आचार्य अत्रे यांची ‘चांगुणा’ ही कादंबरी वास्तव अनुभवावर आधारलेली आहे. अत्र्यांना आयुष्यात अनेक माणसे भेटली; ज्यांच्यात त्यांना कथा, कादंबरीची बीजे मिळत गेली. म्हणूनच जेव्हा यशोदा त्यांना भेटली तेव्हा त्यांना तिच्या आयुष्यावर वास्तववादी कादंबरी लिहावीशी वाटली. त्याला तिची तीव्र जीवनेच्छाच कारणीभूत आहे. अर्थात यशोदा व चांगुणा यांच्या आयुष्याचा शेवट वेगळा होता. जन्मदात्यांपासून ते आयुष्यात आलेल्या प्रत्येकाने चांगुणाला जीवे मारण्याचा प्रयत्न केला; पण ती त्यांना पुरून उरली. आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर तिने केवळ संघर्षच केला. म्हणूनच कदाचित ती शेवटपर्यंत जगली. पोटच्या मुलांना तरी नीट जगता यावे यासाठी चांगुणा स्वत:ला संपवते आणि तिची मुले अनाथाश्रमात प्रवेश घेण्यासाठी लायक ठरतात. अत्रे यांनी त्यांना भेटलेल्या यशोदाच्या जीवनावर लिहिलेली ही कादंबरी आजही वाचकांना आकर्षित करते. अत्रे यांच्याच शब्दांत सांगायचे तर.. ‘जीवन फार भयंकर आहे. ते आपणाला समजत नाही, म्हणूनच आपण जगतो आहे.’
- ‘चांगुणा’- प्रल्हाद केशव अत्रे, डिंपल पब्लिकेशन्स, पृष्ठे- १८४, मूल्य- २०० रुपये