राष्ट्रवादी काँग्रेसचे मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्यावर ठाण्यात राहणाऱ्या एका तरुणाने गंभीर आरोप केला आहे. जितेंद्र आव्हाड यांच्या सुरक्षारक्षकांनी बंगल्यावर नेवून त्यांच्यासमोर अमानुष मारहाण केल्याचा आरोप या तरुणाने केला आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून जितेंद्र आव्हाड यांच्याविरोधात पोस्ट लिहिल्याने आपल्याला मारहाण झाल्याचा आरोप त्याने केलाय. तर, माझ्या बंगल्यावर असा कोणताही प्रकार झाला नाही असे जितेंद्र आव्हाड यांनी म्हटले आहे. या घटनेचे पडसाद राजकीय वर्तुळात उमटायला सुरूवात झाली असून विरोधकांनी सरकारवर टीका केलीये. भाजपाचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी जितेंद्र आव्हाड यांना मंत्रिमंडळातून तात्काळ बडतर्फ करा अशी मागणी केली आहे. तर दुसरीकडे, ‘मौका सभी को मिलता है’ असा डायलॉग मारत आमदार नितेश राणे यांनीही जितेंद्र आव्हाड यांच्यावर निशाणा साधलाय.

भाजपा आमदार नितेश राणे यांनी ट्विटरद्वारे आव्हाड यांना लक्ष्य केले आहे. मौका सभी को मिलता है, असे ट्विट करत नितेश राणेंनी आव्हाड यांना इशारा दिलाय. “जितेंद्र आव्हाड, तुम्हाला डायलॉग मारायला खूप आवडतात…म्हणून या निमिताने सत्या चित्रपटाची एक line…मौका सभी को मिलता है !” असे ट्विट नितेश राणे यांनी केले आहे.

आणखी वाचा- जितेंद्र आव्हाडांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करा; देवेंद्र फडणवीस यांची मागणी

काय आहे प्रकरण? –
ठाण्यातील एका तरुणाने जितेंद्र आव्हाड यांच्या सुरक्षारक्षकांनी बंगल्यावर नेवून त्यांच्यासमोर अमानुष मारहाण केल्याची तक्रार पोलीस ठाण्यात केली. त्यानंतर हे प्रकरण राज्यात चर्चेत आलं आहे. तर, हा आरोप जितेंद्र आव्हाड यांनी फेटाळून लावला आहे. “माझ्या बंगल्यावर असा कोणताही प्रकार झाला नाही. या घटनेबद्दल मला माहिती नाही. मी रात्री झोपलेला होतो. त्या दिवशी मी दिवसभर माझ्या विभागात काम करत होतो. त्यामुळे रात्री घरी येऊन झोपलो. मी मारहाणीचे समर्थन करणार नाही, पण त्याने जी पोस्ट माझ्याबद्दल टाकली. तशी पोस्ट कोण सहन करेल? माझा नग्न फोटो टाकला होता. असे फोटो त्याच्या नातेवाईकांबद्दल टाकल्यावर तो गप्प बसेल का? भाजपाचे नेते तरी हे सहन करतील का? अशी भूमिका आव्हाड यांनी मांडली आहे.