डॉ. चैतन्य कुंटे – keshavchaitanya@gmail.com

डॉ. चैतन्य कुंटे.. संगीतकार, संगीत अभ्यासक. संगीताच्या मानवी संस्कृतीशी असलेल्या संबंधांचे चिंतक. संगीताने माणसाचं आयुष्य व्यापले आहे, त्याला धर्म कसे अपवाद ठरणार? भजन, कीर्तन, अभंग, गुरुबानी, सुफी संगीत अशा नानाविध प्रकारे विविध धर्मानी संगीत जोपासलं, फुलवलं.. त्याचा धांडोळा घेणारं पाक्षिक सदर..

कीर्तनात नमनानंतर आख्यानाचा पूर्वरंग सुरू होतो. त्यात एखाद्या विषयाचे सूत्र घेऊन कीर्तनकार विवेचन करतात. त्यासाठी एखाद्या संताचे पद, अभंग निवडला जातो आणि त्याआधारे निरूपण केलं जातं. कीर्तनाचा हा साचा म्हणजे खरं तर आज रूढ असलेल्या अकादमिक बौद्धिक चर्चेचं पूर्वरूप (म्हणजे ‘प्रोटोटाईप’ बरं!) म्हणता येईल. अर्थात कीर्तनकारांच्या समोर माझ्या-तुमच्यासारखे सामान्य श्रोते असत. त्यामुळे कीर्तनात एकाच वेळी तात्त्विक चर्चा आणि मनोरंजन हे दोन्ही असे. म्हणजे असं की, तात्त्विक विचारांची आकृती काढली की तिच्यात रंग भरायचे ते रसाळ गायनाने, रोचक अभिनयाने, माफक पदन्यासाने आणि खुमासदार कथा-आख्यायिकांच्या सजावटीने. तर महाराजा, हाच कीर्तनाचा साचा डोळ्यासमोर ठेवणार आहे.. त्यामुळे या मालिकेत रंजक माहिती असेल; पण तात्त्विक चर्चाही असेल बरं!

या लेखमालेच्या आजच्या पूर्वरंगात ‘धर्मसंगीत’ म्हणजे काय हे जाणून घेऊ. तेव्हा ही संज्ञा अधिक तपशिलाने समजून घेऊ. ज्या अभ्यासशाखेतून ही संज्ञा बनली आहे तिचीही ओळख करून घेऊ. म्हणजे या शब्दाच्या पाठीमागची परंपरा आणि तिचा व्यापक परीघही ध्यानात येईल.

(एक डिस्क्लेमर : हा लेख काही तांत्रिक तपशिलामुळे वाचायला थोडा जड वाटू शकेल. पण पुढे शरीर सुदृढ होण्यासाठी आधी बाळगुटी घ्यावी लागते ना! तसेच मानून हा चढाचा रस्ता दमादमाने चढा! रविवार फक्त मनोरंजनाचा नसतो ना! आज जरासे ‘बौद्धिक जिम’ही करू.)

धर्मसंगीताचा अभ्यास हे ‘संस्कृती-संगीतशास्त्र’ या अभ्यासशाखेचे एक अंग आहे. संस्कृती-संगीतशास्त्र म्हणजे काय? संगीताचा विचार केवळ सांगीतिक दृष्टीने करणे म्हणजे ‘संगीतशास्त्र’! परंतु समग्र संस्कृतीच्या संदर्भात करून त्या- त्या भौगोलिक, कालिक, सामाजिक, भाषिक, तात्त्विक, मानसिक, धार्मिक, आर्थिक, राजकीय, इ. परिमाणांतून झालेली संगीताची घडण तपासणे म्हणजे ‘संस्कृती-संगीतशास्त्र’! संस्कृतीने संगीताला पाडलेले पैलू आणि बदल्यात संगीताने संस्कृतीला दिलेले आयाम असा परस्पर सहयोगाचा अभ्यास म्हणजे संस्कृती-संगीतशास्त्र. संगीताच्या माध्यमातून संस्कृती काय म्हणू पाहते, हे या शास्त्राच्या अभ्यासातून समजते.

संस्कृती-संगीतशास्त्र ही अभ्यासशाखा भारताला तशी अनोळखी नसली तरी काहीशी नवीच.. गेल्या काही दशकांत विकसित होत असलेली. ‘अनोळखी नाही’ असे म्हणण्याचे कारण असे की ‘नाटय़शास्त्र’कार भरत, ‘मानसोल्लास’कार सोमेश्वर किंवा ‘संगीतरत्नाकर’कार शार्ङ्गदेव हे सारेच प्राचीन शास्त्रकार असे संस्कृतीचे बोट धरूनच कलेचे विवेचन करत होते आणि आपल्या कलाविवेचनातून संस्कृतीच्या एकेका अंगाकडे अंगुलीनिर्देश करत होते.

या अभ्यासशाखेला ‘काहीशी नवीच’ म्हणण्याचे कारण असे की, भरत-शार्ङ्गदेवादिकांची ही परंपरा दुर्दैवाने मध्ययुगात खंडित होऊन कलाविवेचन एकांगी होऊ लागले. संस्कृती > कलाविश्व > विशिष्ट कलाविधा अशा क्रमाने तीन पातळ्यांवरचे विवेचन केवळ आपापल्या कलाविधेपुरते, संगीतापुरते सीमित होऊ लागले. एवढेच काय, हा विचार त्या कलेचे एखादेच अंग यापुरता उरला. बरेचसे शास्त्रकार केवळ कलेच्या प्रत्यक्ष प्रयोगाशी संबंधित अंगाचीच चर्चा करत राहिले. (तसे होणे स्वाभाविक आणि आवश्यकही होते म्हणा. त्यामुळे संगीताची आधी ‘विस्तीर्ण’ असलेली चर्चा ‘सखोल’ होत गेली.) ब्रिटिशकाळात आणि नंतरही परकीय अभ्यासक पुष्कळशा कुतूहलाने, तटस्थतेने भारतीय कलांचा अभ्यास करू लागले. मग पुन्हा भारतीय विचारवंतही एतद्देशीय भूमिकेतून कलातत्त्वांचे नव्याने, संस्कृतीच्या गवाक्षातून अवलोकन करू लागले.

आरंभी वसाहतवादी प्रेरणांतून ‘ओरिएंटल स्टडीज्’ या अभ्यासशाखेंतर्गत या अभ्यासाची मूस घडत गेली. तेव्हा ‘इथ्नोम्युझिकॉलॉजी’ (वंश-संगीतशास्त्र) हे नाव रूढ झाले. नंतर अभ्यासाचा उद्देश आणि पवित्राही अधिकाधिक पूर्वग्रहरहित झाला. खुले दृष्टिकोन स्वीकारत हे शास्त्र व्यापक झाले. या प्रक्रियेतून कात टाकत ‘कल्चरल म्युझिकॉलॉजी’ (संस्कृती-संगीतशास्त्र) असे अधिक नेमके व निकोप नाव धारण करून हे शास्त्र आता स्थिरावले आहे.

भारतीय संगीताच्या पाश्चात्त्य अभ्यासकांनी आरंभी आपापले पूर्वग्रह लादून या शास्त्राची उभारणी आरंभी केली खरी, पण पुढे अस्सल भारतीय विचार परंपरेचे सत्त्व आणि पाश्चात्त्यांची वैचारिक शिस्त हे दोन्ही घेऊन या शास्त्राची नव्याने उभारणी काही मोजक्या भारतीय संगीताभ्यासकांनी केली. अशा विद्वानांपैकी एक महत्त्वाचे शास्त्रकार म्हणजे डॉ. अशोक दा. रानडे. भारतीय संदर्भ अधोरेखित करून या अभ्यासशाखेची ‘भारतीय संस्कृती-संगीतशास्त्र’ अशी स्वतंत्र ओळख तयार करण्याचे मोठे श्रेय त्यांचे आहे.

गेल्या शतकात अनेक अभ्यासकांनी भारतातील वैष्णव हवेली संगीत, शीख गुरुमत संगीत, सोपान संगीत, वारकरी संगीत, बाऊल आणि सूफी संगीत अशा विविध भक्तीसंगीताच्या परंपरांचा अभ्यास केला. मात्र, हा अभ्यास सुटा सुटा, त्या- त्या संगीत परंपरेपुरता मर्यादित होता. अशा सुटय़ा अभ्यासांच्या एक पाऊल पुढे जाऊन धर्मसंगीताच्या अभ्यासाला ठोस सिद्धांताचे अधिष्ठान देण्याचे मोठे कार्य डॉ. अशोक रानडे यांनी केले. भारतीय धर्म परंपरा आणि संगीत परंपरा या दोन्हींच्या एकत्रित अवलोकनातून ‘धर्मसंगीत’ या संगीतकोटीची सैद्धांतिक मांडणी त्यांनी केली, एक नवे आकलन घडवले. असेच कार्य त्यांनी ‘लोकसंगीतशास्त्रा’च्या उभारणीतूनही केले होते. किंबहुना आदिम संगीत, लोकसंगीत, कलासंगीत, धर्मसंगीत, जनसंगीत आणि संगमसंगीत अशा सहा संगीतकोटींच्या सिद्धांतांद्वारे त्यांनी भारतीय संगीताच्या बहुरंगी पटाचे समग्र दर्शन घडवले.

‘भक्तीसंगीत’ हा शब्द अधिक परिचित, रुळलेला. मग त्यापेक्षा निराळा असा ‘धर्मसंगीत’ हा शब्द का वापरायचा? याचे महत्त्वाचे कारण असे की, ‘भक्तीसंगीत’ हे एखाद्या संप्रदाय वा दैवताविषयी असलेल्या भक्तिभावाचा आविष्कार करणारे संगीत असते. मात्र, केवळ भक्ती हेच धर्माचे एकमेव अंग नाही. भक्तीसंगीताच्या बरोबरीने धर्माच्या अन्य अंगांत असलेले संगीतही सामावून घेणारी एक व्यापक संगीतकोटी असा अर्थ ‘धर्मसंगीत’ संज्ञा व्यक्त करते.

‘धर्मसंगीत’ म्हणजे नेमके काय? धर्माच्या कक्षेत येणाऱ्या उपासना, विधी, धर्मतत्त्वांचा प्रचार-प्रसार, सांप्रदायिक उत्सव यांसाठी केवळ धार्मिक उद्दिष्टांनी योजलेले संगीत म्हणजे ‘धर्मसंगीत’! एका प्रकारे धर्मसंगीत ही ‘उपयोजित संगीतकोटी’ आह.े (‘अप्लाइड म्युझिक’ असं म्हटलं की चटकन् कळेल ना!)

ढोबळमानाने धर्माची तीन अंगे असतात- (१) तत्त्वज्ञान व नैतिक अधिष्ठान, (२) विधी व कर्मकांड, (३) दैनंदिन उपासना. धर्मसंस्था या तीनही अंगांच्या गरजेनुसार तसतसे संगीत तयार करते किंवा आपलेसे करते. या अंगांच्या मागणीनुसार लयबद्ध भाषण, पठण, छंदोबद्ध पद्य, गेय पद आणि गीत असा सोपान चढत अनेक प्रकारचे संगीत योजले जाते. त्याला आवश्यकतेनुसार वाद्ये, नृत्य यांचीही जोड दिली जाते आणि त्या- त्या धर्मातील खास संगीताविष्कार सज्ज होतो.

तात्त्विक वा नैतिक अंगाचा उपदेश करणारे प्रवचन, कीर्तन हे प्रकार असतात. त्यातील संगीत हे भाषण, पठण आणि गायन या तीन अवस्थांचा समावेश करते. विधींच्या कर्मकांडात मंत्रोच्चार, विशिष्ट वाद्यांचे वादन इ. बाबींतून कर्मकांडातील कृतींना अधोरेखित केले जाते. इथे संगीत हे मुख्यत्वे सूचक स्वरूपाचे असते. दैनंदिन उपासनेत आणि धार्मिक उत्सवांत मात्र संगीततत्त्व मोठय़ा प्रमाणात असते आणि संगीताचे अनेकरंगी आविष्कार होताना आढळतात. दैनंदिन उपासनेतील संगीत हे खरे तर ‘भक्तीसंगीत’ म्हणावे असे असते. याशिवाय धार्मिक उत्सवांतील संगीत हे मोठय़ा समुदायाच्या समावेशामुळे जनरंजनाकडे अधिक झुकलेले असते, म्हणून उपासना संगीतापेक्षा त्याचे स्वरूप बदलते. अशा प्रकारे प्रवचन संगीत, विधीसंबद्ध संगीत, उपासना संगीत, संकीर्तन संगीत, भक्तीसंगीत, धर्मोत्सवी संगीत अशा सर्वाचा समावेश ‘धर्मसंगीत’ कोटीत होतो.

भारतापुरता विचार करायचा तर खेडोपाडी रुजलेल्या अनेक आदिम धर्म-पंथांसह वैदिक वा हिंदू, बौद्ध, जैन, शीख, पारशी, ज्यू, ख्रिश्चन, इस्लाम असे ठळक आठ धर्म इथे नांदत आहेत. त्यांचे संप्रदाय, पोटशाखा तर शेकडय़ाने आहेत आणि आधुनिक काळातही त्यांत भर पडत चालली आहे. या आठ धर्माचे संगीत किती वैविध्यपूर्ण असावे! शिवाय त्या धर्मातील संगीतांना प्रांतीय रंग आहेत, भाषिक पोत आहेत, ऐतिहासिक पाश्र्वभूमी आहे, लोकमानसाची साद आहे.

धर्मसंगीताच्या या परंपरांनी एकमेकींनाही काही दिले, काही घेतले.. त्या समृद्ध होत गेल्या. ही समृद्ध वाटचाल पुढल्या काही लेखांत पाहू.