लोकसभा निवडणुकीची उत्सुकता सर्वानाचा लागली आहे. मतमोजणीच्या वेळी प्रत्येक मतदान यंत्रामध्ये तीन टप्पे असणार आहेत. पहिल्यांदा कंट्रोल युनिटद्वारे मतदान यंत्र सुरू केले जाईल. त्यानंतर सील आहे याची खातरजमा करून सुरू केले जाणार आहे. शेवटचा टप्पा म्हणजे प्रत्येक मतदान केंद्रावर उमेदवाराला किती मते मिळाली हे दिसणार आहे. टपालाने मिळालेल्या मतांसह उमेदवाराला मिळालेल्या प्रत्येक केंद्रावरील मते त्यामध्ये येतील. या प्रक्रियेत १३ लाख मतदान यंत्रे वापरण्यात आली आहेत. त्यासाठी व्यापक तयारी करण्यात आली आहे.
मतमोजणी अशी होणार
सकाळी निवडणूक निर्णय अधिकारी, उमेदवार आणि त्यांचे प्रतिनिधी यांच्या उपस्थितीत मतदान यंत्रे मतमोजणीसाठी आणली जातील. आठ वाजता प्रत्यक्ष मतमोजणीसाठी सुरुवात होईल. पहिल्यांदा टपालाने आलेली मते मोजली जातील. त्यानंतर अर्धा तासाने मतदान यंत्राद्वारे मतमोजणी सुरू होईल. टपाल मतमोजणी होईपर्यंत मतदान यंत्राद्वारे मतमोजणी सुरू केली जाणार नाही. मतमोजणी प्रक्रियेचे चित्रीकरण केले जाणार आहे. ते गोपनीय ठेवले जाणार असून भविष्यात गरज लागल्यास त्याचा उपयोग केला जाईल. उमेदवाराला प्रत्येक टेबलला आपला एक प्रतिनिधी नेमता येईल. विजयातील अंतर एकूण टपालाच्या मतांपेक्षा कमी असल्यास सर्व टपाल मते पुन्हा मोजली जातील, असे निवडणूक अधिकाऱ्यांनी सांगितले.
मतमोजणीसाठी मतदान यंत्राचे कंट्रोल युनिट गरजेचे आहे. त्यामधील बॅलेट युनिट पुन्हा स्ट्राँग रूममध्ये ठेवले जाणार आहे. कंट्रोल युनिट विविध टेबलांवर वितरित केले जातील.
या प्रक्रियेस प्रारंभ करण्यापूर्वी मतदानदिनी जे चार सील मतदान यंत्रांना लावले गेले होते त्याची खातरजमा केली जाईल. यात गडबड असल्याची शंका अधिकाऱ्यांना आल्यास त्यांनी तातडीने निवडणूक आयोगाला कळवावे. अशा वेळी त्या यंत्रातील मते मोजली जाणार नाहीत.
मतमोजणीची खातरजमा
प्रत्येक फेरीत मतमोजणी झाल्यावर निरीक्षकही समांतर पद्धतीने एक-दोन मतदान यंत्रे निवडणूक मतमोजणी योग्य पद्धतीने सुरू आहे काय ते तपासतील. निवडणूक निर्णय अधिकारी प्रत्येक फेरीचा निकाल जाहीर करतील. त्यानंतर पुढच्या फेरीसाठी मतदान यंत्रे आणली जातील. प्रत्येक फेरीत निरीक्षक निकाल जाहीर करताना उमेदवारांच्या प्रतिनिधींना किती मते मिळाली ते दाखवतील. कंट्रोल युनिटमध्ये काही बिघाड झाल्यास डाटा घेतला जाईल. त्यामध्ये अडचण निर्माण झाली तर ते मतदान यंत्र सील करून बाजूला ठेवले जाईल. त्याची मोजणी होणार नाही, त्याबाबत आयोगाला कळवले जाईल. मतदान यंत्रामध्ये बिघाड किंवा त्यामध्ये गडबड वाटते म्हणून बाजूला ठेवले असल्यास त्या मतदारसंघाचा निकाल जाहीर करण्यापूर्वी निवडणूक आयोगाची मान्यता गरजेची आहे. मतमोजणीत चूक झाल्यास निवडणूक निर्णय अधिकाऱ्याला जबाबदार धरले जाईल.
समान मते मिळाल्यास..
एखाद्या मतदारसंघात सर्वाधिक समान मते दोन उमेदवारांना मिळाल्यास सोडत काढून निकाल जाहीर केला जाईल. अर्थात हे घडण्याची शक्यता अत्यल्प आहे. असे झाल्यास प्रथम निवडणूक आयोगाला कळवून त्यांचे मार्गदर्शन घ्यायचे आहे.