तुकारामांच्या गाथेचा साक्षेपी अभ्यास

संतश्रेष्ठ तुकाराम हे महाराष्ट्राचं लाडकं दैवत आहे. महाराष्ट्रातील सर्व संतकवींमध्ये तुकाराममहाराजांचे नाव अग्रक्रमाने घेतलं जातं.

संतश्रेष्ठ तुकाराम हे महाराष्ट्राचं लाडकं दैवत आहे. महाराष्ट्रातील सर्व संतकवींमध्ये तुकाराममहाराजांचे नाव अग्रक्रमाने घेतलं जातं. त्यांचे अभंग वारकऱ्यांच्या नित्य पठणात असतात. विद्वानांच्या चर्चेत असतात. केवळ महाराष्ट्रातच नव्हे, तर जेथे जेथे मराठी भाषा पोहोचली आहे तेथे तुकारामांच्या कीर्तीचा दरवळ पसरला आहे.
म्हणूनच तुकाराममहाराजांवर आजवर अनेक प्रकारे लेखन झालेलं आहे. त्यांच्यावर पीएच.डी.चे जवळजवळ तीस प्रबंध झाले आहेत. त्याखेरीज इतर अभ्यासकांनीही वेगवेगळ्या अंगांनी तुकारामांवर भरपूर लेखन केलेले आहे. कोणी त्यांच्या चरित्रावर लिहिले आहे, तर कोणी त्यांच्या शिकवणुकीवर प्रकाश टाकला आहे. कोणी त्यांच्या कथनशैलीचा अभ्यास केला आहे. कोणी शैली-वैज्ञानिक अंगाने त्यांच्या काव्यावर लिहिले आहे. कोणी त्यांचे मराठी संतवाङ्मयातील स्थान व त्यांचा पुढीलांवरचा प्रभाव याचे दर्शन घडवले आहे. अशा प्रकारे विविध अंगांनी तुकाराममहाराजांचे व्यक्तिमत्त्व, कर्तृत्व आणि साहित्य यावर लेखन झालेले आहे. तरीही तुकारामांच्या अभंगवाणीवरील लोकांच्या प्रेमाला अद्याप ओहोटी ठाऊक नाही. बदलत्या काळाबरोबर येणाऱ्या नव्या पिढीलाही नव्या प्रेरणा देण्याचं कार्य तुकारामांच्या काव्यानं केलेलं आहे. आजही तुकाराममहाराजांच्या वाङ्मयाचा वेगवेगळ्या अंगांनी अभ्यास चालू आहे. अभ्यासकांपुढे अभ्यासाच्या नवनव्या दिशा उजळत आहेत.
यासंदर्भात तुकाराम साहित्याच्या एका नव्या दिशेने झालेल्या अभ्यासावर इथे प्रकाश टाकायचा आहे. तुकाराम साहित्याच्या संदर्भात ही नवी दिशा देण्याचं काम तुकाराम गाथेचे गाढे अभ्यासक कै. रामभाऊ नगरकर यांनी केले आहे. रामभाऊ नगरकर हे मूळचे पंढरपूरचे. त्यामुळे पंढरपूरचे दैवत श्रीविठ्ठल, त्यांचे अनुयायी असलेला वारकरी संप्रदाय, पंढरपुरातील विद्वान यांचे संस्कार घेऊनच रामभाऊ पुण्यात येऊन स्थायिक झाले. त्या संस्कारांमुळेच तुकाराम आणि त्यांचे साहित्य हे रामभाऊंच्या आवडीचे विषय झाले. त्यांच्या विविध प्रकारच्या लेखनामध्ये त्यांची ही तुकारामभक्ती प्रगट झाली आहे. त्यांनी डॉ. मु. श्री. कानडे यांच्या सहकार्याने ‘तुकाराम गाथा संदर्भकोश’ सिद्ध केला. त्या कोशाला त्यांची विद्वत्तापूर्ण प्रस्तावना आहे. त्यात त्यांनी तुकाराममहाराजांच्या गाथेवर सर्वस्पर्शी प्रकाश टाकला आहे. ‘तुकारामांचा अभ्यास’ हा त्यांचा तुकारामांवरचा स्वतंत्र ग्रंथ. त्यानंतर मराठीतील संतांच्या साहित्यातील सुभाषिते ठरलेल्या सुवचनांचा ‘संत-साहित्य सुभाषित कोश’ हा बृहद्ग्रंथ त्यांनी सिद्ध केला. त्यांचा ‘तुकाराम गाथेचा अभ्यास’ हा ग्रंथ नुकताच प्रकाशित झाला आहे.
या ग्रंथातील लेख मुंबईहून प्रसिद्ध होणाऱ्या ‘मराठी संशोधन पत्रिका’ या त्रमासिकातून क्रमश: प्रसिद्ध झाले होते. मराठी संशोधन पत्रिकेच्या ऑक्टोबर-नोव्हेंबर-डिसेंबर २०१३ च्या अंकापासून सुरू झालेली ही लेखमाला याच पत्रिकेच्या जानेवारी-फेब्रुवारी-मार्च २०१६ या अंकामध्ये समाप्त झाली. एकंदर नऊ लेख या लेखमालेत गुंफले आहेत. प्रत्येक लेखात एका गाथेचा अभ्यास असे जरी धोरण असले, तरी तुलना करण्याच्या निमित्ताने उपलब्ध असलेल्या अन्य गाथांचाही परामर्श या लेखांतून घेण्यात आलेला आहे.
तुकाराममहाराजांच्या गाथेच्या अभ्यासात रामभाऊंनी जवळजवळ २५ गाथांचा अभ्यास सादर केला आहे. त्यांच्या स्वत:च्या संग्रहातच त्यापैकी १०-१२ गाथा तरी असतील. बाकीच्या गाथा मिळवण्यासाठी त्यांना खूप दगदग करावी लागली. वयाची ८० वर्षे उलटल्यानंतर त्यांना ही दगदग करावी लागली. पण त्यांनी ती न थकता, न कंटाळता केली. काही गाथा निरनिराळ्या ग्रंथालयांतून मिळवल्या. काही खासगी संग्रहातून मिळवल्या.
या गाथांचा अभ्यास केवळ वरवर ग्रंथ चाळून होण्यासारखा नव्हता. प्रत्येक गाथेचा अभ्यास करताना त्यांनी खूप काळजी घेतली आहे. ती गाथा संपादित करणाऱ्या अभ्यासकाची चरित्रात्मक माहिती, त्या गाथेचा इतिहास व स्थूल परिचय, त्या गाथेची वैशिष्टय़ं, इ. माहिती त्यांनी प्रत्येक गाथेच्या संदर्भात दिली आहे. सगळ्याच गाथांत संपादकाची भूमिका सांगणारी प्रस्तावना असतेच असं नाही. तेव्हा तत्कालीन नियतकालिकांतील अभिप्रायही पाहावे लागले. काही गाथा पारंपरिक क्रमानुसार अभंगांची मांडणी करतात, तर काही गाथांत अभंगांचे विषयानुसार वर्गीकरण केलेले आहे. सर्वच वर्गीकृत वर्गीकरणं सारखी असतीलच असेही नाही. त्यातही पुढे-मागे होत असतं. गाथेतील एकूण अभंगसंख्येची नोंद करून, इतर गाथांतील संख्येशी त्यांची तुलना करून, त्यांच्यात पडलेल्या फरकाची कारणमीमांसा करावी लागते. काही गाथा ढिसाळपणे तयार झालेल्या असतात. त्यामुळे एकच अभंग दोनदा येतो. त्याला दुबार अभंग म्हणतात. अभ्यासकाला प्रत्येक गाथेतील दुबार अभंगांची नोंद करावी लागते. काही गाथांत अभंगांची मोडतोड झालेली असते. एक अभंग मुळातील तीन तुकडय़ांचा बनलेला असतो, तर दुसऱ्या ठिकाणी एकाच अभंगाचे दोन किंवा तीन अभंग केलेले असतात. या प्रकाराचीही दखल घेऊन त्यांची तुलना करावी लागते. सर्वात त्रासदायक प्रकार म्हणजे एकाच गाथेत भिन्न मुद्रांचे अभंग आढळतात. ते अभंग अन्य कवींच्या गाथेतून आलेले असतात. हे अभंग अन्य ठिकाणांहून यदृच्छेने आलेले असतात, तर काही मुद्दाम घुसवलेले असतात. असे घुसखोर अभंग म्हणजे प्रक्षेप होत. प्रक्षेपांचे हे एकच कारण नसते. हे प्रक्षेप गाथेत ठेवायचे की नाही, याबद्दल संपादकांच्या भूमिका वेगवेगळ्या असतात. आरंभीच्या प्रस्तावनेत काही गाथांत ही भूमिका मांडलेली असते. काहीत नसते. प्रक्षेपांचे अनेक प्रकार असतात. नगरकरांनी आपल्या तुकाराम गाथेच्या संदर्भ शब्दकोशाच्या प्रस्तावनेत ही सर्व चर्चा केली आहे. आता आपण ठरवलेले प्रक्षेप दुसऱ्या अभ्यासकाला मान्य नसतील तर अशा मतभेदांच्या बाबतीत काय करायचे, असा प्रश्न उपस्थित होतो. काही संपादकांनी प्रक्षेप पूर्णपणे वगळले आहेत. नगरकरांना हे मान्य नाही. आपण प्रक्षिप्त ठरवलेले अभंग दुसऱ्याला स्वीकारार्ह वाटले तर एकदम ते गाळणे हे नैतिकदृष्टय़ा योग्य वाटत नाही. म्हणून आपण ठरवलेल्या प्रक्षेपांना एकदम वगळण्याऐवजी त्यांची स्वतंत्र नोंद करून ग्रंथात समाविष्ट करा, असे त्यांचे म्हणणे आहे. आणि ते रास्त आहे. त्यांनी स्वत: नामदेवांच्या गाथेतील प्रक्षिप्त भाग स्वतंत्र ठेवून तो भाग शेवटी मूळ संहितेबरोबर दिला आहे.
गाथा अभ्यासातील ही शिस्त नगरकरांनी काटेकोरपणे पाळली आहे. ही गाथा-परीक्षणाची शिस्त पाळताना त्यांनी जागोजाग कोष्टकं दिली आहेत. प्रक्षेपांच्या याद्या दिल्या आहेत. आपल्या विधानांच्या पुष्टय़र्थ निरनिराळे संदर्भ दिले आहेत. मात्र, आपला मुद्दा पटलाच पाहिजे असा अट्टहास कोठेही केलेला नाही. कुणा अभ्यासकाचा अहंकार दुखावेल अशी विधानं केली नाहीत. नगरकरांच्या सुसंस्कृतपणाचा हा पुरावा आहे. अभ्यासाच्या सर्व पायऱ्या सांभाळून त्यांचे हे लेखन झाले आहे.
दुर्दैवानं आज ते आपल्यामध्ये नाहीत. त्यांचे हे पुस्तक त्यांना पाहायला मिळावं अशी सर्वाची इच्छा होती. त्यांच्या कन्यांची यासाठी फार धडपड चालली होती. त्यांच्या लेखांचे पूर्वसंपादक डॉ. प्रदीप कर्णिक यांनी अत्यंत त्वरेने ते लेख पाठवले. त्यांच्या या पुस्तकाचे प्रकाशक पाष्टे यांनीही परिस्थितीचं गांभीर्य ओळखून ग्रंथनिर्मितीची सूत्रं वेगाने हलवून हा ग्रंथ पूर्णत्वास नेला. पण त्याच्या प्रकाशनापूर्वीच नगरकरांचे दुर्दैवी निधन झाले. हा ग्रंथ भरपूर माहितीने भरला असून मौलिक असे विचारधन त्यात सामावलेले आहे.

कल्याण काळे 

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Tukaram maharaj books study