ.’ हसावं की रडावं कळेचना. मेरीसारखे नकारात्मक लोक एका बाजूला आणि एडनासारखी गोड भारतीय पठडीची आजी दुसरीकडे. मी तिला एकदा न राहवून विचारलंच, ‘तू इतकी कुटुंबवत्सल कशी गं?’ तसं मिश्कीलपणे म्हणाली, ‘इन माय पास्ट लाइफ, आय वॉज इंडियन.’ एडनाची मुलं एखाद्या वेळी भेटायला आली नाहीत, तरी तिला अजिबात राग येत नसे. म्हणायची, ‘अगं त्यांनी उंच भरारी घ्यावी म्हणून पंख मीच दिले, आता मीच ते कापू का? शेवटी आपण जे पेरतो तेच उगवतं.’ तिनं जे पेरलं होतं त्याला तोडच नव्हती. पुढल्या सर्व पिढय़ा सुपीक, सशक्त व सक्षम जन्माला आल्या.
रात्री साडेदहाला आमची शिफ्ट संपली की न चुकता आम्हा सर्व स्टाफला ‘बाय अँड प्लीज ड्राइव्ह सेफ’ हे सांगूनच एडना झोपायला जायची. असंच त्या रात्री निरोप द्यायला आली आणि घट्ट मिठी मारली. तिच्या डोळ्यात वेगळेच भाव होते. पण आधीही अनेकदा प्रेमाने मिठी मारली असल्यामुळे विशेष असं वाटलंच नाही. दुसऱ्या दिवशी सकाळी कामावर आले तशी नाइट शिफ्ट करणारी नर्स रडत म्हणाली, ‘एडना पास्ड अवे लास्ट नाइट इन हर स्लिप अ‍ॅट ११.३० डय़ू टू अ हार्ट अटॅक.’ ऐकून पायाखालची जमीन सरकली. रडू आवरेना. इतर स्टाफला दु:खद बातमी देऊन आम्ही सगळेच एडनाच्या रूमजवळ गेलो. रूमच्या बाहेर ५०-६० लोक होते. एडनाची मुलं, सर्व कुटुंबीय अजूनही यायचे होते. काल रात्रीचे एडनाच्या डोळ्यातले भाव मला का नाही कळले, ती मिठी शेवटची होती हे मनाला पटतच नव्हतं. आश्चर्यजनक बाब म्हणजे रूमच्या थोडय़ा दूर चक्क मेरी हुंदके देऊन रडत होती, निराशा प्रेमासमोर हरली होती.
  आयुष्याच्या सरतेशेवटी खरंच काय घेऊन जातो आपण जपलेल्या नात्यांमधून? मिळणारं प्रेम, शेवटच्या क्षणापर्यंत लाभलेली प्रेमाच्या माणसांची साथ व या पुढचा प्रवास शांतपणे होण्यासाठी अंत:करणापासून आलेले त्यांचे आशीर्वाद, एवढंच. पण इतकं सुंदर सत्य ९३ वर्षांची एडना- माझी ऑस्ट्रेलियन आजी मला सांगून गेली.
नातं निर्माण करायला भाषेत साम्य नसलं तरी चालतं, पण भावना समान असाव्यात. मग विणलं जातं एक घट्ट नातं!    

First Published on April 26, 2015 12:14 pm

Web Title: austrelia at the end of life
Next Stories
1 मालवीयांना प्रकाशात आणल्याबद्दल आभार!
2 भस्मासुर
3 प्रकाशनलिका (Tube light)
Just Now!
X