पालघर जिल्ह्य़ात चार महिन्यांत ४१ कोटींचे नुकसान

वसई : करोना विषाणूच्या संसर्गामुळे लागू करण्यात आलेल्या टाळेबंदीचा फटका सर्वच क्षेत्राला बसला आहे. त्यामध्ये पालघर जिल्ह्य़ात सेवा देणाऱ्या राज्य परिवहन महामंडळाच्या एसटी सेवेलाही याचा मोठा फटका बसला आहे. मागील चार महिन्यांत तब्बल ४१ कोटींचे नुकसान झाले आहे. पालघर जिल्ह्य़ातील आठ आगारातून एसटीची सेवा दिली जाते. यामध्ये अर्नाळा, वसई, नवघर, नालासोपारा, बोईसर, सफाळे, जव्हार, डहाणू, सफाळे यांचा समावेश आहे. ठिकाणच्या आगारातून राज्य परिवहन मंडळातर्फे विविध ठिकाणी ये-जा करण्यासाठी बस सोडल्या जातात. या आगारातून मोठय़ा संख्येने प्रवासी प्रवास करतात. परंतु करोनाच्या संकटामुळे मागील चार महिन्यांपासून अत्यावश्यक सेवा वगळता ही सेवा पूर्णपणे बंद आहे. एसटी सेवा बंद असल्याने याचा मोठा परिणाम एसटी सेवेच्या आर्थिक उत्पन्नावर झाला आहे.

मध्यंतरी एसटी सेवा सुरू करण्यास परवानगी दिली आहे. परंतु जिल्ह्य़ातील बहुतांश भाग हा लाल क्षेत्रात असल्याने अशा ठिकाणी एसटी सेवा सुरू करता आली नाही. याचाच परिणाम हा एसटीच्या उत्पन्नावर झाला असून चार महिन्यांत जवळपास ४१ कोटींचे नुकसान झाले असल्याची माहिती विभाग नियंत्रक राजेंद्र जगताप यांनी दिली.

मालवाहतूक सेवेला चांगला प्रतिसाद

करोनाच्या पार्श्वभूमीवर विस्कटलेले आर्थिक गणित सुधारण्यासाठी एसटी महामंडळाने प्रवासी वाहतुकीसोबतच मालवाहतूक सुरू करण्याचा निर्णय घेतला होता. यामध्ये पालघर जिल्ह्य़ातील शेतकरी, व्यापारी व उद्य्ोग व्यावसायिक यांच्यासाठी एसटी बसच्या संरचनेत बदल करून ही सेवा सुरू केली आहे. या सेवेला जिल्ह्य़ातील व्यापारी वर्गाचा चांगला प्रतिसाद मिळत असून दोन महिन्यांत साधारणपणे एसटीला ५ लाख रुपयांपर्यंत उत्पन्न मिळाले आहे. व्यापारी वर्गाने जास्तीत जास्त माल वाहतूक सेवेचा लाभ घ्यावा, असेही आवाहनही एसटी महामंडळाकडून करण्यात येत आहे.

टाळेबंदीत एसटी सेवा पूर्णपणे ठप्प होती. त्यामुळे एसटीचे चार महिन्यांत मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. जेव्हा सर्व काही पूर्वपदावर येईल, तेव्हा ही स्थिती सुधारेल.

राजेंद्र जगताप, एसटी विभाग नियंत्रक, पालघर