संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी सोमवारी महाराष्ट्रातील भाजपा कार्यकर्त्यांना व्हर्च्युअल रॅलीच्या माध्यमातून संबोधित केलं. राजनाथ सिंह यांनी रॅलीतून काँग्रेसवर टीका केली होती. “राहुल गांधी जबाबदारी झटकत आहे. जबाबदारी न घेता सत्ता हवी, हीच काँग्रेसची प्रवृत्ती राहिली आहे,” असा घणाघात सिंह यांनी केला. सिंह यांनी केलेल्या टीकेला काँग्रेसनंही उत्तर दिलं आहे. त्याचबरोबर राजीनामा देण्याची मागणी केली आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील एनडीए सरकारची वर्षपूर्ती झाल्यानिमित्तानं भाजपानं देशभरातील राज्यांमध्ये व्हर्च्युअल रॅली आयोजित केल्या आहेत. भाजपाचे नेते या रॅलीतून संवाद साधत असून, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यापाठोपाठ संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी महाराष्ट्रात व्हर्च्युअल रॅली घेतली. राजनाथ सिंह यांच्या रॅलीनंतर काँग्रेसनं टीका केली आहे. “चीन भारताची सीमारेषा पार करून ६० किलोमीटर आत आला. ते यांच्या गावीही नव्हते. नेपाळ भारताकडे डोळे वटारून पाहत आहे. याची जबाबदारी संरक्षण मंत्र्यांनी घेऊन आधी राजीनामा दिला पाहिजे,” अशी टीका काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी केली आहे.

आणखी वाचा- सरकारला सर्कस बोलणार्‍या राजनाथ सिंग यांचे हे ‘अनुभवाचे बोल’ : नवाब मलिक

काय म्हणाले होते राजनाथ सिंह?

काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी महाविकास आघाडी सरकारबद्दल केलेल्या विधानाचाही राजनाथ यांनी समाचार घेतला होता. “राज्याच्या सत्ताधारी आघाडीत काँग्रेस सहभागी पण, निर्णयप्रक्रियेत नाही असे राहुल गांधी म्हणतात. याचा अर्थ काय? संकटाच्या सत्ताकाळात सरकारी कामाशी काँग्रेसचा संबंध नाही असे कसे चालेल? जबाबदारी न घेता सत्ता हवी, हेच काँग्रेसची वृत्ती राहिलेली आहे. या सरकारमधील तीनही पक्षांतील नेते वेगवेगळे बोलतात. सत्ता सुखासाठी नव्हे, लोकांच्या सेवेसासाठी असते, हे काँग्रेस विसरला आहे. काँग्रेस पूर्ण दिशाहिन झालेला आहे,” अशी टीका राजनाथ सिंह यांनी केली होती.