नरेंद्र मोदी यांच्यामुळे अल्पसंख्याक समाजाच्या मतदानात वाढ झाली असली तरी मुंबई, मुंब्रा, भिवंडी या पट्टय़ात काँग्रेस-राष्ट्रवादीला अपेक्षित होते तेवढे मतदान झाले नाही. परिणामी आघाडीच्या गोटात काहीसे चिंतेचे वातावरण पसरले आहे.
मोदी यांना शह देण्यासाठीच देशाच्या अन्य भागांमध्ये मुस्लिमांचे मतदान चांगले झाले आहे. राज्यातील पहिल्या दोन टप्प्यात मुस्लिम मतांचे प्रमाण वाढले होते. तिसऱ्या टप्प्यात मुंबई, ठाणे, कल्याण, धुळे या मतदारसंघांमध्ये मुस्लिम मतदान वाढून त्याचा फायदा होईल, असा सत्ताधारी आघाडीच्या नेत्यांचा प्रयत्न होता. मतदार याद्यांमधील घोळ आणि सुट्टीनिमित्त मतदार मुंबई बाहेर गेल्याने त्याचा काही प्रमाणात फरक पडल्याचे त्यांचे म्हणणे आहे. अल्पसंख्याकांचे तेवढे मतदान कमी झालेले नाही, असा दावा राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी केला.
पहिल्या टप्प्यात मुस्लिमांच्या मतांची टक्केवारी वाढली होती. हा कल मुंबईत दिसला नाही, अशी प्रतिक्रिया काँग्रेसच्या गोटात व्यक्त केली जाते. उत्तर- पश्चिम मुंबई मतदारसंघात अल्पसंख्याक मतदारांकडे मतदान कार्ड असले तरी पासपोर्टची मागणी केली जात होती. हे सारे जाणूनबुजून करण्यात आल्याचा आरोप या मतदारसंघातील काँग्रेस उमेदवार गुरुसाद कामत यांनी केला. कामत यांनी या संदर्भात निवडणूक आयोगाकडे तक्रार केली आहे.
अल्पसंख्याक समजाचे राज्यात एरव्ही ३० ते ३५ टक्के मतदान होते. यंदा काही ठिकाणी ४० ते ५० टक्क्यांच्या आसपास मतदान झाले आहे. मात्र मुंबईत हे प्रमाण ४० टक्क्यांच्या आसपास असल्याचे काँग्रेस नेते आणि अल्पसंख्याक विकासमंत्री नसिम खान यांनी सांगितले.
दिल्लीत सावध प्रतिक्रिया
काँग्रेस पक्षाच्या वतीने अल्पसंख्याकांना आरक्षण देण्याबाबतचे आश्वासन गुरुवारी दिले. पक्षाने मूळ जाहीरनाम्यात नव्या तरतुदीचा समावेश केला आहे. उत्तर प्रदेश आणि बिहारमधील मतदान डोळ्यासमोर ठेवूनच काँग्रेसने ही खेळी केली. मात्र महाराष्ट्रातील शेवटच्या टप्प्यातील मतदानापूर्वी हे आश्वासन दिले गेले असते तर नक्कीच फरक पडला असता, असे मत काँग्रेसच्या गोटातून व्यक्त करण्यात येत होते. केंद्रीय मंत्री कपिल सिब्बल यांनी मुस्लीम आरक्षणाच्या मुद्दय़ावर अत्यंत सावध प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले की, काँग्रेसप्रणीत संयुक्त पुरोगामी आघाडी सरकार सलग तिसऱ्यांदा सत्तेत आल्यानंतर मुस्लीम आरक्षणावर सर्वपक्षीय चर्चा केली जाईल. काँग्रेसची भूमिका मुस्लीम आरक्षणाच्या मुद्दय़ावर सर्वपक्षीय चर्चा घडवून आणण्यासाठी पुढाकार घेण्याची आहे, असे संदिग्ध उत्तर देत सिब्बल यांनी वेळ मारून नेली
मते मिळविण्याचा केविलवाणा प्रयत्न – जावडेकर
नवी दिल्ली:मागासवर्गीय मुस्लिमांना आरक्षण देण्याचे आश्वासन देणारा पुरवणी जाहीरनामा प्रसिद्ध केल्याबद्दल भाजपने काँग्रेसवर टीका केली आहे. पुरवणी जाहीरनामा म्हणजे अखेरच्या क्षणी काही मते पदरात पाडून घेण्याचा काँग्रेसचा केविलवाणा प्रयत्न आहे, मात्र जनता विश्वास ठेवणार नाही, असे भाजपने म्हटले आहे. काँग्रेसने मात्र पुरवणी जाहीरनामा प्रसिद्ध केल्याच्या वृत्ताचे जोरदार खंडन केले आहे.सध्याच्या अन्य मागासवर्गीयांच्या आरक्षणात मागासवर्गीय मुस्लिमांना ४.५ टक्के आरक्षण देण्याचे आश्वासन पुरवणी जाहीरनाम्यात काँग्रेसने दिले आहे.तथापि, काँग्रेसने आता कितीही आश्वासने दिली तरी काही फरक पडणार नाही असे भाजप प्रवक्ते प्रकाश जावडेकर जावडेकर यांनी सांगितले.
संग्रहित लेख, दिनांक 26th Apr 2014 रोजी प्रकाशित
काँग्रेसला अल्पसंख्याकांचे अपेक्षित मतदान नाही
नरेंद्र मोदी यांच्यामुळे अल्पसंख्याक समाजाच्या मतदानात वाढ झाली असली तरी मुंबई, मुंब्रा, भिवंडी या पट्टय़ात काँग्रेस-राष्ट्रवादीला अपेक्षित होते तेवढे मतदान झाले नाही.
First published on: 26-04-2014 at 03:21 IST
मराठीतील सर्व लोकसभा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Congress didnt get expected minority vote