हेमंत प्रकाश राजोपाध्ये – rajopadhyehemant@gmail.com

गणेशोत्सवाच्या काळाविषयी मराठी मनाचा एक कोपरा संवेदनशील असतो. या संवेदनांना नेहमीच पावित्र्य, श्रद्धा यांचा आधार किंवा बैठक असते असे नाही. गणेश या दैवताविषयीच्या वेगवेगळ्या वयोमानानुरूप धारणा, आस्तिक्य-नास्तिक्य, राजकीय किंवा सांस्कृतिक भान अशा अनेक गोष्टी या संवेदनांच्या केंद्रस्थानी असतात. अभिजन, नवनागरी संवेदनांमधील धारणांमधल्या गणेशस्मृतींमध्ये सार्वजनिक गणेशोत्सवाविषयीच्या चर्चा वेगवेगळ्या व्यासपीठांवर दरवर्षी झडतात. त्यातून दरवर्षी त्याच त्याच मुद्दय़ांवर वेगवेगळ्या रीतीने विचार होतो. त्यातला सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे गणेश मंडळांच्या पूजापद्धती, आरतीच्या वेळचा गोंगाट, मंडप व त्याभोवतीचे वातावरण आणि देवाला उद्देशून केले जाणारे उपचार! खेडय़ांमध्ये किंवा शहरांमधल्या वेगवेगळ्या वस्त्यांमध्ये उभे केले जाणारे हे मंडप, त्याभोवतीचा अस्वच्छ परिसर, ध्वनिवर्धकांवरील हिडीस गाणी, आक्षेपार्ह अंगविक्षेप इथपासून अनेक वास्तवे या कुतूहलाच्या कक्षेत येतात. देवाचे येणे, त्याचे अस्तित्व आणि त्याचे विविध उपचारांद्वारे केलेले अर्चन या साऱ्याच गोष्टी भक्तांच्या भावविश्वात मंगल, पवित्र अशा भावनांना अभिव्यक्त  करतात. मांगल्य, शुद्धता, पावित्र्य इत्यादीविषयी नागर, अभिजन संस्कृतीत घडलेली मने या सार्वजनिक मंडळांच्या मंडपांचा भवताल, स्वच्छता इत्यादी गोष्टींसंदर्भात अस्वस्थ होताना दिसतात. तीर्थक्षेत्रांच्या संदर्भातील अस्वच्छतेच्या बाबतीतही अभिजन नागरी मनांना जाणवणारी अस्वस्थता अशाच धाटणीची असते. याच्या नेमक्या उलट रीतीच्या धारणा माझ्या संशोधनासंदर्भात भ्रमण करताना उत्तर भारतातील महत्त्वाच्या तीर्थक्षेत्री असलेल्या भाविकवर्गात मला दिसून आल्या. संबंधित क्षेत्री असलेल्या तीर्थजलाविषयी व मंदिरांविषयीची अस्वच्छता हा विषय न राहवून छेडल्यावर तिथल्या एका सुप्रतिष्ठ आचार्यानी ‘कहां है गंदगी? इस क्षेत्र में जो भी अस्तित्व है, वह मंगलता से युक्त है।’ असे मला उत्तर दिले होते. आचार्यानी दिलेले उत्तर एरवी नागरी संवेदनांना वास्तवाहून विसंगत, खोटे वाटले तरी त्या उत्तराने मी अतिशय खूश झालो आणि त्या परिसराकडे, वातावरणाकडे आणि तिथल्या धर्मव्यवस्थेकडे पाहायची माझी दृष्टी त्या दोन वाक्यांनी बदलून गेली. तात्पर्य इतकेच, की धर्माचरणाच्या वेगवेगळ्या पद्धतींसारख्याच त्याविषयीच्या पावित्र्यव्यूहांविषयीच्या धारणादेखील कमालीच्या रोचक व विसंगत अशा गुंतागुंतींनी भारून गेलेल्या आहेत.

मुळातच पवित्रता (sacredness) हा सर्वच श्रद्धापर व्यवस्थांच्या, धर्माच्या केंद्रस्थानी असलेला एक घटक. या धारणेविषयी असलेल्या कल्पना संबंधित सांस्कृतिक आणि पर्यायाने राजकीय, सामाजिक नैतिकतेला नियमित करणारे व त्यांना धर्मनियमांना बांधून ठेवणारे मापदंड निर्माण करीत असतात. जवळपास सर्वच धर्मातील समजुतींनुसार हे मापदंड व निकष मनुष्याला पारलौकिक तत्त्वाशी जोडण्याचे काम करत असतात. भारतीय धर्माच्या, विशेषत: हिंदू व काही जैन धारणांनुसार पावित्र्याच्या, शुद्धतेच्या या मापदंडाच्या पालनातूनच वेगवेगळ्या ईश्वर, देवता किंवा पारलौकिक तत्त्व आणि मानव यांच्यात अनुबंध निर्माण होत असतात. खरे तर पाश्चात्त्य श्रद्धापर धारणांनुसार ईश्वराचे ईश्वरत्व सर्वत्र असले तरीही मानवी अस्तित्वाहून स्वतंत्र असण्यामध्ये त्याच्या ईश्वरत्वाची व्याख्या सामावली आहे. त्याला जाणणे, त्याच्याशी एकरूप होणे या धारणांना पाश्चात्त्य, विशेषत: अब्राहमिक धर्मामध्ये स्थान नाही. याउलट, रूढ हिंदू धारणांमध्ये ईश्वराचे अस्तित्व हेच मुळात सर्व भूतमात्रांच्या ठायी वसलेले असून, हे अस्तित्व मानव आपल्या अनुभूतिजन्य संवेदनांतून सहज अनुभवू शकतो आणि त्याच्याशी एकरूप होऊ शकतो. अर्थात संबंधित अनुभूती आणि एकरूपता साधण्यासाठी विशिष्ट धाटणीच्या पावित्र्याचा आणि पावित्र्याच्या अधिष्ठानावर घडवलेल्या स्वत:तील पावित्र्य, शुद्धता यांनादेखील संबंधित व्यवस्थेत महत्त्वाचे स्थान आहे. त्यादृष्टीने अभिजन लोकरीतीतील हिंदू धर्मव्यूहामध्ये शारीरिक शुद्धी, मानसिक शुद्धी आणि भावशुद्धी यांना असलेले महत्त्व लक्षणीय आहे. या भावशुद्धीतूनच ईश्वरत्वाशी समीपता आणि सरूपता साधणे सहज शक्य होते अशी धारणा या व्यूहातून अभिव्यक्त होत असते.

Sacred तत्त्व जवळपास सर्वच धर्मव्यवस्थांतील व्यवहारात महत्त्वाचे असले तरी वर नमूद केलेल्या, त्यासारख्या वैशिष्टय़ांमुळे व अन्य गुंतागुंतींमुळे या sacred या शब्दाला अगदी नेमका असा एक पर्यायवाची शब्द नाही. sacred या शब्दाचा उगम लॅटिनमधील sacer म्हणजे पवित्र, sacrare म्हणजे समर्पित करणे किंवा sancire म्हणजे शुद्ध करणे, मांगल्य प्रदान करणे या धातूंमध्ये शोधता येतो. अब्राहमिक संप्रदायांमध्ये हा शब्द देवासाठी खास आरक्षित असलेल्या वस्तू किंवा तत्त्वांसाठीच राखून ठेवला गेल्याचे दिसून येते. मिर्शिआ एलियाद या विख्यात अभ्यासकांनी सांगून ठेवल्यानुसार, ‘सॅक्रेड’ शब्दाचा अर्थ जे जे profane अर्थात ईश्वरत्वाशी किंवा श्रद्धाविश्वाशी विसंगत आहे ते. आपल्या मानवी विश्वातील सत्यांच्या पल्याडच्या जगातील अगदी वेगळी अशी तत्त्वे ‘सॅक्रेड’ या चौकटीत बसवता येतील. मात्र, वेगवेगळ्या लोकधर्मीय रीतींतून उदय होऊन प्रमाणिकृत होणाऱ्या भारतीय समाजातल्या पावित्र्यविषयक धारणांची व्याप्ती एलियाद यांच्या वरील व्याख्यांहून अधिक व्यापक असल्याचे दिसून येते. ज्येष्ठ अभ्यासक रामदास लांब यांनी दाखवून दिल्यानुसार, ‘सॅक्रेड’ या शब्दाला पर्यायवाची म्हणून ‘पवित्र, दिव्य, ब्रह्मण्य (ब्रह्म म्हणजे मंत्र किंवा निर्गुण ब्रह्म), पुण्य, पूज्य, मंगल’ असे वेगवेगळे शब्द वेगवेगळ्या संदर्भात भारतीय भाषांतून वापरता येतात. हे शब्द वापरताना किंवा त्यांच्या वापराची चिकित्सा करताना त्यांच्या उपयोजनाचे वेगवेगळे संदर्भ पाहणे गरजेचे ठरते. अनेकदा काही विधींसाठी लागणारी द्रव्ये किंवा अन्नसामग्री मूळची पवित्र असली तरी ती वेगवेगळ्या कारणांनी तात्पुरत्या अशुद्धतेने ग्रासली जाते. तेव्हा तुलसीदल किंवा अभिमंत्रित केलेले पाणी इत्यादींद्वारे ती शुद्ध होऊ शकते अशी धारणा दिसते. विदेशगमन करून किंवा अशौच, सुतक, ग्रहण वगैरे अमंगळ समजल्या जाणाऱ्या काळातून बाहेर आल्यावर गोमूत्र किंवा तत्सम द्रव्ये घेऊन विधिवत शुद्ध होता येते अशी धारणा आजही समाजात रूढ दिसते. वस्तूंच्या शुद्धीकरणासारखेच मनुष्याचे शुद्धीकरण करण्याचे विशिष्ट विधीदेखील अनेकदा शुद्धीकरणाविषयीच्या मानसिक धारणांपुरतेच मर्यादित राहिल्याचे दिसतात. केवळ अशी द्रव्ये किंवा मनुष्य नव्हे, तर राहती वास्तू, तिचा भवताल शुद्ध करण्याकरता, ते दुष्ट शक्तींपासून दूर ठेवणारे शांतिविधी हेदेखील या धारणांतूनच जन्म घेतात. एकीकडे श्रद्धाचारांना कर्मकांडप्रवण शुद्धतेच्या चौकटीत बसवणाऱ्या श्रद्धाव्यूहाचे दुसरे अंग असलेल्या तंत्रविधींमध्ये तोंडात उष्टे अन्न ठेवून देवतांची काम्य उपासना करण्याचे विधी दिसतात. काही अघोरी संप्रदायांमध्ये प्रेतासनावर बसून केलेली साधना, कॅनिबलिजम अर्थात नरमांसभक्षण यांसारख्या प्रथादेखील अगदी अलीकडेपर्यंत रूढ होत्या. त्यांना पवित्रतेच्या व्यूहात बसवण्यास आधुनिक व्यवस्थेत शिक्षित झालेले नागरी मन धजावणार नाही. पवित्रतेच्या या धारणांचे दुसरे अंग म्हणजे काही विशिष्ट वृक्षांना, प्राण्यांना, प्रतीकांना पवित्र समजायची पद्धत धर्मश्रद्धांतून दिसून येते. त्यातून भूप्रदेश, विशिष्ट सामाजिक व्यवस्था, पशू, पक्षी यांना धर्माच्या किंवा आधुनिक काळात राष्ट्रचिन्हांच्या रूपात प्रतिष्ठा बहाल केली जाते. तीर्थस्थाने आणि महत्त्वाची मंदिरे असलेली शहरे पवित्र लेखण्याची प्रथा आपण जाणतोच.

पवित्रतेच्या या अशा साऱ्या प्रतीकांच्या अंगीकारातून, स्पर्शातून किंवा त्यांच्याशी असलेल्या समीपतेतून पारलौकिक तत्त्वांच्या जवळ जाण्याच्या प्रक्रियेला अनुकूलता आणण्यासाठी योग्य मनोभूमिका बनवण्याचे कर्मकांडनिबद्ध हेतू असल्याचे दिसून येते. त्यातून आत्मिक विकास होऊन स्वत:ची मुक्ती किंवा तात्कालिक इच्छित फळाची प्राप्ती व्हावी असा हेतू या पवित्रताव्यूहाच्या मुळाशी असतो. यातील काम्य विधींतून प्राचीन काळात पराक्रमी संतती किंवा स्वर्ग या मुख्य फळांची इच्छा केली जाई. आत्मिक विकास ही सर्वस्वी आत्मकेंद्री, स्वत:च्या उद्धारासाठीची बाब. त्याच्या पूर्तीसाठी योजिलेली प्रतीके हीदेखील तेवढय़ा वैयक्तिक मर्यादेसाठी असणे अभिप्रेत असायला हवे. पण मानव समाजशील प्राणी असल्याने या साऱ्या धारणा आणि प्रतीके सार्वत्रिक होऊन त्या सामूहिक अस्मितेचे व पर्यायाने राजकारणाचे प्रतिनिधित्व करू लागल्या. सर्वच धर्म व त्यांतील अध्यात्म किंवा भक्ती यांचे राजकीयीकरण होण्याच्या प्रक्रियांचे वेगवेगळे आयाम आपण आपल्या लेखमालेतून चर्चेला घेतले आहेत. त्यामुळे त्याविषयी अधिक चर्चा इथे करत नाही. मात्र, धर्मश्रद्धांच्या एकसाचीकरण होण्याच्या प्रक्रियेत त्या अनेकदा आक्रमकरीत्या, प्रसंगी हिंसक अभिव्यक्तीतून जपण्याची रीती रूढ झाल्याचे अनेकदा दिसून येते. या शुचितेविषयीच्या धारणा सोवळ्याच्या संदर्भात विशिष्ट पौरोहित्यप्रधान व्यवस्थांशी तादात्म्य पावून जातीय गंडांचे रूप घेऊन अभिव्यक्त होताना दिसतात. त्याचा विचार आपल्याला जातकारणाच्या इतिहासाची चर्चा करताना स्वतंत्रपणे करायचा आहेच.

मात्र, पवित्रतेच्या अनेक कल्पना आणि त्यांच्याशी निगडित काही नियम यांना आधुनिकतेच्या संदर्भात जोखताना निर्माण होणारे काही ऐतिहासिक प्रश्न वेगळ्याच राजनैतिक वळणांना जन्म देताना दिसून येतात. उदाहरणार्थ, प्लेगच्या साथीत जैवऔषधे असणारी लस टोचण्यासाठी धर्मशील मंडळींनी केलेला विरोध, त्याला मिळालेली धर्मवादी, राष्ट्रवादी वळणे असोत, किंवा गाईच्या आणि डुकराच्या आतडय़ाच्या वेष्टनाने युक्त असलेल्या काडतुसांच्या वापरावरून झालेला १८५७ चा उठाव व त्याला मिळालेले राष्ट्रवादी स्वरूप असो, मांगल्य, पवित्रतेचे प्रतीक मानल्या गेलेल्या चंद्रभागा नदीत शेकडो भाविकांच्या स्नानादी विधींमुळे दूषित झालेल्या पाण्यामुळे पसरलेली कॉलराची साथ असो, त्यातून अनिवार्य केलेले लसटोचणीचे नियम असोत.. या साऱ्यांतून पवित्रताविषयक मूल्यांचा सर्वागीण अभ्यास करताना मानवी इतिहासाचे वेगवेगळे कप्पे आपसूकच उघडले जातात. किंबहुना, हे कप्पे उघडले गेले नाहीत तर पवित्रताव्यूहाचा इतिहास लिहिलाच जाऊ शकत नाही. समाज ज्याप्रमाणे सतत उत्क्रांत होत असतो त्याच रीतीने हे पवित्रताव्यूहदेखील नेहमीच उत्क्रांत होत असतात. अनेकदा या प्रक्रियेत पुनरुज्जीवनवादी घटक  डोके वर काढताना दिसतात, तर कधी टोकाची आधुनिकता अधिक प्रबळ होताना दिसते. मानवी समूहांचा इतिहास हा या अशा renegotiation च्या प्रक्रियांना सामोरे जात आपली गती ठरवत विकसित होत जातो. पवित्रतेच्या धारणा व तद्नुषंगिक आयामदेखील त्याच रीतीने समाजात टिकून राहण्याची, वेगवेगळ्या माध्यमांतून, रूपांतून पुनरुज्जीवित होण्याची धडपड करत असतो. त्यामुळेच अभ्यासकाच्या भूमिकेतून त्यांकडे बघताना सतत जागरूक राहणे गरजेचे ठरते.

(लेखक ‘ऑब्झव्‍‌र्हर रीसर्च फाउंडेशन’ या संस्थेत वरिष्ठ संशोधक म्हणून कार्यरत आहेत.)