उपमुख्यमंत्री अजित पवार हे त्यांच्या दिलखुलास भाषणासाठी प्रसिद्ध आहेत. बारामतीच्या कार्यकर्ता मेळाव्यातही त्यांच्या याच दिलखुलास आणि खुमासदार भाषणाचा प्रत्यय आला. “बारामतीतले लोक मुंबईला येतात. तेव्हा मी थोडा नाराज होतो. अद्याप देवगिरी बंगला मिळालेला नाही. ज्या घरात मी सध्या राहतो ते लहान पडतं. तिथे बसायला जागा नाही. हॉलमध्ये गर्दी झाली की डायनिंगमध्ये बसायला लागतं. तिथे गर्दी झाली की जयच्या बेडरुममध्ये बसावं लागतं. आता फक्त माझ्या बेडरुममध्ये बसायचं बाकी आहे. तिथे जर कार्यकर्त्यांसोबत बसलो तर बायको मला हाकलून देईल.” अजित पवार असं म्हणाले आणि एकच हशा पिकला.

“थोडं दमानं घ्या, दोन-चार दिवसांमध्ये देवगिरी बंगला रिकामा होईल. १०० दिवसात काय केलं बाबानं कुणास ठाऊक.. अद्याप घर रिकामं केलं नाही” असं म्हणत अजित पवार यांनी माजी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनाही टोला लगावला आहे. भाजपा सरकारच्या काळात माजी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांना मलबार हिल येथील देवगिरी बंगला वास्तव्यासाठी देण्यात आला होता. नवीन सरकार येऊन १०० दिवस झाले तरीही सुधीर मुनगंटीवार यांनी हा बंगला रिकामा केलेला नाही. त्यामुळे अजित पवार हे सध्या चर्चगेट येथील एका इमारतीत वास्तव्यास आहेत. ते घर कार्यकर्ते आले की भरुन जातं असं अजित पवार सांगत होते. त्यावेळी त्यांनी पत्नी आपल्याला हाकलून देईल असा उल्लेख करत आपली प्रेमळ अडचण सांगितली. ज्यानंतर कार्यकर्त्यांमध्ये एकच हशा पिकला.