गो रक्षणाच्या नावाखाली मुस्लिम समाज आणि दलितांवर होणारे हल्ले थांबले नाहीत तर हा देश गांधींऐवजी गोडसेंचा होईल अशी खरमरीत टीका एमआयएमचे खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी औरंगाबादमध्ये केली आहे. तसंच गोरक्षकांकडून होणाऱ्या हल्ल्यांचा एमआयएमकडून कडाडून निषेध करण्यात आला आणि औरंगाबादमध्ये मूक मेणबत्ती मोर्चाही काढण्यात आला.

औरंगाबादच्या आझाद मैदानातून या मोर्चाला सुरूवात झाली होती, या मोर्चात हजारो लोकांचा सहभाग दिसून आला. गोरक्षणाच्या नावाखाली आजवर देशात ३५ लोकांची हत्या करण्यात आली ज्यापैकी २८ जण मुस्लिम तर ७ जण दलित होते. हा अन्याय कुठपर्यंत सहन करायचा? साबरमतीमध्ये जाऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गोरक्षणाच्या नावे हल्ले करणाऱ्यांवर टीकेचे ताशेरे झाडले होते, तसंच अशा लोकांवर कारवाई होईल असंही म्हटलं होतं त्यांच्या भाषणानंतर चार तासांच्या आतच गोमांस घेऊन जाण्याच्या संशयावरून एका निरपराध माणसाला मारहाण करण्यात आली हेच का मोदी सरकारचे अच्छे दिन? असा खोचक प्रश्नही ओवेसी यांनी उपस्थित केला.

इतकंच नाही तर ‘सबका साथ सबका विकास’ ही घोषणा देऊन मोदी सरकार सत्तेवर आलं आहे मग देशाच्या विकसासाठी सगळ्यांची सुरक्षा गरजेची आहे हे मोदींना समजत नाही का? असाही प्रश्न त्यांनी विचारला आहे. सोलापूरच्या मोहसीनला पुण्यात मारलं गेलं, ट्रेनमध्ये जुनैद मारला गेला या युवकांची चूक काय होती? त्यांना मारणाऱ्यांवर आजवर कारवाई का झाली नाही? देशात माणुसकी संपत चालली आहे याचंच हे लक्षण आहे. कथित गोरक्षकांकडून या मारहाणीच्या घटना जेवढ्या वाढतील तेवढा देशातल्या तरूणांच्या मनात रोष निर्माण होईल असंही ओवेसी म्हणाले आहेत.

अमरनाथ यात्रेवर जो हल्ला झाला त्याचा आम्ही निषेध करतो कारण हिंदू समाजाविरोधात आमचा लढा नाही तर सावरकरांच्या हिंदुत्त्ववादाविरोधात आमचा लढा आहे. काश्मीरमध्ये सैनिक मारले जात आहेत अशात मोदी सरकार का गप्प बसलं आहे असाही प्रश्न ओवेसींनी विचारला तसंच अशाच घटना सातत्यानं वाढत राहिल्या तर हा देश गांधींचा नाही गोडसेंचा म्हणून ओळखला जाईल असंही ओवेसी यांनी आपल्या भाषणात म्हणत मोदी सरकारवर टीकेचे ताशेरे ओढले आहेत.