‘वेध.. व्हॅटिकनमधील सत्तांतराचा!’ हा आनंद हर्डीकर यांचा लेख (२४ फेब्रुवारी- लोकरंग) वाचला. एकांगी अभ्यासातून तयार झालेल्या अनेक वादग्रस्त आणि आक्षेपार्ह विधानांचे कडबोळे करून त्यांनी हा लेख तयार केला आहे. त्या सर्व विधानांचा उल्लेख न करता मला इथे फक्त त्यांच्या दोन प्रमुख विधानांकडे लक्ष वेधावयाचे आहे. १) नवीन पोपची निवड झाली की नाही हे बाहेरच्या जगताला कळावे म्हणून जगप्रसिद्ध सिस्टाईन चॅपलसारख्या पवित्र ठिकाणी जे ‘धुरांडे’ आहे त्याचा उल्लेख ‘चॅपलच्या खुराडय़ा’तून अशा दुर्दैवी शब्दप्रयोगात करणे योग्य आहे का? तसेच- २) ‘आफ्रो-आशियाई देशांमध्ये एड्ससारख्या रोगाच्या झालेल्या फैलावापासून ख्रिस्ती धर्मोपदेशकाचे संरक्षण व्हावे म्हणून भिक्षुणीचा असा वापर झाला तर तो आक्षेपार्ह मानता येणार नाही,’ हे एकेरी अवतरणचिन्हात दिलेले विधान बरेच काही सांगून जाते. वरील विधान हे लेखकाचे स्वत:चे मत आहे की दुसऱ्या कुणाचे? ते जर दुसऱ्या एखाद्या लेखकाचे असेल तर त्या लेखकाचा तसा नामोल्लेख होणे गरजेचे होते. जगद्विख्यात व्यक्तीविषयी लिहिताना कोणताही पुरावा न देता असे खोडसाळ विधान करणे योग्य नाही व ते शिष्टाचारालाही धरून नाही. अशा लेखामुळे ख्रिस्ती भाविकांच्या धार्मिक भावना दुखावतात.
– फादर फ्रान्सिस कोरिया, संपादक ‘सुवार्ता’

संपूर्ण भारतच चांगला होतोय..
प्रदीप लोखंडे यांनी (‘लोकरंग’- १० फेब्रुवारी) बदलत्या ग्रामीण भारताबद्दल सुंदर लेख लिहिला आहे. अनेक दिशेने, तऱ्हेने, पद्धतीने बदलत्या भारताचे चित्र त्यांनी या लेखात उभे केले आहे. कारण संपूर्ण भारतच चांगला होतोय. २१ वर्षांपूर्वी मी ‘इंडियन सायन्स काँग्रेस’चा जनरल प्रेसिडेंट होतो. विज्ञान, लोकसंख्या आणि विकास या विषयावर मी तेव्हा बोललो होतो. शेजारी पंतप्रधान होते. मागच्या बाजूला शंभरहून अधिक परदेशाहून आलेली शास्त्रज्ञ मंडळी होती. ‘लोकसंख्यावाढीचा वेग भारतात कमी व्हायला लागला आहे,’ असं विधान तेव्हा मी केलं होतं. ते आज सर्वाना दिसायला लागलं आहे. १९१० सालचं स्त्री-पुरुषांचं २० वर्षांचं आयुर्मान आज ७० वर्षांच्या जवळपास आलं आहे.
– डॉ. वसंत गोवारीकर (ज्येष्ठ शास्त्रज्ञ), पुणे.

मन:पूर्वक अभिनंदन
प्रदीप लोखंडे यांचा ‘ग्रामीण भारत बदलतोय’ हा लेख वाचला. त्यांनी ग्रामीण भारतात होत असलेल्या बदलांविषयी चांगली निरीक्षणे मांडली आहेत. त्यांचे मन:पूर्वक अभिनंदन.
– अतुल देऊळगावकर, लातूर.

नकारात्मकतेला चपराक
प्रदीप लोखंडे यांनी ग्रामीण भारतात होत असलेल्या बदलांविषयी जी निरीक्षणे मांडली आहेत, ते आजचं वास्तव आहे. पण अनेक लेखक, सामाजिक अभ्यासक, बुद्धिवादी या सकारात्मक बदलांना समजून घेण्यात पूर्णपणे अपयशी ठरले आहेत. लोखंडे यांनी थोडक्यात खूप चांगल्या पद्धतीने मांडणी केली आहे. ती खूप सकारात्मक आणि वास्तवदर्शी आहे. त्यांची मांडणी ही सतत नकारात्मकता सांगणाऱ्यांना दिलेली एक प्रकारची चपराकच आहे.
– महेश झगडे (आयएएस), पुणे.

स्वैर लेख
‘लोकरंग’ (१७ फेब्रुवारी)मधील ‘लिंकन’ चित्रपटावरचा अनिल शिदोरे यांचा लेख हा ना धड सिनेमाची समीक्षा होती, ना रसग्रहण. भारतीयांच्या सामाजिक, राजकीय परिस्थितीशी ओढूनताणून संबंध जोडण्याचा अयशस्वी प्रयत्न या लेखात केलेला आहे. तर नाना पाटेकर यांचा लेख म्हणजे शब्दांचा अतिसार आणि विचारांचा अवरोध याचे उत्तम उदाहरण आहे. शब्दांचा असा डोंबारखेळ आवडण्याचे दिवस आता राहिले नाहीत, हे पाटेकर कसे विसरतात?
– शुभा परांजपे, पुणे.

अशिष्ट टीका
आनंद मोडक यांचे १० फेब्रुवारीच्या अंकातले ‘स्मरणस्वर’ वाचले. याआधीचे ‘सर्वव्यापी यमन’ या विषयावरचे त्यांचे लिखाणही वाचले होते. त्यात त्यांनी त्यांना कुठलाही ‘राग’ शॉर्टकट मेथडने वापरलेला आवडत नाही असे म्हटले होते आणि संगीतकार वसंत देसाई यांनी ‘मल्हार’ राग शॉर्टकट मेथड म्हणून खूप वापरला, अशी शिष्ट टीकाही केली होती. एकतर त्यांनी हे अतिशय चुकीचे
विधान केलेले आहे; जे सहज खोडून काढता येईल. वसंत देसाई यांनी मल्हारसहित सर्वच
रागांचा सुयोग्य वापर आपल्या संगीतात केलेला आढळतो. वानगीदाखल ‘तेरे सूर मेरे गीत’ (बिहाग), ‘तुझ्या प्रीतीचे दु:ख मला’ (यमन), ‘निर्बलसे लडाई’ (मालकंस), ‘इक था बचपन’ (गुर्जरी तोडी), ‘जीवन में पिया’ (भैरवी).. अशी किती उदाहरणे द्यायची? त्यांची मल्हारगीते जर ‘शॉर्टकट मेथड’वाली असती तर ती अजरामर का झाली असती? ही सर्व मल्हारगीते आज भारतीय
चित्रपट संगीताच्या इतिहासात मैलाचे दगड ठरली आहेत. ‘डर लागे गरजे बदरिया’ (सूरमल्हार), ‘ना ना ना बरसो बादल’ (मल्हार), ‘बोले पपिहरा’ (मियाँ मल्हार), ‘सावन घन गरजे’
(मेघमल्हार), ‘रम्य ही स्वर्गाहुनी लंका’ ही मल्हारची रूपे म्हणजे वसंत देसाईंच्या स्वतंत्र,
स्वयंभू प्रतिभेचाच आविष्कार होत. त्यांनी रागांच्या नुसत्या आरोह-अवरोहांची कॉपी
करून गाणी बेतलेली नाहीत. त्या काळातले सर्वच संगीतकार रागरागिण्या कोळून प्यायलेले
होते आणि त्यांनी रागसंगीत वापरून अशा अनेक अजरामर रचना तयार केलेल्या आहेत. त्यांनी शॉर्टकट मेथडने संगीत तयार केले असते तर ते कधीच विसरले गेले असते. याउलट, आनंद मोडक यांनी १० फेब्रुवारीच्या ‘स्मरणस्वर’मध्येच कॉलेजच्या आठवणी सांगताना आपण ‘स्वातंत्र्याचा रवि उगवला’ या गाण्याला ‘संगीत सौभद्र’मधील ‘प्रिये पहा..’ची देसकार रागाची चाल लावली, हे स्वत:च कबूल केले आहे. तसेच नववीत असताना ‘सृजनहो असो शुभ स्वागत’ या स्वागतगीताला ‘जय गंगे भागीरथी’ची कलावती रागाची चाल त्यांनी लावली होती. म्हणजे स्वत: शॉर्टकट मेथड वापरायची
आणि वसंत देसाई यांच्यावर मात्र मल्हार रागाच्या पाटय़ा टाकल्या म्हणून शिंतोडे उडवायचे, हा दांभिकपणा झाला.
जाई विनय जोग, कोथरुड, पुणे.