अभिनेता सुशांत सिंह राजपूत प्रकरणात सीबीआय चौकशीची मागणी करणाऱ्या पार्थ पवार यांना राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी फटकारलं होतं. त्यानंतर पार्थ पवार नाराज असल्याची चर्चा सुरू झाली. दरम्यान पार्थ पवार प्रकरणात उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांना प्रश्न विचारण्यात आला. त्यावर “मला कुणाशीही काही काही बोलायचं नाहीये. मला माझं काम करायचं आहे,” असं म्हणत त्यांनी या प्रकरणावर अधिकच भाष्य करण्याचं टाळलं.

उपमुख्यमंत्री अजित पवार बारामती दौऱ्यावर आहेत. सध्या ते मतदारसंघातील विविध विकास कामांच्या पाहणीत आणि नागरिकांच्या समस्या जाणून घेण्यात व्यस्त आहेत. पार्थ पवार यांना शरद पवारांनी फटकारल्यापासून अजित पवारांनी कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. त्यानुषंगानं आज विकास कामांच्या पाहणी दरम्यान अजित पवार यांना पार्थ पवार यांच्यासंदर्भात पत्रकारांनी प्रश्न विचारला. त्यावर बोलताना अजित पवार म्हणाले,”मला कुणाशीही काहीही बोलायचं नाही. मला माझं काम करायचं आहे. मी सकाळी सकाळी या अधिकाऱ्यांना इकडं आणलं आहे,” असं म्हणत अजित पवारांनी मुद्दा टाळला.

अभिनेता सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणाची देशभर चर्चा सुरू आहे. विशेषतः महाराष्ट्र आणि बिहार या राज्यांमध्ये यावरून संघर्ष सुरू असल्याचं दिसत आहे. सुशांत सिंह प्रकरणाची सीबीआय चौकशी करण्यात यावी अशी मागणी सुरूवातीपासून केली जात होती. अनेकांनी यासंदर्भात पत्रव्यवहार केला होता. अजित पवार यांचे सुपूत्र पार्थ पवार यांनीही गृहमंत्री अनिल देशमुख यांची भेट घेऊन सीबीआय चौकशीची मागणी केली होती. त्यांच्या या मागणीसंदर्भात बोलताना शरद पवार यांनी पार्थ पवार यांना फटकारलं होतं. “पार्थ पवार इमॅच्युअर आहे. माझ्या नातवाच्या बोलण्याला कवडीचीही किंमत देत नाही,” अशा शब्दात शरद पवार यांनी फटकारलं होतं. तेव्हापासून पार्थ पवार नाराज असल्याची चर्चा आहे.