‘समाजस्वास्थ्य’ नाटकाचं लेखन आणि ‘नाटकघर’ या संस्थेनं केलेला त्याचा प्रयोग हा माझ्यासाठी एक समृद्ध करणारा अनुभव होता. नाटक लिहिण्याच्या निमित्ताने र. धों. कर्वेचं पुन्हा वाचन करणं, समकालीन वास्तवाचंच मला त्यात प्रतिबिंब पडल्यासारखं दिसणं, अतुल पेठेने नव्या कलावंतांना घेऊन ते लोकांपर्यंत घेऊन जाणं आणि मान्यवरांनी विषयाचं महत्त्व ओळखून अतिशय सकारात्मक प्रतिक्रिया देणं याने मला लेखक म्हणून खूप समाधान दिलं.

र. धों. कर्वे यांच्या जीवनाचा आणि कार्याचा परिचय होताच. त्यांच्या जीवनावरच्या अमोल पालेकर दिग्दर्शित ‘ध्यासपर्व’साठी चित्रा पालेकरांबरोबर पटकथा लेखनातही सहभागी होतो. त्यामुळे रघुनाथ कव्र्यावरचं तोपर्यंत उपलब्ध असलेलं साहित्य पाहिलेलं होतं. पण पालेकरांचा चित्रपट अतिशय सुंदर झाला असला तरी प्रत्येक कलाकृतीला एक मध्यवर्ती सूत्र लागतंच- तसा तो प्रामुख्याने संततिनियमनाच्या कार्याभोवती फिरणारा होता. त्यामुळे रघुनाथ कर्वे यांच्या व्यक्तिमत्त्वाच्या अनेक पैलूंना स्पर्श करणं राहून गेल्याची हुरहुर मनात होती. त्यांचा बुद्धिप्रामाण्यवाद, कोणतीही गोष्ट तिच्या तार्किक परिणतीपर्यंत नेण्याची त्यांची ताकद, लैंगिकता, स्त्री-पुरुष संबंध यांच्या संदर्भात काळाच्या पुढे पाहणारी त्यांची दृष्टी, आपण विचाराने अल्पसंख्याक आहोत हे दिसत असतानाही लोकशाहीवर अढळ असणारी त्यांची श्रद्धा हे कधीतरी मांडलं गेलं पाहिजे असं वाटत होतं.

मध्यंतरीच्या काळात रधोंचं सगळं साहित्य प्रकाशात आलं. अनंत देशमुखांनी प्रचंड परिश्रम घेऊन रधोंचं लिखाण संकलित, संपादित केलं होतं आणि अरुण जाखडेंनी ते प्रकाशित केलं होतं. त्यामुळे रघुनाथराव कसा विचार करीत होते ते समजायला मदत झाली आणि आजूबाजूच्या बुरसटलेल्या, प्रतिगामी वातावरणाशी एक विवेकवादी माणूस कशी झुंज देतो त्याचं दर्शन घडवणारं नाटक मी लिहून काढलं. अतुल पेठेनेही ते बसवायचं मान्य केलं. पण तरी त्यात अजून काहीतरी हवंय हे जाणवत होतं. आम्हाला लेखक/ दिग्दर्शक म्हणून रधोंच्या निमित्ताने ‘काळाचा एक तुकडा’ मांडण्यात रस नव्हता. हळूहळू मला अश्लीलतेच्या आरोपांविरुद्धच्या रघुनाथरावांच्या लढाईत आजच्या लेखकांचा आक्रोश, पेरुमल मुरूगनचं ‘माझ्यातला लेखक मरण पावलाय..’ असं व्याकूळ होऊन म्हणणंही दिसायला लागलं आणि आम्ही नाटक कोर्ट केसेसवरच केंद्रित करायचे ठरवले. एक प्रकारे परिस्थितीनेच नाटकाला आकार दिला असं म्हटलं पाहिजे. म्हणून हे नाटक रधोंच्या जीवन आणि कार्याचा परिचय करून देण्यासाठी आहे असं म्हणण्यापेक्षा ते विवेकवादी माणसाचा आपल्याकडे जो छळ होतो (persecution) आणि त्यामागे जे राजकारण असतं त्याबद्दलचं आहे, असं म्हणणं योग्य ठरेल. आता ते राजकारण अत्यंत हिंसक होतंय. पण आगरकरांच्या जिवंतपणी त्यांची प्रेतयात्रा निघाली तेव्हापासून ते दिसतं आहेच. नाटक जसं इथल्या सनातन्यांनी केलेल्या कोर्ट केसेससंबंधीचं, छळासंबंधीचं आहे, तसंच ते रघुनाथरावांनी त्या परिस्थितीला कसं धर्याने तोंड दिले त्यासंबंधीचेही आहे. रघुनाथरावांच्या सगळ्या लिखाणात त्यांना आपल्या भूमिकेविषयी शंका होती, किंवा प्राप्त परिस्थितीत आपल्या स्पष्टवक्तेपणाला मुरड घालावी असं त्यांना कधी वाटलं होतं असं दिसत नाही. त्यांनी आपले विचार शास्त्रीय कसोटीवर पारखून घेतलेले होते. ते त्या विचारांवर ठाम होते आणि ते समाजाच्या गळी त्वरित उतरवले पाहिजेत असा त्यांचा आग्रह होता.

नाटकात कर्वे आणि डॉ. आंबेडकरांच्या संबंधांचे चित्रण करताना, त्यांचे संवाद लिहिताना मला विशेष आनंद झाला. बाबासाहेबांबद्दल लिहिताना, बोलताना त्यांच्या विवेकवादावर, व्यक्तिस्वातंत्र्यवादी भूमिकेवर जितकं बोललं गेलं पाहिजे, तितका भर दिला जात नाही. दलितांच्या समस्यांचा डोंगर समोर उभा असताना त्यांना कव्र्याविरुद्धच्या खटल्याचं महत्त्व वाटणं, त्यांनी तो लढवणं, पुढे काँग्रेस संततिनियमनासंबंधी कणखर भूमिका घेत नसताना त्यांनी आपल्या सहकाऱ्याकरवी संततिनियमनाचं बिनसरकारी विधेयक आणणं यांसारखे निर्णय त्यांची विवेकवादी भूमिकाच अधोरेखित करतात.

अतुल पेठेनेही नाटक चोख बसवलं. आमचा रंगकर्मी म्हणून जुना परिचय असला तरी दिग्दर्शक या नात्याने मी त्याला प्रथमच जवळून बघत होतो. त्याच्या तालमी दीर्घकाळ चालतात. आजच्या काळात चार-साडेचार महिने नटांचा नाटकातला रस टिकवून ठेवणं आणि त्यांना आपल्या क्षमतांचा नाटकासाठी पूर्ण वापर करायला लावणं अत्यंत कठीण झालं आहे. पण अतुलची बांधिलकी आणि झपाटा त्यांना आपल्याबरोबर ओढून नेतो. नटांनी चांगला अभिनय करण्याबरोबरच नाटकाच्या आशय-विषयाशी परिचित असलं पाहिजे हा त्याचा आग्रह असतो. रघुनाथरावांचे लैंगिकता, स्त्री-पुरुष संबंधांबद्दलचे विचार नटापर्यंत पोहोचावेत म्हणून त्याने शिबीरच घेतलं होतं. एकीकडे नटांना तयार करत, तालमीत काही भाग जोडत, काही कमी करीत तो हळूहळू नाटकाच्या गाभ्यापर्यंत पोचतो. नाटकाच्या शेवटी आरोपीचा पिंजरा रंगमंचाच्या मध्यभागी आणून त्याने नाटकाला वैश्विकता प्राप्त करून दिली. त्यामुळे नाटक फक्त र. धों. कर्वेचं न राहता अशा छळाचा सामना करणाऱ्या कुणाचंही झालं. नाटकाच्या निर्मितीमूल्यांचीही अतुलने विशेष काळजी घेतली.

पहिल्या पंचवीस प्रयोगांत रघुनाथरावांची भूमिका साकारणाऱ्या गिरीश कुलकर्णीमुळे नाटकाला वेगळी मिती प्राप्त होत होती. रघुनाथराव मुळात अत्यंत अबोल, माणसांत फारसे न मिसळणारे होते. पण वेळ येताच ते ठामपणे, ठाशीवपणे आपली भूमिका मांडू शकत. आवाजाची पट्टी खाली ठेवून आणि विरामांचा योग्य वापर करून गिरीशने रघुनाथरावांच्या व्यक्तिमत्त्वाचा हा विशेष व्यवस्थित पोहोचवला. नंतरच्या प्रयोगात अतुल पेठेनेही अनेक बारकाव्यांनिशी रघुनाथराव उभे केले. त्याचा भर रधोंचे विचार आणि नाटकाचा आशय खणखणीतपणे लोकांपर्यंत नेण्याचा आहे.