राजकीय मतभेद असले तरी जयललिता आणि नरेंद्र मोदी चांगले मित्र आहेत असे वक्तव्य करणारे अण्णा द्रमुकचे माजी खासदार के मलयसामी यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे. पक्षशिस्तीचा भंग करून प्रतिमा खराब केल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. लोकसभेचे निकाल जाहीर झाल्यावर अण्णा द्रमुक महत्त्वाची भूमिका बजावेल असे भाकित त्यांनी वर्तवले होते. अण्णा द्रमुकच्या सर्वेसर्वा जयललिता यांनी निकालापर्यंत कोणतीही प्रतिक्रिया देणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. माजी प्रशासकीय अधिकारी असलेल्या मलयसामी यांनी बुधवारी अण्णा द्रमुक रालोआला पाठिंबा देईल असे संकेत दिले होते. त्यावरून पक्षाने हकालपट्टी केली.
फेरमतदानास ‘शून्य’ प्रतिसाद
कोहिमा : नागालँडमधील वोखा मतदारसंघातील पाच मतदान केंद्रांवर फेरमतदानात एकही मत टाकले गेले नाही. मतदानावर बहिष्कार टाकण्याचे कारण समजू शकले नाही. मात्र निवडणूक आयोगाने घेण्याचे कारण काय यावरून स्थानिक संतापले होते.
जवळपास सहा मतदान केंद्रांवर फेरमतदानाचा आदेश देण्यात आला होता. ९ एप्रिलला झालेल्या मतदानात बोगस मतदान झाल्याचा आरोप काँग्रेसने केला होता. १३०० मतदान केंद्रांवर फेरमतदान घेण्यात यावे, अशी मागणीही केली होती. सत्तारूढ नागा पीपल्स फ्रंटने निवडणूक आयोगाच्या फेरमतदानाच्या निर्णयावर नाराजी व्यक्त केली होती. काँग्रेसच्या इशाऱ्याप्रमाणे आयोग कृती करत असल्याचा त्यांनी आरोप केला होता.