25 November 2020

News Flash

ती येते.. आणिक जाते

‘‘आजपर्यंत इतक्या रेखीव मूर्ती पाहिल्या देवी सरस्वतीच्या; पण या छोटय़ाशा बोटांनी जे घडवलंय ते अद्भुत आहे..

| February 22, 2015 04:16 am

‘‘आजपर्यंत इतक्या रेखीव मूर्ती पाहिल्या देवी सरस्वतीच्या; पण या छोटय़ाशा बोटांनी जे घडवलंय ते अद्भुत आहे.. इतकी जिवंत मूर्ती मी माझ्या उभ्या आयुष्यात पाहिली नाही..’’ आंतरराष्ट्रीय कीर्तीचे मूर्तिकार, शिल्पकार सगळेच दाद देत होते. वयाच्या दहाव्या वर्षी ‘तो’ हे सारं कौतुक अनुभवत होता. बोललेलं सगळंच lok02त्याला कळत होतं असं नाही, पण अगदी बालपणापासून त्याच्या बोटांत अशी काही जादू होती, की तो मूर्ती बनवताना खुळावून जायचा. कौतुक, असामान्यत्व हे त्याला ठाऊक नव्हतं. पण त्याला एवढंच कळत होतं की, त्यानं हात लावला की जणू मूर्तीच त्याचे हात, त्याची बोटं स्वत:भोवती फिरवत स्वत:ला घडवून घ्यायची. अगदी वयाच्या पाचव्या वर्षांपासून मूर्ती बनवता बनवता एक दिवस त्यानं साक्षात् सरस्वती घडवली. तो दिवस वेगळा होता. आणि त्यानंतरची रात्रसुद्धा.
रात्री सगळे झोपल्यानंतर ‘तो’ एकटक त्या मूर्तीकडे पाहत होता. आपल्या हातून काहीतरी वेगळं घडल्याचं त्याला जाणवत होतं. आणि तेवढय़ात त्या दहा वर्षांच्या चिमुकल्याने डोळे विस्फारले. आणि त्याला स्पष्टपणे जाणवत होतं की, ती देवी सरस्वतीची मूर्ती त्याच्याकडे पाहत होती. प्रदर्शनात सगळे कौतुकानं म्हणत होतेच की, या मूर्तीचे डोळे खूप जिवंत आहेत. पण हे तेवढंच नव्हतं. आत्ता त्या मूर्तीचे डोळे जणू त्याच्याकडे पाहून हसत होते.. मिटून उघडत होते.. तो सरस्वतीचा लाडका पुत्र खुळावून गेला. इतक्यात त्याच्या कानांत कोणीतरी कुजबुजलं..
‘‘ती येते.. आणिक जाते
येतांना कधि कळ्या आणते
आणि जाताना फुले मागते..’’
त्याला खूप काही कळलं नाही; पण जाणवलं. प्रत्येक मूर्ती घडवताना त्याच्या डोक्यात हे सारं घुमायला लागलं. तो जीव तोडून शिल्पं, मूर्ती घडवीत होता. रोज रात्री झोपताना तो त्या मूर्तीकडे पाहत राहायचा आणि ती मूर्ती त्याच्याकडे पाहून समाधानानं हसत होती.
त्या रात्री कानात ऐकू आलेल्या ओळींचा अर्थ त्याला वयाबरोबर जाणवण्यापलीकडे कळू लागला होता. त्या देवी सरस्वतीच्या ओंजळीतून आपल्याकडे सुपूर्द होणाऱ्या कळ्यांची फुले करून देण्याची जबाबदारी तो ओळखू लागला. पंचविशीतच त्याचं नाव देशभरात गाजायला लागलं होतं. विविध प्रदर्शनांमधून त्याची कला संपूर्ण देशभरातल्या लोकांच्या नजरांपर्यंत आणि हृदयापर्यंत पोहोचली होती. त्याचा ध्यास मात्र कौतुक, प्रदर्शन, पुरस्कार या साऱ्यांपलीकडचा होता. त्याला ओढ होती ती कळ्यांची फुलं करून सरस्वतीच्या चरणाशी वाहण्याची.
अनेकजण भेटत होते.. वाहवा करत होते.. काही मोजके टीकासुद्धा करत होते.. या सगळ्यामध्ये एक दिवस एका ट्रस्टची माणसं आली ती मात्र काही वेगळं मनात घेऊन. जगभरामध्ये आनंद पसरवण्याचा वसा घेतल्याचा दावा सांगणाऱ्या एका महाराजांचे ते ट्रस्टी एक आंतरराष्ट्रीय प्रोजेक्ट घेऊन आले होते. ‘तो’ आधी बावचळला. मग जगभरात फिरून महाराजांच्या मूर्ती करण्याची मागणी ऐकून घाबरला. पण अखेर स्थिरावला तो चेकवरची रक्कम बघून! अट साधी होती- जगातील सर्व मोठय़ा शहरांत जाऊन तिथे महाराजांच्या मूर्ती बनवण्याच्या कार्यशाळा घ्यायच्या. भारतातला एवढा मोठा शिल्पकार व मूर्तिकार ट्रस्टशी जोडला जातोय याची बातमी होईल. लहानपणापासून देवांच्या मूर्ती, क्रांतिकारक देशभक्तांची शिल्पं करणाऱ्या त्याला अशा प्रकारे शिल्प घडवणं आणि शिकवणं दोन्ही अवघड नव्हतं; पण मग छोटय़ा छोटय़ा मुलांना शिकवण्याचा ध्यास आणि आजपर्यंत कला न विकण्याचा हट्ट..? फक्त स्वत:साठी आणि तत्त्वनिष्ठ लोकांसाठीच काम करण्याचा निग्रह..?
त्या रात्री देवी सरस्वतीच्या मूर्तीच्या साक्षीने ‘तो’ त्याच्या तत्त्वांना, मूल्यांना एका तळहातावर आणि ट्रस्टने दिलेला चेक दुसऱ्या तळहातावर घेऊन जागत बसला. स्वत:शी बोलला. भांडला. स्वत:च्या गळ्यात पडून रडलासुद्धा. दमून झोपला तेव्हा कानांत खूप खूप वर्षांनी पुन्हा कुजबुज..
‘येतानाची कसली रीत, गुणगुणते ती संध्यागीत
येताना कधि फिरून येत, जाण्यासाठीच दुरून येत’
खूप वर्षांनी पुन्हा तोच आवाज! तो गडबडला. त्याच्या आयुष्यातला प्रसिद्धीचा, वैभवाचा सूर्य असा काही तळपत होता, की ‘संध्यागीत’ ऐकू यावं अशी शांतताच मिळाली नाही त्याला.
एकीकडे आंतरराष्ट्रीय स्तरावरचा एक महाराजभक्त गुणी शिल्पकार म्हणून महाराजांचे प्रचंड भक्त, अनुयायी यांच्याकडून प्रशंसा, पैसा, पुरस्कार मिळवत असताना आपल्याला लहानपणी गवसलेलं काहीतरी निसटतंय, त्याचं निरोपाचं ‘संध्यागीत’ ऐकू येतंय, हे जाणवलंच नाही. आणि त्या रात्री तासन् तास पाहत बसला तो त्याने दहाव्या वर्षी घडवलेल्या सरस्वतीच्या मूर्तीकडे. पण.. पण ती हसली नाही. आणि मूर्तीला डोळे होतेच; पण नजर मात्र हरवली होती.
एका चतुर कारागिरासारखा तो पुढील अनेक वर्षे शिल्पं घडवत होता.. नाव मिळवत होता, आणि पैसाही. पण त्या कळ्यांची फुलं करण्याचा वसा मात्र आता त्याच्याकडे नव्हता. होता तो फक्त कारागिराचा व्यवसाय. खूप काही मिळवण्याचा आनंद साजरा करताना हातून नेमकं काय निसटलंय, हे ‘तो’ समजून होता. आणि त्याच्या कामातसुद्धा ते दिसत होतं.
‘‘जगभरात फिरून शिल्पकलेचा प्रसार करणारे महाराजभक्त शिल्पकार, मूर्तिकार श्री. ‘तो’ आज महाराष्ट्रातल्या एका छोटय़ा गावात आले, हे आपलं परमभाग्य..’’ ‘तो’ शांतपणे ऐकत होता. संयोजकांच्या विनंतीवरून गावातल्या एका तरुण शिल्पकाराच्या प्रदर्शनाचं उद्घाटन झालं. ‘तो’ दमलेल्या डोळ्यांनी प्रदर्शन पाहिल्यासारखं करत होता. गेली काही वर्षे नजर फक्त  सरकत जायची, स्थिरावायची नाही. पण.. या गावातल्या मुलाच्या प्रदर्शनात एक ‘सरस्वती’ दिसली त्याला.. तो चमकला. मनात समजलं त्याला.. कळ्या आता वेगळ्या हातांत सोपवल्या आहेत.. आणि हा मुलगा त्यांची फुलं करतोय प्रामाणिकपणे..
खूप उशिरा.. पण त्या जन्माच्या हद्दीत त्याला किमान आपल्या हातून काय निसटलं, हे जाणवलं.. तो सुप्रसिद्ध झाला. पण ‘ती’ पुन्हा हसली मात्र नाही. आता आता त्याला ‘नदी लंघुन जे गेले तयांची’ ‘हाक’ कानी येऊ लागली आहे. आणि त्याच्याकडे उरलंय ते फक्त कळ्यांचं निर्माल्य आणि पानांचा पाचोळा.
पण ते ‘नक्षत्राचं देणं’ देण्यासाठी त्याला पुन्हा पहिल्यापासून हा वसा घ्यावा लागेल. कारण ती-
येताना कळ्या आणते आणि
जाताना फुले मागते..

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 22, 2015 4:16 am

Web Title: statue of saraswati
Next Stories
1 प्रेशर कुकर अर्थात पेपिनचे पाचकपात्र
2 मनदैनिक!
3 ‘निर्मल ग्राम’ (?)
Just Now!
X