तूर, मूग, उडीद
- आंतरमशागत – जरुरीनुसार नांगे भरतात व विरळणी करतात. प्रत्येक ठिकाणी एक-दोन रोपे ठेवतात. पीक एक महिन्यांचे होण्यापूर्वीच एक खुरपणी व एक कोळपणी करणे गरजेचे असते. दुसरी कोळपणी पीक ६० दिवसांचे असताना केली जाते.
- पाणीपुरवठा – मूग व उडीद ही पिके पावसावरच येतात. तुरीचे पीक अलीकडे बागायती पीक म्हणून घेतले जाते. त्यासाठी पाण्याच्या दोन-तीन पाळ्या द्याव्या लागतात. फुले व शेंगा लागण्याच्या अवस्थेत पाणी देणे जरुरीचे असते.
- पीकसंरक्षण उपाय – मावा, तुडतुडे, पांढरी माशी – वरील तिन्ही पिकांवर या किडी दिसून येतात. यासाठी पेरणीनंतर १५-२० दिवसांत एक लीटर ‘मॅलेथिऑन’ ५०० लीटर पाण्यात मिसळून फवारणी करतात.
- शेंगमाशी, घाटेअळी, पिसारी पतंग – कळ्या लागण्यापासून शेंग पक्व होईपर्यंत या किडींचा उपद्रव होतो. त्यासाठी कळी अवस्थेपासूनच औषध-फवारणी करणे गरजेचे असते. सुरुवातीस एक लीटर ‘एन्डोसल्फान’ ५०० लीटर पाण्यात मिसळून फवारतात. त्यानंतर ५०० मी. ली. ‘मोनोक्रोटोफॉस’ ५०० लीटर पाण्यात मिसळून ३-४ वेळा फवारणी करतात.
- भुरीरोग – यासाठी हेक्टरी २५ किलो गंधक पावडर (३०० मेशची) धुरळतात. मररोगासाठी बीडीएन-२ या रोगप्रतिबंधक जातीचा वापर करतात.