पंतप्रधानपदासाठी विशिष्ट व्यक्ती डोळ्यासमोर ठेवून घोषणा करण्याची भाजपची चाल घटनाबाह्य़ आहे, असे सांगत आपल्या पक्षाच्या संसद सदस्यांनी पंतप्रधानपदी आपली निवड केली तर ती जबाबदारी स्वीकारण्यास कचरणार नाही, याचा पुनरुच्चार काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी एका वृत्तवाहिनीस मुलाखत देताना केला. त्याचवेळी गुजरातमध्ये विशिष्ट उद्योगगटाच्याच व्यक्तींना झुकते माप दिले जात असल्याचाही आरोप राहुल यांनी केला.
निवडणूक निकालासंबंधी जनमतचाचण्यांद्वारे जाहीर झालेले निष्कर्ष खोटे ठरून युपीएच पुन्हा सत्तारूढ होईल, असाही विश्वास राहुल गांधी यांनी व्यक्त केला. गुजरातमधील एक विशिष्ट उद्योगसमूह मोदी यांच्या अत्यंत निकटचा असल्याचा आरोप करून या समूहास बडोद्याच्या क्षेत्रफळाची जमीन नाममात्र दराने देण्यात आल्याचे राहुल यांनी नमूद केले. याच समूहास मुंबईच्या किनारपट्टीएवढी गुजरातच्या किनारपट्टीची जमीन बहाल करण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले. राहुल गांधी यांनी असे आरोप केल्यामुळे काँग्रेस व भाजप यांच्यात पुन्हा एकदा वागयुद्ध छेडले जाण्याची शक्यता राजकीय वर्तुळात व्यक्त करण्यात येत आहे. आपल्या आरोपांची सरबत्ती करताना राहुल गांधी यांनी ‘विशिष्ट उद्योगसमूहाचा’ नामोल्लेख केला नाही. परंतु त्यांचा रोख अदानी उद्योगसमूहाच्या दिशेने असल्याचे जाणवत होते.
गुजरातचा विकास झाला तेव्हा छोटे उद्योग, अमूल चळवळ आदी घटक त्यासाठी कारणीभूत ठरले होते. परंतु आता एका उद्योगपतीची उलाढाल तीन हजार कोटींवरून ४० हजार कोटी रुपयांपर्यंत पोहोचली असल्याकडे राहुल यांनी लक्ष वेधले. राज्यातील केवळ दोन ते तीन व्यक्तींकडेच पैसे जावेत, अशा रितीने ‘गुजरात मॉडेल’ तयार केल्याचेही राहुल म्हणाले.
स्थावर मालमत्तेमध्ये घट
राहुल यांनी शनिवारी अमेठीत उमेदवारी अर्ज सादर केला. यावेळी प्रतिज्ञापत्रात त्यांनी स्थावर मालमत्तेमध्ये २००९ पासून घट झाल्याचे स्पष्ट केले. मात्र असे असले तरी त्यांच्या एकूण मालमत्तेचे मूल्य गेल्या पाच वर्षांत दुपटीने म्हणजेच ९.४ कोटी रुपये इतके झाले आहे. गेल्या पाच वर्षांत राहुल गांधी यांच्या मालमत्तेत ८६ टक्क्यांनी वाढ झाली आहे. गांधी यांची स्थावर मालमत्ता घटली आहे. त्यांनी एका मॉलमधील आपली दोन दुकाने विकली असून हरयाणातील कृषी मालमत्ताही विकली आहे. दिल्लीतील सुलतानपूर गावात वडिलोपार्जित शेतीमध्ये त्यांचा हिस्सा आहे. राहुल गांधी यांच्याकडे स्वत:ची गाडी नसल्याचेही म्हटले आहे.