मुलायम आवाजाचा धनी

१९६६ साल असावं ते. आमच्या एका मित्राच्या घरी त्याच्या आमंत्रणावरून आम्ही दोन-तीन कुटुंबंच जमलो होतो.

(संग्रहित छायाचित्र)

कुलवंतसिंग कोहली

‘‘पुत्रा, ये रियाजम् छोडी ना। बिल्कुल छोडी ना। मी खूप गायक ऐकलेत, पण तुझ्यासारखा आवाज खूप कमी जणांना रबम्ने दिलाय. कुलवंत, देखियो क्या मिठास है, क्या गेहराई है और कितनी समझ है इसके गाने में। वाह वा, वाह वा।’’

खुद्द राज कपूरजींचे उद्गार होते हे!

१९६६ साल असावं ते. आमच्या एका मित्राच्या घरी त्याच्या आमंत्रणावरून आम्ही दोन-तीन कुटुंबंच जमलो होतो. छानशी पार्टी जमली होती. मी माझ्या पत्नीसह हॉटेलमधलं काम निपटवून थोडासा उशिरा पोहोचलो होतो. माटुंग्याला होती ती पार्टी. त्या घरातील हॉलच्या एका भिंतीपासून दुसऱ्या भिंतीपर्यंत कार्पेट अंथरलं होतं. राजजी, कृष्णाजी, माझे काही मित्र खालीच बसले होते आणि भिंतीला टेकून एक वीस-बावीस वर्षांचा, थ्री पीस सूट घातलेला तरुण हार्मोनिअम वाजवत गजल गात होता. त्याच्या आवाजानं सारा माहौल भारून गेला होता. कधी डोळे मिटून, कधी डोळे उघडे ठेवून तो गात होता. त्या डोळ्यांत विलक्षण चमक दिसत होती. त्याचे डोळे उघडे असले तरीही त्या डोळ्यांत समोरच्या व्यक्ती दिसत नसणार त्याला, इतका तो त्या गाण्यांत हरवून गेला होता. त्याचं अंतर्मन गजलेच्या, गीताच्या अर्थाला संपूर्ण क्षमतेनं स्वरांत पकडण्यासाठी प्रयत्न करत होतं. तो त्या शब्दांशी, त्या शब्दांतून व्यक्त होणाऱ्या अर्थाशी एकरूप झाला होता. सारेच त्याच्या गजल गायकीनं थक्क झाले होते. एका बाजूला जेवण मांडलं होतं. पण त्या जेवणाकडे कोणाचंच लक्ष नव्हतं. शेवटी रात्रीचे दोन अडीच वाजले. तेव्हा कुठे राजजी भानावर आले. खुशीत त्या मुलाला म्हणाले, ‘‘बेटा, रियाज सोडू नकोस. एक दिवस तू हिंदुस्थानचा सर्वात मोठा गजल गायक होशील. मेरी दुवाएँ तुम्हारे साथ है।’’

मी मित्राजवळ त्या गायकाची चौकशी केली. तो नुकताच कुरूक्षेत्र विद्यापीठातून आलेला गायक होता. जगजीत सिंग धीमन त्याचं नाव! जगजीत सिंगनं सर्वाचंच लक्ष वेधून घेतलं होतं. मी जगजीतकडे त्याची सर्व चौकशी केली. तो म्हणाला, ‘‘मी शेरे पंजाब हॉस्टेलवर सध्या राहतोय.’’ आर्थिक परिस्थिती खूप बिकट होती त्याची. त्याला मुंबईत येऊन त्याची करिअर घडवायची होती, पण नशीब फारशी साथ देत नव्हतं. कशीबशी गुजराण करत होता तो. अगदी दोन वेळच्या जेवणाची मारामार होती त्याची. त्याच्या एकूण नम्रतेनं माझ्या मनावर प्रभाव टाकला. मी त्याचं मन दुखावणार नाही अशा बेतानं त्याला हळूच म्हणालो, ‘‘तुला फारशी अडचण वाटणार नसेल तर आमच्या दादरच्या ‘प्रीतम हॉटेल’मध्ये तू रोज जेवायला येत जा. त्या जेवणाचे पैसे द्यायची गरज नाही.’’ त्याच्या डोळ्यांत एक दिलासा चमकून गेला.

मी उत्तररात्री घरी परतलो. सकाळी पापाजींना सगळं सांगितलं. मी जरी जगजीतला आमच्याकडे जेव असं सांगितलं होतं, तरीही पापाजींची मान्यता हवी होती. अर्थातच त्यांनी होकार दिला. मला म्हणाले, ‘‘नेक काम केलंस.’’ दुसऱ्या दिवशी संध्याकाळी आठच्या सुमारास जगजीत ‘प्रीतम’मध्ये आला. मी त्याला घेऊन पापाजींकडे गेलो. पण त्याला बघता क्षणीच पापाजी भडकले, ‘‘अरे, तू कसला शीख? वाहे गुरूंच्या शिकवणीविरुद्ध वागणारा माणूस आहेस तू. तुझा फेटा कुठाय, दाढी कुठाय?’’ जगजीत हिरमुसला. त्याच्या चेहऱ्यावर वेदना उमटली. पापाजींचा राग थोडा शांत झाल्यावर मी जगजीतला विचारलं, ‘‘तू फेटा, दाढी का काढलीस?’’ तो पापाजींची नजर चुकवत म्हणाला, ‘‘मी मुंबईत आल्यावर दाढी, फेटा काढला. एच.एम.व्ही.नं माझी रेकॉर्ड काढायचं ठरवलं. त्या वेळी एक दाढीवाला, फेटाधारी शीख माणूस कोमल गजल गातोय हे चित्र काहीसं विचित्र दिसेल असं एक जण मला म्हणाला. म्हणून त्या रेकॉर्डच्या कव्हरवर माझा फोटो टाकण्यासाठी मला फेटय़ाला व दाढीला तिलांजली द्यावी लागली. पापाजी, तुम्ही आत्ता रागावलात ना, तसेच माझे वडीलही माझ्यावर रागावले. पण काय करणार? या शहरात जगायचंय, रोजीरोटी कमवायचीय, पण त्याहूनही मोठी गोष्ट म्हणजे संगीताची सेवा करायचीय. म्हणून हे केलं. आज आप खम्फम हो गये, गुस्सा किया, बस आपने मेरे पापाजीकी याद दिला दी. मला मुंबईत माझे पापाजी मिळाले, असं रागावून दूर करू नका.’’ त्याच्या आवाजातली नम्रता आणि बोलण्यातला प्रामाणिकपणा पापाजींना आवडून गेला.

त्यानंतर जवळपास सहा महिने तरी जगजीत ‘प्रीतम’मध्ये दररोज संध्याकाळी जेवायला यायचा. शांतपणे यायचा, जेवायचा आणि निघून जायचा. काऊंटरवर पापाजी असले, तर तो दूर उभा राहायचा. त्यांचं लक्ष गेलं की, ते जगजीतला हाक द्यायचे. तो पैरीपोना करायचा. ते त्याला फेटा व दाढीवरून एकदा तरी ऐकवायचे. मग प्रेमानं त्याच्या पाठीवर थाप मारून त्याला जेऊ  घालायचे. सहा-सात महिन्यांनी एका संध्याकाळी जगजीत माझ्याकडे आला, ‘‘कुलवंतजी, मी उद्यापासून जेवायला येणार नाही. मी आता या शहरात जगू शकतो. तुमच्यामुळे माझे काही महिने आनंदात गेले. मी ही गोष्ट कधीच विसरणार नाही. तुमचं हे ऋण मी कसं फेडू, मला कळत नाही. माझ्याकडे पैसे जमा झाले, की मी या जेवणाचे पैसे तुम्हाला देईन.’’ ‘‘जगजीत, अरे ही काय आभार मानायची गोष्ट आहे का? मला जे शक्य होतं ते मी केलं. मला खात्री वाटते, की उद्या तूही एखाद्या गरजवंताला तुझ्या ऐपतीप्रमाणे नक्की मदत करशील. जेव्हा तू अशी मदत करशील ना, तेव्हा त्या पैशांची परतफेड आपोआप होईल.’’

जगजीतचा आवाज आणि त्याची संगीतसाधना पाहून मी आमच्या पंजाबी असोसिएशनला म्हणालो, ‘‘आपण जगजीतला बैसाखीची तयारी करायला देऊ. तो पंजाबातून, देशभरातून येणाऱ्या कलाकारांना प्रत्यक्ष शोसाठी तयार करील. आपण त्याला त्याचे पैसे देऊ.’’ सर्वानी ही सूचना मान्य केली. त्यानंतर कितीतरी र्वष जगजीत देशभरातून येणाऱ्या कलाकारांकडून बैसाखीची तयारी करून घेत राहिला. त्याला मार्गदर्शन करायला रवीजी (संगीतकार रवी) होतेच. बैसाखीच्या आधीपासून तो ही तयारी करून घेत असे. जवळपास दहा दिवस तो ही मेहनत करत असे. त्यासाठी आम्ही त्याला दोन वेळचं जेवण आणि पाचशे रुपये देत असू. काही वर्षांतच तो मोठा झाला, नावारूपाला आला; पण त्यानं बैसाखीला येणं, तयारी करून घेणं सोडलं नाही. नावारूपाला आल्यानंतर त्यानं बैसाखीच्या तयारीचं मानधन घेणं बंद केलं. १९७३-७४च्या सुमारास मीच त्याला म्हणालो, ‘‘जगजीत, तू आता तयारी करून घेऊ  नकोस. त्यासाठी तुझा वेळ फुकट घालवू नकोस.’’ तो म्हणाला, ‘‘कुलवंतजी, हा वेळ फुकट कसा जाईल? ज्या संस्थेनं या शहरात उभं राहायला मला मदत केली, तिचा उतराई होण्याची ही संधी मी कशी सोडू?’’ त्यानंतरही काही र्वष तो तयारी करून घेत असे. नंतर जगजीत बैसाखीचे तीन दिवस पंजाबी असोसिएशनसाठी बाजूला ठेवत असे व बैसाखीच्या रात्री दिलसे गात असे.

त्याची माझी दोस्ती झाली. कित्येकदा तो ‘प्रीतम’मध्ये येऊन बसे. जेवत असे. गप्पा मारत बसे. त्याची विनोदबुद्धी जबरदस्त होती. तो काही क्षणांत समोरच्याच्या मनाचा ताबा घेत असे. लहान-थोर, गरीब-श्रीमंत सारेच त्याला एकसारखे होते. एका निवांत गप्पांच्या क्षणी जगजीतनं त्याचं मन माझ्याकडे मोकळं केलं, ‘‘कुलवंतजी, मी खात्यापित्या घरचा आहे. माझे पापाजी सरकारी सव्‍‌र्हेअर होते. ते सुंदर गात असत. गंगापूरच्या गुरुद्वारात ते शबद कीर्तन करत असत. माझी आईही श्रद्धाळू आहे. पापाजी देखणे आहेत आणि बिजीही सुंदर आहे. तिच्या प्रेमात पडून पापाजींनी तिच्याशी विवाह केला होता.’’ जगजीतला एकूण दहा भावंडं होती. त्यातली चार लहानपणीच मरण पावली, सात राहिली. त्यातला एक जगजीत. जगजीत लहानपणापासून अतिशय खोडकर होता, मस्तीखोर होता. ‘‘कुलवंतजी, मी फारसा हुशार नव्हतो. माझं सारं लक्ष गाण्यात होतं. पापाजींनी मला गाणं शिकायला पं. छगनलाल शर्माकडे पाठवलं. ते अंध होते, पण संगीताची अद्भुत दृष्टी त्यांना लाभली होती. ते फक्त शास्त्रीय संगीत शिकवत आणि मला सर्व प्रकारचं गाणं आवडे. चित्रपट संगीत तर फारच प्रिय! सैगलसाहेब, रफीसाहेब, तलतजी, किशोरदा, लतादीदी, आशाजी सारेच माझ्या आवडीचे. त्यांची गाणी ऐकायला म्हणून मी शाळा बुडवून सिनेमे बघायला जात असे. त्याकरता पैशाचा जुगाड करावा लागे. पण मी तो करत असे. एकदा गुरुजी दूर आहेत हे पाहून मी माझ्या मित्राला तबला वाजवायला सांगितला व मी हार्मोनियमवर गाऊ  लागलो- ‘तू प्यार का सागर है।’ गुरुजींच्या कानावर आवाज गेला. ते भडकले. ते पायात खडावा घालत असत. त्यांनी एक खडावा हातात घेतली आणि आवाजाच्या दिशेनं नेम धरून मारली. माझं गाणं बंद झालं. त्यांच्यासमोर येणारा माझा आवाज बंद झाला, पण ते माझ्या मनात वाहणारं गाणं थोडंच थांबवू शकणार होते. नंतर पापाजींनी मला शबद कीर्तन नीट गाता यावं म्हणून उस्ताद जमाल खाँसाहेबांकडे पाठवलं. त्यांनी मला ध्रुपद गायकी, टप्पा, ठुमरी आदी प्रकार शिकवले.’’

जगजीतच्या पापाजींची इच्छा होती, की त्याने गावं, पण आयएएसदेखील व्हावं. म्हणून त्याला आधी जालंधरला डी.ए.व्ही. कॉलेजमध्ये आणि नंतर कुरूक्षेत्र विद्यापीठात एम.ए. करण्यासाठी पाठवलं. जालंधरला गेल्यावर जगजीतच्या प्रतिभेला नवे धुमारे फुटले. तिथं तो ऑल इंडिया रेडिओवर जाऊ  लागला. ‘‘कुलवंतजी, त्या वेळी गंमत झाली. रेडिओने मला शास्त्रीय गायक म्हणून निवडलं. पण सुगम संगीत गाण्यासाठी मला नाकारलं. तरीही मी गात राहिलो. हॉस्टेलवर भल्या पहाटे पाचपासून माझा रियाज चालायचा. माझ्या जवळच्या रूममध्ये राहायला कोणी तयार नसायचं, त्यांना माझ्या आवाजाचा त्रास व्हायचा. मी त्यांना पकडून पकडून गाणं ऐकवायचो, तर ते पळून जायचे. मी त्यांना म्हणायचो, आज फुकट ऐका; उद्या तुम्हाला पैसे देऊन माझं गाणं ऐकायला लागेल!’’ जगजीतचं हे सांगणं गमतीचं होतं. त्याचा एक बॅचमेट मला म्हणाला, ‘‘जगजीत हार्मोनियम घेऊन हॉस्टेलच्या गॅलरीत बसून रियाज करायचा, तर सारं हॉस्टेल खाली उभं राहून त्याचं गाणं ऐकायचं!’’

‘‘मैं जलंदर में अब छोटे छोटे प्रोग्राम करने लगा. एका कार्यक्रमात महान कलाकार ओमप्रकाशजींनी माझं गाणं ऐकलं. ते खूप खूश झाले. मला म्हणाले, ‘तू मुंबईला ये. तुझ्या कलेचं सोनं होईल.’ पडत्या फळाची आज्ञा समजून मी १९६१ मध्ये पहिल्यांदा मुंबईत आलो. ओमप्रकाशजींकडे गेलो. ते मला मदनमोहन, जयदेव, शंकर-जयकिशनसारख्या संगीतकारांकडे घेऊन गेले. पण माझी डाळ शिजली नाही. मी परत जालंदरला गेलो. शिक्षण पूर्ण केलं. एम.ए.साठी कुरूक्षेत्र विद्यापीठात प्रवेश घेतला. पण माझ्या स्वप्नातली मुंबई मला हाक देत होती. माझा सायकल दुकान चालवणारा एक दोस्त होता- हरदमनसिंग भोगल. त्याला माझं गाणं आवडायचं. तो मला सांगायचा, ‘जा मुंबईत, तुझी स्वप्नं पूर्ण कर. मी तुला महिन्याला पैसे पाठवत जाईन.’ आणि एका रात्री घरच्या कोणालाही न सांगता मी मुंबईत पळून आलो. माझं नशीब शोधत राहिलो. तुमच्यासारखे स्नेही मार्गदर्शन करायला मिळाले आणि एकदाचा मी संगीतसागराचा किनारा गाठला. त्या किनाऱ्यावर पोहोचल्यावर मग समोरच्या त्या सागरात दररोज डुबकी मारायची, जे जे मोती गवसतील ते ते वेचत राहायचे, त्यांची मौक्तिकमाला गुंफायची आणि ती रसिकाच्या चरणी वाहायची, एवढंच मी केलं.’’

जगजीत हळूहळू मुंबईत स्थिरावला. एके दिवशी माझ्याकडे बातमी आली, की त्यानं चित्रा दत्ता नावाच्या मुलीशी लग्न केलं. मी मनात म्हणालो, चला बरं झालं. ते दोघं एकत्र गजलगायनाचे कार्यक्रम करू लागले. त्यांचं नाव होऊ  लागलं. जगजीत कधीतरी एकदा माझ्याकडे आला. ‘‘कुलवंतजी, मी लग्न केलंय चित्रा दत्ताशी.’’ ‘‘बधाई हो, जगजीत! चल, तू आता सेटल झालास.’’ ‘‘कुलवंतजी, बऱ्याचदा रेकॉर्डिगसाठी मी देबू दत्तासाहेबांकडे जायचो. तिथं चित्राजींशी माझी भेट झाली. तुम्हाला गंमत सांगू, आज जरी त्या माझी पत्नी असल्या तरी त्यांनी सुरुवातीला माझ्यासोबत गायला नकार दिला होता. मी इथून तिथं, तिथून इथं असा गाण्याच्या मैफिली करत असे. त्यामुळे कित्येकदा माझी झोप पुरी होत नसे. चित्राजी तोवर ‘जिंगल क्वीन’ म्हणून ओळखल्या जाऊ  लागल्या होत्या. मोहिंदरसिंग यांच्या एका रिहर्सलसाठी मी देबू दत्तासाहेबांकडे गेलो. दरवाजावरची बेल वाजवली आणि चौकटीवर हात ठेवून मी उभ्या उभ्या झोपलो! चित्राजींनी दरवाजा उघडल्यावर हसून मी आत गेलो. माझ्या रिहर्सलला वेळ होता आणि मला झोपही अनावर झाली होती. मी एका कोपऱ्यात झोपून गेलो. तासा-दोन तासांनी मला उठवलं गेलं. चित्राजींसोबत मी गाणार होतो. झोपेतून उठल्यामुळे आवाज जडावला होता, त्यात मी खर्जातून गातो. माझा आवाज ऐकताक्षणी चित्राजींनी मोहिंदरसिंगजींना सांगितलं, ‘मी याच्याबरोबर गाणार नाही. याचा आवाज किती जाडा आणि खोल आहे! माझा आवाज स्त्रीसुलभ पातळ आहे. हे मिसमॅच होईल.’ त्या गायल्या नाहीत. नंतर दुसऱ्या एका ठिकाणी रिहर्सल झाल्यावर त्या घरी जायला निघाल्या. मला त्यांनी विचारलं, ‘तू कुठे राहतोस?’ मी म्हणालो, ‘शेरे पंजाब हॉस्टेलवर.’ ‘माझ्याकडे गाडी आहे, चल मी तुला सोडते. पण आधी मी घरी उतरेन व नंतर तू जा.’ – त्यांच्या घराजवळ आल्यावर त्या म्हणाल्या, ‘चहा घेऊन जाशील का?’ मी हो म्हणालो. त्यांच्या घरी गेलो. त्या चहा करायला स्वयंपाकघरात गेल्या. जवळच हार्मोनियम ठेवलेला मला दिसला. मला राहवेना, माझी बोटं त्याच्यावरून फिरायला लागली. डोळे मिटले गेले, मी गाऊ लागलो. माझं गाणं ऐकून चित्राजी आल्या. ऐकत राहिल्या. आत चहा उतू गेला आणि इथं मन उतू गेलं! त्यांनी माझ्याबरोबर मोहिंदरसिंगचं गाणं गायलं. आमची मनं जुळली, नंतर आम्ही लग्न केलं. बस्स!’’

जगजीत सिंग हा कोणाचंही ऋण कधीही विसरत नसे. आम्ही नंतर गुरू नानक हॉस्पिटलचा प्रकल्प हाती घेतला. त्याच्यासाठी देणग्या गोळा करायला आम्ही लंडनमध्ये जगजीतचा एक कार्यक्रम ठेवला. तिथं मला त्याच्या लोकप्रियतेची खरी कल्पना आली. तो गाताना रसिक दहा-दहा पौंडांच्या नोटा घेऊन येत, त्याच्यावर ओवाळून नंतर दोन्ही हातांमध्ये त्या नोटा धरून नम्रपणे त्याला अर्पण करत. त्या सर्व नोटा आणि त्या कार्यक्रमाचं सर्व उत्पन्न, स्वत: एकही पै न घेता जगजीतने हॉस्पिटलसाठी न मोजता देऊन टाकलं. आमचा खूप भार हलका झाला त्या वेळी.

जगजीत व चित्राच्या सुखी संसारावर खरी आपत्ती ओढावली ती त्यांच्या मुलाच्या- विवेकच्या अपघाती निधनाची. चित्रा तर कोसळली, तिनं गाणं बंद केलं. तोही वर्षभर गात नव्हता. नंतर पुन्हा हळूहळू त्यानं गाणं सुरू केलं. त्याचे रसिक त्याची वाट बघत होते. ‘गजल किंग’ होता तो!

नव्या सहस्रकाच्या सुरुवातीस त्याला भारताच्या पंतप्रधानांची- आदरणीय अटलबिहारी वाजपेयीजींची गीतं गायची संधी मिळाली. त्या अल्बमच्या प्रकाशनासाठी मी गेलो होतो. खुद्द वाजपेयीजी म्हणाले होते, ‘‘मी जगजीत सिंगजींच्या आवाजाचा फॅन आहे! पूर्वी मी गर्दीत उभं राहून त्यांचं गाणं ऐकलंय. माझं भाग्य, आज माझ्या कवितांना त्यांचा आवाज लाभलाय!’’

तो गुलामअली साहेबांबरोबर गजलांचा कार्यक्रम करणार होता, परंतु अचानक त्याच्यावर मृत्यूचा घाला पडला. तो आपल्याला सोडून गेला. त्याच्या नावे पोस्टाचा स्टॅम्प असावा यासाठी आम्ही काही जणांनी प्रयत्न केले. त्या वेळी आदरणीय डॉ. मनमोहन सिंगजी पंतप्रधान होते. त्यांच्या हस्ते स्टॅम्प प्रकाशित व्हावा म्हणून मी त्यांना भेटलो. त्यांनीही आदरानं मान्यता दिली आणि ते स्वत:च्या घरात प्रकाशित केले. त्या वेळी डॉ. मनमोहन सिंग म्हणाले, ‘‘मी जगजीत सिंगजींच्या आवाजाचा फॅन आहे. आज त्यांच्या नावाचा स्टॅम्प माझ्या हस्ते निघतोय, हे माझं भाग्य आहे!’’

दोन पंतप्रधानांना आणि करोडो रसिकांना त्याचा आवाज ऐकणं हे भाग्याचं वाटलं. जगजीत सिंग हा माझा मित्र होता. मग माझं भाग्य किती थोर!

ksk@pritamhotels.com

* शब्दांकन : नीतिन आरेकर

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व ये है मुंबई मेरी जान! बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Article about soft sound rich jagjit singh dhiman

ताज्या बातम्या