News Flash

लोकसभा निवडणुकीत पेरले तेच विधानसभा निवडणुकीत उगवणार?

मदार विश्वजित कदम आणि वसंतदादा घराण्यातून एकमेकाच्या गळी उमेदवारी मारण्याचे प्रयत्न सुरू होते.

सांगलीत ‘स्वाभिमानी’ची झूल काँग्रेसला त्रासदायक

दिगंबर शिंदे, सांगली

लोकसभा निवडणुकीतील भाजपच्या विजयाने विधानसभेच्या रणमदानासाठी चांगले औतकाम केले असून आता पेरेल ते उगवेल असे वातावरण तयार करण्यात युती यशस्वी झाली आहे. लोकसभेच्या मदानात काँग्रेसने ‘स्वाभिमानी’ची झूल पांघरून वसंतदादा पाटील यांचे नातू विशाल पाटील यांच्यासारखा मोहरा मैदानात उतरवून पदरी अपयशच घेतले. तर बहुजन वंचित आघाडीचे गोपीचंद पडळकर यांना विधानसभेच्या तीन मतदारसंघामध्ये मिळालेली मते आघाडीबरोबरच भाजपलाही इशारा देणारी आहेत.

लोकसभा निवडणूक जाहीर झाल्यानंतर काँग्रेसमध्ये चैतन्य निर्माण करण्यासाठी फारसे प्रयत्नच झाले नाहीत. यामुळे पराभवाच्या मानसिकतेत असलेल्या काँग्रेसमध्ये उमेदवारी घेण्यास कोणी राजी नव्हते. आमदार विश्वजित कदम आणि वसंतदादा घराण्यातून एकमेकाच्या गळी उमेदवारी मारण्याचे प्रयत्न सुरू होते. कारण त्यांच्यातील राजकीय शत्रुत्व परंपरागत असल्याने सहकार्य मिळेलच याची खात्री देता येत नसल्याने दोन्हीकडून उमेदवारी स्वीकारण्यास नकार दर्शवला जात होता. या तू-तू, म-मच्या खेळात अखेर काँग्रेसने महाआघाडीतील घटक पक्ष असलेल्या स्वाभिमानीला जागा सोडण्याचा निर्णय घेतला.

काँग्रेसमध्ये उमेदवारीचा घोळ सुरू असतानाच या घडामोडीला कारणीभूत असल्याच्या आरोप-प्रत्यारोपातून काँग्रेस कार्यालयालाच टाळे लावण्याचा प्रकार सांगलीकरांनी पाहिला. काँग्रेसला उमेदवारीपासून वंचित ठेवणारे झारीतील शुक्राचार्य कोण असा सवाल करीत वसंतदादांचे नातू विशाल पाटील यांनी अखेर मदानात उतरण्याची तयारी केली. मात्र तोपर्यंत भाजपचे उमेदवार पाटील यांनी प्रचाराची एक फेरी पूर्ण केली होती.

महाआघाडीतील स्वाभिमानीसाठी सांगलीची जागा सोडण्याचा निर्णय दिल्लीतून झाला. ज्यावेळी  पक्षश्रेष्ठी उमेदवारी द्यायला तयार होते त्यावेळी पुढे येण्यास कोणी राजी नव्हते. मात्र काँग्रेस जागाच सोडण्याच्या तयारीत असल्याचे स्पष्ट होते. तरीही स्वाभिमानीने जागा मिळताच उतावीळपणा न करता अथवा केवळ औपचारिकता न दर्शविता गांभीर्याने या जागेसाठी प्रयत्न केले. भाजपला तोंड देण्यासाठी संघटनेत सक्षम उमेदवार नाही असे लक्षात येताच काँग्रेसकडून उमेदवारीची उसनवारीही केली. मात्र ती करताना ज्या साखर कारखानदारांच्या विरोधात ऊस दरासाठी ‘वळवळ’ उभी राहिली तिचे तत्त्व खुंटीला अडकवून राजकारण साधण्याचे प्रयत्न सामान्य शेतकरी वर्गाला मान्य झाले नाही. याचे परिणाम खुद्द राजू शेट्टी यांनाही हातकणंगले मतदार संघामध्ये भोगावे लागले.

आंदोलनात ज्यांच्या लाठय़ा खाल्ल्या त्या कारखानदारांच्या मांडीला मांडी लावून नेते बसत असल्याने हा विरोधाभास अनाकलनीय नसला तरी ‘सत्तेसाठी वाट्टेल ते’ या तत्त्वात असल्याचा साक्षात्कार युवा पिढीला झाला. दादांपासून ज्या घराण्याने काँग्रेसशी बांधिलकी जपली, जिल्ह्य़ातच नव्हे तर राज्यात काँग्रेसला जनाधार मिळवून देण्याचे काम केले त्या घराण्यातील वारसदारांनाच उमेदवारीसाठी उसनवारी करावी लागली. यामुळे चिन्हात झालेला बदल काँग्रेसच्या परंपरागत मतदारांना रुचला नाही.

त्याचबरोबर अखेरच्या क्षणी बहुजन वंचित आघाडीची उमेदवारी गोपीचंद पडळकर यांना जाहीर झाली. ती आघाडीला त्रासदायक तर भाजपला इष्टापत्तीच ठरली. निवडणुकीच्या प्रारंभी भाजपला एकतर्फी वाटत असलेली निवडणूक अखेरच्या दोन दिवसात तिरंगी आणि चुरशीची झाली. तिन्ही उमेदवारांनी विजयाचा दावा करीत असताना मतांची बेरीज कशी केली हेच सांगण्याचा प्रयत्न केला असला तरी मतदारांनीच गृहीत धरण्याच्या वृत्तीला जोरदार चपराक दिली.

पडळकर यांच्यासाठी कार्यकर्त्यांनी जातीचा फॅक्टर मोठय़ा प्रमाणात आणला. धनगरबहुल मतदान केंद्रावर पडळकर यांना चांगले मतदान झाल्याचे उपलब्ध आकडेवारीवरून लक्षात येते. मात्र वंचित आघाडीत सहभागी असलेल्या एमआयएमचा फारसा प्रभाव मतदानावेळी दिसून आला नाही. मिरज, सांगली परिसरातील मुस्लीम मतदारांनी वंचितच्या मागे न जाता आघाडीला पसंती दिल्याचे दिसून आले. जर याही मतदाराने आघाडीपासून फारकत घेतली असती तर आघाडीला तिसऱ्या स्थानावर जावे लागले असते.

सहा विधानसभा मतदारसंघांपैकी पलूस-कडेगाव या एकमेव मतदारसंघात आघाडीच्या विशाल पाटील यांना आघाडी मिळाली. अन्य मतदारसंघात भाजपलाच पहिल्या क्रमांकाची मते मिळाली आहेत.

लोकसभा निवडणूक निकालाचे परिणाम आता विधानसभा निवडणुकीवर निश्चितच होणार आहेत. मिरज मतदार संघामध्ये भाजपचे कमी झालेले मताधिक्य, पलूसमध्ये भाजपला  मिळालेले दुय्यम स्थान हे भाजपची चिंता वाढविणारे आहे.

त्याचबरोबर तासगाव-कवठेमहांकाळमध्ये भाजपचा वाढता प्रभाव राष्ट्रवादीलाही त्रासदायक ठरण्याची चिन्हे आहेत. सहाही विधानसभा मतदारसंघामध्ये राजकीय मांडणी करण्यासाठी वंचित आघाडीला आता वेळ असला तरी सक्षम नेतृत्वाचा अभाव असल्याने मोच्रेबांधणी कोणी करायची, असा प्रश्नच सध्या पडला आहे. याचा लाभ घेण्याची संधी महाआघाडीला असली तरी त्यांच्यातही अद्याप ताळमेळ लागलेला नाही, यामुळे पुढे कोण होणार हा प्रश्नच आहे.

जयंतरावांचा मोबाईल आणि संशय

सांगली मतदारसंघामध्ये राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांनी महाआघाडीसाठी प्रामाणिक प्रयत्न केल्याचे सांगितले जात असले तरी टेक्नोसॅव्ही असलेल्या या नेत्याचा मोबाईल हॅक करून ‘वंचित’ला मतदान करण्याचा खुद्द आमदार पाटील यांच्या आवाजातील संदेश अखेरच्या टप्प्यात व्हायरल झाला होता. याबाबत संशय व्यक्त होत आहे. पोलीस ठाण्यात तक्रार दाखल झाली असली तरी हॅकरचा शोध लागलेला नाही आणि कोणी त्यासाठी पाठपुरावाही केलेला नाही. यामुळे वंचितमुळेच महाआघाडीचा पराभव झाला असे मानणे भाबडेपणाचेच आहे. याला अन्य घटकही तितकेच, किंबहुना जास्तीच कारणीभूत असल्याचा निष्कर्ष कोणी काढला तर वावगे ठरणार नाही. मात्र जवळ आलेल्या विधानसभा निवडणुकीत याची उत्तरे नेत्यांना द्यावी लागणार आहेत. वाळवा मतदारसंघातही मतदार या उत्तराची प्रतीक्षा करीत आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 31, 2019 3:33 am

Web Title: bahujan vanchit aghadi imprasive performance in sangali loksabha constituency
Next Stories
1 विदर्भवाद्यांना पुन्हा धक्का
2 जागतिक तंबाखूविरोधी दिन : तंबाखूमुळे देशात दरवर्षी १३ लाख लोकांचा मृत्यू
3 कर्णबधिर पायलच्या जिद्दीची कहाणी
Just Now!
X