काळाच्या ओघात जे पारंपरिक व्यवसाय नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत त्यापैकी कुंभारकाम हा एक व्यवसाय. आधुनिकीकरणाच्या प्रक्रियेत अनेक ग्रामीण उद्योग भरडले गेले. कधी कधी परंपरेला चिकटून राहण्यात आणि भविष्याचा वेध घेण्यात माणूस कमी पडतो. तो त्याचा दोष नसतो. कारण त्याच्याभोवतीच्या जगाला बाहेरच्या जगातील बदलाचा वेग माहीतही नसतो. ते वारे त्याच्यापर्यंत पोहोचलेले नसतात. जिथे आपला व्यवसाय वाढवावा असे वाटण्याजोगी परिस्थिती नसते, तिथे त्यात लोकांच्या आवडीनिवडीनुसार बदल करावा, ही कल्पना मनाला शिवतही नाही. शहर व खेडी यांच्यातील अंतर कमी होऊ लागल्यापासून मात्र हे चित्र बदलले आहे. शहरात दाखल झालेल्या सुधारणा त्याच वेगाने खेडय़ापर्यंत पोहोचतात. फक्त त्यांना आपलेसे करण्याची मानसिकता हवी. या सुधारणा सोबत आव्हानेही घेऊन येत असतात. ती स्वीकारण्याची हिंमत दाखवली की खेडे किंवा शहर अशा भौतिक सीमांची बंधने व्यवसायाला राहत नाहीत. इंदापूरच्या राजेश कुलकर्णीने हे जाणले. आपल्या व्यवसायाला बदलत्या वाऱ्यानुसार नवा आकार देण्याचे स्वप्न पाहिले आणि त्यात आकर्षक रंगही भरले. ग्रामीण भागात राहून आगळावेगळा व्यवसाय करणारा राजेश कुलकर्णी हा जगाच्या पाठीवर आज आपली स्वतंत्र ओळख ठसवू पाहतोय.

कुंभारकाम हा तसा पारंपरिक व्यवसाय. कुंभाराची भांडी  म्हटल्यावर पाण्याचे माठ, मडकी, पणत्या आणि झाडं लावायच्या कुंडय़ा एवढंच नजरेसमोर येतं. पण एखादा कलावंत अवलिया याच मातीतून अनेक अप्रतिम घाट आणि त्यात लय निर्माण करतो. अशा वस्तूंना सजवण्यासाठी त्यात काही शोभिवंत ठेवायची गरजच नसते. कारण ती वस्तू म्हणजेच एक देखणी, स्वतंत्र कलाकृती असते. कुंभारकामाची परंपरा पाठीशी नसतानाही एका ध्यासातून राजेश कुलकर्णीने स्वीकारलेल्या या व्रताची फळे आता दिसू लागली आहेत. मुंबई-गोवा महामार्गावरील रायगड जिल्ह्य़ातील इंदापूर हे गाव सध्या होतकरू शिल्पकारांसाठी अभ्यास केंद्र बनले आहे. राज्याच्याच नव्हे, तर देशभरातील कला महाविद्यालयांतील तरुण शिल्पकार या ठिकाणी प्रशिक्षणासाठी येत असतात. अभिजात मातीकलेला आधुनिकतेची जोड दिल्यास त्यातून पारंपरिक कुंभारकलेस नवीन आयाम कसा देता येतो, हे इथे शिकवले जाते.

हॉटेल व्यावसायिक कुटुंबात जन्मलेल्या राजेशने पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण झाल्यावर ठाणे स्कूल ऑफ आर्टमधून एक वर्षांचा फाऊंडेशन कोर्स केला. तिथल्या शिक्षकांचा त्याच्यावर चांगलाच प्रभाव पडला. याच वेळी घरच्या हॉटेल व्यवसायाची जबाबदारी येऊन पडल्याने त्याला परत गावाकडे यावे लागले. पण या व्यवसायात आनंद व समाधान मिळत नसल्याची खंत त्याला होती. यातून बाहेर पडावे हे ठरवतानाच पॉटरी व्यवसायात आपले करिअर करण्याचा निर्णय त्याने घेतला. पण पॉटरीचे औपचारिक शिक्षण त्याने घेतले नव्हते. मग एकलव्याप्रमाणे पुस्तके वाचून, पॉटरी गॅलरीज्ला भेट देऊन, काही कलाकारांची प्रात्यक्षिके बघून त्याने या कलेची साधना सुरू केली आणि अथक परिश्रमांची जोड देत ती आत्मसात केली.  पारंपरिक कुंभारकामाला कलात्मकतेची जोड दिली तर त्यातून व्यवसायाच्या अनेक संधी उपलब्ध होऊ  शकतात, हे एव्हाना त्याच्या लक्षात आले होते. घराशेजारील जागेतच त्याने छोटीशी कार्यशाळा तयार केली. विटा रचून छोटी भट्टी तयार केली. वेगवेगळ्या प्रकारची माती वापरून त्याने त्यावर असंख्य प्रयोग करण्यास सुरुवात केली.

सुरुवातीला अनेक प्रयोग फसले. अनेक अडचणी आल्या. मातीकामासाठी लागणारा कच्चा माल सहज उपलब्ध होत नव्हता. पण त्याने जिद्द सोडली नाही. मातीचे प्रकार, त्याचे गुणधर्म याचा अभ्यास त्याने सुरू केला. मातीच्या वस्तू भाजण्याचे तंत्रज्ञान आत्मसात केले. कुंभारकलेला ‘युटिलिटी’चे माध्यम न ठेवता ‘अभिव्यक्ती’चे माध्यम म्हणून कसा वापर करता येईल याचा अभ्यास सुरू केला. यातूनच त्याने आपली स्वत:ची स्वतंत्र अशी ‘कुंभारकला’ विकसित केली.

मानवाने निर्माण केलेली पहिली वस्तू म्हणून टेराकोटा ओळखली जाते. मात्र, जागतिकीकरणाच्या रेटय़ात मातीच्या वस्तू कालबा होत चालल्या आहेत. मातीकला अर्थात कुंभारकाम नामशेष होण्याच्या मार्गावर आहे. अशा काळात मातीकलेला व्यवसाय म्हणून निवडणे ही सोपी गोष्ट नव्हती. सुरुवातीला पारंपरिक मातीच्या भांडय़ांना कलात्मक जोड देऊन त्याने काही वस्तू तयार केल्या. स्टेनलेस स्टील, प्लास्टिक आणि काचेच्या भांडय़ांच्या जमान्यात या भांडय़ांचा टिकाव लागणे कठीण असल्याचे त्याच्या लक्षात आले. त्यानंतर वापरायोग्य भांडी बनवण्याऐवजी शोभेची भांडी बनवण्याचे त्याने ठरवले. लोकांना हा प्रयोग प्रचंड भावला. आणि त्यानंतर मात्र राजेशने मागे वळून पाहिलेच नाही. लोकांची आवड आणि गरज जाणून मातीकामातून त्याने अनेकविध वस्तू, मूर्ती, भांडी, कलात्मक चित्रे निर्माण केल्या. उत्तम दर्जाच्या उत्पादनांना प्रसिद्धीची गरज नसते. त्यांच्या शोधात लोक स्वत:हून येतात, हे त्याच्या लक्षात आले.

मातीकामासाठी कोकणातील माती उपयुक्त नाही हे राजेशच्या लक्षात आले. त्यामुळे गुजरात, राजस्थान आणि मध्य प्रदेशमधून माती आणून त्याने काम सुरू केले. दोन प्रकारची माती एकत्र करून वेगवेगळ्या कलात्मक वस्तू बनवण्यास त्याने सुरुवात केली. कोकणातील खाडय़ांमधील माती अत्यंत चिकट असते. त्यामुळे खाडीतील मातीचा वापर करून काही नवीन प्रयोग करून पाहिले. ते यशस्वी होताहेत हे लक्षात येताच, आपली कला आपल्यापुरती मर्यादित न ठेवता ती इतरांनाही कशी देता येईल याचा विचार सुरू झाला. गावातील सुशिक्षित बेरोजगारांना एकत्र करून मातीकामाचे प्रशिक्षण देण्यास त्याने सुरुवात केली. यातूनच ‘आकार पॉटरी आर्ट’चा जन्म झाला.  हळूहळू ‘आकार’ची व्याप्ती वाढत गेली. मुंबई, पुणे, बंगलोर, इंदौर, हैद्राबाद येथून ‘आकार’मध्ये तयार झालेल्या वस्तूंना मोठी मागणी येऊ  लागली. सुरुवातीला काही ठिकाणी प्रदर्शन भरवण्यावर त्यांनी भर दिला. मात्र, दर्जा व गुणवत्ता लक्षात आली की लोक स्वत:हूनच आपल्याकडे येतात हे त्याच्या लक्षात आले. मग प्रदर्शन भरवणे बंद झाले. तोवर इंदापूर येथे स्वत:च्या जागेत ‘आकार’चे कलादालन उभे राहिले होते. कोकणातील पर्यटकांसाठी कला-पर्यटनाचे केंद्रही त्यातून निर्माण झाले. इंटेरिअर डिझायनर आणि नामांकित वास्तुरचनाकारांकडून ‘आकार’च्या विविध उत्पादनांना मागणी येऊ  लागली.

पॉटरी व्यवसायात आज ‘आकार’ आणि राजेश कुलकर्णी यांची स्वतंत्र ओळख निर्माण झाली आहे. देशाच्या कानाकोपऱ्यातून कला महाविद्यालयांतील विद्यार्थी, होतकरू शिल्पकार, इंटेरिअर डेकोरेटर ‘आकार’च्या शोधात इंदापूरला येतात. त्यांना अपेक्षित असणारी सर्व मदत ‘आकार’च्या माध्यमातून केली जाते. मातीकामाचे प्रशिक्षण दिले जाते. ग्रामीण आणि शहरी भागातील कलेची देवाणघेवाण या माध्यमातून होते. यातून मुलांमध्ये आत्मविश्वास निर्माण होतो.

पॉटरी मेकिंग हा एक निर्मितीचा आनंद देणारा व्यवसाय आहे. माती, पाणी, हवा, उजेड आणि अग्नी या पंचतत्त्वांची अनुभूती या व्यवसायातून येते. यासाठी जिद्द, चिकाटी, संयम आणि कलात्मक दृष्टिकोन आवश्यक असतो. काळाबरोबर जो आपल्या व्यवसायात बदल करणार नाही तो यशस्वी होऊ  शकत नाही, असे राजेश सांगतो. त्याची ही कला आज त्याच्या गावाची ओळख बनली आहे. गावातील अनेकांना त्यातून रोजगाराची संधी मिळाली आहे. मातीला आकार देता देता त्यांच्या आयुष्यालाही आकार प्राप्त झाला आहे. राजेशकडे पॉटरीचे शिक्षण घेतलेल्यांनी आज स्वत:चे पॉटरी व्यवसाय सुरू केले आहेत. माणगाव तालुक्यातील हे छोटेसे गाव मातीकलेचे माहेरघर म्हणून नावारूपास येत आहे. यात राजेश कुलकर्णी हा दीपस्तंभ म्हणून काम करतो आहे.

एकीकडे मातीला कलात्मक रूप देत असतानाच राजेश इंदापूर परिसरातील तरुणांमध्ये व्यक्तिमत्त्व विकास तसेच त्यांच्यात कलाभिरुची निर्माण करण्याचे व सामाजिक भान रुजविण्याचे कामही तितक्याच निष्ठेने करतो आहे. संगीत मैफली, काव्यवाचन, डोळस भटकंती, सामाजिक जाणिवा प्रगल्भ करणारे चित्रपट, शिल्पकला, वाद्यवादन आदी कार्यक्रमांचे आयोजन, त्याचबरोबर देशात कुठेही पूर, त्सुनामी, दुष्काळादी आपत्ती आल्यास त्या- त्या ठिकाणी साहाय्यासाठी धावून जाण्याचे संस्कारही जाणतेपणाने इथल्या तरुणाईवर राजेश करत आहे. सानेगुरुजी राष्ट्रीय स्मारक, युसुफ मेहेरअली सेंटर, सामाजिक कार्यकर्त्यां उल्का महाजन यांच्या सहकार्यानेही अनेक सामाजिक उपक्रमही तो राबवत असतो. केवळ पोटार्थी जगणे हे खरे जगणे नव्हे, तर जीवनजाणिवा प्रगल्भ होणे, त्याद्वारे सामाजिक बांधिलकी जपणे हे त्याच्या दृष्टीने अधिक महत्त्वाचे काम आहे. स्वत:बरोबरच ही जाणीव इतरांतही रुजावी, बहरावी आणि त्यातून एक सुदृढ, निकोप समाज निर्माण व्हावा, हे त्याचे स्वप्न आहे. त्यासाठी प्रत्यक्ष आचरण आणि कृतीतून तो समाजबदलाचे हे चित्र प्रत्यक्षात येण्यासाठी धडपडतो आहे. आणि तेच त्याचे खरे ‘मिशन’ आहे.

dinesh.gune@expressindia.com