क्रिप्टोकरन्सी, बिटकॉईन, ब्लॉकचेन या संज्ञा गेली काही वर्षे वापरल्या जात आहेत/ ऐकिवात आहेत. पण हे नेमके काय गौडबंगाल आहे, याविषयीची उत्सुकता समाजातील मोठय़ा वर्गाला आहे. क्रिप्टोकरन्सी म्हणजे गूढचलन ही एक समांतर चलनव्यवस्था. तर बिटकॉईन्स हे या व्यवस्थेतीलच एक; परंतु सर्वाधिक उपयोजित चलन. बिटकॉईन्सची दुनिया अद्भुतरम्य व गूढ आहे. पण तिचा थांग लागत नसल्याने ती संशयास्पदही आहे. तरीही काही लाख डॉलरचे व्यवहार या आभासी चलनाच्या माध्यमातून होत आहेत. भविष्यात सोन्याची वा डॉलरचीही जागा हे चलन घेऊ शकेल असा अनेक अर्थतज्ज्ञांचा होरा आहे. हे प्रकरण तसे खूप गुंतागुंतीचे आहे. त्यात भारतासारख्या अनेक देशांनी बिटकॉईन्सना परवानगी दिलेली नसल्याने या संकल्पनेभोवतीचे गूढ अधिकच वाढलेले दिसते. इंग्रजीत या विषयावर अनेक पुस्तके आली आहेत. मराठीत मात्र अजूनही यावर फारसे लिखाण झालेले दिसत नाही. पुस्तके तर दुर्मीळच. ती उणीव भरून काढण्याचा प्रयत्न अर्थतज्ज्ञ व प्रकाशक जयराज साळगावकर यांच्या ‘बिटकॉईन- क्रिप्टोकरन्सी’या पुस्तकाने केला आहे.

पुस्तकाच्या सुरुवातीलाच अमेरिकेचे माजी अध्यक्ष अँड्रय़ू जॅक्सन यांचा संदर्भ त्यांच्याशी संबंधित किश्श्यांसह प्रतीकात्मक म्हणून घेतलेला आहे. जॅक्सन यांनी त्या काळातील प्रस्थापितांची बँक म्हणजे बँकिंग व्यवस्था संपवली आणि मुख्य म्हणजे नवीन चलन बाजारात आणले. जॅक्सन यांच्या काळाप्रमाणेच अजूनही आर्थिक विषमता कायम असून, जगभरच्या बँकिंग व्यवस्था म्हणजे या विषमतेची आगारे आहेत, डॉलरसारखी चलने विषमतेची प्रतीके  आहेत, त्यांना पर्याय म्हणून बिटकॉईनसारखी चलनप्रणाली अस्तित्वात आली तर.. यावर या पुस्तकात बऱ्यापैकी मंथन घडवले आहे. कोणत्याही नवीन विषयाला हात घालताना त्याच्या उपयुक्ततेविषयी आणि संभाव्य धोक्यांविषयी एकदम भूमिका न घेता दोन्ही बाजू वाचकांसमोर उलगडून दाखवण्याचा लेखकाचा प्रयत्न असून तो स्तुत्य आहे. प्रस्तावनासदृश दुसऱ्या टिपणात १६ जून २०१५ रोजी न्यूयॉर्कला झालेल्या एका चर्चासत्रामध्ये बिटकॉईनशी संबंधित अनेक तज्ज्ञांशी समक्ष चर्चा करण्याची संधी लेखकाला मिळाली, त्याचा उल्लेखही यात आहे. या गुंतागुंतीच्या विषयावरील पुस्तकासाठी लेखकाने  केलेल्या सायासांची कल्पना त्यातून येते. प्रास्ताविकात लेखक बिटकॉईनबरोबरच ब्लॉकचेन आणि क्रिप्टोकरन्सी या संज्ञाही तपशिलात समजावून सांगतात.

या तपशिलापेक्षाही रंजक आहे बिटकॉईनच्या जन्माची कहाणी.. एखाद्या थ्रिलर चित्रपटात किंवा कादंबरीत शोभेल अशी. बिटकॉईन्सचा मूळ निर्माता कोणीएक सातोशी नाकामोटो- जो अस्तित्वात आहे की नाही, हे कुणीच सांगू शकत नाही. त्याच्या बिटकॉईन्सचा पहिल्यांदा विनिमयात्मक वापर करणारा रॉस अल्ब्रिच, सिल्क रोड या सूचक नावाची त्याची व्हर्च्युअल बाजारपेठ, तिथे सुरुवातीला अमली पदार्थाचे चालणारे व्यवहार ही सगळी कहाणी रोचकपणे सादर झाली आहे. या सिल्क रोडचा सुगावा लागताच अमेरिकेच्या फेडरल ब्युरोने त्या नेटवर्कमध्ये केलेला शिरकाव, त्यातून रॉस आणि त्याच्या सहाय्यकांना झालेली अटक हे सारे एखाद्या सिनेमातील कहाणीसारखेच. आपल्या कृत्यांचा कोणताही माग राहू नये यासाठी वापरकर्त्यांनी योजलेल्या क्लृप्त्या; पण त्यातूनच निर्माण झालेली ब्लॉकचेनची जवळपास अभेद्य अशी तटबंदी याचे फायदेही लेखक समजावून सांगतो.

बिटकॉईन्स विशेषत: अर्जेटिनासारख्या लॅटिन अमेरिकी देशात अधिक वेगाने लोकप्रिय का झाले, याविषयी पुस्तकात सविस्तर विवेचन आहे. अर्जेटिनामध्ये एक घर खरेदी करण्यासाठी डॉलरऐवजी बिटकॉईनचा वापर कसा खुबीने करण्यात आला, याचे उदाहरण देण्यात आले आहे. पण भारतासारख्या देशांनी बिटकॉईनकडे कायम संशयाने का पाहिले, आणि भारतात अमिताभ बच्चनचा अपवाद वगळता इतर पातळ्यांवर बिटकॉईनला समाजमान्यता मिळण्यासाठी काही प्रयत्न झाले का, याविषयी अधिक विस्ताराने माहिती देता आली असती. पुस्तकाच्या अखेरच्या टप्प्यात बिटकॉईनविषयी शंकानिरसनपर प्रश्नोत्तरे देण्यात आली आहेत- जी अत्यंत उपयुक्त ठरतात. परिशिष्टामध्ये जगभरातील प्रचलित १२ गूढचलनांची किंवा क्रिप्टोकरन्सींची माहिती त्यांच्या गुणदोषांसह आणि बाजारमूल्यांसह देण्यात आली आहे. हा ऐवजही माहितीत भर घालणारा आहे.

‘बिटकॉईन- क्रिप्टोकरन्सी’

– जयराज साळगावकर

परममित्र प्रकाशन,पृष्ठे – १२०, मूल्य – २०० रुपये.