News Flash

जपू या निसर्गाचा आनंदकंद!

भूतानचे २० टक्के जंगल अगदी मूळच्यासारखे शाबूत आहे. कारण त्याला देवराई म्हणून संरक्षण दिलेले आहे.

पुणे-भोरच्या वरंधा घाटात माझे वनस्पतीशास्त्रातील गुरू वामनराव वर्तक मला पहिल्यांदा घेऊन गेले. खरे तर तिथे घनदाट जंगल असायला हवे होते, पण सगळे उजाड झाले होते. मग अचानक सहा-सात हेक्टरची एक वनराजी दिसली. त्यातून चार उत्तुंग वृक्षांनी डोके वर काढले होते. ते होते धूपवृक्ष. आणि ती होती लोकांनी पवित्र म्हणून राखलेली धूपरहाट. परंतु परंपरेने अनाघ्रात राहिलेल्या अशा देवराया आता दुर्मीळ होत चालल्या आहेत.  पाच जून… जागतिक पर्यावरण दिन! त्यानिमित्ताने प्रख्यात पर्यावरणतज्ज्ञ  डॉ. माधव गाडगीळ  यांचा पर्यावरण परिसंस्थेचा वेध घेणारी खास लेखमाला…

आपण ५ जून हा दिवस ‘जागतिक पर्यावरण दिन’ म्हणून साजरा करतो. ‘पण पर्यावरणाचे रक्षण करायचे म्हणजे नेमके काय करायचे भाऊ?’ या प्रश्नाला अगदी वेगवेगळी, परस्परविरोधी उत्तरे दिली जातात. लेख येतात : वाघांचे अधिवास वाचवलेच पाहिजेत! अवश्य वाचवू या. पण पृथ्वीच्या पाठीवर निदान एक कोटी जीवजाती आहेत. यात वाघाला अग्रक्रम का द्यावा? मी विज्ञानाचा पाईक आहे. माझी दोन आवडती ब्रीदवाक्ये आहेत : आधुनिक मोलेक्युलर जीवशास्त्राचा जनक बर्नाल म्हणतो, ‘विज्ञान हा एक संशयकल्लोळ नाटकाचा प्रयोग आहे. विज्ञान प्रत्येक गोष्ट तावूनसुलाखून बघते. कोणीतरी सांगते म्हणून मान्य करत नाही.’ माझे दुसरे आवडते ब्रीदवाक्य आहे गणितज्ञ व्हाइटहेडचे. तो सांगतो, ‘निष्कर्ष कितीही कटु असो, विज्ञान वास्तवाचा घट्ट आधार कधीच सोडत नाही.’ आज अनेक शहरी निसर्गप्रेमिकांची स्थिती ‘वाघ, वाघ ऐसे लागले ध्यान, हरपले मन, झाले उन्मनी’ अशी बनली आहे. मी विचारू इच्छितो : निसर्गरक्षणात वाघाला इतके महत्त्व का द्यावे?

जैवविविधतेच्या संरक्षणाच्या दृष्टीने एखाद्या जीवजातीचे मूल्य कसे ठरवावे याचा अभ्यास केला गेलेला आहे. यासंदर्भात चार निकष मानले जातात. (१) ती जीवजाती ज्या परिसंस्थांत आढळते, त्या किती धोकात्रस्त आहेत? (२) त्या जीवजातीचा भौगोलिक विस्तार केवढा आहे? (३) ती जीवजाती किती वेगवेगळ्या अधिवासांत आढळते? (४) त्या जीवजातीच्या गणगोतांत इतर किती जीवजाती आहेत?

आपण सूक्ष्म जीव, बुरशा, वनस्पती, किडेमकोडे बाजूला ठेवू. फक्त मोठ्या आकाराच्या पशूंचा विचार करत वाघाची तुलना मगरी-सुसरीच्या गणगोतातल्या घडियाळाशी करू या. वाघ झाडोऱ्यापासून ते सदाहरित अशा वेगवेगळ्या रचनेच्या जंगलांत आढळतो. घडियाळ फक्त नद्यांत. नद्या हा अधिवास सगळ्या जगात आणि खासकरून भारतात जंगलांहून खूप तीव्र धोक्यात आहे. वाघ सायबेरियापासून भारत ते इंडोनेशिया या विस्तृत भूभागांत आढळतो. घडियाळ केवळ गंगा व ब्रह्मपुत्रा यांच्या काही थोड्या उपनद्यांत आढळतो. वाघ मांजराचा भाचा आहे. त्याच्या गणगोतांत अनेक जाती आहेत. घडियाळच्या गणगोतांत अगदी मोजक्या. तेव्हा निसर्गरक्षणाच्या दृष्टीने सर्व शास्त्रीय निकषांवर घडियाळ वाघाहून जास्त मोलाचा आहे.

या घडियाळांची संख्या १९४६ मध्ये १०,००० इतकी होती. ती २००६ मध्ये २५० हून कमी झाली. तथापि आपले पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर म्हणतात की, वाघांची संख्या वाढल्यामुळे भारत जगात पर्यावरण संरक्षणात विशेष प्रतिष्ठेच्या स्थानावर पोहोचला आहे. पर्यावरण संरक्षणाच्या कर्तबगारीचे जागतिक पातळीवर नियमित मूल्यमापन केले जाते. या मूल्यमापनानुसार, भारत १६० देशांमध्ये अगदी तळाला- म्हणजे १४० व्या क्रमांकावर आहे. तो का, हे समजावून घ्यायला नेहमीच्या चाकोरीबाहेर पडून या गुंतागुंतीच्या समस्येचे निरनिराळे पदर उलगडून नव्याने विचार करायला हवा. असा साकल्याने विचार करणे ही पर्यावरण विज्ञानाची खासियत आहे. भौतिकी, रसायनशास्त्र, क्रियाविज्ञान, मोलेक्युलर जीवशास्त्र यांचे विषय सरळ असतात. त्यांत अनेक पदराची गुंतागुंत नसते. पण पर्यावरण विज्ञानातील घटना अनेक घटकांच्या परस्परसंबंधांवर अवलंबून असतात. त्यांच्या भौतिकी, रासायनिक, जैविक घटकांवर सामाजिक, आर्थिक, राजकीय, सांस्कृतिक, धार्मिक अशा सगळ्यांचा प्रभाव असतो. शिवाय काय घडते आहे हे समजावून घ्यायला इतिहासाचे आकलन आवश्यक आहे. हे सगळे ध्यानात घेत या समस्येचा उलगडा करणे हे मोठे आव्हान आहे. पण असा उलगडा केल्यावर पुढे काय करावे याची मांडणी करणे आवश्यक आहे. हे केवळ बुद्धिवादाच्या आधारावर ठरवता येत नाही. त्यासाठी मूल्यांचा विचार करावा लागतो. कोणती मूल्ये? अग्रक्रमाने मानवतेची मूल्ये. पण त्याच्याच जोडीला सर्व भारतीय नागरिकांनी स्वीकारणे योग्य अशी भारतीय संविधानाने मान्य केलेली मूल्ये डोळ्यांसमोर ठेवावी लागतील.

काही वर्षांपूर्वी मला भूतानला जाण्याची संधी मिळाली. भूतानचा राजा खूप लोकप्रिय होता. त्याने गादी सोडावी असे कोणीही म्हणत नव्हते. तरीही त्याने आपणहून निवडणुका घेण्याचे ठरवले आणि निवडून आलेल्या लोकसभा सदस्यांच्या हातात सत्ता सोपवून स्वत: केवळ नामापुरता गादीवर राहिला. या लोकसभा सदस्यांनी पर्यावरणाच्या धोरणांची चर्चा करायला काही शास्त्रज्ञांना बोलावले. मी त्यातला एक. भूतानला पोहोचताना विमानतळावर उतरलो आणि मोठा फलक पाहिला : भूतान राष्ट्राचे आर्थिक उत्पादन वाढवायच्या खटाटोपात नाही, तर लोकांच्या आनंदवृद्धीसाठी कटिबद्ध आहे! लोकसभा सदस्यांनी सांगितले की, आमच्या राष्ट्राच्या धोरणाचे पर्यावरणाचे संरक्षण, सुशासन, समाजात सामंजस्य आणि बौद्ध धर्माची मूल्ये हे चार खांब आहेत. सुशासनाबद्दल बोलताना त्यांनी अभिमानाने उल्लेख केला की, राजाच्या मेव्हण्याने खाणकामात काहीतरी गडबड करत पैसे खाल्ले होते. राजाने ताबडतोब त्याला सजा केली.

भूतानचे २० टक्के जंगल अगदी मूळच्यासारखे शाबूत आहे. कारण त्याला देवराई म्हणून संरक्षण दिलेले आहे. ‘वाघाचा कडा’ (टायगर्स नेस्ट) हा देवराईचा ख्यातनाम डोंगर पाहण्याची संधी मला मिळाली. हा पुण्याच्या पर्वतीहून उंच आहे. त्याच्या माथ्याजवळ बौद्ध मठ आहे. तिथवर घनदाट जंगलातून अगदी निमुळत्या पायवाटेने चढून जाण्याचा अनुभव चित्तथरारक होता. वाटेत दिसले गोराल… डोंगरकड्यावर राहणारे वन्य बोकड. देवराया हा माझ्या आवडीचा विषय आहे. १९७१ साली माझे फग्र्युसन महाविद्यालयातले आवडते वनस्पतीशास्त्राचे गुरू वामनराव वर्तक यांच्यासोबत मी त्या प्रथमच पाहिल्या. ते मला पुणे-भोरच्या वरंधा घाटात घेऊन गेले. खरे तर इथे घनदाट जंगल असायला हवे होते, पण सगळे उजाड झाले होते. मग अचानक सहा-सात हेक्टरची एक वनराजी दिसली. त्यातून चार उत्तुंग वृक्षांनी डोके वर काढले होते. ते होते धुपाचे वृक्ष- उंल्लं१्र४े २३१्रू३४े. आणि ती होती लोकांनी पवित्र म्हणून राखलेली धूपरहाट. हे धूपवृक्ष मोठ्या संख्येने कर्नाटक-केरळातल्या सह्याद्रीवरील घनदाट अरण्यांत आढळतात. आपल्याकडे ते क्वचितच आढळतात. परंपरेने या देवराईत ते जतन करून ठेवले होते.

आम्ही ठरवले की आपण जोडीने या देवरायांचा पद्धतशीर अभ्यास करू या. वर्तकांचे एक स्नेही ज्येष्ठ वनाधिकारी होते. त्यांना भेटलो. ते म्हणाले, ‘मी मावळात अशा अनेक देवराया पाहिल्या आहेत. तुम्ही पानशेत धरणाच्या पाणलोट क्षेत्रापासून सुरुवात करा. पण तिथे अजिबात रस्ते नाहीत. खूप पायपीट करावी लागेल. मी तुमच्याबरोबर एक वाटाड्या देतो.’ तेव्हा फुटलेले पानशेत धरण पुन्हा बांधून झाले होते. धरणात लॉंचने जाऊन मग सगळीकडे पायी डोंगर पालथे घालायचे. लोकांशी बोलत माहिती काढायची. रात्री एखाद्या खेड्यात, नाही तर झाडाखाली झोपायचे. पहिल्या सहा दिवसांच्या सफरीत बरोबर जो वनरक्षक दिला होता, तो गावात पोहोचल्यावर गायब व्हायचा. कुणाकडून तरी कोंबडीचे जेवण, दारू उकळून मस्त झोपून जायचा… तो पुन्हा दुसऱ्या दिवशी सकाळी दिसायचा. पुढच्या अनेक सफरी असले वाटाडे टाळून आम्ही दोघे जोडीने फिरलो.

यातून धूपरहाटीसारख्या खूप सुंदर देवराया पाहिल्या. मला नवनव्या वनस्पती जाती पाहायला मिळाल्या. शिवाय जो कोणीच लिहून ठेवलेला नाही असा इतिहास ऐकला. पानशेतच्या धरणानिमित्त या डोंगराळ, वृक्षाच्छादित प्रदेशात पहिल्यांदाच रस्ते बांधले गेले. पानशेत धरणाच्या खाली गेलेल्या अंबी नदीच्या खोऱ्यात आणि त्याचे पाणलोट क्षेत्र असलेल्या डोंगरउतारांवर स्थानिक शेतकऱ्यांच्या मालकीच्या जमिनी होत्या. नदीच्या चिंचोळ्या खोऱ्यात ते भातशेती करायचे आणि डोंगरउतारावर फिरती शेती. दोन-तीन वर्षे नाचणी, सावा, तीळ पिकवून मग दहा-पंधरा वर्षे ती जमीन पडीत टाकायची अशी पद्धत होती. पण शेती करताना ते आंबा, हिरडा सांभाळून ठेवायचे. डोंगराच्या अगदी वरच्या चढांवर सरकारी राखीव जंगल होते. ज्यांची जमीन धरणाखाली बुडली, त्यांचे पुनर्वसन पूर्वेच्या पर्जन्यछायेच्या प्रदेशात होणार होते. धरणाच्या बांधकामाला सुरुवात झाली. रस्ते झाले. गाड्या  फिरू लागल्या. आणि आतापर्यंत कधीही जास्त रोख पैसा न पाहिलेल्या शेतकऱ्यांना एक नवे जग सामोरे आले. १९५५-६० च्या दरम्यान पुण्यात लाकडी कोळशाला प्रचंड मागणी होती. हे वखारवाले, धरण बांधणारे इंजिनीयर, वनविभागाचे कर्मचारी एकदिलाने अंबी खोऱ्यातली वनसंपत्ती लुटायला तुटून पडले. त्यांनी सारे डोंगर उघडेबोडके करून टाकले. लोक सांगायचे की, धरणाचे इंजिनीयर वखारवाल्यांबरोबर गावोगाव फिरले. तुम्ही आता हालणारच असे लोकांना सांगत पिढ्यान् पिढ्या जतन केलेली हिरडा, आंब्यांची मोठमोठी झाडे विकायला प्रोत्साहन देत. एकेक झाड आठ आण्याला अशा दराने विकून त्यांचा कोळसा केला गेला. वरच्या राखीव जंगलातही लोकांच्या सांगण्याप्रमाणे, वनखात्याद्वारे प्रचंड भ्रष्टाचार होऊन जंगल साफ झाले. शेवटी विस्थापितांचे नीट पुनर्वसन झालेच नाही. त्यातले बहुतांश लोक १९७१ साली उघड्याबोडक्या झालेल्या, माती धुपून गेलेल्या डोंगरांवर सरकून उपजीविका करत होते. यातून स्थानिक लोकांचे तर नुकसान झालेच; पण वनसंपत्तीची, जलसंपत्तीचीही प्रचंड हानी झाली. डोंगरउतारांवर मातीची मोठी धूप होऊन धरण झपाट्याने गाळाने भरले.

आमचा देवरायांचा अभ्यास चालू असताना आम्हाला एक दिवस एक पोस्टकार्ड आले. ते होते श्रीवर्धन तालुक्यातल्या गाणी गावाच्या ग्रामस्थांचे. त्यांनी लिहिले होते की, ‘आमच्या गावच्या दहा हेक्टरच्या देवराईतल्या झाडांवर तोड करायची म्हणून वन विभागाने छापे मारले आहेत. आम्ही ही देवराई तोडू नका म्हणून रेन्जरला विनंती केली. तो म्हणाला, वरून आदेश आला तरच मी तोड थांबवू शकतो. त्याने ऐकले आहे की, वर्तक-गाडगीळ देवारायांचा अभ्यास करताहेत. त्यांची आमच्या साहेबांशी ओळख आहे. त्यांना लिहून बघा, कदाचित ते मदत करू शकतील तुम्हाला. त्याच्या या सांगण्यावरून आम्ही हे पत्र लिहीत आहोत. तुम्ही आमच्या गावाला या. आमची राई बघा आणि आम्हाला काही ना काही करून मदत करा.’

वर्तक आणि मी म्हणालो, ‘चला, जायलाच पाहिजे.’ श्रीवर्धनला गेलो. गाणीला कसे जायचे चौकशी केली. डोंगरातून आठ किलोमीटर चालले की पोहोचता येईल, तिथे काही वाहन जात नाही असे कळले. भल्या पहाटे चालत निघालो. सगळे डोंगर उजाड. रखरखीत. चढत, उतरत गाणीला पोहोचलो. तिथे डोंगरमाथ्यावर काळकाईची दहा हेक्टरची घनदाट राई होती. गावकरी  सांगायला लागले, ‘काही वर्षांमागे इथे भरपूर झाडी होती. अनेक बारमाही ओढे होते. ही राई सोडून बाकी सगळी झाडी सफाचट झाली. आणि या राईतून वाहणारा एक ओढा सोडता बाकीचे कोरडे पडले. ही राईही तुटली तर तो ओढाही आटेल आणि आमचे हाल कुत्रा खाणार नाही.’ आम्ही त्या सुंदर, जीवविविधतेचे आगार असलेल्या वनराजीतून हिंडून आलो. पुण्याला परतल्यावर वन विभागाच्या प्रमुखांना पत्र लिहून ही राई तोडली जाऊ नये अशी विनंती केली. त्यांनी भेटायला बोलावले. म्हणाले, ‘ठीक आहे, तुम्ही म्हणता म्हणून मी ही तोड थांबवतो. पण तुमची विनंती म्हणजे शुद्ध वेडगळपणा आहे.’ मग आम्ही ज्या रायांना जीववैविध्याचे अनमोल ठेवे समजत होतो त्यांना एका वाक्यात त्यांनी मोडीत काढले. म्हणाले, ‘मी पाहिल्या आहेत तुमच्या देवराया… नुसत्या जुनाट लाकूडफाट्यांनी तुंबलेल्या आहेत.’   (क्रमश:)

madhav.gadgil@gmail.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 30, 2021 12:06 am

Web Title: joy of nature botany world environment day akp 94
Next Stories
1 पृथ्वीचा योग आणि भोग
2 रफ स्केचेस :  स्वप्ने
3 वाचवू माती, पाणी, हवा… बहुगुणाजींचा ठेवा!
Just Now!
X