नरेंद्र मोदी आणि केंद्रीय मंत्री डॉ. फारुख अब्दुल्ला आणि त्यांचे पुत्र व जम्मू-काश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांच्यात शाब्दिक खडाजंगी उडाली आहे. भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांना जे मतदान करतील त्यांना समुद्रात बुडविले पाहिजे, असे वक्तव्य करणाऱ्या डॉ. फारुक अब्दुल्ला यांच्यावर मोदी यांनी सडकून टीका केली आहे. धर्माच्या नावाखाली काश्मिरी पंडितांना पलायन करावे लागणे हा धर्मनिरपेक्षतेवर बसलेला सर्वात मोठा आघात आहे, असे मोदी यांनी म्हटले आहे.
घटनेतील कलम ३७०ने जम्मू-काश्मीरला विशेष दर्जा दिला असून ते कलमच रद्द करण्याचा मोदी यांचा डाव आहे, असा आरोप फारुख आणि ओमर अब्दुल्ला या पितापुत्रांनी केला आहे. राज्यातील जनतेला हे कधीही मान्य होणार नाही, असेही त्यांनी म्हटले आहे.
मते मागण्यासाठी काश्मीरमध्ये येण्याचे आपल्यात धाडस नाही, आपल्याला केवळ पंतप्रधान व्हावयाचे आहे, असे ओमर अब्दुल्ला यांनी म्हटले आहे. आपण जम्मू, लडाखला जाऊ शकाल परंतु खोऱ्यात येऊ शकणार नाहीत. ज्या पद्धतीने आपण येथील जनतेला बदनाम करण्याचा प्रयत्न केला त्यामुळे त्यांच्या हृदयात आपल्यासाठी स्थान नाही, असेही ओमर यांनी म्हटले आहे.
समुद्रात जर कोणाला बुडवायचेच असेल तर प्रथम आपण आपला चेहरा आरशात पाहा. आपल्या वडिलांचा चेहरा आरशासमोर ठेवा आणि प्रश्न विचारा, ज्यांनी काश्मिरी पंडितांना हुसकावून लावले त्यांना जातीयवादाबद्दल बोलण्याचा अधिकारच नाही, असेही मोदी म्हणाले. धर्मनिरपेक्षता ही भारताची अनेक युगांची परंपरा आहे आणि तेच भारताचे उत्तम धोरण आहे, आपण सर्वाना बरोबर घेऊन सर्वाचाच विकास करणार आहोत, असेही मोदी म्हणाले.
धर्माच्या नावाखाली काश्मिरी पंडितांना तेथून हुसकावून लावण्यात आले असा काश्मीर हा भारतातील एकमेव प्रांत आहे. स्वहितासाठी आपण त्या भूमीला जातीय रंग दिला आहे, असा हल्लाही त्यांनी चढविला.

वैयक्तिक आकस नाही
श्रीनगर : नरेंद्र मोदी यांच्याबद्दल आपल्या मनात वैयक्तिक आकस नाही, मात्र जम्मू-काश्मीर आणि मुस्लिमांबाबत त्यांच्या भूमिकेविषयी आपण साशंक आहोत, असे केंद्रीय मंत्री डॉ. फारुख अब्दुल्ला यांनी म्हटले आहे. आम्ही त्यांच्याविरोधात नाही तर त्यांच्या हेतूंच्या विरोधात आहोत, कलम ३७० रद्द करणे हा त्यांचा प्रमुख हेतू आहे, मात्र येथील जनतेला ते कधीही मान्य होणार नाही, असेही डॉ. अब्दुल्ला म्हणाले.