नमुना क्रमांक ‘१७-अ’च्या प्रतींसाठी निवडणूक अधिकाऱ्यांकडे अर्ज

पालघर : पालघर लोकसभा मतदारसंघात सुमारे ९५ हजार मतदारांची दुबार नाव असल्याची माहिती पुढे आली आहे. या मतदारांनी नेमक्या कोणत्या ठिकाणी मतदान केले वा त्यांच्या नावाने अन्य ठिकाणी बोगस मतदान केले का? याबद्दल शंका निर्माण झाली आहे. या संदर्भातील माहिती मिळविण्यासाठी बहुजन विकास आघाडीचे उमेदवार बळीराम जाधव यांनी आपल्याला मतदार स्वत:चे नाव आणि स्वाक्षरी केलेल्या नमुना क्रमांक ‘१७-अ’च्या प्रती मिळावे, यासाठी अर्ज केला आहे.

एकाच क्रमांकाचे मतदार ओळखपत्र वा एकच नाव दोन वा अधिक विधानसभेच्या क्षेत्रांमध्ये दुबार वा अधिक वेळा प्रकाशित झाल्याचे शिवसेना तसेच बहुजन विकास आघाडी या पक्षांच्या प्रतिनिधींनी निवडणुकीच्या पूर्वी निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या निदर्शनास आणून दिले होते. तसेच या दोन्ही पक्षांनी पालघरच्या निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडे ही बाब तक्रार अर्जाद्वारे निदर्शनास आणून दिली होती.

एकाच मतदाराचे नाव एका विधानसभा क्षेत्रात अनेकदा येण्यासोबत इतर विधानसभा क्षेत्रांमध्ये प्रसिद्ध झाल्याचे निदर्शनास आले आहे. यात पालघर विधानसभा क्षेत्रात सुमारे २० हजार, नालासोपारा क्षेत्रांमध्ये २३ हजार, बोईसरमध्ये १७ हजार, डहाणूमध्ये १३हजार, विक्रमगडमध्ये १२ हजार, वसई विधानसभा क्षेत्रात आठ हजार मतदारांची नावे असल्याची प्राथमिक माहिती उपलब्ध झाली आहे.

अशा मतदारांनी एका ठिकाणी आपले मतदान केल्यानंतर बनावट ओळखपत्रा आधारे काही राजकीय मंडळींनी नियोजन करून इतरत्र अशा दुबार नावांवर मतदान करून घेतल्याची शक्यता बळीराम जाधव यांनी व्यक्त केली आहे. याचा तपशील मिळण्यासाठी मतदान करताना मतदारांनी स्वत:च्या हस्ताक्षरात लिहिलेले नाव, केलेली स्वाक्षरी आणि ओळखपत्राचा पुरावा, याची माहिती असणारा नमुना अर्ज ‘१७-’ मिळावी तसेच मतदान केंद्रांवरील मतदारांची यादी आणि निवडणूक निर्णयन अधिकाऱ्याच्या डायरीची प्रत मिळावी, अशी मागणी बळीराम जाधव यांनी पालघरच्या निवडणूक निर्णय अधिकारी यांना केली आहे.

विलंबाने झालेल्या मतदानाचीही माहिती

२९ एप्रिल २०१९ रोजी झालेल्या निवडणुकीत सकाळी ७ वाजल्यापासून सायंकाळी ६ वाजेपर्यंत मतदान करण्याची वेळ निश्चित करण्यात आली होती. मात्र मतदारांचा प्रतिसाद पाहता या मतदारसंघात अनेक ठिकाणी सायंकाळी ६ वाजल्यानंतर रात्री उशिरापर्यंत मतदान सुरू राहिले होते. या संदर्भातील माहिती बळीराम जाधव यांनी अर्जाद्वारे मागितली आहे.