तीन उच्च पदाबाबत चाललय काय?

महेश बोकडे, नागपूर</strong>

एकीकडे युतीचे सरकार अनुसूचित जातीला गोंजारण्याचे काम करते, तर दुसरीकडे महावितरण या शासकीय वीज वितरण कंपनीत अनुसूचित जातीच्या उमेदवारांना पदोन्नतीपासून डावलले जात आहे. येथील मुख्य औद्योगिक संबंध अधिकारी, मुख्य जनसंपर्क अधिकारी आणि मुख्य अभियंता स्थापत्य या तिन्ही महत्त्वपूर्ण विभागप्रमुखांच्या पदाबाबत हा प्रकार घडला आहे.

महावितरणमधील तत्कालीन मुख्य औद्योगिक संबंध अधिकारी किशोर पवार यांनी २०१५ मध्ये स्वेच्छानिवृत्ती घेतली. त्यानंतर संजय ढोके या अनुसुचित जातीतील अधिकाऱ्याला महावितरण सेवा नियमन आणि वरिष्ठतानुसार बढती मिळणे अपेक्षित होते. परंतु त्यांना केवळ या पदाचा प्रभारी पदभार दिला गेला. ते हे काम प्रभावीपणे करत असताना अद्यापही पदोन्नतीपासून डावलून त्यांच्यावर अन्याय सुरू आहे. महावितरणचे तत्कालीन मुख्य महाव्यवस्थापक (सांघिक संवाद) राम दोतोंडे हे २०१५ मध्ये सेवानिवृत्त झाले. त्यामुळे पदोन्नतीला पात्र असलेल्या अनिल कांबळे यांना या पदाचा प्रभार दिला गेला.

कालांतराने त्यांच्या सेवापुस्तिकेवरील कमकुवत कामगिरीवर बोट ठेवत नऊ महिन्यांनी या पदावर कांबळेहून कनिष्ठ असलेल्या पांडुरंग पाटील यांना प्रथम सहमुख्य जनसंपर्क अधिकारी व त्यानंतर मुख्य जनसंपर्क अधिकारी म्हणून बढती दिली गेली. दरम्यान, पांडुरंग पाटील हेही मे- २०१९ मध्ये सेवानिवृत्त झाले. त्यानंतर या पदाचा प्रभार पुन्हा अनिल कांबळे यांना प्रभारी म्हणून दिला असला तरी अद्यापही त्यांना कायम पदोन्नतीने हे पद दिले गेले नाही. याशिवाय २०१८ च्या सुरुवातीस मुख्य अभियंता स्थापत्य म्हणून सेवानिवृत्त झालेल्या चंद्रकांत वाघ यांच्या जागी पात्र असलेल्या राकेश जनबंधू यांना गेल्या दीड वर्षांपासून या पदाचा केवळ प्रभार देण्यात आला आहे. त्यांनाही कायम पदोन्नती मिळत नसल्याने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारच्या काळात महावितरणमध्ये चालले काय? हा प्रश्न उपस्थित झाला आहे. हे तिन्ही अधिकारी हे नागपूरचे आहेत, हे विशेष.

नियमानुसारच पदोन्नतीची प्रक्रिया

महावितरणमध्ये नियमानुसार पारदर्शीपणे पदोन्नतीची सर्व प्रक्रिया होते. त्यानुसार वर्षांला हजारो मागासवर्गीय कर्मचाऱ्यांसह अधिकाऱ्यांना पदोन्नती मिळते. या प्रकरणात काही तांत्रिक कारणे वा अडचणी आहेत. पैकी नियमात बसणाऱ्यांवर निश्चितच प्रशासन योग्य कार्यवाही करेल.’’

– पी. एस. पाटील, जनसंपर्क सल्लागार, महावितरण, मुंबई.

..तर आंदोलन करणार

‘‘गेल्या अनेक महिन्यांपासून महावितरणमध्ये मागासवर्गीय संवर्गातील तिन्ही अधिकाऱ्यांवर अन्याय होत आहे. तातडीने त्यांना पदोन्नती न दिल्यास संघटनेकडून तिव्र आंदोलन करून न्याय मिळवला जाईल.’’

– संजय घोडके, केंद्रीय अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य मागासवर्गीय विद्युत कर्मचारी संघटना.