पडसाद : कृषी क्षेत्राचा शाश्वत विकास हवा!

‘लोकरंग’ (१० मार्च) मधील ‘आधारभूत तिढा कुठवर नेणार?’ हा राजेंद्र जाधव यांचा लेख वाचला. कृषी क्षेत्रातील संकटाची कारणमीमांसा करताना अनेक जटिल बाबी समोर येतात. शेतीची अवनीती ही मूळ शेतीबाबतच्या आपल्या दृष्टिकोनात दडलेली आहेत. देशाला, उद्योगांना आणि शासकीय योजनांना पदरचं घालून स्वस्तात कच्चा माल पुरवणारी यंत्रणा म्हणूनच आपण शेतीकडे आजपर्यंत पाहत आलो आहोत. वर्तमान भांडवली व्यवस्थेत शेती हळूहळू बाजारावर आश्रित झालेली आहे. आज बाजारावर शेतकऱ्यांचा नव्हे, तर भांडवलदारांचा ताबा आहे. म्हणून शेतीमालाचे भाव, शेतीसाठी लागणारे उपदान हे शेतकऱ्यांच्या विरुद्ध जातात. महागाई काबूत ठेवण्याच्या सबबीखाली आपल्या सर्वच पक्षांच्या सरकारांनी विदेशी शेतमालाची भरमसाठ आयात करून, त्याचबरोबर शेतीमालावर निर्यात बंदी लादून शेतीमालाचे भाव पाडले. आज आपल्या केंद्र व राज्य सरकारांनी शेती क्षेत्रातही कॉर्पोरेट व धनिक धार्जिणे धोरणे नेटाने राबवणे सुरू ठेवले आहे. सरकारच्या या धोरणामुळे शेतीमालाचे उत्पादन, साठवण प्रक्रिया, विपणन, विमा, कर्ज वितरण व संशोधनासह शेतीसाठी आवश्यक असणाऱ्या इतर अनुषंगिक बहुतांश बाबींवर देशी-विदेशी कंपन्यांनी मक्तेदारी प्रस्थापित केली आहे. कॉर्पोरेट कंपन्या संगनमताने कृषी क्षेत्राच्या सर्व क्षेत्रात आपली पकड मजबूत करत नफेखोर नीतीतून शेतकऱ्यांचे प्रचंड आर्थिक शोषण करतात. भांडवली बाजारात शेतकऱ्यांचे आर्थिक शोषण होऊ नये याकरिता स्वामीनाथन आयोगाने शेतीमालाच्या उत्पादन खर्चाच्या तुलनेत दीडपट हमीभाव देण्याची शिफारस केली होती. वर्तमानकालीन सरकारने निवडणूक प्रचारात या शिफारसीप्रमाणे भाव देऊ असे आश्वासन दिले होते. मात्र सत्तेवर येताच आश्वासनाला बगल देण्याचा प्रयत्न केला. शेतकऱ्यांच्या आंदोलनानंतर दीडपट भावाची हमी देण्याचे जाहीर केले, मात्र भाव जाहीर करताना शेतीमालाचा सर्वंकष उत्पादन खर्च विचारात न घेता केवळ निविष्ठांचा खर्च व कुटुंबातील सदस्यांची मजुरीच विचारात घेण्यात आली. जमिनीचा खंड, कर्ज, व्याज व इतर बाबी विचारात घेतल्या नाहीत. अशा तडजोडीतून शेतकऱ्यांचं समाधान मात्र होऊ शकले नाही. या समस्येवर मात करण्याचा एक मात्र उपाय म्हणजे सरकारने बाजारात प्रत्यक्ष न उतरता असे दीडपट भाव शेतकऱ्यांना परस्पर कसे मिळतील अशी व्यवस्था निर्माण करण्याची आवश्यकता आहे. त्यात आयात निर्यात, उत्पादन खर्च, पणन, साठवणूक प्रक्रिया, विक्री, मूल्यवर्धन, बाजार सुधारणा व सुविधा, पायाभूत सुविधा, गट शेती, समूहशेती, सेंद्रिय शेती, पीक विमा व सहकार याबाबतच्या धोरणांत शेतकरीधार्जिणे निर्णय घेतल्यास असे भाव शेतकऱ्यांना मिळणे सहज शक्य आहे. मात्र सरकारने त्या दृष्टीने पावले टाकली पाहिजेत.
शेती व शेतकरी यांच्या समोरील आजची आव्हाने पाहता ग्रामीण विकासाबाबत अत्यंत समग्र दृष्टिकोन स्वीकारण्याची आवश्यकता आहे. डॉ. एम. एस. स्वामीनाथन यांच्या अध्यक्षतेखाली राष्ट्रीय शेतकरी आयोगाने या अनुषंगाने अत्यंत मूलभूत विचार मांडले आहेत. आयोगाने शेतीवर उपजीविका करणारे शेतकरी आणि त्यावर पूर्णपणे आधारित असलेले मजूर, शेतमजूर यांच्यासह ग्रामीण भागातील छोट्या-मोठ्या घटकांचा शाश्वत व समन्यायी विकास व्हावा या दृष्टिकोनातून मौलिक शिफारशी केल्या आहेत. त्याची प्रत्यक्ष अंमलबजावणी सरकारने करायला हवी. तरच शेती आणि शेतकरी समृद्ध होऊ शकेल. -डॉ. बी. बी. घुगे, बीड

हेही वाचा…पडसाद : मातृभाषा दैनंदिन जीवनातील भाषावापरातून टिकते

pension for government employees
लेख : सामाजिक कल्याणाकडे दुर्लक्ष
Innovative Polling Stations, Nagpur, Environment and Tribal Culture, nagpur lok sabha seat, polling station, slefie points, gadchiroli, nagpur polling station news,
मतदान केंद्रांवर जंगल, पर्यावरण, आदिवासी संस्कृतीचे दर्शन……
Dissatisfaction in Ashok Chavans sphere of influence due to Shaktipeeth Highway
शक्तिपीठ महामार्गामुळे अशोक चव्हाणांच्या प्रभावक्षेत्रात असंतोष, नांदेडमध्ये भाजप उमेदवाराला फटका बसणार?
75 years of nato,
यूपीएससी सूत्र : भारतातील गहू उत्पादन अन् नाटोची ७५ वर्ष, वाचा सविस्तर…

आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांवर सरकारची कुऱ्हाड

‘लोकरंग’ (१० मार्च) मधील ‘आधारभूत तिढा कुठवर नेणार?’ हा राजेंद्र जाधव यांचा लेख देशातील कष्टकरी शेतकरी बांधवाची व्यथा मांडणारा होता. दिवसभर उन, वारा, पावसात शेतात राबणारा आमचा शेतकरी रात्री घरी येतो व चुलीवर शिजवलेले मिळेल ते अन्न खाऊन अंथरूणावर पडतो. मात्र घरातील वृद्ध आईवडील, मुले यांच्या पोटात अन्नाचा कण गेला असेल तरच त्याला झोप लागते. शेतकऱ्याची ही दयनीय अवस्था वर्षानुवर्षे चाललेली आहे, तरीही आजतागायत सरकारी नजरेतून पूर्णपणे दुर्लक्षित आहे. शेतकरी शेतात घाम गाळतो म्हणून उगवलेल्या पिकातून अन्न तयार होते व सर्वांची पोटे भरतात. पण ज्याच्या श्रमातून हे सारे घडते त्या शेतकऱ्याला मात्र शेतमालाला हवा तेवढा भाव न मिळाल्यामुळे आंदोलन किंवा आत्महत्या हे दोनच पर्याय त्याच्याकडे शिल्लक असतात. आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांवर सरकारची कुऱ्हाड आली की आत्महत्या हाच पर्याय उरतो. शेतमालाचा भाव गेल्या दहा वर्षांत वाढण्याऐवजी पूर्वीच्या तुलनेत कमी झाला असेल तर पिकवलेले अन्नधान कचऱ्याच्या भावाने विकणे याशिवाय दुसरा उपाय राहत नाही. जनतेच्या खिशातील करोडो रूपयांची उधळण करून बांधलेल्या राममंदिरातील श्रीराम मंदिराच्या बाहेर येऊन या शेतकऱ्यांना दिलासा देईल काय, जेणेकरून रक्त आटवून तयार झालेल्या शेतमालाला वाढीव दर मिळेल व शेतकरीराजा म्हणून हा भूमीपुत्र स्वाभिमानाने जगेल. – सूर्यकांत भोसले

हेही वाचा…आम्ही डॉक्युमेण्ट्रीवाले : लोकदानातून सिनेधनुष्य..

लोकांच्या मनातलं…

‘लोकरंग’ (३ मार्च) मध्ये ‘समाजभानाचं हरवणं’ हा लेख वाचला. मनातली भावना उघड करणारा हा लेख अतिशय आवडला. अशा सर्व प्रकारच्या वागण्याचा समाजातील सामान्य माणसांना किती त्रास आणि मनस्ताप होतो, हे कळत असूनही लोक समोरची, शेजारची व्यक्ती असं वागत असली तरी त्याला हटकत नाहीत हे दुर्दैव. त्यांना ही अरेरावी करणारी मंडळी आपल्याशी कशी वागतील याचीही भीती वाटते. त्यामुळं अशी बेजबाबदार माणसं बोकाळतात. चांगल्यांचा वाली कुणी नसतो, अशीच सध्या अनेकांची धारणा झाली आहे. या लेखाद्वारे लेखिकेने लोकांच्या भावनेला वाचा फोडली हे बरं झालं. – पद्माजा बडे

अस्वस्थ करणारा लेख

‘लोकरंग’ (३ मार्च) मध्ये ‘समाजभानाचं हरवणं’ या लेखात कळीच्या मुद्द्याला हात घालून नेमकी, मार्मिक आणि आशयसुसंगत अशी मांडणी केली आहे. विषय कानाच्या आणि मनाच्याही बाजूने खूपच नाजूक आहे. अशा काही नाजूक माणसांच्या बाबतीत, अभिजात संगीताची सवय लागलेले कान साधनेमुळे शांत झालेले असतात. त्या शांततेत निर्विचार झालेलं मन अभिजातपणात विरघळू पहात असतं … निर्वीकल्प ध्यानाची ती पहिली अवस्था असते. या अवस्थेची अनुभूती घेण्यासाठी पूर्वी वातावरण शांत असायचं, पण आज याच शांततेचा ताबा अनेक अशांत करणाऱ्या घटकांनी घेतलाय, ज्याचा ऊहापोह उत्तम प्रकारे समोर आणला आहे.
ध्यानासाठी एक विशिष्ट वातावरण लागते म्हणून लोक शांतता असलेल्या जागी जाऊन ध्यान करतात. त्यांना घरबसल्या किंवा निदान आजूबाजूच्या वातावरणात का होईना, स्वत:शी संवाद साधता यावा यासाठी आजवर अनेक ध्यान साधकांनी प्रयत्न केले आहेत. हे प्रयत्न आजकाल प्रसारमाध्यमांवरूनही दुथडी भरून वाहत असतात. परंतु त्यांनी केलेले प्रयत्न आणि सवंग विचारांनी वाढलेला ‘वाट्टेल ते ऐकण्यातला अतिरेक’ याची सरमिसळ झाली आणि इथेच घोटाळा झाला. मनोरंजनाची दिशाभूल करायला दुसरीकडे ‘करमणूक’ नावाच्या भस्मासुराचे आव्हान आहेच. सामान्य श्रोत्याला मनोरंजन आणि करमणूक यातली पुसटरेषा दिसत नाहीये ती या डेटा नावाच्या धुक्यामुळे. पण मी फार आशावादी आहे- एक दिवस हे धुकं जाईल असं मला वाटतं. ते धुकं घालवण्यासाठी आज लेखिकेने वातावरणात चैतन्य आणलंत, फार बरं झालं. आता हे बेरिंग सोडू नका आणि पुन्हा काहीतरी लिहायला घ्या.
एक कलाकार म्हणून माझी संवेदना असे म्हणते की, मला माझी प्रतिभा धुंडाळायची असते, मला माझ्या स्फूर्ती वलयातून दरवळणारे सूर ऐकायचे असतात… यासाठी मी वणवण भटकतो, डोंगरदऱ्यांमध्ये जातो, नदी समुद्रावर जातो, पण प्रत्येक ठिकाणी कुणीतरी ‘डेटा’ नावाची पिस्तूल खिशात घेऊन फिरत असतो… त्या पिस्तुलीतल्या गोळ्या किती प्रतिभा, विचारांचा बळी घेत असतील याचा मी विचार करतो तेव्हा फार अस्वस्थ होतो. चाळिसेक वर्षांपूर्वी माझ्या गुरुजींनी मला अनेक वर्षं फक्त दोन तंबोऱ्यांच्या नादामध्ये बसवलं, तेव्हा आजूबाजूला इतकं क्रूर वातावरण तयार होईल अशी कल्पनाही केली नव्हती. पूर्वी तानपुरे लावायला दहा-बारा मिनिटं पुरायची, आता अर्धा अर्धा तास एकाग्रता होत नाही. यावर मी माझ्या कानांच्या डॉक्टरांकडेही जाऊन आलो. त्यांचे उत्तर फार मजेशीर होतं, ‘‘चंद्रात्रे, तुमच्या कानात नाही मनात प्रॉब्लेम आहे…’’
मी मनात म्हटलं, माझ्याच काय तुमच्याही मनात प्रॉब्लेम असेल. सगळ्या समाजाला एका मोठ्या कर्णपिशाच्चाने झपाटलं आहे. कुणी आणि कुणाची कीव करावी? लेखिकेने फारच सौम्य शब्दांत विषय मांडला आहे, परंतु त्याची दाहकता एक कलाकार म्हणून भडक वाटली आणि म्हणून लेख जास्त भावला आणि अस्वस्थ झालो. – सचिन चंद्रात्रे

हेही वाचा…आधारभूत तिढा कुठवर नेणार?

वास्तव मांडणी

‘लोकरंग’ (३ मार्च) मध्ये ‘समाजभानाचं हरवणं’ हा मुक्ता चैतन्य यांचा डेटाग्रस्त समाजावरील लेख फारच आवडला. मी महाविद्यालयातील विद्यार्थी आहे. महाविद्यालयातील जीवन अनुभवत असताना लेखिकेच्या लेखांतील मुद्दे अगदी समर्पक वाटले. एकीकडे प्राध्यापक वर्गामध्ये शिकवत असतात आणि अनेक मुलं-मुली वेब सिरीज पाहण्यात अगदी तल्लीन झालेली असतात. परंतु जेव्हा कल्पनाविलास करून निबंध लिहायची वेळ येते तेव्हा ही मुलं सर्रासपणे आंतरजालावर पडलेले निबंध लिहून आणतात. कधी हे विद्यार्थी कॉलेजच्या कट्ट्यावरच मोबाइलवर अश्लील गोष्टी पाहत असतात. अनेक जण कॅण्टीनमध्येच जोर जोराने गाणी लावतात. या अशा अनेक गोष्टी आज कॉलेजमध्ये घडत आहेत.
या लेखामध्ये नमूद केल्याप्रमाणे पुढील काळात सार्वजनिक ठिकाणी शांततेसाठी हाणामारा झाल्या तर नवल नसेल. आभासी जगातल्या वर्तनाचे काय परिणाम होऊ शकतात हे अनेकदा माणसांच्या लक्षातच येत नाही, हे अगदी खरं आहे. लेखिकेने या लेखाच्या शेवटी विचारलेला प्रश्न- आभासी जग आपल्यासाठी आहे की आपण आभासी जगासाठी आहोत? यावर मला वाटतं की, आपल्यासाठी हे आभासी जग आहे, नाही की आपण आभासी जगासाठी! हा लेख वाचनीयत तर होताच, पण साध्या शब्दात या सगळ्या जटिल विषयाची उकल करत उत्तम मांडणी केली आहे. -प्रतिक मुंजेवार, सातारा