News Flash

लॉकडाऊन काळातल्या तुटक नोंदी

एरवी जो रस्ता ओलांडायला पाच-सात मिनिटं लागायची, तो आता त्याला काही सेकंदांत ओलांडता आला.

लेखकाने आपली नोंदवही पाहिली. त्यातल्या आत्महत्येच्या व्हायरसचं कथानक वाचलं आणि नि:श्वास टाकला. पेनने त्या कथानकावर सरळ काट मारून टाकली.

प्रणव सखदेव – sakhadeopranav@gmail.com

‘रस्ते लॉकडाऊन होतायत

शहरं लॉकडॉऊन होतायत

नेशन्स लॉकडॉऊन होतायत

जग लॉकडॉऊन होतंय

हा कुलुपावतार आहे

आणि त्याची चावी एका व्हायरसकडे आहे’

– श्रीधर तिळवे

लेखकाला किराणा सामान, औषधं असं काहीबाही हवं होतं म्हणून तो घराबाहेर पडला. एरवी जो रस्ता ओलांडायला पाच-सात मिनिटं लागायची, तो आता त्याला काही सेकंदांत ओलांडता आला. दोन-तीन माणसं ये-जा करत होती. बाकी शुकशुकाट. साठीच्या पुढचे एक आजोबा कानात हेडफोन घालून चालायला निघाले होते. समोरून एक माणूस येत असल्याचं त्याने पाहिलं. त्याची उंची साधारणत: लेखकाएवढीच होती. तोंडावर काळ्या रंगाचा मास्क घातला होता आणि हातात मोबाइल.

लेखकाला वाटलं की, आपणही मास्क घालायला हवा का? छे! डॉक्टरांनी सांगितलंय की, जे कोव्हिड-१९ पॉझिटिव्ह आहेत त्यांनी आणि डॉक्टर्स, नर्स इ. लोकांनीच मास्क घालावा.

हळूहळू समोरचा माणूस पुढे पुढे येत होता आणि लेखकही एकेक पाऊल त्याच्याकडे सरकत होता. लेखकाच्या मनात चलबिचल झाली. मनातला एक भाग भीतीने कंप पावायला लागला. जसजसे दोघं एकमेकांकडे यायला सुरुवात झाली, तसतशी कंपनं वाढतच गेली.

लेखकाला वाटलं की, कशाला बाहेर पडलाय हा माणूस? गरजच काय आहे लॉकडाऊनमध्ये बाहेर पडायची?

लेखकाने एकदा त्या माणसाच्या चेहऱ्याकडे पाहिलं. त्याचे डोळेच तेवढे दिसत होते. बाकीचा चेहरा झाकलेला. तोही लेखकाकडे पाहत होता. आणि काही क्षणांच्या नजरानजरीत लेखकाला वाटून गेलं की, तोही आपल्यासारखाच विचार करत नसेल ना? की कशाला बाहेर पडलाय हा माणूस? गरजच काय आहे? समजा, याला संसर्ग झाला असेल आणि आपण एकमेकांसमोरून जाताना काही घडलं तर? छॅ! हे काहीतरीच झालंय. मनातला हा सततचा संशय कसा धुऊन काढायचा?

लेखकानं स्वत:ला समजावलं की, नुसतं जवळून जाण्याने संसर्ग होत नसतो. अशक्यच आहे ते. प्लीज, वैज्ञानिक दृष्टिकोन ठेवून विचार कर. पण हा व्हायरस नवाय. शास्त्रज्ञही अजून संशोधन करताहेत. मग एवढं ठोस कसं सांगता येईल? आणि आपण मास्क लावला तर काय फरक पडणार आहे? मघाशी तो वाणीही म्हणाला की, मास्क लावा, नाहीतर सामान मिळणार नाही. हात हलवतच यावं लागलं आपल्याला. असंही नुकसान काय होणारे मास्क लावण्याने? प्लीज, विवेकाने विचार कर. मास्क धुऊन वापरणं, तो लावल्याने सतत हात नाका-तोंडाजवळ जाणं, पुन्हा त्याची विल्हेवाट वगैरेंमुळे धोकेच जास्त आहेत. शिट्! आता घराबाहेर पडताना परत घरी कधी परतू, या विचारानेच संसर्गून जायला होतंय. नकोच वाटतंय बाहेर आता. या व्हायरसने तर आपल्या मूलभूत स्वातंत्र्यावरच घाला घातलाय. असं वाटतंय की, जणू निसर्ग आपल्याला लंघन करायला लावतोय- त्याची आपण बिघडवलेली प्रकृती बरी करण्यासाठी.

तो माणूस आणि लेखक एकमेकांना ओलांडून जाताना त्यांच्यात पुरेसं अंतर होतं, पण तरी.. तरीही लेखकाच्या मनातल्या भीतीची कंपनं एवढी वाढली की त्याच्या छातीत धडधडू लागलं. कपाळ घामेजलं. आणि लेखक तसाच माघारी फिरला. पळतच घरी गेला. बायकोने दार उघडलं. तिला बाजूला करत तो बेसिनपाशी गेला आणि खसाखस हात धुवायला लागला. तेव्हा त्याला जाँ-पॉल सात्र्चं वाक्य आठवत राहिलं- Hell is other people.

रस्त्यात जे घडलं, ते नोंदवून ठेवायचं असा विचार करत असतानाच लेखकाला वाटलं की, त्या माणसालाही आपल्यासारखंच वाटलं असेल का? तोही पळून गेला असेल का? आणि असं वाटलं असेल तर इथून पुढे या कोव्हिड-१९ साथरोगानंतर हे जग कसं असेल? इथून पुढे कालगणनेची नवी पद्धत करायला हवी का? म्हणजे AC (एसी)- After Covid-19 आणि BC (बीसी) – Before Covid-19.

बीसी : जग अधिक खुलं होतं. लोक एकमेकांना भेटत होते. हात मिळवत होते. आपल्या गावात, घरात घेत होते. एकमेकाचं स्वागत करत होते.

एसी : सगळं जग ठप्प. देशांनी, राज्यांनी, प्रांतांनी, जिल्ह्यंनी, तालुक्यांनी, गावांनी, घरांनी आपापल्या सीमा बंद केलेल्या. कोणीही आत येऊ नये म्हणून मोठाल्या भिंती बांधलेल्या. प्रत्येकाच्या मनात भीती. प्रत्येकाच्या मनात संशय. आणि भिंतींच्या बाहेर काही फाटके लोक उभे. घरदार नसलेले. ते ओरडून ओरडून सांगताहेत : आम्हाला आत घ्या. आम्हाला भूक लागलीय. आम्ही उन्हात पोळतोय. आम्ही थंडीत गोठतोय. आम्ही पावसात गारठलोय. आम्हाला आत घ्या. परंतु कोणीही ऐकायला तयार नाहीये. सगळ्यांचे कान बंद आहेत. सगळे जण कुठल्या ना कुठल्या तरी स्क्रीनमध्ये बुडून गेलेले. शेवटी बाहेरचे लोक भिंतीवर डोकी आपटू लागले आहेत. पण भिंत तसूभरही हलत नाहीये.

आणि या भिंतींच्या आत काय चाललंय? सरकार आपल्या नागरिकांवर तंत्रज्ञानाच्या डोळ्यांनी लक्ष ठेवून- तो माणूस कुठे गेला होता? त्याने दिवसभरात काय केलं? तो कोणाला भेटला होता? त्याने काय खाल्लं? तिने कोणाला मिठी मारली? तिने कोणते कपडे घातले होते? इ.

आणि मग हळूहळू लोक असंही म्हणू लागले की, हा रोग अमुकतमुक धर्मीयांमुळे इथे येतोय.. त्यांना हाकलून द्या. ते लोक काहीतरी खातात आणि जगात रोग पसरतो. त्यांच्यावर बंदी घाला.. आणि समाजधुरीण म्हणू लागलेत की, आपल्या संस्कृतीत जे सोवळंओवळं होतं तेच योग्य आहे. आपल्या संस्कृतीत जे स्पर्श करण्या- न करण्याचे नियम होते, तेच फायद्याचे आहेत. चला, पुन्हा आपले जुने कायदे आणू या. तोच एकमेव मार्ग आहे यातून बाहेर पडण्याचा. यातच जगाचं भलं आहे. आणि लोक ‘हो, हो’ म्हणू लागलेत. त्यांचा आवाज कानठळ्या बसेपर्यंत वरवर जात आकाशाला भिडू लागलाय..

लेखकाला मार्गारेट अ‍ॅटवूडच्या ‘द हँडमेड्स टेल’मधलं गिलियॅड राज्य आठवलं आणि त्यातल्या ज्यून ऊर्फ ऑफफ्रेड ऊर्फ ऑफजोसेफचं वाक्य- A rat in a maze is free to go anywhere, as long as it stays inside the maze.

लेखकाने आपली नोंदवही पाहिली. त्यातल्या आत्महत्येच्या व्हायरसचं कथानक वाचलं आणि नि:श्वास टाकला. पेनने त्या कथानकावर सरळ काट मारून टाकली. चीनच्या हुबेई प्रांतातल्या वुहान शहरात ज्या वेळेस करोना व्हायरसच्या साथीला सुरुवात होऊ लागली होती, त्या वेळेस- थोडं मागेपुढे- लेखकाला हे कथानक सुचलं होतं.

झालं होतं असं की, त्यावेळी लेखक कोरडय़ा खोकल्याने ग्रस्त झाला होता. तेव्हा करोना व्हायरस वगैरे त्याला माहीतही नव्हता. त्याचं सगळं जगणं खोकल्याभोवतीच केंद्रित झालेलं होतं. काढे, गोळ्या किंवा आजीबाईंच्या बटव्यातल्या क्लृप्त्या असे कितीतरी उपचारबिपचार तो करत होता, पण तरी आराम काही पडत नव्हता. रात्री झोपायला पाठ टेकली रे टेकली की खोकल्याची उबळ येत असे आणि ढासांवर ढासा येऊन जीव हैराण होत असे. बरं, हा खोकला स्वत:पुरताच मर्यादित राहिला असता तरी चाललं असतं; पण या खोकल्याची लागण घरातल्या इतरांनाही झाली. शिवाय रात्री सगळ्यांची झोपमोड होई, ते वेगळंच.

खोकल्याने दोनेक महिने लेखकाची पाठ सोडली नाही. यांतले काही दिवस तर रोज रात्री २ ते ३ च्या सुमारास खोकला येईच. लेखकाच्या मेंदूलाही त्याची एवढी सवय झाली होती की रात्री २ वाजता आपोआपच त्याला जाग येत असे आणि तो चक्क जागा होऊन, घडय़ाळ्याची टिकटिक ऐकत खोकल्याची वाट पाहत बसे. एक दिवस रात्री काही केल्या खोकला थांबायचं नाव घेईना. बायकोची आणि मुलीची झोपमोड होऊ नये म्हणून लेखक दुसऱ्या खोलीत गेला. खोकून खोकून उलटीसारखं व्हायला लागलं आणि जठरासकट हृदय, फुप्फुस बाहेर पडेल असं वाटू लागलं. तोच त्याची मुलगी जागी होऊन रडू लागली. बायको तिला खांद्यावर घेऊन थोपटवत झोपवायचा प्रयत्न करू लागली आणि त्या क्षणी त्याला वाटलं की, स्वत:ला या पंख्याला लटकावून घ्यावं! बस्स झालं!

सकाळी रात्री आपल्या मनात आलेला विचार आठवून लेखकाला हसू फुटलं. लेखक-कवी असतातच अतिशयोक्त.. त्याला वाटलं. नंतर त्या वाटण्यात त्याला एक कथा दिसली. त्याने सुचलेलं कथानक वहीत नोंदवून ठेवलं..

एका शहरात लोकांचे मृत्यू व्हायला लागतात. जणू मरणाची साथच येते. या प्रकरणात काहीतरी गूढ आहे असं त्या शहरातल्या एका इन्स्पेक्टरला वाटतं. म्हणून तो त्या, त्या मृत व्यक्तींच्या निकटवर्तीयांशी बोलू लागतो, प्रकरणाची चौकशी करू लागतो. तेव्हा त्याला काही सामायिक धागे सापडतात. ते असे- मृतांपैकी प्रत्येकाला काही महिने खोकल्याचा प्रचंड त्रास होत होता आणि काही ना काही कारणाने या व्यक्ती एकमेकांच्या संपर्कात आल्या होत्या. शेवटी तो अशा निष्कर्षांप्रत येतो की, खोकल्याला कंटाळूनच या व्यक्तींनी आपला जीव दिलेला आहे; नव्हे खोकल्याने त्यांना भाग पाडलं आहे. कोणीतरी असा व्हायरस पसरवला आहे की, जो लोकांचा जीव घेत नाहीये, तर संसर्ग तीव्र करून जीव द्यायला भाग पाडतोय. यामागे कोण असेल याचा शोध इन्स्पेक्टर घेऊ लागतो. पण अखेरीस हा व्हायरस त्यालादेखील गाठतो. आपलं मरण जवळ आलंय हे जाणून इन्स्पेक्टर त्याने गोळा केलेली माहिती जगाला सांगायचा प्रयत्न करतो, पण सगळे जण त्याला वेडय़ात काढतात आणि व्हायरस पसरत जातो..

आता या कथानकात काही दम राहिलेला नाही असं लेखकाला वाटलं. आपण तेव्हाच ही कथा लिहून टाकायला हवी होती. आता ही कल्पना बहुधा हळूहळू वास्तवरूप घेईल आणि मग ही कथा हा वास्तवाचा रिपोर्ताज होऊन जाईल.

असं का होतं आजच्या काळातल्या लेखकाचं? आणि त्यातही तिसऱ्या जगातल्या लेखकांचं? आपण जी कल्पना करतो ती प्रत्यक्षात कागदावर येईपर्यंत तिचं वास्तवात रूपांतर झालेलं असतं. का? आपण जगाच्या खूप मागे आहोत? की आपली कल्पनाशक्तीच उणी आहे, जी खूप पुढचं पाहू शकत नाही? की आपली ज्या सामाजिक-आर्थिक परिसंस्थेत जडणघडण होते, त्यातच काहीतरी कमतरता आहे?

इटलीतल्या बातम्या वाचून लेखकाला कसंतरीच होतं. त्याला वाटतं की, हा व्हायरसही सरसकट लोकांना मारत नाहीये; पण रुग्णांची संख्याच एवढी करून ठेवतोय, की निवड करावी लागतेय- कोणाला जगण्याचा चान्स द्यायचा! हा व्हायरस साक्षात मृत्यू आहे. आणि मृत्यू हे अटळ वास्तव आहे. जगलेला प्रत्येक क्षण म्हणजे मृत्यूकडे टाकलेलं एक पाऊल. मुळात जगणं म्हणजे धोका पत्करणं. निसर्गात ‘सुरक्षित’ असं काहीही नसतं. तरी आपण मरणाला का घाबरतो? आपण त्याला खूप म्हणजे खूपच गृहीत धरतो म्हणून? की आपण निसर्ग आणि माणूस असं कृत्रिम द्वैत केलंय म्हणून?

लेखकाला वाटतं की, लोकांना आपण एक ना एक दिवस मरणार हे पक्कं माहीत असतंच. पण प्रत्येकाने आपण कसे मरू याची कधी ना कधीतरी कल्पना करून ठेवलेली असते. एवढंच नाही तर आपले जवळचे नातेवाईक कसे मरतील याबद्दलही आपण काहीएक कल्पना करून ठेवलेली असते. पण जेव्हा अचानक यातलं कोणीतरी मरण पावतं, तेव्हा आपल्या मनातल्या या कल्पनांना धक्का बसतो. एका अर्थी या कल्पना करणं हेही ‘सुरक्षित’ कोषात राहण्यासाठीची क्लृप्तीच असते. या कोषाला हादरा बसून तडा गेला की आपण गोंधळून जातो. डोळ्यांना न दिसणारा एक सूक्ष्मजीव काही दिवसांत एका चालत्या-फिरत्या माणसाला संपवून टाकू शकतो, हे आपल्याला मान्य करता येत नसावं. आपल्याला जाणीव होते की, या विश्वात माणूस कस्पटासमानही नाही एवढा क्षुद्र आहे. आपलं अस्तित्व क्षणभंगुर आहे. कुठेतरी आपल्या अहंला लागलेला हा मोठ्ठा धक्का असतो.

आणि असंही काल आपल्यात असलेला माणूस आज आपल्यात नाही, हे सत्य पचवणं अवघड असतंच. कारण माणसं म्हणजे काही डेटा भरलेले कॉम्प्युटर्स नसतात. तर माणसं म्हणजे आठवणींची कोठारं असतात. आठवणी आणि डेटा यांत फरक असतो. आठवणींना भावभावना लगडलेल्या असतात. आठवणींच्या आत असं काहीतरी असतं, जे फक्त आणि फक्त त्या माणसाचं आणि आपलं असतं. आणि या फक्त आपल्या आणि त्या माणसातल्या धाग्याने आपण जोडलेलो असतो. हे जाळं विणणं सतत सुरू असतं. आणि अचानक ते तुटतं..

***

लॉकडाऊन झाल्यावर आपापल्या गावी पायी निघालेल्या, हातावर पोट असणाऱ्या लोकांचे जथ्थे दाखवणारा व्हिडिओ कोणीतरी लेखकाला पाठवला. लाखो लोक जात होते. नंतर त्यातले काही अपघातात मेल्याच्या, काही अतिश्रमांनी मेल्याच्या बातम्या आल्या. आणि आता थोडय़ा दिवसांनी काही भुकेने मरणार आहेत अशी परिस्थिती. व्हिडिओज्मधला एक मजूर म्हणाला की, ‘‘साहब, हम बिमारी से नहीं, भूक से मरेंगे!’’ लेखकाला वाटलं की, आपल्याच मरणाविषयी हे लोक किती धीटपणे बोलताहेत! जणू थेट मृत्यूच्या डोळ्याला डोळा देताहेत. तसं आपल्याला जमेल? नक्की कोणत्या काळात राहतोय आपण? कोव्हिड-१९ ही आधुनिकोत्तर  काळातली सर्वात मोठी साथ आहे असं मानलं, तर आपल्या देशातली माणसं किती वेगवेगळ्या कालखंडात जगताहेत.. काही अजून मध्ययुगात आहेत, काही आधुनिक, काही आधुनिक-मध्ययुग यांच्या अधेमधे आणि अगदी थोडके लोक आजमध्ये. अगदी थोडके. पण तेही हळूहळू मनाने मध्ययुगात तर नाही ना जाणार? आपण सगळे या परिस्थितीला कसे सामोरे जाणार आहोत?

वर्क फ्रॉम होम.. छानच आहे की! पण देशात किती टक्के लोक वर्क फ्रॉम करू शकणारे असतील? तीन-चार टक्के? बहुधा त्यापेक्षाही कमीच. आणि यातले काही समाजमाध्यमांवर म्हणताहेत की, का जाताहेत हे लोक? घरी बसा ना! कोणाला सांगताहेत ते? ज्यांना घरच नाही त्यांना? डब्ल्यूएचओ वगैरे कोणाला सांगताहेत की, सारखे हात धुवा म्हणून? ज्यांच्याकडे पाणीच पुरेसं नाही त्यांना, किंवा ज्यांना काही हंडे पाण्यासाठी मैलोन् मैल चालत जावं लागतं त्यांना? या जथ्थ्यांना आपण आपल्यासोबत आणायचा प्रयत्न करणार आहोत की नाही? किंवा आपल्या खाली प्रचंड संख्येने फाटका समाज उभा आहे.. त्यांच्यामुळे आपली घरं, आपली ही सगळी व्यवस्था अव्याहत चालू आहे, याची जाणीव आपली पाठय़पुस्तकं कधी करून देणार आहेत? हा व्हायरस जसा शरीरांना मारत चाललाय, तसाच तो खुलेपणाला, मोकळेपणाला, पारदर्शकतेलाही नाही ना मारत जाणार? ‘मानवाचे अंती गोत्र एक’ या उक्तीचा मृत्यू होऊन यातून एक बंदिस्त जग नाही ना जन्म घेणार?

या व्हायरसने अख्ख्या जगाला नव्याने जन्माला घातलंय. पूर्वीचे आपण आणि आताचे आपण वेगळे आहोत. पूर्णत: वेगळे! बा. सी. मर्ढेकर यांच्या कवितेतल्या काही ओळी आठवताहेत-

‘आज पाहिलें मरण। गेला भांबावून प्राण

माझ्या ज्ञानाचे कुंपण। स्मशानांत।।’

वर्क फ्रॉम होम.. छानच आहे की! पण देशात किती टक्के लोक वर्क फ्रॉम करू शकणारे असतील? तीन-चार टक्के? बहुधा त्यापेक्षाही कमीच. आणि यातले काही समाजमाध्यमांवर म्हणताहेत की, का जाताहेत हे लोक? घरी बसा ना! कोणाला सांगताहेत ते? ज्यांना घरच नाही त्यांना? डब्ल्यूएचओ वगैरे कोणाला सांगताहेत की, सारखे हात धुवा म्हणून? ज्यांच्याकडे पाणीच पुरेसं नाही त्यांना, किंवा ज्यांना काही हंडे पाण्यासाठी मैलोन् मैल चालत जावं लागतं त्यांना? या जथ्थ्यांना आपण आपल्यासोबत आणायचा प्रयत्न करणार आहोत की नाही? किंवा आपल्या खाली प्रचंड संख्येने फाटका समाज उभा आहे.. त्यांच्यामुळे आपली घरं, आपली ही सगळी व्यवस्था अव्याहत चालू आहे, याची जाणीव आपली पाठय़पुस्तकं कधी करून देणार आहेत?

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 5, 2020 1:01 am

Web Title: some experience in lockdown time dd70
Next Stories
1 रात्रंदिन युद्ध… (चीन)
2 गाफील शासनाची अटळ परिणती (अमेरिका)
3 अवघड ‘ऑपरेशन करोना’ (दुबई)
Just Now!
X