क्षुल्लक कारणावरून अतिसंवेदनशील भाग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जुन्या नांदेड शहरातल्या गाडीपुरा परिसरात दोन गटात तुंबळ हाणामारी झाल्याने चौघेजण गंभीर जखमी झाले. या घटनेनंतर तणाव निर्माण झाला होता. परंतु पोलीस आणि दोन्ही गटांच्या नेत्यांनी सामंजस्याची भूमिका घेतल्याने अनर्थ टळला.
नांदेड जिल्हा पोलीस दलाची सूत्रे बुधवारी भारतीय सेवा दलातील अधिकारी परमजीतसिंह दहिया यांनी स्वीकारली. दहिया यांनी सूत्रे स्वीकारल्यानंतर संपूर्ण जिल्ह्याची माहिती घेण्याचे काम सुरू केले. दरम्यान, इतवारा भागात दोन गटांत रात्री साडेअकराच्या सुमारास हाणामारी झाली. गाडीपुरा येथे सार्वजनिक रस्त्यावर गतिरोधक टाकण्याचे काम सुरू होते. ऑटोचालक मो. इकराम याने याच गतिरोधकावरून स्वतचा ऑटो नेण्याचा प्रयत्न केला. त्याला स्थानिक तरुणांनी विरोध केला. हा विरोध झाल्यानंतर मो. इकराम व त्याच्या सात ते आठ अन्य साथीदारांनी अंगद वर्णेकर, रंजिताताई, अर्जुन बाबुलाल यांच्या घरावर सशस्त्र हल्ला केला. यामध्ये चौघेजण जखमी झाले. चौघांना नांदेडच्या गुरुगोिवदसिंग शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. या प्रकरणी अंगद वर्णेकर यांच्या फिर्यादीवरून १२ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. तर मो. इकराम याने दिलेल्या तक्रारीवरून सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.
दोन गटांत झालेल्या या हाणामारीनतंर सहायक पोलीस अधीक्षक पंकज देशमुख, पोलीस निरीक्षक अनिलसिंह गौतम व अन्य अधिकारी घटनास्थळी धावले. तणाव वाढत असल्याचे लक्षात आल्यानंतर पोलीस बंदोबस्तातही वाढ करण्यात आली. परस्पर विरोधी गुन्हे दाखल झाल्यानंतर दोषींविरुद्ध कारवाई करण्यात येईल, अशा शब्दांत पोलिसांनी आश्वस्त केल्यानंतर दोन्ही गटांच्या नेत्यांनी सामंजस्याची भूमिका घेतली व पुढचा अनर्थ टळला.