‘लग्न आयुष्यात एकदाच होतं!’ असं एक लंगडं, पण भावनिक समर्थन खर्चिक लग्न करणारी मंडळी करत असतात. त्याच पद्धतीने राज्यभरातून जाहीर निषेध, नाराजी व्यक्त झालेली असतानाही त्याकडे पूर्ण दुर्लक्ष lok11करून पहिल्यावहिल्या भाजप मुख्यमंत्री व मंत्र्यांचा ‘शाही’ शपथविधी वानखेडेवर पार पडला.
नवे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस विधानसभेतील आक्रमक, अभ्यासू व तळमळीने प्रश्न मांडणारे आमदार म्हणून ओळख असलेले सद्गृहस्थ आहेत. पण मोदीपुरस्कृत ‘इव्हेन्टशाही’ला बळी पडत त्यांनीही ही ‘शाही’ शपथ घेतली.
हीच गोष्ट जर ‘आघाडी’ सरकारने केली असती तर निषेधाचा वरचा स्वर देवेंद्रनीच लावला असता आणि कॅमेराग्रस्त किरीट सोमय्या वानखेडेसमोरच्या रस्त्यावर आडवे पडून धाय मोकलून रडले असते! असो. सत्ता भल्याभल्याना ३६० अंश फिरवते. त्यात भाजप मुळातच रिव्हॉल्िंव्हग चेअरसारखा ‘दिशा’ बघून फिरणारा पक्ष! तरीही राज्यात चौथ्या क्रमांकावरून सर्वात मोठा पक्ष होऊन अल्पमतातले का होईना, पण भाजपचे सरकार स्थापन करण्यात त्यांनी जे बरे-वाईट परिश्रम घेतले त्याबद्दल त्यांचे अभिनंदन! (आज तरी हे लिहीपर्यंत) ‘भाजपचे’ सरकार आहे. पुढे शिवसेनेच्या सहभागानंतर ते ‘युतीचे’ सरकार होणार की ‘भाजपचे’च राहणार, हे भाजपचे चाणक्य ठरवतीलच!
दरम्यान, महायुतीतल्या पांडवांपैकी सेना आधीच बाहेर पडली होती आणि आठवलेंसह राजू शेट्टी, जानकर, मेटे भाजपसोबतच राहिले. त्यातूनही आठवले आणि जानकर पुढच्या रांगेत शिरतात तरी! राजू शेट्टी आणि मेटे यांची अवस्था मात्र नकुल-सहदेवासारखी झालीय. म्हणजे बेरजेपुरते ते पांडव म्हणून उरलेत.
आठवले, शेट्टी, जानकर, मेटे हे तोंड दाबून बुक्क्य़ांचा मार सहन करत असताना मर्द मावळ्यांच्या शिवसेनेला मात्र भाजपने व्यवस्थित तोंड उघडवून बुक्क्य़ांचा मार दिलाय! सेनेचा एवढा अपमान- तोही महाराष्ट्रात आणि खुद्द मुंबईत- आजवर कुणी केला नसेल. राष्ट्रवादीने टाकलेल्या गुगलीवर भाजपने ‘वेल प्लेड’ अशी खेळी केली, पण सेना मात्र ‘क्लीनबोल्ड’ झाली!
अल्पमतातल्या भाजपला आपल्या ६३ आमदारांची गरजच नाही, हे सत्य सेनेला पचवणं जड गेलं. काय भूमिका घ्यावी, यावर त्यांची अशी काही गोची भाजप-राष्ट्रवादीने केली, की वाघाची शेळी नाही, तर मांजर झाली!
भाजपने नंतर या मांजराला असे खेळवले, की मांजराला कळेना- आपल्याला गोंजारताहेत की चेष्टा करताहेत! निवडणुकीत मराठी अस्मितेची, स्वाभिमानी बाण्याची डरकाळी देणाऱ्या सेनेने हळूहळू एक-एक कवचकुंडल उतरवत ‘काही करा, पण मला तुमची म्हणा’ अशी बैठकीची लावणी साक्षात् अफजलखानाच्या शाही शामियान्यात जाऊन गायली! उद्धव ठाकरे बाळासाहेबांनंतरची लढाई ६३ आमदार निवडून आणून जिंकले खरे; पण नंतरच्या तहात त्यांनी मराठी अस्मितेचा लिलावच केला. उद्या सरकारात सामील झालेल्या सेनेचं रूप घोडय़ांच्या टापा वाजवत विराजमान झालेल्या राजासारखं नाही, तर सपशेल शरणागती पत्करलेल्या मांडलिक राजासारखंच राहणार! राष्ट्रवादीचं आँचल ‘मैला’ न होता तर सेनेचं थेट वस्त्रहरणच झालं असतं.
अमूल बॉय देवेंद्र फडणवीस यांचं सरकार पहिल्या दिवसापासूनच ज्वालामुखीच्या तोंडावर बसलेलं आहे. गडकरीपुरस्कृत अस्तनीतले निखारे, तावडेंचा माध्यम- धोरणीपणा, खडसेंची खान्देशी केळीची सुकलेली बाग आणि मास लीडर व मेट्रो लीडर असे पंकजा पालवे-मुंडेंचे चिमखडे बोल अशा कॅबिनेटला घेऊन त्यांना कारभार करायचाय. निवडणुकीच्या तोंडावर आयात केलेले ‘सक्षम’ उमेदवार, त्यांचे राजकीय चारित्र्य आणि पक्षांतर्गत उभे राहिलेले वाडा, महाल, बंगला, पालं यांच्या आव्हानातून स्वत:ला सांभाळत पुढे जाताना त्यांचा मनमोहनसिंग किंवा पृथ्वीराज होऊ नये, हीच सदिच्छा! पण खरी गोष्ट पुढे आहे..
मेमध्ये केंद्र शासन स्थापन झालं. आता महाराष्ट्रातही सरकार स्थापन झालंय. देशाप्रमाणे राज्यातही मोदीपर्व सुरू झालंय. काँग्रेस आणि मित्रपक्ष यांना सत्तेवरून घालवणं गरजेचं होतं. त्याला पर्याय म्हणून लोकांनी मोदीपर्वाची निवड केली खरी; पण या मोदीपर्वात लोकशाहीची सर्वसाधारण लक्षणं अथवा प्रमुख अंगांना विकास व उत्तम प्रशासन या नावाखाली एकाधिकारशाही, ‘हम करे सो कायदा’ ही वृत्ती बळावत असून विरोधकांचा राजकीय खातमाच नाही, तर त्यांचं अस्तित्वच पुसून टाकायचं अत्यंत चलाख असं धोरण राबवलं जात आहे.
बहुमताचा अहंकार आणि स्वप्रेमाने भारित असं नरेंद्र मोदींचं व्यक्तिमत्त्व लगाम नसलेल्या घोडय़ासारखं चौखूर उधळतंय. आणि त्यांच्यासोबत असलेल्या पक्षाध्यक्ष अमित शहांसोबत संपूर्ण भाजप फरफटत चाललाय. माध्यमं नंदीबैलासारखी माना डोलावताहेत. आणि उद्योगपती एखादा मोठा संप बारगळल्यानंतर होणाऱ्या आसुरी आनंदाच्या उकळ्यांनी मार्केटची धोरणं लोकशाहीच्या माध्यमातून सर्वसामान्यांवर लादत आहेत. विषमता या देशात हजारो वर्षांपूर्वीपासून आहे. परंतु ती कमी करण्यासाठी संत, महात्मे, सुधारक, दूरदृष्टीचे राजकीय नेते यांनी टप्प्याटप्प्याने, पण ठोस बदल, परिवर्तन केले. या देशाची वीण बहुसांस्कृतिक, बहुधार्मिक, बहुपंथीय, प्रादेशिक राहील याचा रचनात्मक विचार त्यांनी केला. पण आताचे मोदीपर्व या सगळ्याला एक वेगळाच रंग देऊ पाहतंय. यातील गंभीर बाब अशी की, विकासाचा मुखवटा लावून या गोष्टी मूळ चेहरा लपवून बेमालूमपणे केल्या जाताहेत. कमंडल वादानंतर देशात झालेल्या उभ्या फाळणीपेक्षा विकासाचे हे नवे प्रारूप भारताला भीषण अराजकाकडे घेऊन जाऊ शकते.
वाचताना हे अतिशयोक्त, एकांगी, पूर्वग्रहांनी भरलेले आणि टोकाचे विधान वाटेल. पण शांतपणे घटनाक्रम पाहिले तर गोष्टी लक्षात येऊ लागतील. मात्र, त्यासाठी एक तटस्थ नजर तयार करावी लागेल.
मोदी आणि भाजपचा विजय हा ऐतिहासिक व उत्साहवर्धकच आहे. ३० वर्षांनंतर देशात स्थिर सरकार येणं हे देशाच्या प्रगतीसाठी चांगलंच आहे. त्याचे प्राथमिक परिणाम दिसूही लागलेत. पण छोटय़ा गोष्टी मोठय़ा करून दाखवायच्या आणि मोठय़ा गोष्टी नुसत्या छोटय़ा नाही, तर अस्तित्वातच नाहीत अशा करायच्या- असं हे खास जाहिरात, विपणन तंत्र आहे.
यूपीए १ आलं तेव्हा त्याला असलेला डाव्यांचा भरभक्कम पाठिंबा दिसताच शेअर मार्केट धाडकन् ‘कोसळवलं’ गेलं! अगदी तसंच मोदींची उमेदवारी जाहीर झाल्यापासून निर्देशांक सतत वाढता आहे.. सरकार योजनांमागून योजना जाहीर करतेय. पण रिझव्‍‌र्ह बँकेचे गव्हर्नर व्याजदर कमी करायला तयार नाहीत. त्यामुळे चिदंबरम् यांच्याप्रमाणेच जेटलींचीही गव्हर्नरांवरची चिडचीड वाढलीय.
याचाच अर्थ मोदी म्हणाले म्हणून ‘अच्छे दिन’ लगेच सुरू होणार नाहीत. जनधन योजना असो, स्वच्छता अभियान असो की गांधींचे नाव घेत वल्लभभाई पटेलांचे भाजपपुरस्कृत सोयीस्कर उदात्तीकरण असो. मोदीपर्वामुळे आता विवेकानंदांनाही बरे दिवस येतील. महापुरुषांची अशी पक्षीय, प्रांतीय, धार्मिक, जातीय विभागणी क्लेशदायक आहे. काँग्रेसचाच पाढा पुढे भाजपने रेटावा याचा अर्थ सत्ताधारी व्हायचं तर हे सगळे हिणकस खेळ खेळा!
मोदीपर्वातील सर्वात भयानक गोष्ट आहे ती प्राधान्यक्रम बदलायची. त्यासाठी त्यांना माध्यमांचीही साथ मिळतेय. निवडणूक काळात बारा दिवसांतल्या दहा दिवसांत मोदी घसा फोडून शेतकऱ्यांच्या आत्महत्येचे आकडे सांगत होते. विजेची गणितं सांगत होते. उद्योगांची आरती गात होते. पण स्वपक्षीय सरकारचा शपथविधी करताना त्यांनी हे सर्व नजरेआड करून आपली ‘इव्हेन्ट’ पद्धतीच दामटून राबवली. पुन्हा मुख्यमंत्री निवडला तो विदर्भाचा. ज्या शेतकऱ्यांच्या आत्महत्येचे भांडवल करून भाजप सत्तेत आली, ती विदर्भातच दुसरी दिवाळी साजरी करते. सरकार स्थापनेदरम्यान जवखेडय़ाला भीषण असे दलित हत्याकांड झालं. पण शाही शपथविधीत गर्क असलेल्या भाजपला तिकडे बघायला वेळ नाही! लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांदरम्यान ‘माळीण’ची घटना घडली. लगेच देशाचे गृहमंत्री धावून आले! आणि जवखेडय़ाला काळी दिवाळी असताना इकडे गृहमंत्री, मुख्यमंत्री निवडीत भाजप गुंतला होता. निवडणुकीदरम्यान धनगर आरक्षणासाठी उपोषणाला बसलेल्या रासप नेत्यांचे उपोषण सोडायला भाजप नेते प्रवक्त्यांसह मोसंबी रस घेऊन धावले होते. आणि जवखेडय़ाला संघर्षयात्रा-फेम मास लीडर पंकजा मुंडेंना सवड मिळाली ती मंत्रिपदाची शपथ घेतल्यावरच!
मुळात फुले- शाहू- आंबेडकरांच्या नावाचा जप करणाऱ्या आघाडी सरकारने खैरलांजी, खर्डा अशा ठिकाणी ‘अ‍ॅट्रोसिटी’चे कलमच लावले नाही. उलट, खैरलांजीला तंटामुक्त गावाचा पुरस्कार दिला.
९५ ला सरकारात असलेल्या युतीने तर अ‍ॅट्रोसिटी कायदाच रद्द केला होता. त्यामुळे आता ते काय करतील, हे वेगळं सांगायला नको!
भाजपची ओबीसी चळवळ ही या समाजाला फुले- शाहू-आंबेडकर, बुद्ध किंवा मार्क्‍स यांच्याकडे जाण्यापासून परावृत्त करून ‘हिंदुत्वा’च्या नावाखाली मुस्लिमांच्या विरोधात वापरण्यासाठीची वानरसेना म्हणून हवीय. गुजरात, उ. प्रदेश इथल्या दंगलींत हा प्रयोग यशस्वी झालाय. मराठा समाजात आता इतिहासबदलाचे वारे वाहू लागल्याने भाजपला जानकर, मेटे यांची गरज लागणार. आठवलेंना तर आताच बौद्ध भिख्खूंचे चिवर, त्यातला भगवा आणि मोदींच्या हिंदुत्वाचा भगवा यांत साम्य दिसू लागलंय.
मोदीपर्वाचे टार्गेट फक्त काँग्रेस नाही, तर काँग्रेससहित फुले, शाहू, आंबेडकर, बुद्ध, कम्युनिस्ट, समाजवादी हे सगळे आहेत. भारतीयत्व हिंदुत्वात बदलण्याची ही विषारी खेळी आहे.
मोदीपर्व सुरू झाल्यावर उ. प्रदेशात छोटय़ा-मोठय़ा ६०० दंगली झाल्या. अलीकडे बडोदाही चार दिवस पेटत होतं. ‘लव्ह जिहाद’ हा जबरदस्तीने करायला लावलेला कांगावा होता असं त्या तरुणीनेच सांगितलं. गोव्याचे मंत्री म्हणाले, स्त्रियांनी बिकिनी घालू नये. उत्तर प्रदेशात हिंदू महासभा आणि तत्सम संघटनांनी- मुलींनी स्कर्टस्-जीन्स घालू नये, असे फर्मान काढले.
सगळ्यात धक्कादायक म्हणजे विवाहोत्तर छळ प्रतिबंधक कायदा ४९८ (अ)- ज्यात लगेचच कारवाई होऊन नवरा, तसेच आवश्यक असल्यास सासू, सासरे, दीर यांना अटक होत असे. ही अटकेची कारवाई होण्याआधी पोलिसांनी फेरविचार करावा, लगेच अटक करू नये, असे निर्देश पोलिसांना देशाचे गृहमंत्री खुद्द राजनाथ सिंह यांनीच दिले आहेत.
या सर्व बातम्या माध्यमात आल्याच नाहीत. आल्या तरी त्यांचा पाठपुरावा झाला नाही. ४९८ (अ) प्रमाणेच अ‍ॅट्रोसिटीलाही विरोध होत आलाय. आणि केंद्र व राज्य सरकारची विचारसरणी पाहता ते काय निर्णय घेतील, हे वेगळे सांगायला नको.
शाही शपथविधीला विरोध करणाऱ्यांची व जवखेडय़ासाठी निदर्शने करणाऱ्यांची दृश्ये शपथविधी सोहळा संपल्यावरच वाहिन्यांवर दिसू लागली. इलेक्ट्रॉनिक माध्यमांवर मोदीसमर्थक उद्योगपतींनी घेतलेला कब्जा इथून पुढे ‘दुसरं जग’ दिसणार नाही याचीच काळजी घेणार.
आता आणखी दोन गोष्टी! या निवडणुकीत ‘एमआयएम’चा उदय झाला म्हणून माध्यमांसकट राजकीय पक्ष ‘अगं बाई अरेच्चा!’ थाटात बोलू लागलेत. ओवेसी म्हणजे दुसरा जीना असल्याचं ते म्हणताहेत. एमआयएमचा प्रचार जहरी असेल तर सनातन प्रभातचा प्रचार काय आहे? ओवेसीला बेडय़ा घाला म्हणणारे दाभोलकर हत्येनंतर ‘देवाने शिक्षा दिली, असेच मरण येणार’ असं लिहिणाऱ्या ‘सनातन’च्या आठवलेंवर कारवाई करा, असे म्हणतील? उद्या सनातन प्रभात अथवा अभिनव भारतने निवडणुका लढविल्या तर ते जिंकणार नाहीत? एमआयएम ‘जहर’ आहे, तर सनातन प्रभात, अभिनव भारत हे काय ‘अमृत’ आहे?
दुसरी गोष्ट दिल्लीच्या शाही इमामांच्या नव्या वारसाच्या सोहळ्याची. या सोहळ्याला नवाज शरीफना निमंत्रण; पण मोदींना नाही. पंतप्रधानांना निमंत्रण दिलं नाही म्हणून सर्वानी- अगदी मुस्लिमांनीही इमामांना लक्ष्य केलं. पण शाही इमामांच्या एका प्रश्नाचे उत्तर कुणाकडे नाही. त्यांनी विचारलं, ‘मोदींनी स्वत:च्या शपथविधीसाठी सर्व धर्मगुरूंसह नवाज शरीफना बोलावलं, पण मला निमंत्रण दिलं नाही. ते आमच्या कुठल्याच प्रतीकांचा स्वीकार करीत नाहीत. मग मी त्यांना का बोलवावं?’
हा देश विषमतेतून समता, बहुविविधतेतून एकता राखत अखंड राहिलाय. पण नव्या राज्यकर्त्यांना या अखंडातच खंड पाडून या परिवर्तनीय मूळ ढाचालाच नष्ट करायचंय. राजकीय पक्ष, प्रादेशिक पक्ष ही वरवरची लक्ष्यं आहेत. खरं लक्ष्य वेगळंच आहे.
पण हा देश शंबूक, एकलव्य, चार्वाक, चक्रधर, चोखामेळा, सीता, द्रौपदी अशा न-नायक-नायिकांचा आहे. सवाल विचारण्याची परंपरा खंडित झाली, नामशेष झाली, या भ्रमात नवधर्माध, भांडवलदारांनी, शोषणकर्त्यांनी राहू नये. तुम्ही प्रतिमा नाहीशी कराल, प्रतिभा नाही. माणसं संपवाल, पण विचार नाही.
संविधानिक शपथ घेताना ईश्वराला स्मरणे आणि गुन्हेगारी आरोप असलेले महाराज धर्मगुरू म्हणून मंचावर असणे- यातून एकाच जगातली दोन जगं स्पष्ट झालीत. उद्याच्या लढाईतले शत्रू स्पष्ट झालेत. तेव्हा विकासाच्या मुखवटय़ाआडचं विनाशकारी राजकारण सामोरं आणत राहायला हवं. त्याविरुद्ध आवाज उठवत राहिलं पाहिजे.
शेवटची सरळ रेष : ‘खुपते तिथे गुप्ते’ या कार्यक्रमात एक जादूचा फोन दिला जाई. त्यावरून त्या सेलिब्रेटीने कुणाही जिवंत/ मृत व्यक्तीला फोन लावायचा असे. एका भागात अशोक हांडे यांनी स्वर्गीय बाळासाहेबांना फोन लावला. त्यांच्याशी बोलता बोलता हमसून हमसून रडत ‘बाळासाहेब परत या, परत या’ असं ते म्हणाले. तेच अशोक हांडे परवा शाही शपथविधी सोहळ्यात सेनेचा नि:पात करून त्यांना दाती तृण धरायला लावणाऱ्या, ‘बाळासाहेबांचा की मोदींचा करिश्मा?’ असं आव्हान देणाऱ्या भाजपवासीयांसमोर ‘मराठी बाणा’ सादर करीत होते! कलाकाराला जात, धर्म, प्रांत, पक्ष नसतो, ‘शो मस्ट गो ऑन’ हे तत्त्व अशोकजींना महत्त्वाचं वाटलं असणार. आणि आंब्याच्या मोसमात चिकू विकायचा अव्यवहारीपणा त्यांच्यातला मूळ फळविक्रेता कधीच करणार नाही!