|| डॉ. भालचंद्र मुणगेकर

खरे म्हणजे एखाद्या व्यक्तीचे ८५ व्या वर्षी झालेले निधन ‘अकाली’ म्हणता येणार नाही, परंतु काही व्यक्ती आपल्या क्षेत्रामध्ये महत्त्वपूर्ण योगदान देऊन समाज पुढे घेऊन जातात आणि त्यांच्याशी संबंधित असलेल्या माणसांची अशा व्यक्तींमध्ये इतकी भावनिक गुंतवणूक असते की त्यांचे ८५ व्या वर्षी झालेले निधनही मग ‘अकाली’ वाटते. प्रा. जे. व्ही. नाईक हे अशा व्यक्तींपकी एक होते.

मार्च १९८२ मध्ये ‘यूजीसी’ची (विद्यापीठ अनुदान आयोग) फेलोशिप मिळवून पीएच.डी. करण्यासाठी मी अर्थशास्त्र विभागात रुजू झालो. मला शिकवलेल्यांपकी प्रा. लकडावाला,

प्रा. दांतवाल आणि प्रा. कांता रणदिवे या निवृत्त झालेल्यांचा अपवाद सोडला तर इतर सर्व प्राध्यापक मला एम. ए. ला शिकवलेलेच होते.

कालिन्यामध्ये रानडे भवनच्या तिसऱ्या माळ्यावर अर्थशास्त्र, तर दुसऱ्या माळ्यावर इतिहास विभाग. काही दिवसांनी अर्थशास्त्रातील ऋषी आणि विभागाचे संचालक प्रा. ब्रह्मानंद मला प्रा. नाईक यांच्या रूममध्ये घेऊन गेले आणि त्यांना म्हणाले, ‘‘जगन्नाथ, मी तुला एक चांगला मित्र आणला आहे.’’ पाचच मिनिटांनी ते निघून गेले. प्रा. नाईक यांना पिरीयड नव्हता. आम्ही सुमारे अर्धा तास गप्पा मारल्या. आम्हा दोघांनाही पहिल्याच भेटीत जाणवले की, आमच्यामध्ये वैचारिक मत्री होऊ शकते. ती झालीच, परंतु तिचे नंतर दृढ भावनिक मत्रीत रूपांतर झाले. परवा २२ जुल रोजी प्रा. नाईक (आमच्यासाठी जे. व्ही.) निवर्तले आणि आमच्यातील ३७ वर्षांची मत्री भौतिक अर्थाने संपली.

गेल्या सुमारे ४५-५० वर्षांमध्ये जे. व्हीं. नी एकोणिसाव्या शतकाच्या, तेही प्रामुख्याने १८२५ ते १८९० या ६० – ६५ वर्षांच्या काळातील महाराष्ट्राच्या इतिहासाबाबत जे मूलगामी स्वरूपाचे संशोधन केले आहे, त्यासाठी त्यांना ‘एकोणिसाव्या शतकातील महाराष्ट्राचा ज्ञानकोष’ म्हणणे समर्पक ठरेल.  त्यांचे लिखाण वाचताना, (मी निवडकच वाचले आहे) ज्या तीन-चार गोष्टी ठळकपणे जाणवतात, त्या  माझ्या पिढीसकट आजच्या पिढीनेही ध्यानात ठेवणे अगत्याचे आहे.

इतिहास ही आपली मुख्य अभ्यासशाखा (डिसिप्लीन) आहे, हे जे.व्ही. कधीही विसरले नाहीत. त्यामुळे इतर क्षेत्रांमध्ये त्यांनी कधीही हस्तक्षेप केला नाही. त्यांना अर्थशास्त्र, राज्यशास्त्र, समाजशास्त्र इ. विषयी खूप माहिती होती. खरे पाहता, तो मला त्या संपूर्ण पिढीचा गुणधर्म वाटतो. उदा. रा. भा. पाटणकर हे इंग्रजी सौंदर्यशास्त्राचे प्राध्यापक. त्यांचे व माझे संबंधही मत्रीपूर्ण होते. त्यांनी अ‍ॅडम स्मिथ, रिकाडरे, जॉन स्टुअर्ट मिलपासून केन्सही वाचला होता. १९९१ मध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या जन्मशताब्दीच्या निमित्ताने, त्यांच्या आíथक विचारांवर माझी चार व्याख्याने सबंध देशात, सर्वप्रथम इंडियन एज्युकेशन सोसायटीमध्ये आयोजित केली, ती पाटणकरांनी. मी मुंबई विद्यापीठाचा कुलगुरू असताना, लोकसंख्येचा प्रश्न पुन्हा नीट समजून घेण्यासाठी िवदा करंदीकरांनी माल्थूसचे पुस्तक पाठवून द्यायला सांगितले. जे. व्ही. अशांपकी होते.

त्यांचे दुसरे वैशिष्टय़ म्हणजे, त्यांनी ‘भरमसाट’ लिखाण केले नाही. ज्या विषयात त्यांची वैचारिक गुंतवणूक झाली, जे विषय एकोणिसाव्या शतकातील महाराष्ट्राबाबतच्या संशोधनात उपेक्षित राहिले आणि त्या ६०-७० वर्षांतील महाराष्ट्राची वैचारिक, सांस्कृतिक जडणघडण समजून घेण्यासाठी जे आवश्यक असल्याचे त्यांना वाटले, अशा विषयांवरच त्यांनी आपले संशोधन केंद्रित केले. उदा. महाराष्ट्रातील सामाजिक सुधारणांची चळवळ; त्यांचा अत्यंत आवडता विषय असलेला प्रार्थना समाज, जोतीराव फुले, न्या. रानडे, नामदार गोखले, लो. टिळक, आर. जी. भांडारकर, प्रियोळकर, लोकसंख्या नियंत्रण व    लंगिक शिक्षणाचे पुरस्कत्रे र. धों. कर्वे, लोकहितवादी, आगरकर ते भाऊ दाजी लाड, दादोबा व द्वारकानाथ पांडुरंग तर्खडकर बंधू, भाऊ महाजन या सर्वाचे विचार व कृतींनी महाराष्ट्र कसा समृद्ध केला, याचे वस्तुनिष्ठ विश्लेषण जे. व्हीं. नी केले आहे. त्यांच्याशी चर्चा करताना वा गप्पा मारताना या मंडळींचा ते इतक्या वेळा उल्लेख करीत की ते सगळेजण आजूबाजूला वावरत असल्यासारखे वाटत. भारताच्या स्वातंत्र्य चळवळीला महाराष्ट्राने केलेल्या योगदानाबद्दलचे त्यांचे अवलोकनही महनीय आहे.

तिसरी गोष्ट म्हणजे, त्यांचे लिखाण नुसत्या घटना वा त्यांचा क्रम यापुरते मर्यादित नाही. त्यामुळे ते केवळ ‘वर्णनात्मक’ नसून ‘विश्लेषणात्मक’ होते. ज्या विषयात त्यांनी संशोधन केले, त्या व्यक्ती अथवा संस्थांच्या कार्याचे मूल्यमापन करताना, त्यांनी त्याबाबत आपली मते नोंदवलेली आहेत. याची काही    उदाहरणे नोंद घेण्यासारखी आहेत.

फुल्यांविषयी ते म्हणतात, ‘‘शूद्र समजल्या गेलेल्या जातींच्या महाराष्ट्राच्या एकोणिसाव्या शतकातील विद्रोही चळवळीचे फुले हे प्रमुख तत्त्ववेत्ते आणि पहिले प्रभावशाली नेते होते. त्याचप्रमाणे नाव, चेहरा आणि आवाज हरवलेल्या लक्षावधी भारतीयांचे फुले हे क्रांतिकारक प्रवक्ते होते.’’  विष्णूशास्त्री चिपळूणकरांचे वर्णन त्यांनी ‘‘प्रतिगामी हिंदू विचारप्रणालीचे मुख्य प्रवक्ते’’ असे केले आहे; तर ‘‘प्रतिगामी हिंदूंना सामान्य समाजसुधारकापेक्षा भांडारकर हे अधिक धोकादायक वाटत,’’ असे म्हटले आहे.  लो. टिळकांनी भारताला कार्ल मार्क्‍सची ओळख करून दिली व त्यांच्यावर मार्क्‍सच्या वर्गसंघर्षांच्या भूमिकेचा प्रभाव होता, हे जे. व्ही. नी पुराव्यासह स्पष्ट केले आहे. मात्र, टिळकांनी कोकणातील ‘खोती’ पद्धतीचे आक्रमकपणे समर्थन का केले, याबाबत त्यांनी मतप्रदर्शन केले नाही. ‘‘तुम्ही डॉ. आंबेडकर यांच्याविषयी खास काही लिहिले नाही,’’ असे जेव्हा मी एकदा म्हणालो, तेव्हा ते काहीसे वरमल्यासारखे झाले होते.

ना. गोखले आणि न्या. रानडे यांचे विचार व एकूणच व्यक्तिमत्त्वाचा त्यांच्यावर खूपच प्रभाव होता. आज ‘विचारवंत’ हे नामाभिधान महाराष्ट्रात फार स्वस्तपणे वापरले जाते विशेषत: कॉलेज, विद्यापीठातील शिक्षक, त्यातही पीएच. डी., दोन-तीन पुस्तके, पुस्तिका, कुठे तरी प्रसिद्ध झालेले लेख, काही भाषणे इ. सामुग्री ‘विचारवंत’ होण्यासाठी आपल्याकडे पुरेशी ठरते, परंतु याबाबत दस्तुरखुद्द न्या. रानडे यांनी १८९६ मध्ये (मराठी) भाषेला समृद्ध करण्यासाठी करण्यात येणाऱ्या योगदानाबद्दल जे भाष्य केले आहे, ते जे. व्ही. नी उद्धृत केले असून आज आपण सर्वानीच विचारात घेण्याजोगे आहे. न्या. म्हणाले होते, प्रादेशिक (मराठी) भाषा समृद्ध करण्याचे खरे श्रेय विद्यापीठांमध्ये मोठमोठय़ा पदव्या मिळवणाऱ्या मंडळींपेक्षा ‘बाहेरच्या’ लोकांनाच अधिक जाते. उत्तम कादंबऱ्या, नाटके, चरित्रे, निबंध, इतिहासलेखन आणि कविता याबाबतचे बाहेरच्या लोकांचेच योगदान मोठे आहे.’’ म्हणजे आज २१ व्या शतकाच्या पहिल्या २५ वर्षांत जे घडत आहे, ते न्यायमूर्तीनी शंभर वर्षांपूर्वी वर्तवले होते. त्यामुळे न्यायमूर्ती ‘दृष्टे’ व डॉ. आंबेडकरांच्या मते ‘महान पुरुष’ (ग्रेट मॅन) ठरतात.

जागेअभावी शेवटचा मुद्दा म्हणजे, जे. व्ही. नी आपल्या संशोधनासाठी त्या काळात प्रसिद्ध झालेल्या मराठी व इंग्रजीतलीही सर्व वृत्तपत्रे व नियतकालिकांची पारायणे केली होती.

त्यांच्या जिभेवर ती सारखी घोळत असत. अशा अस्सल व प्राथमिक पुरावे-आधारांमुळे त्यांचे निष्कर्ष भक्कम पायावर उभे असत. त्यामुळेच त्यांना केवळ महाराष्ट्रातच नव्हे, तर भारतीय पातळीवर ‘इतिहासकार’ म्हणून मान्यता व मानसन्मान मिळाले.

त्यांचे माझ्यावर विलक्षण प्रेम होते. मी मुबई विद्यापीठाचा कुलगुरू झालो, योजना आयोगाचा सभासद झालो, नंतर राज्यसभेचा राष्ट्रपतीनियुक्त सदस्य झालो याचा त्यांना मनापासून आनंद झाला. विद्यापीठात मी जे अनेक नवीन उपक्रम सुरू केले, त्याची ते नेहमी प्रशंसा करीत. विद्यापीठात व बाहेर मी आयोजित केलेल्या जवळपास प्रत्येक  कार्यक्रमात ते उपस्थित असत.

मी दहा-बरा वर्षे दिल्लीत असल्यामुळे आमचा व्यक्तिगत संपर्क कमी झाला. परंतु ते एशियाटिक सोसायटीचे अध्यक्ष असताना २०१५ मध्ये सोसायटीचा ‘ऑनररी फेलो’ म्हणून माझा सन्मान करण्यात आला. दोन वर्षांनी मी विश्वस्त झालो. त्यामुळे गेल्या तीन-चार वर्षांत आमच्या भेटीगाठी पुन्हा नियमितपणे सुरू झाल्या. मी जेव्हा त्यांना माझे ‘इसेन्शिअल आंबेडकर’ हे पुस्तक भेट म्हणून दिले, तेव्हा त्यांचे डोळे पाणावले होते. दोनच महिन्यांपूर्वी आमची सोसायटीच्या कार्यकारिणीच्या मीटिंगमध्ये भेट झाली होती. तीच अखेरची ठरेल, अशी जराही कल्पना नव्हती. जे. व्ही. यांच्या निधनामुळे एक मोठय़ा व निर्मळ मनाचा, नेमस्त व माझ्यावर विलक्षण प्रेम करणारा एक हितचिंतक व जिवाभावाचा जेष्ठ मित्र गेल्याचे दु:ख म्हणूनच फार काळ मनात रेंगाळत राहील.