30 November 2020

News Flash

ई-पास रद्द केल्यानंतर महाराष्ट्रात राज्यांतर्गत रेल्वे प्रवासाला परवानगी; उद्यापासून बुकिंग सुरु

मध्य रेल्वेने केली घोषणा

फाइल फोटो (फोटो : पीटीआय)

लॉकडाउन शिथिलीकरणाच्या चौथ्या टप्प्यात राज्यातील आंतरजिल्हा प्रवासासाठीची ई-पास सक्ती रद्द करण्यात आल्यानंतर आता मध्य रेल्वेनेही राज्यांतर्गत प्रवासी वाहतूक सुरु करण्याला परवानगी दिली आहे. राज्यांतर्गत रेल्वे बुकिंग उद्यापासून (२ सप्टेंबर २०२० पासून) सुरू होत असल्याचे मध्य रेल्वेने जाहीर केलं आहे. यासंदर्भातील एक पत्रक मध्य रेल्वेने जारी केलं आहे.

पॅसेंजर रिझर्व्हेशन सिस्टीम म्हणजेच आरक्षण पद्धतीने २ सप्टेंबरपासून राज्यांतर्गत प्रवासी वाहतूक सुरु होणार असल्याचे रेल्वेने या पत्रकामध्ये स्पष्ट केलं आहे. सर्व प्रवाशांना राज्यांतर्गत प्रवासासाठी २ सप्टेंबरपासून तिकीट बुकींग करता येणार आहे असंही रेल्वेनं म्हटलं आहे. देशभरामध्ये मार्च महिन्यात लॉकडाउन सुरु झाल्यानंतर प्रवासी रेल्वे वाहतुकीवर निर्बंध घालण्यात आले होते. लॉकडाउनदरम्यान परराज्यातील कामगारांसाठी विशेष श्रमिक ट्रेन्स चालवण्यात आल्या. दुसरीकडे मुंबईतील अत्यावश्यक सेवेमध्ये काम करणाऱ्यांसाठी विशेष मर्यादित लोकल गाड्यांची वाहतूक सुरु आहे. मुंबई लोकलबद्दल अद्याप कोणताही निर्णय झालेला नाही. यादरम्यान मध्य रेल्वेने परिपत्रक प्रसिद्ध करत आंतरजिल्हा प्रवासासाठी परवानगी देण्यात आल्याची माहिती दिली आहे.

सोमवारीच राज्य सरकारने राज्यातील आंतरजिल्हा प्रवासासाठीची ई-पास सक्ती रद्द करत प्रवासावरील निर्बंध काढल्याची घोषणा केली.  नवी मार्गदर्शक तत्त्वे बुधवार, २ सप्टेंबरपासून अमलात येतील आणि ई-पासही रद्द होईल. नव्या अधिसुचनेनुसार सरकारी आणि खासगी कार्यालयांमधील उपस्थितीचे प्रमाण वाढवण्यात आले आहे. केंद्र सरकारने मेट्रो रेल्वे सुरू करण्यास मुभा दिली असली तरी राज्यात आणखी महिनाभर तरी मेट्रो बंदच राहील. राज्य सरकारने सप्टेंबर महिन्यासाठी लागू केलेल्या मार्गदर्शक तत्त्वांत ई-पास रद्द करण्याची मागणी मान्य केली आणि प्रवासाला मुभा दिली.

आंतरराज्य आणि आंतरजिल्हा प्रवासावरील निर्बंध उठवण्याची सूचना केंद्र सरकारने राज्यांना केली होती. राज्याच्या ग्रामीण भागांतील करोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता, ई-पास रद्द करू नये, असा सरकारमध्ये एक मतप्रवाह होता. फक्त खासगी प्रवासासाठी ई-पासची अट होती. ती रद्द करण्याची मागणी वारंवार करण्यात येत होती. नागरिकांची नाराजी लक्षात घेता ती रद्द करण्यात आली आहे. त्यामुळे राज्यातील नागरिकांना आता एका जिल्ह्य़ातून दुसऱ्या जिल्ह्य़ात आता सहज प्रवास करता येईल. गेले पाच महिने हा ई-पासचा जाच सुरू होता. केंद्र सरकारने ७ सप्टेंबरपासून मेट्रो सेवा सुरू करण्यास परवानगी दिली असली तरी ३० सप्टेंबपर्यंत राज्यातील मेट्रो सेवा बंदच राहील. यामुळे मुंबईतील घाटकोपर-अंधेरी-वर्सोवा तसेच नागपूरमधील मेट्रो सेवा सुरू होण्यास प्रवाशांना आणखी महिनाभर प्रतीक्षा करावी लागणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 1, 2020 3:23 pm

Web Title: central railway allows inter district person movement as part of unlock 4 scsg 91
Next Stories
1 ती व्यक्ती मुलींसाठी फार धोकायदायक; राम कदमांचे आभार मानणाऱ्या कंगनाला काँग्रेसचा सल्ला
2 ‘टोसिलीझुमॅब’ इंजेक्शनसाठी तगादा लावणाऱ्या डॉक्टरला सेवेतून काढलं
3 यंदा ना ढोलताशांचा गजर, ना भक्तांचा गरडा; करोनामुळे बाप्पाला साधेपणाने निरोप!
Just Now!
X