अकोल्यातील आमदारांचे प्रशासनाला निर्देश

अकोला

पावसामुळे झालेल्या शेतकऱ्यांच्या नुकसानीचे पंचनामे करून तातडीने शासनाकडे अहवाल सादर करा, असे निर्देश अकोला जिल्हय़ातील पाचही आमदारांनी प्रशासनाला दिले आहेत. आमदार रणधीर सावरकर यांनी नुकसानग्रस्त ग्रामीण गावाचा दौरा करून जिल्हाधिकाऱ्यांशी सविस्तर चर्चा केली.

ऑक्टोबर महिन्यात सरासरी पेक्षा ३० टक्के अधिक पाऊस झाल्यामुळे कापणीला आलेल्या सोयाबीन, उडीद, ज्वारी, मका पीक संपूर्ण नष्ट झाले. पावसामुळे उभे पीक काढण्यासाठी कुठलीही यंत्रणा वापरता आली नाही. शेतात कापून ठेवलेले पीक सुद्धा गोळा करता आले नाही. तूर, कपाशीच्या पिकांचे मोठय़ा प्रमाणात नुकसान झाले. ऐन दिवाळीच्या सणात अतिवृष्टीमुळे बळीराजा नैसर्गिक आपत्तीत सापडला आहे. शेतकरी हवालदिल झाला. खरीप हंगामातील नैसर्गिक आपत्तीत सापडलेल्या पिकांना आर्थिक कवच देण्यासाठी पंतप्रधान पीक विमा योजना राज्यात राबवण्यात आली आहे. नुकसान झालेल्या पिकांची माहिती विमा कंपनीस विविध प्रपत्रात व ठराविक कालावधीत देणे बंधनकारक असली तरी विमा कंपन्यांचे टोल फ्री क्रमांक लागत नाहीत. शेतकऱ्यांपुढे कुठे दाद मागावी, ही विवंचना असल्याने आमदार रणधीर सावरकर यांनी जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा करून त्यांना सविस्तर माहिती दिली. तहसीलदार, तालुका कृषी अधिकारी, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांचेकडे लेखी अर्ज नमुना फॉर्म अर्जद्वारे सादर करण्याबाबत सूचना कराव्यात, असे निर्देश आमदार सावरकर यांनी अधिकाऱ्यांना दिले आहेत. पीक विमा भरलेले तसेच विमा न भरलेल्या शेतकऱ्यांच्या नुकसानीचे पंचनामे करून आर्थिक नुकसानीचा अहवाल शासनास दोन दिवसात सादर करावा, अशा सूचना प्रशासनाला देण्यात आल्या. केंद्रीय राज्यमंत्री संजय धोत्रे यांच्या मार्गदर्शनात अकोला जिल्हा तसेच वाशीम जिल्ह्यातील रिसोड, मालेगाव या भागाच्या शेतकऱ्यांच्या भावना शासन दरबारी मांडून न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे आमदार गोवर्धन शर्मा, रणधीर सावरकर, प्रकाश भारसाकळे, हरीश पिंपळे, नितीन देशमुख यांनी सांगितले.

दोन लाख ६७ हजार पीक विमाधारक

जिल्हय़ात पीक विमा काढणाऱ्यांची संख्या दोन लाख ६७ हजार असून अनेक शेतकरी विविध कारणाने योजनेपासून वंचित राहिले आहेत. त्यांना सुद्धा न्याय मिळवून देण्याच्या दृष्टीने महायुतीचे सर्व लोकप्रतिनिधी प्रयत्नशील राहणार असल्याचे सांगण्यात आले. आमदार रणधीर सावरकर यांनी दोन दिवसापासून जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या नुकसानीची पाहणी करून शेतकऱ्यांच्या भावना जाणून घेतल्या.