‘‘पृथ्वीवर शांतता नांदावी असं वाटत असेल तर आपण ज्या ठिकाणी राहतो, तिथल्या पर्यावरणाचं संरक्षण करणं आपलं आद्य कर्तव्य ठरतं,’’ असं म्हणणाऱ्या वंगाई मथाई यांनी पर्यावरण रक्षणाकरता केनियाच्या जुलमी राजवटीविरोधात प्राणपणाने संघर्ष केला. पारिस्थितिकीशी जुळवून घेणाऱ्या सामाजिक, आर्थिक आणि सांस्कृतिक विकासाच्या वाटेवर, केनियासह संपूर्ण आफ्रिका खंडाने वाटचाल करावी यासाठीही त्यांनी अथक प्रयत्न केले. तर ब्राझीलची वनदेवता म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मारिया तेरेझा जोर्गे पदुआ यांनी १९६० ते १९८० या दशकांत दोन कोटी एकर जंगल ‘राष्ट्रीय उद्यानं’ म्हणून घोषित करण्यात यश मिळवलं. पर्यावरणासाठी झटणाऱ्या अशा या आगळ्यावेगळ्या स्त्रियांची अल्पचरित्रं ज्येष्ठ विज्ञानलेखक निरंजन घाटे यांच्या ‘पर्यावरण क्षेत्रातील महिला संशोधक’ या पुस्तकात वाचायला मिळतात. पर्यावरणपोषक ऊर्जानिर्मिती करणाऱ्या, कोळसा-खाण उद्योगाविरोधात संघर्ष करणाऱ्या, वन्यप्राण्यांबाबत संशोधन करणाऱ्या, अशा विविध पर्यावरण घटकांसाठी काम करणाऱ्या तब्बल २७ अभ्यासक, संशोधक महिलांच्या कार्याबाबत थोडक्यात पण महत्त्वाची माहिती देण्याचं काम लेखकानं केलं आहे. घाटे यांच्या ओघवत्या शैलीने या चरित्र-निबंधांत जिवंतपणा आला आहे.

‘पर्यावरण क्षेत्रातील महिला संशोधक’

– निरंजन घाटे

साकेत प्रकाशन,

पृष्ठे – १५२, मूल्य – १७५ रुपये.