|| सुभाष अवचट

आजच्या प्रवचनाची सुरुवात एका कंजूष माणसाच्या गोष्टीने करू. एका छोट्या गावात एक कंजूष राहत होता. तो दु:खी होता. कारण गावातले लोक पलीकडच्या मोठ्या गावातल्या एका कंजुषाची मोठी तारीफ करीत असत. त्याच्या कंजूषपणाच्या अनेक कथा ऐकून त्याने ठरवले की, त्याला जाऊन एकदा भेटलेच पाहिजे. माझ्यापेक्षा तो एवढा मोठा कंजूष कसा, हे तरी कळेल! तो निघतो. रिकाम्या हाताने जाण्यापेक्षा काहीतरी भेट घेऊन जावी म्हणून रस्त्यात पडलेला एक कागद उचलतो. कोळशाच्या वखारीपाशी पडलेला कोळसा घेऊन  कागदावर एका आंब्याचे चित्र काढून त्याच्या घरी पोहोचतो आणि दरवाजा ठोठावतो. त्याच्या मुलाने दरवाजा उघडल्यावर हा म्हणतो, ‘‘मी शेजारच्या गावातून तुमच्या वडिलांची कीर्ती ऐकून आलोय. त्यांना भेटण्याची इच्छा आहे! ’’ मुलगा म्हणतो, ‘‘बाबा परगावी गेलेत. आल्यावर निरोप देतो.’’ जाताना त्या मुलाला तो कागदावरचे आंब्याचे चित्र देऊन म्हणतो, ‘‘माझ्याकडून त्यांना भेट द्या!’’ तो निघणार एवढ्यात तो मुलगा म्हणतो, ‘‘अहो, तुम्हालाही परतभेट घ्यावीच लागणार. आत या!’’ त्या मुलानं हवेत आंब्याचं तीनदा चित्र काढून सांगितलं, ‘‘हे तीन आंबे भेट घेऊन जा!’’

Anant Ambani and Radhika Marchant pri Wedding
Video : जामनगरमध्ये व्हीआयपी पाहुण्यांसाठी अंबानी कुटुंबाने उभारले आलिशान तंबू, आतील सोयी बघून तुम्हीही व्हाल थक्क
Sale of pistol by prisoner
पुणे : जन्मठेपेची शिक्षा भोगणाऱ्या कैद्याकडून पिस्तूल विक्री; पिस्तुलासह तीन काडतुसे जप्त
Development Plan, Navi Mumbai, Wetlands, Residential Complexes, Political Silence, flamingo, environment,
नवी मुंबई : पाणथळीच्या जागा निवासी संकुलांसाठी खुल्या करण्याचा निर्णय, पर्यावरणप्रेमींचा विरोध, नेत्यांचे सोईस्कर मौन
Pune pubs
पुण्यात आता मध्यरात्री दीडपर्यंत ‘चिअर्स’… पब, मद्यालयांबाबत पोलीस आयुक्तांचा मोठा निर्णय

परतताना हा छोटा कंजूष मनाशी म्हणतो, ‘‘मी कमीत कमी कागदावरचे चित्र तरी घेऊन गेलो. याने तर हवेतले आंबे दिले. बेटा असा, तर त्याचा बाप किती मोठा कंजूष असेल!’’

इथेच ही कथा संपत नाही. तीन दिवसांनी जेव्हा बाप घरी येतो आणि त्याला मुलगा ही सविस्तर गोष्ट आणि कागदावरच्या आंब्याची भेट दाखवतो तेव्हा हा मोठा कंजूष मुलाला थप्पड मारतो आणि म्हणतो, ‘‘तू माझे दिवाळे काढशील एकदा! तुला तीन आंबे द्यायची काय गरज होती? एकच पुरे होता.’’

आपले धर्मगुरू, कर्मठ, पंडित, सनातन असेच मोठे कंजूष आहेत. त्यांनी एवढी कंजुषी केली की मोकळ्या ज्ञानाचे दरवाजेच बंद केले. पुण्याच्या हिंद विजय टॉकीजमध्ये सकाळी हे आचार्यांचं पहिलं प्रवचन मी ऐकलं तेव्हा मी कॉलेजला होतो. त्या वयात आचार्यांच्या ओघवत्या वाणीने मी पूर्ण भारावलो होतो. बोलण्याची धाटणी, मांडणी, आवाजाचा पोत आणि अत्यंत सोप्या भाषेत पारंपरिक तत्त्वज्ञानाचा आधुनिक परामर्श हे गुण त्यांच्यात होते. तेव्हापासून मी त्यांच्या प्रवचनांतून कबीर, महावीर, बुद्ध, सूफी, गांधी ते जे. कृष्णमूर्ती अशा थोर विचारवंतांचे खरे, सोपे धडे घेतलेले आहेत. त्यांचे ते धडे शब्दबंबाळ नव्हते, तर त्यात जीवनाबद्दलचं त्यांचं विश्लेषण होतं. आचार्य हे खरे शिक्षक होते. त्यांच्या वैयक्तिक आयुष्यातही ते प्रोफेसर होते. जबलपुरात शिकवायचे! तत्कालीन असा कोणी विचारवंत आसपास नव्हता- जो सडेतोड, पूर्ण तत्त्वज्ञान घेऊन जुन्या, कर्मठ आणि अंध विचारांचे विच्छेदन करेल. जे होते, ते कर्मकांडांत गुंतले होते. एकीकडे जे. कृष्णमूर्ती होते, त्यांचा पिंड सौम्य होता. पण एकदम जुनी भिंत पाडून नवीन उभी करण्याचे काम त्यावेळी आचार्य करीत होते.

याच सुमारास ‘संभोगातून समाधीकडे’ या त्यांच्या पुस्तकामुळे कर्मठ गल्ल्यांमध्ये एकच वादळ उठलं होतं. ‘सेक्स’ हा शब्द उच्चारायला विटाळ मानणारा वर्ग, टीकाकार, सो-कॉल्ड तत्त्ववेत्ते, गोंधळात नेहमी गुंतलेले जर्नालिस्ट वगैरे जागचे हलले होते. धक्कादायक विचारसरणी आणि तत्त्वज्ञानाच्या कन्टेम्पररी अ‍ॅप्रोचमुळे मिळालेल्या धक्क्याने हे शहर सावरत नव्हते. तशात जगातून मिळालेल्या प्रतिसादाने रिव्होल्यूशनरी ग्लॅमर तयार झालं. त्यातच हा रजनीश आश्रम उभा राहिला. आता आचार्य रजनीश झाले होते. हा आश्रम मठ नव्हता. इतर स्वामी-बुवांसारखा पाहण्याचा दृष्टिकोन या आश्रमात नव्हता. तेथे जगातून अनेक विचारवंत, लेखक, संगीतकार, आर्टिस्ट, शास्त्रज्ञ, अ‍ॅक्टर्स, बिझनेसमन्स एकत्र आले आणि माझ्यासाठी क्रिएटिव्हिटी सेंटरच तेथे उभे राहिले. त्याचीच ही गोष्ट!

एम्प्रेस गार्डनविषयी, कॅम्पमधील वातावरणाबद्दल आम्हाला आकर्षण होतं. स्केचिंगसाठी आम्ही वर्गमित्र सायकलवर एम्प्रेस गार्डन शोधीत गेलो. सकाळची वेळ होती. रस्ता चुकलो. त्या परिसरात तुरळक वाहतूक असायची. सारं शांत. जुन्या पुण्याच्या मानाने हा परिसर नवखा वाटायचा. प्रचंड जुन्या वडांच्या झाडांच्या रांगांमधून गेलेल्या एका रस्त्यावर आलो. रस्त्यावर गर्द सावल्या. आजूबाजूला बहुतेक संस्थानिकांच्या मोठ्या हवेल्या. आतल्या गल्ल्यांमध्ये आम्ही सायकली मारीत फिरत होतो. तेवढ्यात एक आर्मी मॅन चालत येताना दिसला. आम्ही चौकशी केली तेव्हा त्याने सांगितलं, हा कोरेगाव पार्क आहे! माझी पहिली ओळख ही होती. नंतर ती ‘रजनीश आश्रम म्हणजे कोरेगाव पार्क’ अशी झाली. पण रजनीश आश्रमाचं नाव घेताच माणसं दचकायची. हळूहळू कोरेगाव पार्कमधल्या वडांच्या पारंब्यांमधून मरुन रंग पसरू लागला. झाडांच्या फांद्यांवर अडकवलेल्या मरुन रंगाच्या कफन्या, संन्यासिनींचे मरुन कपडे, सपाता, टोप्यांनी त्या रस्त्याचा नवा चेहरा दिसू लागला. सकाळी पारंब्यांमधून तिरक्या पडलेल्या उन्हात फिरताना किंवा ध्यानस्थ बसलेले मरुन कलर्समधले संन्यासी एखाद्या चित्राच्या विषयासारखे वाटायचे. या घडामोडी तेथे चालू असताना मी माझ्या टिळक रोडवरील स्टुडिओमध्ये कामात बुडालो होतो. त्यावेळी मी सॅलसबरी पार्कमध्ये राहत होतो. संध्याकाळी माझा अ‍ॅक्टर मित्र विनोद खन्ना माझ्याकडे येत असे. तो रजनीशांचा शिष्य झाला होता. त्याच्याबरोबर त्याचे मित्रही येत-जात असत. त्यात दिग्दर्शक विजय आनंद, महेश भट, कर्नल कपूर हे असत. जगातले उत्तमोत्तम आर्किटेक्ट्स, म्युझिशियन्स, गायक, एडिटर्स त्या काळात माझ्या परिचयाचे झाले होते. त्यात भर म्हणजे माझी जिवाची मैत्रीण स्मिता पाटीलही भरकटत तिथे पोहोचली. त्यांच्याबरोबर मी आश्रमात चक्कर मारायचो.

अशाच एका संध्याकाळी मी स्मिताबरोबर आश्रमात तिच्या मुंबईहून आलेल्या एका एडिटर मैत्रिणीबरोबर गेलो होतो. बुद्धा हॉलमध्ये अनेक लोक जमले होते. सूर्य अस्तास जात होता. या गोल, उघड्या हॉलमध्ये अत्यंत शांत म्युझिक सुरू झालं. तिथे रजनीशांचा फोटो, त्यांचं लेक्चर काही नव्हतं. तिथे कोणतीही शक्ती नव्हती. कोणीही नागडे नव्हते. तुम्ही बसा, डान्स करा, डोला… काहीही करा. इतकेच नव्हे तर म्युझिक ऐका किंवा निघून जा. काही वेळातच मला सारे वातावरण मॅग्नॅटिक झाल्याचे जाणवले आणि स्वत:च्या तालातच कित्येक जण नाचू लागले. त्या नाचात नियम नव्हते. स्टेप्स नव्हत्या. मीही काही वेळाने एका ठिकाणी बसलो. माझ्या आय लेव्हलला अनेक पाय मरुन रंगात सुपर इम्पोझ होतायत. लहान मुलं स्वत:शीच गिरक्या घेत हसत आहेत. एक लहर… त्यात मिसळत गेलेले अनेक तरंग. त्या जर्मन संन्याशांनी कंपोझ केलेलं संगीत आता हळुवार रीतीनं वरच्या पातळीवर गेलं आणि माझ्या लक्षात आलं की पलीकडे जमिनीवर कोणी मोठा बिझनेसमन गडाबडा लोळतो आहे. ही एडिटर मैत्रीण बाहेर जाऊन भडाभडा ओकू लागली. आम्ही तिला सांभाळलं खरं; मात्र नंतर ती रडू लागली ती थांबेच ना! म्युझिक उच्च पातळीवर गेलं आणि मंद होऊन थांबलं. अनेक जण हळूहळू आपल्यात दंग होत गेले आणि विरळ झाले. मी आणि स्मिता त्या रिकाम्या चौथऱ्यावर तिच्या मैत्रिणीचं रडणं थांबेपर्यंत बसलो. काय झालं होतं तिथे? निराळ्या देशांतली, चेहऱ्यांची, स्वभावांची अनोळखी माणसं एकत्र येतात, स्वत:त मुरत ठेवलेलं दडपण एकाएकी बाहेर येतं, त्याला मोकळी वाट मिळते आणि त्या अलौकिक संगीताच्या सुरांत ते आनंदाने सामील होतात. स्मिताची मैत्रीण जाताना सारखी हसत होती. तिला स्वत:चीच गंमत वाटत होती. बहुदा ती मनमोकळी झाली असावी… जसा सतत स्ट्रेट फेसवाला तो बिझनेसमनही झाला असावा. मला मात्र पुढे कित्येक दिवस हलणारे मरुन कलर्सचे पडदे डोळ्यांसमोर उघडझाप करीत होते आणि ‘इज द मून बिहाइंड द मून, इज द सन बिहाइंड द सन’ हे म्युझिक अंगभर असे. मला आश्रम आवडत असे, कारण तिथे क्रिएटिव्हिटी होती. पारंपरिक खुळचट गांभीर्य नव्हतं. सर्वजण आनंदाने आपापल्या कामात सहजतेने काम करीत असत. विनोद खन्ना हा बॉलीवूडचा टॉपचा नट आश्रमात झाडांना पाणी घालताना दिसे. कोणी जॅपनीज बाहुलीसारखी मुलगी स्केचिंग करताना झाडाखाली बसलेली दिसे. या माणसांमुळे हा आश्रम मला आवडतो आहे की रजनीशांच्या तत्त्वज्ञानामुळे, हा प्रश्न माझ्यापुढे होताच. या माणसांमुळे पुण्यात स्थित्यंतर झालं… बदल होत गेला. मानसिक बदल तर सोडाच; पुण्यातले प्रिंटिंग प्रेस, मंडईतली बांबूची कामं करणारी बुरुड मंडळी, दुकानदार, छोटे-मोठे कामगार यांची दृष्टीही बदलत गेली. आश्रमात संन्यासी होऊन राहणारे लोक हे प्रसिद्ध डिझाइनर्स, प्रिंटर्स, टेक्निशियन होते. लोकल कारागिरांकडून त्यांनी बांबू, चटईचा वापर करून स्लीपर्स तयार करून घेतल्या. त्या आजतागायत प्रसिद्ध आहेत. बुरुड मंडळींकडून त्यांचंच सामान वापरून नजर लागावी अशा बांबूच्या कलात्मक झोपड्या बनवल्या. रजनीशांची पुस्तकं लोकल छापखान्यांत छापली जायची. त्या जुन्यापुराण्या छापखान्यांतून छापलेली पुस्तकं बघता आज वाटणारही नाही, की ती अशा छोट्या प्रेसमध्ये छापली गेलीत. कागद, टाईप फेसेस, बांधणी यांत तांत्रिक बदल त्यांनी करवून घेतलेच; पण शिक्षण आणि सौंदर्यही शिकवलं. भारतीय संगीत काय किंवा परिसरातील झाडं काय- त्यांना आगळेपण लाभलं. शिवकुमार शर्मा, हरिप्रसाद चौरसिया यांच्यासारख्या लोकांच्या संगीताला टेक्निकल जोड देऊन ते किती वेगळ्या आध्यात्मिक पातळीवर नेऊन ठेवता येतं याचंच हे उदाहरण आहे. नाला गार्डन बघताना कचऱ्यातून किती सौंदर्य निर्माण करता येतं याचा खरा अर्थ दृष्टीस पडतो.

एम्प्रेस गार्डन हे विलक्षण गार्डन पुण्यात आहे. तसं ते आत्ता आहे की नाही, मला माहीत नाही. त्यातली झाडं, त्यांची वयं, आकार, बहर… बांबूच्या बेटांनी भरलेल्या या तृप्त गार्डनमध्ये सतत हिरवी शांतता असे. पण अलीकडच्या पुणेरी लोकांना ते आपलंसं वाटत नसे. एअर इंडियामधला एक पायलट संन्यासी होता. तो चांगला शेफ होता. त्याने तिथे शनिवार-रविवार चहा-सँडविचचा छान स्टॉल उघडला. अनेक संन्यासी तिथे मेडिटेशन अथवा गिटार वाजवीत बसलेले असत. मीही एकदा स्केचिंगसाठी तिथे गेलो. माझी नुकतीच ओळख झालेली ती जपानी मुलगी एका बांबूच्या बेटापाशी अगदी जवळ बसून स्केचिंग करताना दिसली. अर्थातच भाषेमुळे संभाषणाचा प्रश्नच नव्हता. मीही इकडे तिकडे फिरून काही स्केचिंग केलं. पायलटबरोबर चहा पिऊन तिच्याकडे गेलो. बहुतेक वेळा स्केचिंग करताना लांबून सारं बेट कागदावर आणण्याचं शिक्षण तिला मिळालं असेल. ती बांबूच्या बेटापाशी इतक्या जवळ कशी बसली? स्टॉलवर बसल्यानंतर तिने केलेलं  स्केच मी पाहिलं. एकाच बांबूचा तिनं क्लोजअप् घ्यावा तसं स्केच केलं होतं. त्यावरच्या लिरिकल असलेल्या लाल, हिरव्या रेघा, त्यातली लय तिने पकडली होती. नजरेत मावून घेतलेल्या मोठ्या चित्रात अनेक छोटी चित्रं लपलेली असतात, त्याचंच हे उदाहरण होतं. सूक्ष्मात जाणं, तिथल्या सौंदर्याला स्पर्श करणं हेच सूत्र ती आश्रमातून नकळत शिकली असावी. संन्यास, प्रवचनं यापेक्षाही तिथे चाललेल्या, निर्माण होत असलेल्या अशा संवेदनक्षम कामानं मी अधिक आकर्षित झालो होतो. त्यातच घरी मित्रमंडळी जमली की विनोद म्हणायचा, ‘‘संन्यास घे!’’ ‘‘कशाला?’’ मी म्हणायचो. ‘‘कमीत कमी भगवानांना तर भेट!’’

आता रजनीश ‘भगवान’ झाले होते. मी ‘हो’ म्हणालो आणि माझी भेट झाली. अगदी समोरासमोर. विनोदने माझी भेट ठरवली. त्याला ‘दर्शन’ संबोधित असत.

बुद्धा हॉलमध्ये हा सोहळा असे. लांबच लांब वेटिंग लिस्ट असे. पण माझ्या मित्राची वट असल्याने तारीख लवकर मिळाली. तत्त्वज्ञान असो, नाहीतर संन्यास अथवा दर्शन- निगोशिएशन हे करावंच लागतं.

संध्याकाळची वेळ होती. बुद्धा हॉलमध्ये वेगळीच शांतता होती. धूसर प्रकाश होता. थोडी भीती, थोडी उत्सुकताही. समोरच्या छोट्याशा व्यासपीठावर रुबाबदार खुर्ची होती. खाली माझ्या पलीकडे चार फिरंगी स्त्रिया, एक पुरुष, नंतर विनोद, कडेला मी बसलो होतो. विनोदने मला बजावलं होतं… मस्करी करायची नाही. खुर्चीशेजारी एक फिरंगी हातात रेशमी पॅड घेऊन बसला होता. त्यात बहुतेक आमची नावं असावीत. आता हे भगवान येणार कुठून? डावीकडून की उजवीकडून? ते उजवीकडूनच आले. शांत हात जोडून. पांढरा रोब. पांढरी दाढी. हिप्नॉटिक वाटावेत असे डोळे. प्रत्येकाकडे शांत नजरेनं बघत ते खुर्चीत बसले. फिरंग्याने पॅड उघडलं. त्यात पहिल्या नंबरचं नाव बाईचं असावं. पण ती ट्रान्समध्ये गेली होती. दुसरी, तिसरी असं करत, प्रश्न-उत्तरं होत भगवान विनोदपर्यंत पोहोचले. विनोदच्या कपाळावर जसा बोटांनी त्यांनी स्पर्श केला, तोही ट्रान्समध्ये गेला असावा. आता भगवान माझ्याकडे पाहू लागले. त्यांच्या नजरेला नजर देणं म्हणजे बहुतेक ट्रान्समध्येच जाणं आलं. पण माझ्या निरीक्षणशक्तीला दुसरंच रूप आहे. मी त्यांच्याकडे एक मॉडेल म्हणूनच पाहू लागलो. जर त्यांचं पोट्र्रेट करायचं असेल तर कपाळ, दाढी, डोळे, नाक, त्यावर पडलेला प्रकाश पाहण्यात मी दंग होतो.

त्यामुळेच कदाचित मी त्यांना रिस्पॉँड झालो नसावा. माझ्याकडे हसून ते म्हणाले, ‘‘सुभास, तुझे आना पडेगा!’’ त्यांचा ‘ष’चा उच्चार ‘स’ असायचा. ‘‘आपको भी आना पडेगा!’’ मी म्हणालो. ‘‘कहाँ?’’ ‘‘मेरे स्टुडिओ में!’’ असं मी म्हटल्यावर ते हसून म्हणाले, ‘‘नॉट टुडे, बट समटाइम्स यू हॅव टू जम्प इन मरुन.’’ आता आश्रमातील या फ्रेजचा अर्थ संन्यास घेणं! मी शब्दश: अर्थ घेतला आणि एक व्हिज्युअल माझ्या डोळ्यासमोर आलं. ते हे की, एक प्रचंड मोठा स्वीमिंग पूल आहे. त्यातलं पाणी मरुन कलरचं आहे आणि उंचावरून मी त्यात उडी घेत आहे! मी स्पॉंटेनिअसली त्यांना म्हणालो,

‘‘बहोतही अच्छा सब्जेक्ट है। मैं पेंट करूंगा। प्रदर्शनी को आपको आना पडेगा।’’

ते ऐकून दाढीतच ते हसले. म्हणाले, ‘‘जरूर आऊंगा। निमंत्रण भेजना। लेकिन एक काम करना, संन्यास कभी नहीं लेना। बस सिर्फ पेंटिंग करते रहेना।’’

आता बोला! साक्षात् ओशोंनी मला सांगितलं, त्यामुळे मला संन्यास घेता आला नाही. विनोद आणि इतर संन्याशांची बोलती बंद झाली. ‘जंपिंग इन ऑरेंज’चं प्रदर्शन स्मिता आणि विनोदने जहांगीर आर्ट गॅलरीत भरवलं होतं. त्या चित्रांमध्ये मनमोकळ्या नाचणाऱ्या ऑरेंज कलर्सचा आविष्कार होता. आश्रमाकडून मला त्यांचं शुभेच्छापत्र तर आलंच, पण अनेक संन्यासी हे प्रदर्शन पाहून गेले. ते साल होतं १९७९.

ओशोंची शेकडो पुस्तकं आहेत. माझं आवडतं पुस्तक म्हणजे ‘सिग्नेचर ऑन द वॉटर!’ त्यात पुण्यात टिपलेले सुंदर फोटो आहेत. पुस्तकाची मांडणी, कॅलिग्राफी आणि ‘सूफी’वर केलेली काव्यात्मक टिपणं पाहता हे पुस्तक सतत जवळ असावं, हा जिव्हाळा अजूनही आहे. आजही आश्रमातलं मरुन चैतन्य माझ्यापाशी आहे. त्यातले मनमोकळं विश्व शोधणाऱ्या प्रवृत्तीचं मूळ आहे ते अनेक क्रिएटिव्ह माणसं इथे त्या शोधात एकत्र आली आणि संन्यासी झाली, यात. आणि ती परतही गेली. काही सैरभैर झाली. त्यांनी आपापल्या आयुष्यातल्या भूमिकांचा अर्थ शोधीत मनापासून कामात योगदान दिलं. भीती जन्मापासून आपल्या अंगाला, मनाला चिकटवली जाते. त्यावर पोसलेल्या मनाच्या कोंडवाड्यातून बाहेर पडण्याचे मार्ग जो-तो शोधतो. स्वत:ची समजूत घालायला प्रार्थना नको, मृत्यूची दहशत संपविण्यासाठी आनंदी उत्सवाचं गाणं म्हणायला हवं. चित्रकलेतला  उच्च स्थितीचा आनंद लुटायला जुनं शिकवलेलं पोकळ होमवर्क पार करायला हवं. फुलांच्या बहराने रस्त्यावर एखादी फांदी जशी वाकते तसेच आश्रमातले काही दिवस माझ्यापाशी आले. चंद्रमोहन जैन, आचार्य,  सेक्स गुरू, भगवान आणि ओशो अशा अनेक नावांत. ते खरे शिक्षकच होते. ते पाण्यावरच्या सहीसारखेच होते. ती दिसते आणि विरघळून जाते… जसं आपलं जीवन! पण जाताना या शिक्षकांनी मला सांगितलं- ‘‘एक काम करना, संन्यास कभी नहीं लेना। सिर्फ पेंटिंग करते रहेना।’’

Subhash.awchat@gmail.com