13 July 2020

News Flash

बालेकिल्ल्यासाठी सेनेची बाहेरील रसदीवर भिस्त!

शिवसेनेसाठी ‘गद्दारी’ची परंपरा असलेल्या परभणी मतदारसंघात राष्ट्रवादीच्या विजय भांबळे यांनी महायुतीच्या संजय जाधव यांच्यापुढे कडवे आव्हान उभे केले आहे.

| April 9, 2014 02:27 am

शिवसेनेसाठी ‘गद्दारी’ची परंपरा असलेल्या परभणी मतदारसंघात राष्ट्रवादीच्या विजय भांबळे यांनी महायुतीच्या संजय जाधव यांच्यापुढे कडवे आव्हान उभे केले आहे. शिवसनिकांचा जुना उत्साह ओसरल्यामुळे नरेंद्र मोदी यांची लाट आणि आमदार रामप्रसाद बोर्डीकर, सुरेश वरपूडकर, सीताराम घनदाट यांच्याच ‘पक्ष-निरपेक्ष’ सहकाऱ्यावर शिवसेनेची भिस्त आहे.
परभणी मतदारसंघात १९८९ पासून सेनेचे वर्चस्व आहे. गेल्या २५ वर्षांत सेनेने या मतदारसंघात कोणतेही भरीव काम केले नाही. पैकीगेल्या १० वर्षांत या ना त्या कारणाने सेनेला काँग्रेस-राष्ट्रवादीचे बळ मिळाले. विधानसभेला उमेदवार काँग्रेसचा असतो, त्यामुळे राष्ट्रवादीचे लोक सेनेला मदत करतात आणि लोकसभेला उमेदवार राष्ट्रवादीचा, त्यामुळे काँग्रेसचे लोक सेनेलाच मदत करतात. या वेळी पहिल्यांदाच काँग्रेस राष्ट्रवादीच्या उमेदवारासाठी झपाटय़ाने कामाला लागली आहे. बोर्डीकर यांचा अपवाद वगळता काँग्रेस जिल्हाध्यक्ष सुरेश देशमुख यांनी त्यांचा सर्व संच भांबळे यांच्या पाठीशी उभा केला.
 एकीकडे मोदी लाटेचे मतांमध्ये रूपांतर होईल, अशी अपेक्षा आणि दुसरीकडे बाहेरच्या पक्षांकडून अपेक्षित असलेली रसद यावरच सध्या सेनेचा डोलारा अवलंबून आहे. प्रामाणिक व निष्ठावान शिवसनिकांपेक्षाही बोर्डीकर, घनदाट व पडद्याआडून वरपूडकर यांची होणारी मदत सध्या सेनेच्या उमेदवाराला जास्त लाभदायी ठरेल, असे वाटू लागले आहे.
सलग ३ निवडणुकांत राष्ट्रवादीच्या वरपूडकर यांनी पराभव स्वीकारला. या वेळी मात्र वरपूडकरांपेक्षा किती तरी सरस अशी भांबळे यांची उमेदवारी आहे. काँग्रेसचे सहकार्य व दुसरीकडे सेनेची खरी ताकद असलेल्या तरुण वर्गातही शिरकाव ही भांबळे यांच्यासाठी जमेची बाजू आहे. प्रत्येक वेळी राष्ट्रवादीची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर आता सेनाच खात्रीने येणार असे सहज बोलले जायचे. या निवडणुकीत तशी खात्री कोणालाही देता येत नाही, इतपत आव्हान भांबळे यांनी उभे केले.  भाकपचे राजन क्षीरसागर हेही िरगणात आहेत. आजवर शेतकरी-शेतमजूर, बेरोजगारांसाठी उभारलेल्या चळवळीची पाश्र्वभूमी त्यांना आहे. परभणी मतदारसंघात दलित-मुस्लिम मतांचे प्राबल्य मोठे आहे. या मतांची विभागणी होण्याची शक्यता नसल्याने येथील लढत ही थेट आहे. सेनेला बालेकिल्ल्याची इभ्रत राखण्यासाठी कडवी झुंज द्यावी लागेल, अशी स्थिती आहे.

किती दिवस लोकांना मूर्ख बनवणार? – भांबळे
गेल्या २५ वर्षांपासून परभणीत शिवसेनेचा खासदार आहे. एकही भरीव काम झाले नाही. खासदारकीसाठी उभे असलेल्या सेनेच्या उमेदवाराने स्वत:ची संपत्ती वाढविण्यापलीकडे दुसरे काही केले नाही. लोकांना आता परिवर्तन हवे. किती दिवस लोकांना मूर्ख बनवणार?

धनशक्ती विरुद्ध जनशक्ती- जाधव
जिल्ह्य़ात राष्ट्रवादीने विकासाच्या नावाखाली सर्वसामान्य माणसांना देशोधडीला लावले. चांगल्या अधिकाऱ्यांना जि. प. तून याच लोकांनी घालवले. धनशक्ती विरुद्ध जनशक्ती अशी लढत आहे. या लढतीत जनता सेनेच्या पाठीशी आहे.

एकाच नाण्याच्या दोन बाजू- राजन क्षीरसागर
राष्ट्रवादी व सेनेचे उमेदवार एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. सेनेचे आधीचे खासदार निवडून आल्यानंतर काँग्रेस-राष्ट्रवादीत गेले. पण त्यांचा सध्याचा उमेदवार आधीच काँग्रेस-राष्ट्रवादीसाठी उपकृत आहे. दुसरीकडे राष्ट्रवादीला भ्रष्टाचाराशिवाय दुसरे काही माहीत नाही.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 9, 2014 2:27 am

Web Title: first time shiv sena face big challenge in parbhani constituency
Next Stories
1 नागरी जबाबदारी पाळायला हवी
2 ठाणे राखण्यासाठी वसईचा तह दादा आणि अप्पांमध्ये दिलजमाई..!
3 अपमान किती सहन करणार? मुख्यमंत्र्यांचा शिवसेनेला चिमटा
Just Now!
X