२७ फेब्रुवारीच्या ‘लोकरंग’मध्ये भानू काळे यांचा ‘मराठीची सद्य:स्थिती : काही अल्पचर्चित मुद्दे’ हा अतिशय संतुलित लेख वाचला. मराठी भाषेच्या परवडीला मराठी अभिजन, सुशिक्षित वर्ग प्रचंड मोठय़ा प्रमाणात जबाबदार आहे. त्यामुळेच बंगाली, मल्याळम् या भाषांच्या तुलनेत मराठी पुस्तकं विकत घेऊन वाचणारे फारच थोडे मराठी वाचक असतात. त्यातही वाङ्मय आणि आपल्या अभिजात कलांबद्दलची अनास्था हा प्रकार बराच आढळतो. माझ्याच मातुल परिवारात अनेक जण डॉक्टर, तंत्रज्ञ, चार्टर्ड अकाऊंटंट आहेत. ‘तुला शास्त्रीय संगीताची आवड कशी निर्माण झाली?’ (‘हा रोग त्वा कोठून जडला?’) असा रोख असलेले प्रश्न मी त्यांच्याकडून पचवले आहेत! माझ्या नात्यातील अमेरिकेत स्थायिक असलेल्या एका व्यक्तीला ‘तुम्ही कृपया मराठीत लिहू नका’ असे मला एकदा सांगावे लागले. बरं, अशा माणसांचे इंग्रजीही तितकेच दिव्य असते, ही गोष्ट वेगळीच. हल्लीच्या खराब, निकृष्ट मराठीची सुरुवात शाळेपासूनच होते. मी ११वीपर्यंत ज्या शाळेत शिकलो तिथल्या शिक्षक-शिक्षिकांना साहित्याची चांगली जाण होती. आज भाषाशिक्षणाचा दर्जा प्रचंड खालावलेला दिसतो. त्यातही विसंगती अशी, की हा दर्जा पुण्या-मुंबईपेक्षा सोलापूर-औरंगाबादकडे बरा आहे!
मराठीइतकी अनास्था व उदासीनता बंगालीबद्दल त्या समाजात नाही. शालेय शिक्षणाची अवस्था सबंध देशात बंगालमध्ये पुष्कळच चांगली आहे. बंगाली माध्यमातून शालेय शिक्षण झालेली, पण गूगल, इंटरनेटचा वापर हुशारीनं करणारी अनेक बंगाली मुलं मी पाहिली आहेत. त्यातली अनेक अमेरिकेतील MIT, प्रिन्स्टन, हॉर्वर्ड, कार्नेगी मेलन अशा विद्यापीठांतून कार्यरत आहेत. ते सर्व निष्णात गणितज्ञ तर आहेतच, पण भाषाप्रभूही आहेत. मराठीत इतक्या प्रतिष्ठित विद्यापीठांत दिनेश ठाकूर (पुलंचे भाचे) यांच्यासारखा एखाद् दुसरीच व्यक्ती अपवाद म्हणून आढळत
भानू काळेंनी त्यांच्या लेखात सॉमरसेट मॉमचे फारच चांगलं उदाहरण दिलं आहे. त्याच्या नावानं सन्मान ही खरंच मोठी गोष्ट आहे. पण यात मॉमचाही विचारीपणा किती! मराठीत आता लाभसेटवार किंवा तत्सम पारितोषिके सुरू झाली आहेत; पण एकूण संख्या कमीच. मुंबईस्थित अशोक रानडे हे विद्वान संगीतज्ज्ञ होते. त्यांच्या नावानं NCPA मध्ये एक व्याख्यान दरवर्षी आयोजित केलं जातं. २०१५ साली हे व्याख्यान कर्नाटक संगीतातील संशोधक, लेखक, गायक टी. एम. कृष्णा यांनी दिलं होतं. किती मराठी लोकांना कृष्णा माहीत आहेत, हा प्रश्न नाहीच; पण अत्यंत कमी लोकांना रानडे आणि त्यांच्या स्कॉलरशिपची जाणीव आहे. भानू काळे यांच्याप्रमाणेच ‘Mumbai deintellectualized’ हे अरुण टिकेकर यांचं पुस्तक अगदी बरोबर सांगतंय! महाराष्ट्रातील शिक्षित वर्गसुद्धा जातीपाती प्रकरणात इतका बुडाला आहे! चं. प्र. देशपांडे यांनी त्यांच्या मराठी दिनानिमित्ताच्या लिखाणात ‘मला मराठीबद्दल अस्मिता वगैरे काही वाटत नाही,’ असं स्पष्ट म्हटलं आहे. माझीही तीच भूमिका आहे. पुणे-मुंबई-नाशिक परिसर सोडून उर्वरित महाराष्ट्रात जिथे मी जन्माला आलो, जगलो आणि वाढलोसुद्धा- तिथे मराठी येत नसेल तर मग काय येतं? ‘मराठी येते हेच खूप झालं!’ या वातावरणात मी वाढल्यामुळे माझाही प्रकार देशपांडे यांच्यासारखाच आहे. मला त्यामुळे सुरेश भटांची तसंच कौशल इनामदार यांनी स्वरबद्ध केलेली ‘लाभले भाग्य आम्हा बोलतो मराठी’ कविताही आवडत नाही. मराठी भाषाप्रेम म्हणजे रोज तिच्या नावानं छाती पिटत बसणं नव्हे! गुढीपाडवा आला की एरवी पँट-शर्ट घालणाऱ्या महिलांनी स्टेशनचा रस्ता अडवून पेशवाई नऊवारी साडय़ा आणि नथी घालून नाचणे हे मराठीचे किंवा सांस्कृतिक प्रेमही मला वाटत नाही. एकूणात सर्व समाजात दिखाऊगिरीच प्रचंड वाढत चालली आहे.
हिंदी ही संपूर्ण उत्तर भारतात फार महत्त्वाची (आणि एकमेव!) भाषा आहे यात वाद नाही. परंतु दक्षिणेतील राज्यांना ती आपली वाटत नाही. परिणामी हिंदूी लादण्याचा प्रकार आपल्या देशात चालेल असं मला वाटत नाही. हिंदूी राष्ट्रभाषा सभेचं कार्य तामिळनाडूमध्ये चांगलं होतं. माझ्या अनेक तमिळ परिचितांनी त्याचा फायदा घेतला. पण यात एक गोष्ट लक्षात घेण्यासारखी म्हणजे यातील बहुतांश व्यक्ती ब्राह्मण होत्या. ज्यांच्या घरात संस्कृत भाषेचे ज्ञान आणि प्रेमही खूप होते. अब्राह्मण वर्गाची तमिळ भाषा फारच वेगळी आणि संस्कृतपासून अतिशय दूर आहे.
भानू काळे यांची ‘इंग्रजीसह मराठी’ ही भूमिका मला अत्यंत योग्य वाटते. इंग्रजी राजवटीला कितीही नावे ठेवली तरी अत्यंत वैविध्याने नटलेल्या, जातीपातींनी भरलेल्या या खंडप्राय देशात एक प्रकारची uniformity (आणि homogeneity सुद्धा) इंग्रजीमुळेच आणली गेली. ही uniformity धर्माद्वारे आणण्याचा प्रयत्न केवळ चुकीचाच नाही, तर हास्यास्पदही आहे. कारण तशी uniformity हिंदूू धर्मासारख्या mystic religion ला शक्य नाही. अनेक जण यात भाषेचा अभिमान इतिहासाशी विचित्र पद्धतीनं जोडण्याचा प्रयत्न करतात. पानिपत युद्धात मराठा सैन्याचा १७६१ साली दारुण पराभव झाला, ही वस्तुस्थिती. त्याला बरीच कारणे होती. ही वस्तुस्थिती मान्य करण्याऐवजी अब्दालीला पळवून लावला, तो मेला असे सांगितले जाते. याशिवाय सर्वात हास्यास्पद दावा म्हणजे पुढची २५० वर्षे इराणी-दुराणी (म्हणजे अफगाण) लोकांची भारताकडे वाकडय़ा नजरेनं पाहण्याची हिंमत झाली नाही. वस्तुस्थिती ही होती की, पानिपतच्या नामुष्कीनंतर ५०-६० वर्षांनी पूर्ण हिंदूस्थानावर ईस्ट इंडिया कंपनीने अत्यंत धूर्तपणे ताबा मिळवला होता. त्यामुळे अफगाण न येण्याचं श्रेय मराठय़ांना नाही, तर ते ब्रिटिशांना द्यावे लागेल! इंग्रजी ही जोडभाषा शिक्षित वर्गात पूर्ण भारतात आहे. शेवटी तमिळनाडूसारख्या प्रगत राज्यात NEET ला बसणाऱ्या विद्यार्थ्यांना यश कमी मिळण्याचे एक कारण इंग्रजीची उपेक्षा हे आहे, हे चेन्नईमधील प्रत्येक राजकारणी खासगीत नक्कीच मान्य करेल! – शरद साने
माणसातील गुन्हेगारी प्रवृत्ती..
‘लोकरंग’ पुरवणीत (१३ मार्च) ‘गॉडफादर’ चित्रपटाच्या पन्नाशीनिमित्ताने प्रसिद्ध झालेले लेख वाचले. वास्तवाची जाणीव करून देणारे दमदार कथानक, खऱ्याखुऱ्या वाटणाऱ्या व्यक्तिरेखा, प्रभावीपणे उलगडत जाणारा आशय अशी वैशिष्टय़े असलेल्या कादंबरीवर चित्रपट तयार होताना जर पटकथा लेखनात लेखकाचा सहभाग असेल, जर दिग्दर्शक कथानकाच्या आशयाची, त्यातील घटिताची मोडतोड न करता त्या कथानकाला अधिक उंची देणारा असेल, तर तो चित्रपट सर्वश्रेष्ठतेच्या पायरीवर जाऊन पोहोचतो. मारिओ पुझोच्या ‘गॉडफादर’ या कादंबरीबाबत हे घडले. ‘गॉडफादर’ या चित्रपटाच्या पहिल्या व दुसऱ्या अशा दोन्ही भागांची पटकथा लेखक व दिग्दर्शक यांनी संयुक्तपणे लिहिली होती व चित्रपटाच्या दोन्ही भागांकरिता दोघांना सर्वोत्कृष्ट कथालेखनाचा ऑस्कर देण्यात आला होता.
विशेष बाब अशी की, चित्रीकरणाच्या काळात लेखक मारिओ पुझोची सल्लागार म्हणून मानधन देऊन खास नेमणूक करण्यात आली होती. मारिओ पुझोची ‘गॉडफादर’ ही कादंबरी १९६९ साली प्रकाशित झाली. अल्पावधीत ती बेस्ट सेलर ठरली. ‘न्यूयॉर्क टाइम्स’च्या बेस्ट सेलर यादीत तब्बल ६७ आठवडे ती विराजमान झाली होती. हा काही चमत्कार नव्हता. त्यासाठी कारणीभूत होता मारिओ पुझोचा ध्यास, अभ्यास व कठोर मेहनत! या कादंबरीसाठी त्याने पत्रकाराप्रमाणे भटकंती केली व आधीच्या दोन कादंबऱ्या प्रकाशित झाल्या असतानाही सर्वोत्कृष्ट लेखनाचे धडेही गिरवले.
या कादंबरीच्या मलपृष्ठावर NEET चे वचन छापलेले आहे.. ‘Behind Every Great Fortune There Is A Crime’.१९७३ साली नाटककार विजय तेंडुलकरांना दिल्लीस्थित संस्थेकडून शिष्यवृत्ती मिळाली होती. संस्थेने विषय कळवायला सांगितले होते. तेंडुलकरांनी विषय कळवला- ‘माणसातली गुन्हेगारी प्रवृत्ती’! नंतरच्या काळात समोर आलेले गुन्हेगारीचे रूप, त्याचे बदलते परिमाण हे आजही दिसत आहेत.. जे मारिओ पुझो आणि तेंडुलकर यांची अभ्यासू वृत्ती आणि त्यांनी दूरदृष्टीने घेतलेला सामाजिक वास्तवाचा वेध यांची आठवण करून देतात. – यशवंत विसपुते, कोपरगाव, नगर
पहिले पाढे पंचावन्न!

२० मार्चच्या ‘लोकरंग’मध्ये ‘आयुष्य तेच आहे, पण..!’ या डॉ. शरद वर्दे यांच्या लेखात करोना, लॉकडाऊन व नंतरच्या परिस्थितीचा घेतलेला जागतिक आढावा अगदी योग्यच! करोना या सूक्ष्म व्हायरसने जगभरात दाणादाण उडवून दिली व मानवी जीवन किती क्षणभंगुर आहे याची जाणीव करून दिली. तत्पूर्वी ‘लॉकडाऊन’ हा शब्द कोणालाही माहीत नव्हता. पण या काळात स्वच्छतेच्या सवयी काही अंशी लोकांना लागल्या, नियमांचे पालन कसे करावे हे समजले. काही व्यक्ती व संस्थांनी लोकांना मदत केली, तर काहींनी लूटमार! संकटकाळातही अनेक गोष्टींचे राजकारण झाले. काही कुटुंबांतून झालेली जीवितहानी भरून निघणारी नाही. त्या काळात मदत करण्याबाबत मेसेज येत होते, पण तरीही मदतीची भावना कमी झाल्याचे जाणवले. निर्बंध असतानाही नियम धाब्यावर बसवण्याचे प्रकार होत होते.त्याचप्रमाणे आता करोना कमी झाल्यावर पुन्हा सर्वच बाबतींत पहिले पाढे पंचावन्न झाले आहेत. – अर्चना काळे, सातपूर, नाशिक

documentary on mangroves of maharashtra
आम्ही डॉक्युमेण्ट्रीवाले : पावलोपावली नवशिक्षण
loksabha election 2024 Peoples issues banished from campaigning in Vidarbha
विदर्भात जनसामान्यांचे प्रश्न प्रचारातून हद्दपार
lokmanas
लोकमानस: महाराष्ट्रधर्म राजकारणापुरताच मर्यादित नाही!
raj thackray mns latest news
अग्रलेख: मनसबदारच..